Skip to content Skip to sidebar Skip to footer

गोड बातमी

©️®️सायली

चाळीतल्या दोन खोल्यात त्यांचा संसार नेटाने सुरू होता. लग्न होऊन जेमतेम दोनच वर्ष झाली होती. कधीकधी धुसफूस चालायची दोघांत. मात्र लगेच राग विसरून ती पुन्हा नवऱ्याच्या पाठीशी उभी राहायची. प्रेमविवाह होता त्यांचा. गुपचूप लग्न केले होते दोघांनी. कारण दोघांच्या घरचे जुन्या वळणाचे. त्यांनी यांच्या लग्नाला परवानगी दिली नाही. शिवाय या दोघांशी सगळे संबंधही तोडून टाकले होते.

तिचं काळीज मात्र तीळतीळ तुटायचं. आपल्या वडिलांची, दादा -वहिनीची तिला आठवण यायची.
तिचं आपल्या नवऱ्यावर जितकं प्रेम होतं, तितकंच घरच्यांवरही होतं.

तिची आई तिला कधीतरी चोरून भेटायची. शेजारच्या सुमीकडून ‘गणपतीच्या मंदिरात भेटायला ये ‘म्हणून चिठ्ठी पाठवायची. शेवटी आईचं काळीज होतं. आपली मुलगी सुखात आहे हे पाहून तिला बरं वाटायचं. आई म्हणायची, “तुझे वडील चिडतील मी तुला भेटते हे पाहून. ते किती कडक आहेत माहिती आहे ना तुला? खूप चिडले आहेत ते तुझ्यावर. आता सगळ्याच कामातून त्यांनी अंग काढून घेतले आहे. म्हणतात, ‘हा म्हातारा आता जड झाला आहे सगळ्यांना. साऱ्यांनी आपल्या मर्जीप्रमाणे वागायचे ठरवले आहेच, तर तुमचे तुम्ही बघा. मला काही एक विचारायचे नाही आता.’ आपण दोघी भेटतो हे कुणी पाहिलं, तर उगीच पुन्हा वाद नकोत.

पण तुम्ही दोघे कायम सुखात राहा आणि जावईबापूंना माझा आशीर्वाद सांग.” निघताना हे वाक्य आई न चुकता बोलायची.

तिला खूप वाटायचं, सासरी जावं आणि साऱ्यांची माफी मागावी. दुरून का होईनात, आपले सासरच्या लोकांशी चांगले संबंध असावेत. ती आपल्या डोळ्यातलं पाणी लपवत नवऱ्याला विचारायची, “तुम्हाला नाही का हो घरच्यांची आठवण येत?”
न लपलेलं तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून नवरा म्हणायचा, “अगं जातीपातीच्या भिंती ओलांडून आपण लग्न केलं. या भिंती ओलांडून ते इतक्या सहजा सहजी आपल्या जवळ नाही येणार. आपण दोघे आहोत ना एकमेकांसाठी? मग आणखी कोण कशाला हवे?”

दिवस सरत होते आणि गेले सहा महिने दोघे ज्या बातमीची वाट पाहत होते, अचानक ती बातमी ऐकून दोघांनाही खूप खूप आनंद झाला. ती ‘आई’ आणि तो ‘बाबा ‘होणार होता! आयुष्यातली सर्वात मोठा आनंद देणारी ही बातमी आपल्या आईला कधी सांगते, असे झाले होते तिला!

पण गेले कित्येक दिवस आई भेटलीच नव्हती.
एक दिवस न राहवून ती गणपतीच्या मंदिरात गेली. योगायोगाने सुमीही तिथे आली होती. तिने आईसाठी चिठ्ठी लिहून गपचुप सुमीकडे दिली.

चिठ्ठी घेउन सुमी गेली ती गेलीच. ना परत आई भेटायला आली, ना तिचा निरोप आला आणि पुन्हा सुमीची भेटही झाली नाही. आता आईला भेटायचे तरी कसे? आणि घरी जावे तरी पंचाईत. आईला काही झाले तर नसेल? की आणखी कोणाला काही..? तिच्या मनात विचित्र शंका घर करू लागल्या.

चार दिवस कसाबसा तिने दम धरला. पाचव्या दिवशी मात्र ती आपल्या माहेरी जायला निघाली. चार पावलं जाते ना जाते तोच मागून आवाज आला, “अगं कुठे निघालीस? अशावेळी सोबत हवी कोणाची तरी. एकटीने जाऊ नये गं.”

आवाजासरशी तिने मागे वळून पाहिले, तर मागे तिचे आई आणि बाबा दोघेही उभे होते. आपल्या बाबांना पाहून तिच्या मनात भीती, आनंद, उत्सुकतेचे भाव दाटून आले. तिने प्रश्नार्थक नजरेने आईकडे पाहिले, तशी आई म्हणाली, “अगं सुमीने आणलेली तुझी चिठ्ठी नेमकी यांच्या हातात पडली. ती चिठ्ठी वाचून त्यांनी बाजूला ठेऊन दिली. मग चार दिवस कोणाशी काहीच बोलले नाहीत. नंतर इतकेच म्हणाले, ‘मला ही आठवण येते माझ्या लेकीची. वरून जरी कडक दिसत असलो, तरी बाप आहे मी तिचा.’

मला कोण आनंद झाला! कधी एकदा भेटते तुला असं झालं होतं गं. आज मी इकडे यायला निघाले तर पाठोपाठ हेही आले. म्हणाले, मी ही येतो तुझ्यासोबत. होणारा आजोबा म्हणून तिच्या आनंदात सहभागी व्हायचं आहे मला.” इतके बोलून आईने पदराने डोळे पुसले.

तशी ती आपल्या बाबांना बिलगली.

“आपली मुलं मोठी झाल्यावर त्यांना निर्णय घेण्याचे स्वतंत्र द्यावे, हे जितके खरे तितकेच मुलांनीही एखादा निर्णय घेताना, आपल्या आई -बापाला विश्वासात घ्यावे हे ही खरे. समाजाने बनवलेले अलिखित नियम एक सामान्य माणूस सहजासहजी मोडू शकत नाही बाळा.
मग अशा वेळी मुलांना वाटतं आम्ही बरोबर आणि आई -वडिलांना वाटतं आमचंच बरोबर. आपली लेक सुखात असावी इतकीच इच्छा असते त्यांची.” बाबा आपल्या लेकीला जवळ घेत म्हणाले.

“बाबा..माझं चुकलं..खरचं. मला माफ करा. मलाही तुमची खूप खूप आठवण येते.” असे म्हणत बराच वेळ ती स्फुंदत राहिली आणि बाबा तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवत राहिले.

नंतर तिने आग्रहाने आई – बाबांना आपल्या घरी नेले. ‘आपली लेक संसार मांडण्याइतपत मोठी झाली!’ टापटीप ठेवलेले घर दोघेही कौतुकाने घर न्याहाळत राहिले.

इतक्यात तो ऑफीसमधून घरी आला आणि अचानक तिच्या आई -वडिलांना समोर पाहून दरवाजातच थबकला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचल्यासारखे करत तिचे बाबा एकदम पुढे होत म्हणाले, “आत या जावईबापू.” तसा तो आणखीनच भांबावला. त्याने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिले. तिने डोळ्यांनीच ‘सारं काही अलबेल असल्याचे’ सांगितले. आता त्याला थोड हायसं वाटलं.

आत येऊन त्याने माफी मागत आपल्या सासू -सासऱ्यांचे पाय धरले. तसे त्याचा हात आपल्या हातात घट्ट पकडत तिचे वडील म्हणाले, “जावईबापू, झालं- गेलं विसरून जाऊ. आमच्या मनात राग नाही तुमच्याबद्दल. आमची लेक सुखात आहे, यापेक्षा आम्हाला अजून काय हवं?”
पण एक अट आहे आमची!” तसा तो गोंधळाला.
“आमच्या पहिल्या -वहिल्या नातवंडाचे लाड त्याच्या आजोळीच होणार बरं का!” असे म्हणत तिचे वडील कितीतरी मोठ्यांनी हसले.
तसा तो काहीसा लाजला.

आणि काही वेळातच जावई आणि सासरेबुवांची गट्टी जमली. हे पाहून तिच्या मनावरचं ओझं उतरलं. ‘आता ही ‘गोड बातमी ‘ सासरच्या मंडळींपर्यंत नक्कीच पोहोचवायला हवी.’ असे मनाशी म्हणत ‘ती’ कौतुकाने दोघांना न्याहाळत राहिली बराचवेळ.

समाप्त.
©️®️सायली

==================

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.