Ritbhatmarathi

Search
Close this search box.

नमिता एका कॉर्पोरेट सेक्टर मध्ये रुजू होऊन फक्त दिड महिनाच झाला होता…नमिता एक अनुभवी आणि डबल ग्रॅज्युएट मुलगी साधारण वय बावीसच्या आसपास…दिसायलाही आकर्षक…कुठलाही पुरुष पटकन आकर्षित होईल असं नमिताचं व्यक्तिमत्व…दिसण्यात जेवढी गोड तेवढीच बोलायलाही लाघवी आणि सुस्वभावी मुलगी…एका खासगी कंपनीमधून कामाचा अनुभव घेऊन कॉर्पोरेट सेक्टर जॉईन केलं होतं…गुडघ्यापर्यंत असलेली आपली लांबसडक आणि दाट असलेली वेणी सावरत ऑफिस मध्ये यायची सर्वांचे लक्ष फक्त नमिताकडेच असायचे त्यावेळी नमिताला ऑफिस नवीन असल्याने रुळायला थोडा वेळा लागला…सर्वात आधी नमिताची मुलाखत झाली ते सर म्हणजे नमिताचे सिनिअर सहकारी होते…सरांचं नाव होतं ‘ अनिल देशमुख ‘ खूप मनमोकळ्या स्वभावाचे ते सर…दिलदार आणि विनोदी स्वभावाचे असे अनिल सर होते आणि सर्वच कर्मचाऱ्यांना आदराने संबोधायचे तसंच अनिल सरांच्या नरमाईने बोलण्याचाही कित्येक जण फायदा घेत असे…म्हणून कधी  कधी कठोरही व्हावे लागायचे…कधीतरी अनिल सर एकदम तडकाफडकी बोलायचेही….

ऑफिसमध्ये नेहमी कुणाची ना कुणाची चहा देण्याची टर्न असायची अनिल सरांना चहा सांगायची कुणाचीही टाप नसायची कारण अनिल सर काही ना काही तरी खोचकपणे बोलून जायचे…सरांच्या मनात असलं तरच स्वतःहून सर चहा सर्वांना द्यायचे…असेच एक दिवस नमिताने आपल्या सरांना सर्वांच्या वतीने चहाची नाही तर थेट कॉफीची मागणी केली…

नमिता – काय मग सर…आजची  कॉफी तुमच्याकडून सर्वांना…

अनिल सर – शुअर….व्हाय नॉट…

असं म्हणून अनिल सरानी सर्वांसाठी कॉफीची ऑर्डर दिली…एव्हढ्याशाच कृतीने मात्र ऑफिसमधल्या सर्वांच्या मनात किल्मिष निर्माण होऊ लागली कारण अनिल सर कधीच कुणाच्या सांगण्यावरून चहा किंवा कॉफी देत नव्हते…दिलीच तर स्वतःहून द्यायचे आणि आज तर चक्क नमिताच्या सांगण्यावरून सर्वांना कॉफी देऊ केली…हि गोष्ट पाहून रानडे सर खोचकपणे म्हणाले…

रानडे सर – हम्म…आम्ही कुठली माणसं…त्यास सुंदर मुलीने तिची इच्छा सांगितली म्हणून सर्वांवर मेहेरबान झालात हा भेदभाव नाही तर काय आहे…

अनिल सर –  असं काहीही नाहीय…आणि ती सुंदर मुलगी काय…? नाव नाही का तिला…

रानडे सर – हा…नमिता देसाई…चांगलंच गुंडाळलं बाबा तुम्हाला…आम्हाला एवढ्या वर्षात नाही जमलं ते हिन करून दाखवलं बुवा…कमाल आहे…

अभिमन्यू – अनिल सर…तुम्ही ना ग्रेट आहेत घरवाली-बाहरवाली  करायचा विचार आहे की काय…? [ हसून ]

अनिल सर –  माणसाचं आयुर्मान मुळात आहेच असं कितीसं ? त्यातलं निम्म्यापेक्षा अधिक संपलेलं आहेच…पुढच्या आयुष्याची कुणी शाश्वतीही देऊ शकत नाही…संशयाने आणि मत्सराने असं आयुष्य घालवण्यापेक्षा आनंदाने घालवावे… स्वतः आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदी राहू द्या की…

रानडे सर – अहो पण अनिल सर…एक तर तुम्ही याआधी कुणी सांगितलंय म्हणून चहा ऑर्डर केला नाहीत आणि आज अचानक एकदम नमिता मॅडम ने सांगितलं म्हणून हुक्की आली

अनिल सर – संपूर्ण दिवसाचा चोवीस तासांचा विचार केला तर जागेपणी आपण घरापेक्षा ऑफिसमध्ये जास्त असतो…ऑफिसमधले लोक सुद्धा आपले सदस्यच आहेत तेव्हा आपण एकमेकांच्या सुखात सहभागी व्हायला हवं….आपण निर्मळ मनाने ऑफिसमधल्या सहकार्यांना चहा,कॉफी असं दिल तर तो आनंद शाश्वतच राहील….त्याकडे संशयाने पाहून दुधात मिठाचा खडा टाकणारा माणूस स्वतः कधी आनंदी राहत नाही आणि तो माणूस दुसऱ्यांनाही कधी आनंद देऊ शकत नाही….

अनिल सर बोलत असतानाच ऑफिसमधला ऑफिसबॉय आला आणि म्हणाला….

ऑफिस बॉय – काय समजलं का रानडे सर….प्रत्येक गोष्टीकडे संशयाने पाहणं सोडून द्या…

आपण चहा ऑर्डर करायला सांगितला म्हणून अनिल सरांना एवढं ऐकावं लागतंय हा विचार करत हिरमुसली आणि रडवेली होऊन नमिता आपल्या डेस्क च्या इथे बसली होती…अनिल सर नमिताच्या शेजारी आले आणि म्हणाले…

अनिल सर – नमिता मॅडम …घ्या कॉफी घ्या…

नमिता – सर…आज माझ्यामुळं तुमच्याबद्दल सगळे वाईट साईट बोलतायत….खरंच माझंच चुकलं…मी असं सर्वांसमोर बोलायला नको हवं होतं…

अनिल सर – मॅडम…तुम्ही खूप विचार करत आहात…असं त्यांना वाटतंय पण खरं पाहिलं तर तसं काहीच नाहीय…तुम्ही अगदी आपलेपणाने आणि निर्मळ भावनेनन मला चहा साठी ऑर्डर करा असं सांगितलं पण इतरांना ती गोष्ट खुपली…खरं तर तुम्ही सुद्धा अगदी फ्रॅंक आहात…तुम्ही नवीन आहात म्हणून या

सगळ्यांना माहिती नाहीय पण एका इंटरव्हियू मध्ये मी हि गोष्ट पटकन हेरली…म्हणून मला तुमचा स्वभाव पटकन समजला…

नमिता – हो ना लोक असे असतात की उदाहरण देते…साधे बहीण भाऊ जरी एका बाईक वरून चालले असतील तरी त्यांच्याकडे संशयाच्या नजरेने पाहतात…

अनिल सर – अगदी साजेल असं उदाहरण दिलंत मॅडम तुम्ही…आपण स्वतः ठाम राहायचं…उगाच लोक काय म्हणतील याचा विचार करू नये एवढं मला म्हणायचं आहे…

अगदी त्या दिवसापासून त्या ऑफिसमध्ये कुणी कुणाशी संशयाने आणि मत्सराने कधीच वागलं नाही… खरंच अशी कितीतरी उदाहरण आपल्या आजूबाजूला घडत असतात…आपण फक्त आनंद घ्यायचा आणि आनंद द्यायचाही उगाच आनंदात मिठाचा खडा टाकण्यात काहीच अर्थ नसतो…