घुंगुरवाळा

©️®️ सौ.गीता गजानन गरुड
भला थोरला वाडा इनामदारांचा..नोकरचाकर,परसदारी बाग,आमराई,शेती सारं काही होतं म्हणूनच तर सुर्याच्या आजोबांनी डोळे झाकून त्यांची कन्या सुकेशिनी या आडगावात दिली होती.
दादासाहेब इनामदार, गावातली बडी आसामी. कोणाच्याही अडीअडचणीला धावून जायचा त्यांचा स्वभाव होता पण वाड्याला जणू एक शाप होता..दादासाहेबांची पत्नी पहिल्या बाळंतपणात त्यांना सोडून गेली..दादासाहेबांनी त्यांच्या मुलास,उल्हासास तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. कर्तासवरता झाला तसे त्याचे दोनाचे चार हात करुन दिले न् सुकेशिनी घरात आली..तिच्याबाबतीत पुरेपूर दक्षता घेऊनही..ती बाळंतपणात तान्ह्या लेकराला पाठी ठेवून सासूच्या वाटेने गेली. याचवेळी इंदी बाळंत झाली होती..तिला खूप वाटायचं, मालकीणीच्या तान्ह्या लेकराला छातीशी घ्यावं पण जातीचा अडसर होता..मालकीणीचं बाळ क्रुश होत होतं..शेवटी एकदा तिने मनाचा हिय्या करुन उल्हासरावांना विचारलं,”भाऊ,मी छातीशी लावू याला..”
भाऊंनी तिच्यापुढे हात जोडले न् ते इवलं बोचकं इंदीच्या स्वाधीन केलं. इंदीने त्या बाळाला पदराखाली घेतलं..बाळ चुटूचुटू दूध पिऊ लागलं,पदराशी खेळू लागलं. त्याचं तेजस्वी रुपडं पाहून इंदीने त्याचं नाव सुर्या ठेवलं. इंदीचा वाघ्या न् मालकीणबाईचा सुर्या दोघं एकत्र वाढू लागले. वाघ्या काळाठिक्कर तर सुर्या तेवढाच गोरापान. दोघांची मैत्री अभेद्य होती. उल्हासरावांनीही त्या दोघांत कधी दुजाभाव केला नाही. जे जे सुर्यासाठी आणत तेच वाघ्यासाठीही घेऊन येत.
इंदी वाड्यावरच रहायची. पहाटे उठून झळझळीत केर काढायची. शेणसडा शिंपडायची, दळणकांडण करायची..तिच्या ओवीच्या सुरांनी वातावरण प्रसन्न व्हायचं. अशा या लक्ष्मी जशा इंदीचा नवरा ,ती पाच महिन्याची गर्भार असताना तिला का सोडून गेला..हे एक कोडंच होतं. इंदी हातावर हात धरुन बसली नाही. आपल्या होऊ घातलेल्या लेकरासाठी पदर खोचून कामाला लागली होती. मालकीणबाईंकडे धारा काढायला यायची ती. तिची स्वच्छता,नीटनेटकेपणा,आपलेपणानं काम करण्याची व्रुत्ती हेरुन मालकीणबाईंनी तिला स्वैंपाकघरातील कामाला ठेवून घेतलं होतं. इंदीचा नवरा परागंदा झाल्यापासनं मालकीणीने इंदीला लहान बहिणीप्रमाणे जपलं होतं. श्रीमंतगरीब असा भेदभाव केला नव्हता.
दोघींचेही दिवस भरत आले होते. इंदी काटकीवानी होती. रात्री लघुशंकेला म्हणून गेली आणि तिथेच बाळंत झाली. सुईणीला बोलावून नाळ वगैरे कापून घेतली.
मालकीणबाई तेंव्हा माहेरी गेली होती,बाळंतपणासाठी..तिकडून निरोप आला..लगेच निघून या..आणि मग दादासाहेब व उल्हासराव भल्या पहाटे निघून गेले होते..मालकीणीच्या माहेरघराला मरणकळा आली होती. समोर वीसपंचवीस माणसं खाली मान घालून उभी होती. उल्हासरावांना नक्की काय झालंय समजत नव्हतं पण सजलेली गौराई जशा पत्नीचं कलेवर अंगणात पाहिलं नि ते तिथेच बेशुध्द होऊन पडले. कांदा काय न् डॉक्टरी उपचार काय..तासाभराने उल्हासरावांना जाग आली तेंव्हा पत्नीच्या कलेवराला मिठी मारुन त्यांनी टाहो फोडला होता..सगळं भागवून घरी येऊन बसले असता कुणीतरी ते तान्हुलं अर्भक त्यांच्या मांडीवर आणून ठेवलं होतं..जुन्याजाणत्यांनी उल्हासरावांना उपदेश दिले,”आता शोक आवर,उल्हासा..या बाळासाठी शोक आवर नि पुन्हा जगू लाग.”
परतताना सासू, मुलाला आमच्याकडेच राहू द्या. तुम्ही दुसरं लग्न करा म्हणाली पण उल्हासरावांनी त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केलं व बाळाला घेऊन घरचा रस्ता धरला. शेळीचं दूध लावायचं ठरलं पण बाळाला ते पचेना. गाईचं,डब्याचं..कोणतही दिलं तरी उलटी काढू लागला..अशावेळी इंदीने सुर्याला पदराखाली धरलं होतं.
सुर्या नि वाघ्या दोघंही वाड्यात हुंदंडत असायचे. नदीत सूर मारायचे. मल्लखांब खेळायचे. तालमीलाही जाऊ लागले.
वयोमानापरत्वे दादासाहेबांना देवाज्ञा झाली आणि वाड्याची जबाबदारी उलवहासरावांच्या खांद्यावर पडली.
वाघ्याचं लग्न गावातल्या जगन्नाथाच्या रखमीशी जुळलं. उल्हासराव इनामदारांनी वाघ्याच्या लग्नाचा खर्च उचलला. वाघ्याला शेतात घर बांधून दिलं. वाघ्याच्या डोक्यात पुस्तकातील धडे शिरत नसले तरी शेतीच्या कामात तो हुशार होता. ओसाड जमीन खणून त्यात त्याने विशिष्ट अंतरांवर खड्डे केले,भोवताली आळी केली. प्रत्येक खड्ड्यात माती,शेणखत टाकून त्यात गुलाबाची रोपं लावली. इनामदारांना त्याचं हे काम आवडत होतं..ते कधीतरी बागेत जायचे, वाघ्याच्या घामाने चकचकत्या पाठीवर हात फिरवायचे.
काही महिन्यांत रोपांना कोवळे धुमारे फुटले..कळ्यांचे घोस आले. एकेक कळी उमलू लागली..स्वर्गलोकीचं नंदनवनच जणू..रक्तासारखा लालभडक गुलाब,पिवळा,गुलाबी,पांढरा..किती ते रंग अन् रंगांच्या छटा..त्यावर बागडणारी इवलाली सोनसळी फुलपाखरं. गुलाबं टेंपोत भरुन फुलमार्केटला जाऊ लागली.
जास्तच फुललेल्या गुलाबांच्या पाकळ्या चिरुन, सतरंजीवर वाळत घालून काचेच्या बरण्यांत पाकळ्यांचा थर वर साखरेचा थर..असे एकावर एक थर रचून बरण्या उन्हात मांडल्या जात होत्या. यात गावातल्या बायांनाही रोजगार मिळाला. गुलकंद बाटल्यांत भरुन आयुर्वेदिक दुकानात विक्रीकरता जाऊ लागल्या.
सुर्याही मार्केटिंग मेनेजमेंटचं शिक्षण घेऊन आला. त्याला नोकरी मिळत नव्हती. अशात गावातल्या चांडाळचौकडीने त्याचे कान भरले की वाघ्या नि त्याच्या आयशीने तुमच्या जमिनीवर कब्जा केला. काही वर्षांत तुला घराबाहेर काढतील. तरुण रक्त अंगात शिवशिवत असतं तेव्हा माणूस तर्कसंगत विचार करत नाही. कुणी तरी इंदीचे न् उल्हासरावांचे प्रेमसंबंध असल्याचंही विपवलं.
झालं , सुर्या पिसाळला. दारु पिऊन ओसरीवर आला नं अतिशय घाण शिव्यांनी इंदीची निर्भस्तना करु लागला. उल्हासरावांनाही नाही नाही ते बोलला. दुसरं बिर्हाड करुन बाळगताय म्हणू लागला.
उल्हासरावांनी सुर्याच्या कानफटात लगावली. खुंटीवरचा चाबुक काढला न् सुर्यावर आसूड ओढणार तोच वाघ्याने आपली पाठ पुढे केली न् ते फटके खाल्ले.
“ही..ही नाटकं,”म्हणत सुर्या त्याच्या खोलीत निघून गेला. त्यारात्री वाघ्याने रखमी व आईला घेऊन ते घर सोडलं. जुन्या वस्तीत आले. घर मोडकळीस आलं होतं. ते पाडलं नि रात्रंदिवस घाम गाळून,पाणी शिंपून स्वत:चं घर उभारलन. ते तयार होईस्तोवर वाघराच्या,सरपटणाऱ्यांच्या भितीने घरातील माणसांना रात्ररात्र नीज नसे.
रखमीने कोंबड्या पाळल्या..विकू लागली..हळूहळू बकऱ्या घेतल्या. घराच्या अवतीभवती मांडव बांधून त्यांवर घोसाळी,शिराळी,पडवळ,कारली असे वेल चढवले. वेलींना फुलं फुलू लागली. मांडव फळभाज्यांनी लोंबू लागला.
वाघ्याचा फुलांचा व्यवसाय सुर्याने करायला घेतला..पण रोपांची हवी तेवढी जपणूक नं झाल्याने कळ्यांना किडी खाऊ लागल्या. उमलण्याआधीच कळ्या गळू लागल्या. सुर्याची फुलबाजारातील व्यापारी गिर्हाइकं तुटली.
सुर्याने रागात पुरी बाग उखडून टाकली. उल्हासरावांशी संभाषण नव्हतच. एकटा पडला. कान भरवणाऱ्यांनी पाठ फिरवली. लांब जाऊन याची फजिती बघू लागली. सुर्याने कलमं लावण्यासाठी कर्ज घेतलं..कलमं लावलीही परंतु, दुष्काळ पडला न् कलमंही उन्हात करपली. कर्जाचे हफ्ते थकले. घरावर जप्ती येणार होती. उल्हासरावांनी अंथरुण धरलं.
वाघ्याला न् रखमीला रहावलं नाही. त्यांनी कर्जफेड केली. सुर्याला काय बोलावं समजेना. वाघ्यारखमीसमोर त्याने स्वतःच्या तोंडात मारुन घेतलं. इंदीचे पाय धरले. उल्हासरावांना गळामिठी घातली. वाघ्याने दोन्ही हात पुढे करुन सुर्याला मिठीत घेतलं. एक संशयाचं वादळ आलेलं ते बरीच धुळधाण करुन गेलं..आता मात्र दोन जीवलग मित्रांची दोस्ती नव्याने बहरणार होती,फुलारणार होती. दोघांच्या अंगीभूत गुणांचा वापर भुईचं नंदनवन करण्यासाठी होणार होता.
वाघ्या व सुर्या दोघांनी मिळून जमिनीची मशागत करायला प्रारंभ केला. रखमीही त्यांना जमेल तशी शिंपणात मदत करत होती. नर्सरीतून कलमं आणून लावली गेली. डोळ्यात तेल घालून दोघं मित्र कलमांची, पोटच्या पोराप्रमाणे काळजी करु लागले.
कलमांनी माती धरली. लाल कोवळी पालवी फुटली. प्रांगणात रांगेत मुलं उभी रहावीत तशी शिस्तीत कलमं उभी ठाकली होती,वाढत होती, पहिला मोहर आला न् सगळा परिसर त्या स्रुष्टीवैभवाने गंधाळून निघाला. छोट्या,छोट्या बाळकैऱ्या लगडू लागल्या. इंदीच्या,उल्हासरावांच्या डोळ्याचं पारणं फिटलं.
“आता मुलाचं मनावर घे बाई!”इंदी रखमीला बोलली. तशी रखमी लाजली.
“आयत्या घरच्या कैऱ्याबी तयार झाल्यात..” इंदीने परत खडा टाकला तसं रखमीने आपला चेहरा झाकून घेतला.
“म्हणजे, आम्हाला अंधारात ठेवून..”
“तसं नाही सासूबाई. हेच म्हनले. म्हयना जाऊंदेत मग सांगू.” रखमी हळू आवाजात बोटाने जमीन रेखीत म्हणाली.
“बरं बरं. आता जपाया हवं तब्येतीला. त्या उंडग्यांसंगती काट्याकुट्यातनं फिरु नुको. घरातलीच कामं करीत जा बाय.” इंदी म्हणाली तशी रखमीने मान डोलावली.
सुर्यासाठीही स्थळ सांगून आलं. वडगावच्या शाळामास्तरांची लेक,मालती ढेकणे..धुमधडाक्यात लग्न लावलं..सुर्याच्या लग्नात वाघ्या, पाठच्या भावासारखा वावरला. सुर्याने आपल्या आईचं नाव ठेवलं, बायकोला.
सुर्याची सुकेशिनी घरात नांदू लागली. नावाप्रमाणेच लांबसडक केस होते तिचे. तिला एकटीला कधी धुवायला जमलेच नव्हते. आता तिला न्हाणं घालण्याचं काम इंदी हौसेने करु लागली. रखमीला ती न्हाऊ घालायचीच..आता सुकेशिनीलाही न्हाऊ घालू लागली. रिठा,शिकाकाई,आवळापावडर,नागरमोथा भिजत घालून
त्याने सुकेशिनीचे लांबसडक केस धुवू लागली. कोवळ्या उन्हात तिचे केस वाळवून चांगला जाडजूड शेपटा बांधू लागली.
आठवा महिना लागला न् रखमीच्या पोटात अचानक दुखू लागलं..रखमी घामाघूम झाली. गाडी करुन तिला इस्पितळात न्हेलं खरं पण डॉक्टरांनी कुणा एकालाच वाचवता येईल असं सांगितलं. इंदीने,”डॉक्टर,माझ्या सुनेला वाचवा,”असं कळवळून सांगितलं. रखमी वाचली खरी पण आता ती आई होऊ शकणार नव्हती. इंदी तिला अधिकाधिक जपू लागली. तिला ताकद येण्यासाठी गरमागरम दुधात भाकरी चुरुन खाऊ घालू लागली.
सुकेशिनीला कोरड्या उलट्या होऊ लागल्या तसं रखमीच्या अंगावर सरकन काटा आला. तिने उगाचच आपली रिकामी कुस चाचपली नि भरुन आलेले डोळे निपटले. काही दिवसांतच सुकेशिनी माहेरी गेली.
सुकेशिनीच्या बाळंतपणाची उल्हासरावांना काळजी लागून राहिली होती. पुन्हा तसाच फेरा येऊन वाड्याच्या सुनेला घेऊन जाणार की काय या विचाराने उल्हासरावांना नीज येत नसायची. सुकेशिनीच्या घरुन निरोप आला,तिला इस्पितळात भरती केलय म्हणून नि इकडे उल्हासराव पडवीत येरझारा घालू लागले..सगळे देव आठवून झाले आणि सुर्या धापा टाकत आला..”भाऊ, तुम्ही आजोबा झालात. मला मुलगा झाला. बाळ, सुकेशिनी अगदी खुशाल आहेत.” उल्हासरावांच्या जीवात जीव आला. देवाजवळ पेढे ठेवून उल्हासरावांनी हात जोडून नमस्कार केला. गावात सगळ्यांचं तोंड गोड केलं.
आता नातवाच्या,सुनेच्या आगमनाची ओढ लागली होती, पण सुकेशिनीची आई तिला सासरी पाठवायला नाखूष होती..वाड्यात ओली बाळंतीण जाते याचा धसका त्या माऊलीने घेतला होता. शेवटी सुकेशिनीपुढे तिचं काही चालेना तरी ती सुकेशिनीसोबत वाड्यावर आली.
सुकेशिनीला दूध पाजताना पाहून रखमीचा पान्हा भरुन येई. ती सारखी अनिमिष नेत्रांनी बाळाकडे बघे. इंदीलाही रखमीचं हे असं टुकत रहाणं आवडत नव्हतं. सुकेशिनीच्या आईने रखमीला बाळाला घेताना टोकलच,”रखमे,हो बाजुला. तू घरातली इतर कामं करायची. बाळाला घ्यायला आम्ही आहोत.”
रखमीला तिची रिकामी कुस अधिकच प्रकर्षाने जाणवली. गळ्यात दाटून आलेला हुंदका दाबून धरत ती बाळंतिणीच्या खोलीतनं बाहेर पडणार इतक्यात सुकेशिनीने स्वतः उठून बाळाला रखमेजवळ दिलं,”घे बाई,काकूची आठवण काढतोय गुलाम. काकू, मला न घेतल्याशिवाय कशी गेली विचारतोय बघ..” असं सुकेशिनी लाडे लाडे म्हणताच बाळानेही आssआ करत अनुमोदन दिलं. रखमीचा पदर गरमओला केला. रखमीने पटापटा बाळाचे मुके घेतले.
उल्हासराव,इंदी भरल्या डोळ्यांनी सुनबाईचा कनवाळूपणा पहात होते. बाळाचा घुंगुरवाळा छन छन करत होता..त्या नादसुरांत घर प्रसन्न हसत होतं.
©️®️ सौ.गीता गजानन गरुड.
=======================
फोटो साभार – गूगल
तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा.
ई-मेल : ritbhatmarathi@gmail.com
फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/