Skip to content Skip to sidebar Skip to footer

वर्षातुन एकदा येणारा, साडेतीन मुहूर्तापैकी एक आणि उत्साहाच्या वातावरणाने भरलेल्या या सणाची माहिती घेऊया ……

ghatasthapana in marathi : आपल्या भारतीय संस्कृतीला सण आणि उत्सवांचा वारसा लाभला आहे. सगळे सण खूप प्राचीन काळापासून आजपर्यंत चालत आलेले आहेत. दिवसेंदिवस या सणांचा उत्साह आणि उत्सुकता वाढतेच आहे. यातील काही सणांना अतिशय महत्त्वाच्या साडेतीन मुहूर्तापैकी एक असे स्थान दिले जाते. उत्साहाचा, गरब्याचा, नऊ दिवसांचा, देवीच्या सेवेचा सण म्हणजेच घटस्थापना.

घटस्थापना म्हणजेच नवरात्र म्हणजेच दसरा हा सण खूप महत्त्वाचा आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे. या सणाची सुरुवात प्रतिपदा तिथीला होते, त्याच दिवशी आपण घटस्थापना करतो. हा सण महिलांसाठी जास्तच उत्साहाचा आणि चैतन्यपूर्ण असतो. या काळात महिला नटून थटून रोज गरबा खेळत, गाणी म्हणत देवीची आराधना करतात.

या दिवसात सगळ्यांच्या उत्साहाला उधाण आलेले असते. रोज दोन वेळा देवीची आरती केल्यामुळे घरातील वातावरण कसे पवित्र आणि मंगलमय असते. देवीचा वास घरात असतो त्यामुळे भारावले जातो आपण. पण देवीचे नवरात्र करताना काही नियम पाळणे खूपच गरजेचे असते, आपल्याकडून काही चूक झाली तर नऊ दिवसांचे व्रत निष्फळ ठरते. त्यामुळे काळजीपूर्वक आपण व्रत करायला हवे.

कोणतेही नवरात्र हे साधारणपणे नऊ दिवसांचे असते, पण तिथीचा क्षय झाल्याने ते आठ दिवसांचे, किंवा वृद्धी झाल्यास दहा दिवसांचे असू शकते. चंपाषष्ठीचे नवरात्र फक्त सहा दिवसांचे असते. हिंदु धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. देवीच्या नऊ रूपांची पूजा आपण करत असतो.

१. शैलपुत्री,
२. ब्रह्मचारिणी
३. चन्द्रघंटा
४. कूष्मांडी (किंवा कुष्मांडी)
५. स्कंदमाता
६. कात्यायनी
७. कालरात्री
८. महागौरी
९. सिद्धिदात्री.

आता नवरात्र व्रत करतो म्हणजे नक्की काय करतो ते पाहूया. नवरात्रात प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना केली जाते. त्याविषयी सविस्तर माहिती घेऊया.

करण्यास अतिशय सोपे आणि लवकर फळ देणारे हे व्रत करून सर्व मनोकामना पूर्ण करून घ्या…

जाणून घ्या हरतालिका व्रत कुणी व कसे करावे?

गौरी गणपती सणाविषयी संपूर्ण माहिती

१. सगळ्यात आधी घटस्थापना आपण ज्या ठिकाणी करणार आहोत ती जागा स्वच्छ धुवून घ्यायची आहे.
२. त्यानंतर त्याठिकाणी पाट ठेवायचा आहे.
३. पाटाच्या वरती लाल कापड टाकुन त्याच्याभोवती सुंदर अशी रांगोळी काढुन मस्त सजवायचे आहे.
४. देवीला लाल वस्त्र हे अतिशय प्रिय असतं त्यामुळे देवीच्या आसनावर लाल रंगाचे कापड टाकायचे आहे.
५. आता घटासाठी आपण मातीच मडकं घ्यायचे कारण ते शुभ मानले जाते किंवा मग एक मोठे ताट घेऊन त्यात माती टाकायची अशीही पद्धत आहे.
६. घटस्थापना करण्याआधी गणपती पूजन करायचे आहे. त्यासाठी पाटावर उजव्या बाजूला सुपारी ठेवून त्यावर हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे.
७. त्या ताटावर किंवा मडक्यात देवीचा फोटो किंवा मातीची मुर्ती सुध्दा चालेल.
८. आपण ही स्थापना करत असतांना पानाचा विडा घ्यायचा म्हणजे पानावर स्थापना करायची आहे. त्यानंतर पुजन करून घ्यायचे आहे. हळद, कुंकू लवायचे आहे. ॐ गणेशाय नमः | जय माता दि या मंत्राचा जप स्थापना करतेवेळी करायचा आहे.

९. त्यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची आहे त्यासाठी आपण कलश घेतला आहे तो कलश कोठेही खाली ठेवायचा नाही तो ठेवण्यासाठी छोटे ताम्हण घेउन ताम्हणामध्ये खाली तांदुळ ठेवायचे आहेत व त्यावरती कलश ठेवायचा आहे. त्या कलशामध्ये पाणी घ्यायचे आहे, व त्या कलशाच्या बाहेरील बाजूने हळदी कुकूंने स्वस्तिक काढुन त्या कलशाचे पुजन करून घ्यायचे आहे.

१०. आता त्याच्यामध्ये पाच विडयाची पाने ठेवायची आहेत, त्यासाठी पाच पानांना हळदी कुंकू लावुन ती कलशामध्ये ठेवायची आहेत. हे सर्व झाल्यानंतर देवाच्या ठिकाणी हा कलश आपण स्थापना करायचा आहे व त्यावर नारळ ठेवायचा आहे. नारळावर देखील आपण स्वस्तिक काढुन घ्यायचे आहे. स्वस्तिक काढल्यामुळे ते शुभ प्रतिक मानले जाते. त्यानंतर ही झाली आपली कलश स्थापना आता त्याच्यावर फुल ठेवून नमस्कार करायचा आहे.

११. आता आपण घटस्थापना करून घ्यायची आहे, घटस्थापनेसाठी जो आपण पाट घेतला होत तो पाट ठेवायची आहे. त्या पाटामध्ये एक दोन पेर एवढा उंच मातीचा थर होईल अशी माती टाकायची आहे.

१२. आता त्या पाटात आपल्याला ७ प्रकारचे धान्य जे धान्य आपण घेतले आहे ते टाकायचे आहे. त्याच्यावर पुन्हा थोडी माती टाकायची आहे, त्या मातीमध्ये पुन्हा सगळं एकत्र करून घ्यायचे आहे त्याच्यावर घटाचं मडक ठेवायचं आहे आणि त्या मडक्यामध्ये पाच किंवा सात पान ठेवायची आहेत. त्या मडक्याच्या बाजुला धागा बांधुन घ्यायचा आहे आणि मग आपल्याला नऊ पानांची नऊ फुलांची माळ तयार करायची आहे.

१३. अशी ती नऊ दिवस फुलांची माळ तयार करून बांधायची आहे आणि जी माळ आपण बांधणार आहोत ती माळ आपल्याला घटांमध्ये सोडायची आहे. अशा पध्दतीने नऊ दिवस माळी तयार करायच्या आहेत व घटामध्ये सोडायच्या आहेत आणि घटामध्ये आपल्याला सुपारी व हळकुंड देखील टाकायचं आहे.

१४. त्याच्यानंतर देवीचं ओटीचं साहीत्य समोर ठेवायचे आहे. देवीला सुध्दा हार तयार करून घालायचा आहे, त्यानंतर देवीला फुले, पाच प्रकारची फळे ठेवायची आहेत आणि देवीला नमस्कार करायचा आहे. पानांच्या किंवा फुलांच्या माळी लावायचा आहेत अखंड नऊ दिवस आपल्याला देवीसमोर व घटासमोर दिवा हा तेवत / प्रज्वलित ठेवायचा आहे.

१५. तसेच नऊ दिवस आपल्याला देवीचे नामस्मरण करायचे आहे आणि व्रत करायचे आहे. आपल्या घरावर कुटूंबावर देवीचा आर्शिवाद असावा म्हणून दैनंदिन आपण नऊ दिवस या घटाची पुजा करायची आहे. हे पुजन झाल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर देवीची आरती करायची आहे. धुप, अगरबत्ती लावायची आहे. आपली इच्छा देवीसमोर वक्त करायची आहे अशा पध्दतीने आपली घटस्थापना पुर्ण होईल.

घटस्थापनाचे नऊ दिवस पूर्ण झाल्यावर दशमी म्हणजे दहाव्या दिवशी येतो तो दसरा. दसऱ्याला आपण विजयादशमी असे म्हणतो. विजयादशमी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय, अंधारावर प्रकाशाचा विजय म्हणूनच याला विजयादशमी असे म्हणतात. हा दिवस खूप खास असतो.

या दिवशी आपण मंदिरात जाऊन सीमोलांघन खेळतो. या दिवसाला साडेतीन मुहूर्तापैकी एक मानले गेले आहे. कारण हा दिवस खूप शुभ आहे. कोणतेही चांगले काम करण्यासाठी उत्तम आहे म्हणूनच या दिवशी सोने चांदी खरेदी करतात कारण या दिवशी खरेदी केलेले सोने शुभ तर असतेच शिवाय हे सोने कधीही मोडण्याची वेळ येत नाही असे म्हणतात.

याच दिवशी चामुंडा देवीने महिषासुराचा वध केला तसेच याच दिवशी रामाने नऊ दिवस देवीची आराधना करून तिला प्रसन्न करून घेतले आणि देवीच्या उपासनेने शक्ती निर्माण झाली आणि रावणाचा वध केला. म्हणजेच रामाला विजय मिळाला म्हणून या दिवसाला विजयादशमी असे म्हणतात. म्हणूनच या दिवशी ठिकठिकाणी रावणाच्या प्रतिमेचे दहन करण्याची पद्धत आहे. या दिवशी सीमोल्लंघन,शमीपूजन, अपराजिता पूजा आणि शस्त्र पूजा तसेच व्यापारी लोक दुकानाची पूजा करतात. नवीन गाडी खरेदीसाठी हा दिवस शुभ मानला जातो.

तर अशा प्रकारे देवीची आराधना करून तिला प्रसन्न करून घ्यायचे आणि आपल्या मनोकामना पूर्ण करून घ्यायच्या. तुम्हा सर्वांवर देवीची नेहमीच कृपा राहो ही सदिच्छा.

Leave a Comment

error: