घर जावई

कोकणातली सुंदर सकाळ सुरू झाली होती. सार्या आसमंतात आंबे, फणस, कोकम, जाम याचा वास पसरला होता. एक गोडसर सुगंध वातावरणात भरून राहिला होता. मनुष्य प्राण्यालाच नाही तर इतर प्राणी, पक्षी यांनाही हवंहवंस हे वातावरण होतं. आता नाही म्हणायला थोडा उन्हाचा तडाखा सहन करावा लागत होता, पण उन्हाळ्यात या खाण्यापिण्याच्या चंगळीमुळे उन्हाकडे थोडं दुर्लक्ष करावं लागतं. घराघरात पाहुण्यांची वर्दळ सुरू होती.
‘‘तू कुणाचा गो झिल? तू ठकीची चेडू काय गो?’’ अशा प्रश्नांनी कोकणातल्या माणसांच्यातील प्रेम, माया यांचं दर्शन होत होतं. तर कधी, ‘‘जळलं लक्षण गो तुझ! तिथे कशाला कडमडलीस?’’ अशा करवादण्यामुळे (ओरडण्यामुळे) छोटी मुलं चुपचाप बसत होती.
सर्वत्र अशी धांदल सुरू असताना वैदेही मात्र झोपाळ्यावर आरामात बसून होती. अगदी परवापर्यंत तिच्याकडे पाहुणी होती. नणंद, तिची मुलं, तिचा मुलगा. आज तिला जरा निवांत वेळ मिळाला होता.
वैदेहीचा नवराही वेळ मिळाला म्हणून जरा बागेकडे जाऊन येतो म्हणून सटकला होता. वैदेही निवांत बसली होती. सकाळच्या वेळची आजुबाजूच्या घरातली धांदल बघत. कुणाकडे चूल पेटली होती तर कुणाकडे ढणाणा मोठ्या शेगड्या पेटवून गरे तळण्याचे उद्योग चालू होते. एरवी निवांत असणारं कोकण उन्हाळा, गणपती आणि शिमग्यात प्रचंड गडबडीत असतं.
तर वैदेही अशी निवांत बसलेली असताना, फाटकातून कोणीतरी आत आलेलं दिसलं. तिनं निरखून पाहिलं तर तिला काही ओळख पटेना.
एक वयस्कर गृहस्थ. धोतर, पांढरा शुभ्र सदरा वर गांधीटोपी घालून हळूहळू पावलं टाकत आत आले.
‘‘कोणी आहे का घरात?’’ खणखणीत आवाजात त्यांनी विचारलं.
‘‘कोण हवंय तुम्हाला?’’ वैदेही सौम्यपणे विचारलं.
‘‘तू आमच्या सखारामची सून ना?’’ त्या गृहस्थांनी विचारलं.
‘‘हो हो!, पण मी तुम्हाला …’’
‘‘तू नाहीच ओळखणार मला! सखारामने सांगितलं नसेल तुला माझ्याबद्दल…’’ कोकणी तिरकसपणे ते गृहस्थ बोलले.
‘‘मीच माझी ओळख करून देतो. मी दत्ता, दत्ता गोखले.’
‘‘हा हा. बाबांचे मित्र ना? ऐकलंय खरं बाबांच्या तोंडातून तुमचं नाव!’’
‘‘नशीब! नाहीतर हाताला धरून बाहेर काढायचीस मला!!’’ हसत हसत दत्ता गोखले म्हणाले.
‘‘शुंभ्या कुठे गेला आमचा?’’
‘‘कोण शुंभ्या?’’
‘‘अगो नवर्यास शुंभ्या म्हणतेस?’’
‘‘अहो मला…’’
मग त्यांनी ते वैदेहीच्या नवर्याला शुंभ्या म्हणायचे कारण तो लहानपणी नुसता शुंभासारखा उभा असायचा काम करायचा नाही अशी आठवण सांगितली आणि वैदेहीला हसू आले. दत्ता गोखले फारच मिश्कील होते. वैदेहीने त्यांना बसायला खुर्ची दिली.
‘‘बरं ते सगळं जाऊदे, आमचा तुमच्याकडे नांदायला पाठवलेला तुमचा ‘घरजावई’ कसा आहे? काम करतोय ना व्यवस्थित? तुम्हाला खाऊ-पिऊ घालतोय ना?’’
‘‘जावई? कोण? आमच्याकडे घरजावई कुणीच नाही! परवाच वन्सबाई येऊन गेल्या. तिच्या नवर्याला तर एक दिवसही राहायला वेळ मिळत नाही. आमच्याकडे दुसरा कोणीच नाही घरजावई!!’’
‘‘अगदी वेंधळी हो तू सूनबाई!’’ दत्ता गोखले म्हणाले. ‘‘तुला सांगतो नंतर हे घरजावई प्रकरण काय आहे ते.’’
मग दत्ता गोखलेंनी त्यांच्या आणि वैदेहीच्या सासर्यांची मैत्री, त्यातल्या गंमती-जमती सांगितल्या तसेच अनेक वर्षं ते मुंबईला होते त्यामुळे भेट नाही, मध्यंतरी एकदा येऊन गेले, पण तेव्हा नेमकी वैदेही नव्हती.
‘‘काश्मीरला का कुठे गेलेलीस हो तू आणि शुंभ्या, मला सांग इथे काय कमी आहे त्या काश्मीरपेक्षा?’’ दत्ता गोखले मधूनच कोकणी माणसासारखं तिरकस बोलणं सोडत नव्हते, पण एकंदरीत त्यांचा स्वभाव मस्त होता. वैदेहीला त्यांच्याशी बोलायला मज्जा येत होती, फक्त तिच्या डोक्यांत सारखा प्रश्न येत होता की, यांचा कोण मुलगा आपल्याकडे जावई आहे आणि तोही घरजावई? आपल्या उभ्या खानदानात कुणी घरजावई गेलेला तिला आठवेना.
ते आपले तिला तिच्या सासर्यांना सासूने कसे धाकात ठेवले होते, बरं झालं हो पण अशी खमकी बायको मिळाली सख्याला, नाहीतर वाया गेला असता तो. गावात राजकारण काय कमी असतं का वगैेर सांगत तिने दिलेल्या दडप्या पोह्यांवर ताव मारत होते.
‘‘अगदी सासूच्या हातावर हात मारलायस हो दडपे पोहे करण्यात.. वहिनींच्या हातचेच दडपे पोहे खात आहे असे वाटले मला.’’
असं म्हणून वहिनींच्या आणि त्यांच्या मित्राच्या आठवणीने त्यांच्या डोळ्याच्या कड्या ओलावल्या.
‘‘आता तुला वाटेल मुंबईत राहणारा माणूस धोतर आणि सदरा घालून कसा? तर इथे कोकणात आलो की घालतो हो मुद्दाम हा वेश! कोकणी असल्याचा बाणा मिळवता यावा ना म्हणून. तिथे मुंबईत काय आहेच टीशर्ट नी पँट, नाहीतर तो बरमुडा…’’
‘‘कोकणी माणसाला त्या बरमुड्याचं काय कौतुक सांग बरं? इथेले लोक आधीपासूनच त्या पायघोळ पँटी घालतात. फक्त त्या चट्ट्यापट्ट्याच्या असायच्या इतकंच! खरं की नाही सांग बरं.’’
‘‘हो हो.’’ वैदेही हसत म्हणाली.
‘‘चल निघतो हो मी. अहो पण ते तुमचं जावई प्रकरण? मला कळलंच नाही.’’
‘‘अगो त्या जावयाला म्हणजे माझ्या मुलाला भेटल्याशिवाय जाईन कसा? चल तुला दाखवतो.’’ म्हणून ते उठले. मग त्यांनी तिला आपण परसात फेरी मारू तिथे तुला माझा मुलगा नी तुमचा जावई दाखवतो असं सांगितलं. वैदेही पार गोंधळून गेली होती.
परसात फिरताना आंबा, चिकू, नारळ या झाडांची ते पाहणी करत होते आणि एका लगडलेल्या आंब्याच्या झाडापाशी येऊन थांबले. झाडाला चांगले आंबे लागले होते.
‘‘या आंब्याचा आंबा सर्वाधिक येतो आणि चवीला तर उत्कृष्ट आहे.’’ वैदेहीने माहिती पुरवली.
‘‘अगो हाच हो तुमचा जावई आणि माझा मुलगा!’’
‘‘ते कसं काय? वैदेहीने आश्चर्याने विचारलं.
त्याचं काय झालं आम्ही मुंबईत राहायला जायचं पक्कं ठरलं. हे कलम मी तयार करून ठेवलं होतं, मग हे कोणाला द्यावं तर सखारामला द्यावं कारण आमची मैत्री होतीच तशी गाढ. तेव्हा देताना त्याला सांगितलं, ‘‘माझ्या मुलाला तुझ्या ताब्यात देतोय. त्याची जोपासना कर. तोही मिश्किल होता हो माझ्यासारखा. म्हणाला, ‘‘जावईबापूंनी व्यवस्थित काम केलं पाहिजे. गोड फळे दिली पाहिजेत. तर उपयोग या घरजावयाचा..’’
‘‘अस्सं होय? मी कितीतरी वेळ विचार करत होते.’’ वैदेहीला हसू आवरेना.
मग दत्ता गोखलेंनी त्या आंब्याच्या झाडावरून मायेने हात फिरवला कदाचित वैदेही तिथे नसती तर त्यांनी त्या झाडाला मिठीही मारली असती. खरंच अगदी आपल्या मुलासारखं प्रेम केलं होतं त्यांनी त्या झाडावर आणि त्या झाडानेही दोन्ही नाती अगदी निभावली होती एक मुलाचं आणि एक घरजावयाचं…
दत्ता गोखले जायला निघाले. वैदेहीने वाकून नमस्कार केला.
‘‘सूनबाई जप हो स्वत:ला, आमच्या सुंभ्याला आणि माझ्या ….’’
आपले भरलेले डोळे वैदेहीला दिसू नयेत म्हणून ते झपाझप पावले टाकत गेटकडे गेले. इकडे वैदेहीचे डोळे मात्र भरून आले होते आणि तिला न जुमानता ते अश्रू गालावर ओघळले. एका वेड्या आणि वेगळ्याच पिता-पुत्राच्या भेटीची ती साक्षीदार होती.
सौ. शिल्पा पराग कुलकर्णी
=================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.
=============