Skip to content Skip to sidebar Skip to footer

गरीबा घरची लेक…जेव्हा श्रीमंता घरची सून होते….!

रत्नाकरराव आपल्या धर्मपत्नीला म्हणजेच रेणुकाताईंना मोठ्याने आवाज देत होते…आवाज देत असतानाच ते म्हणाले-

रत्नाकरराव – रेणुका….अगं रेणुका मी काल तुला जे १००००० रुपये दिले होते ते आण बरं जरा इकडे मार्केट मध्ये जायचंय मला….मग तिकडे शेजारीच बँक आहे तिथे हातोहात पैसे लगेच जमा करून ठेवतो…

रेणुकाताई – [ आपला हात फडक्याने पुसत दिवाणखान्यात आल्या आणि म्हणाल्या ] दोनच मिनिटं थांबा….आत्ता लगेच घेऊन येते पैसे…

रेणुकाताई लगेचच त्यांच्या बेडरूममध्ये गेल्या कपाटात असलेल्या तिजोरीत रेणुकाताईंनी पाहिलं…तर तिजोरीत पैसे नव्हते…म्हणून त्याच गडबडीत रेणुकाताईंनी कपाटात असलेले कपडे,सगळे कप्पे चाचपून पाहिले पण त्यात त्यांना काही पैसे सापडले नाही…त्यानंतर रेणुकाताईंनी आपला बिछाना,ब्लॅंकेट अगदी चाचपडून पाहिलं पण तरीही त्यांना त्यात काही पैसे सापडले नाही…तेव्हा रत्नाकरराव खोलीत आले आणि रेणुकाताईंना म्हणाले-

रत्नाकरराव – काय गं पैसे द्यायला एवढा वेळ…काय हालत केलीय या खोलीची…तुला माहिती आहे ना मला असं अस्ताव्यस्त झालेलं सामान आवडत नाही ते…

रेणुकाताई – अहो…काय सांगू तुम्हाला…मी पैसे तर या कपाटातच ठेवले होते…अचानक कुठे गेले काय कळायला मार्ग नाही…सगळी खोली पिंजून काढली पण मला काही पैसे सापडले नाही….म्हणून तर अस्ताव्यस्त पडलंय सगळं सामान…!

रत्नाकरराव – तुला नक्की आठवतंय ना तू नेमके कुठे ठेवले होतेस पैसे ते…?

रेणुकाताई – म्हणजे काय प्रश्नच नाही…मला चांगलंच आठवतंय कुठे ठेवले होते पैसे ते….हे काय इथे तर ठेवले होते…[ रेणुकाताई चाचपडून पैसे ठेवलेली जागा दाखवतात ]

रत्नाकरराव – अरे कमाल आहे मग काय पैशांना पाय आलेत कि काय…असे कसे गायब झाले…रवी…कल्पना…कावेरी सगळे बाहेर या…कुणी घरात आलं होत कि नाही त्यांच्याकडून तरी कळेल मला…!

रत्नाकरराव…मोठ्याने आपल्या दोन्ही मुलांना आणि सुनबाईंना आवाज देतात…त्यामुळे दोघेही दिवाणखान्यात येतात आणि नेमकं काय झालंय हे समजत….ते समजताच दोघेही मुलं अक्ख घर पिंजून काढतात…घराचा कोपरा न कोपरा शोधतात पण पैसे काही केल्या सापडत नाही…कावेरी म्हजेच घरातल्या धाकट्या सुनबाई स्वयंपाकघरात भाजी शिजतेय हे पाहण्यासाठी म्हणून स्वयंपाकघरात असतात तर कल्पना म्हणजेच घरातल्या मोठ्या सुनबाई घर शोधूनही पैसे सापडत नाहीय म्हणून कल्पना म्हणते…

कल्पना – आई….अहो डाव्या उजव्या हाताने ठेवले असतील पैसे तुम्ही…घरातच असतील…आणि आई तुम्हीच आठवा ना व्यवस्थित कुठे ठेवलेले आहेत पैसे ते….

रेणुकाताई – अगं…किती वेळा आठवू आणि सांगू तुला…मला नीट आठवतंय कपाटातच ठेवले होते पैसे मी…आता असं सारखं सारखं आठवून माझं डोकं खाऊ नकोस तू….मी काय लहान पोरगी नाहीय….एवढी मोठी रक्कम निष्काळजीपणे इकडे तिकडे ठेवायला…!

रेणुकाताई अशाच बोलत राहिल्या पण अचानकपणे रेणुकाताईंच्या मनात काय आलं कोण जाणे…त्यांनी लगेच कल्पनाला आपल्या पाशी येऊन बसायला सांगितले आणि खपलीत कोण कोण येऊन गेलं याची चौकशी करू लागल्या…

रेणुकाताई – आता मला ठामपणे सांग…काल रात्री तू माझ्या खोलीत कावेरीला येताना पाहिलं होतस का ?

कल्पना – हो आई…काल रात्री कावेरीला मीच तुमच्या खोलीत पाठवलं होत दुधाचा ग्लास घेऊन…पण तेव्हा तुम्ही खोलीत नव्हता कारण तुम्ही गार्डनमध्ये मामंजींबरोबर बोलत होता…पण त्यावेळी परत मागे न फिरता कावेरी तुमच्या खोलीत दुधाचा ग्लास ठेऊन आली आणि ओवी ला तुम्हाला बोलवायला सांगितलं होत कावेरीने कि….दुधाचा ग्लास खोलीत ठेवला आहे आणि दूध गरम आहे तोपर्यंत घ्या असा निरोप कावेरीने राणीला द्यायला सांगितला होता…

रेणुकाताई – बघ….तू मान किंवा नको मानूस पण मला कावेरीवर शंका आहे…की एवढी रक्कम तिनेच घेतली असणार कारण परवाच्या दिवशी मी तिचं बोलणं चोरून ऐकलं होत…की शशांकला म्हणजेच तिच्या भावाला नवीन उद्योग-धंदा सुरु करायचा आहे कारण त्याची नोकरी सुटली आहे…नोकरी स्वतःहून सोडलीय की काय देव जाणे पण तिच्या बोलण्यातून एवढंच वाटत होत मला….की तिला पैशांची खूप गरज आहे असं…

कल्पना – आई…असं काहीही नाही आहे…मला नाही वाटत तसं…कारण कधीच तिने खाण्या-पिण्याबद्दल असं लपवून छपवून स्वतः काही खाल्लेल नाही आणि पैसे चोरणे म्हणजे फार लांबची गोष्ट आहे…

रेणुकाताई – नाही…खूप आतल्या गाठीची आहे हं कावेरी…या गरिबाघरच्या मुली असतात ना…त्यांनी कधीच असा पैसा पाहिलेला नसतो म्हणून इकडे सासरकडच्यांना लुबाडण्याचा प्रयत्न असतो त्यांचा….आणि आपल्यासोबत आत्ताही हेच घडतंय याचा चांगलाच अनुभव घेतोय आपण…

रत्नाकरराव – [रागाने बोलतात ] रेणुका…फार बोललीस…आपल्या घरातली सून आहे ती…तिच्याबद्दल असं बोलताना जरा तरी भान ठेव….तुझ्याच तर धाकट्या समीरची बायको आहे ती…नशीब समीर आत्ता नाहीय घरात घडला प्रकार त्याला समजला आणि त्याच्याच बायकोवरती हे असले घाणेरडे आरोप त्याने ऐकले तर तो हे कदापि सहन करणार नाही….त्याच्या मनातून तू साफ उतरून जाशील….तेव्हा कृपा कर आणि तुझं हे फाटक थोबाड बंद कर…तुझ्या चुकी मुळे झालंय हे सगळं…त्यामुळे तुझ्या चुकीचं खापर तू कुणावरतीही फोडू शकत नाहीस…

कावेरी आपल्या सासूबाईंसाठी पाणी घेऊन आलेलीच असते….आणि सगळी बोलणी कावेरीच्या कानावर आधीच पडलेली असतात…कावेरी धीर एकवटून बोलते…

कावेरी – आई….आधी पाणी प्या…बघा बरं किती घामाघूम झाला आहात तुम्ही….डोकं शांत करा आई आधी…आणि माझं म्हणणं ऐकून घ्या मग त्यानंतर मला घराबाहेर काढलं तरी चालेन…

रत्नाकरराव – बोल बेटा…बोल…!

कावेरी – हे खरंय की दोन दिवसांपूर्वी शशांकचा मला फोन आला होता…हेही खरंय की त्याला पैशाची खूप गरज होती….’ होती ‘ अशाचसाठी म्हणतेय मी की…त्याने उद्योग धंदा उभारण्यासाठी जी काही रक्कम लागणार त्यासाठी कर्ज काढलं आणि त्याला लागणारे पैसे मिळतीलच लवकर त्यामुळे मला पैसे का आणि कशासाठी मागेल बरं तो….आणि जरी मला पैसे त्याने मागितले….मीही त्याला आश्वासन देऊन बसलेच पैसे देण्याचं तर आधी तुम्हालाच मागितले असते ना मी…परस्पर का असले व्यवहार केले असते मी…? मानलं की मी एका गरीब घरामधून आलेली आहे…आर्थिक परिस्थितीही आमची चांगली नाहीय…याचा अर्थ असा नाहीय की घरातली कुठलीही वस्तू इकडची तिकडं झाली की त्याचे आरोप माझ्यावर लावले जातील…आणि मी गप्प बसून ऐकून घेत राहील…मी या घरातली सून आहे चोर नाहीय आई…मागेही गणपतीच्या डेकोरेशनचे सामान नेहमीच्या ट्रांकेत न सापडता पोटमाळ्यावर सापडलं तेव्हा ही माझ्यावर आरोप झाले होते तुम्ही म्हणालात की माहेरी घेऊन गेली असेल कारण आमच्याही घरी गणपती बसतात आणि तेव्हाही मलाच दोषी ठरवलंत तुम्ही…मी त्यावेळेला काहीच नाही बोलले आई…तुम्हाला सगळ्यांच्या नजरेतून उतरवायचं नव्हतं मला…आणि आई….तुम्ही चोरीचे आरोप नेहमी माझ्यावर करत आला आहात…कल्पना ताईंवरती आरोप करताना मी कधी ऐकलं नाही तुम्हाला…याच कारण असं की त्या एका सुखवस्तू आणि श्रीमंत घरातून आलेल्या आहेत म्हणून तुम्ही त्यांच्यावर कधीच असले आरोप केलेले

नाहीत…त्या नेहमी त्यांच्या माहेरहून चांगल्या चांगल्या गोष्टी इकडे घेऊन येतात…त्याचा तुम्हाला अभिमान वाटतो….माझ्या माहेरची परिस्थिती बेताची आहे म्हणून मी तिथून काही जास्त आणू शकत नाही…तरी माझी आई मला रिकाम्या हाताने कधीच पाठवत नाही…

हे सर्व बोलत असताना कावेरीच्या डोळ्यांमधून पाण्याच्या धारा वाहत होत्या ….सगळे अगदी स्तब्ध होऊन ऐकत होते तेवढ्यात रवी म्हणजेच कल्पनाचा नवरा जोरजोरात ओरडत सांगू लागला…

रवी – पैसे….सापडले…सापडले…!

रेणुकाताई – कुठे आहे आणि कसे काय सापडले…?

रवी – अगं….ओवीच्या खोलीत सापडले…अगं त्याच काय झालं…तिच्यासाठी आणलेली बाहुली द्यायला मी तिच्या खोलीत गेलो तर….ओवी झोपलेली होती….मग मीच तिला उठवलं तर तिच्या पांघरुणात हे पैसे मला सापडले…मी तिला विचारलं तर तिने सांगितलं की…आजीच्या खोलीतल्या कपाटाचा दरवाजा उघडाच होता…मग मला खूप सारे पैसे  दिसले….मी ना मग ते शॉपिंग शॉपिंग म्हणून खेळायला घेऊन आले इकडे….आणि खेळून झालं की परत आजीच्या कपाटात आणूनच ठेवणार होते मी…असं ओवी मला सांगत होती….

आपल्या मोठ्या मुलाचं हे बोलणं ऐकून रेणुकाताईंचा चेहरा उतरून जातो…आणि आपल्या आत्मसम्मानावर झालेले घाव परत भरून निघतात म्हणून कावेरीचा चेहरा अभिमानाने परत उजळून निघतो…समीरही दारात आलेलाच असतो म्हणून कावेरी पटकन स्वयंपाकघरात चहा बनवण्यासाठी जाते जणू घरात काहीच झालेलं नाही असा भाव चेहऱ्यावर कावेरीच्या असतो….पण घडलेली सगळी हकीकत समीरला रत्नाकररावांकडून समजते…तेव्हा समीर आपल्या आईकडे पाहून खोचकपणे म्हणतो…

समीर – आता आहेत ना सगळं जिथल्या तिथं…एक तर पैसे सांभाळता येत नसतील तर याची जबादारी दुसऱ्या कुणावर तरी द्या पप्पा…

रत्नकराराव – रेणुका…आज तुला तुझ्या जबाबदारीमधून मुक्त करतो…तिजोरीच्या चाव्या इकडे दे…

रेणुकाताई ओशाळलेलेल्या चेहऱ्याने तिजोरीच्या चाव्या रत्नाकररावांकडे देतात…तेवढ्यात कावेरी चहा घेऊन दिवाणखान्यात आलेलीच असते मग रत्नाकरराव तिजोरीच्या चाव्या कावेरीकडे सोपवत म्हणतात…

रत्नाकरराव – हे घे सुनबाई….आजपासून घरातले सगळे आर्थिक व्यवहार तूच पाहायचे…हा मान तुझाच…!

कावेरी – नाही मामंजी…हा मान घरातल्या थोरा मोठ्यांचा… आणि मान हा मिरवायचा नसतो तर तो कमवायचा असतो…जेव्हा मी हा मान कमावेल तेव्हाच मी हा मान आनंदाने स्वीकारेल…!

आपल्या सुनेचा चांगुलपणाचा अनुभव रेणुकाताईंना आणखी एकदा आला. म्हणूनच ज्या ज्या वेळी श्रीमंत सासरकडची मंडळी असली की सुनबाईंना माहेरच्या गरिबीबद्दल कुचकी बोलणी ऐकावी लागतात…तू तुझ्या माहेरकडून काय काय घेऊन आलीस…? तर आम्ही गरिबाघरच्या लेकी आनंदाने म्हणू…’ आम्ही चांगले संस्कार आणि विचार घेऊन आलेल्या आहोत….’


Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.