Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©️®️ प्रज्ञा कुलकर्णी

स्त्री ही तंतोतंत तुळशीसारखी असते….मतितार्थानं! तुळशी जशी ज्या मंजिऱ्यांपासून आपला जन्म झाला,त्यांचं वाण-गुण विसरत नाही अगदी तसंच स्त्रीचंही! स्त्रीही जिथे आपला जन्म झाला, ज्या मातीचा रंग घेऊन आपण लहानाचे मोठे झालो त्या मातीचं मोठेपण अभिमानाने मिरवते.

         ती सासरी जाओ,उद्योग-व्यवसायाच्या निमित्तानं एखाद्या महानगरात स्थिरस्थावर होवो अथवा नोकरीच्या निमित्तानं चंबुगबाळ्यासहित गावोगाव भ्रमंती करो….तिच्या मनातलं तिचं माहेर नेहमीच ताजं टवटवीत असतं! कुठल्या ना कुठल्या निमित्तानं ती तिच्या मनातलं तिचं माहेर वेळोवेळी घासूनपुसून लख्ख करत असते! तो तिच्या जिव्हाळ्याचा विषय असतो.

       मीही चारचौघींसारखीच! माझं गाव….माझं माहेर हा माझ्या साठी ह्रदयाच्या शिंपल्यातला मोतीच! माझ्यासाठी माझ्या गावाकडच्या आठवणी शिंपल्यातल्या मोत्यासारख्या अमूल्य आहेत आणि गावही!

      सह्याद्रीरांगांच्या अंगाखांद्यावर खेळणारं, तांबड्या मातीनं आपलंसं केलेलं आणि वेदगंगेच्या तीरावर बागडणारं कोल्हापूर जिल्ह्यातलं अगदी आखीवरेखीव असं माझं गाव…गारगोटी!

         प्राचीनकाळापासून अनेक थोर संतविभूतींनी अध्ययन आणि अध्यापनासाठी वेदगंगेच्या तीराकाठी आपले आश्रम उभे केले…त्यांपैकीच एक म्हणजे गार्ग्य ऋषी! त्यांच्या चरणस्पर्शाने ही भूमी पावन झाली. ‘गार्ग्य-कुटी’चा अपभ्रंश होऊन गावाचं नाव ‘गारगोटी’ असं झालं.

         सदगुरु मुळे महाराज,श्रीकृष्णमकाका महाराज यांच्या अध्यात्मप्रेरणेने आजही गारगोटी भक्तीमार्गाचा केंद्रबिंदू ठरली आहे.

       इतिहास ज्यांना अध्यात्माचं सोज्वळ-सुंदर रुप म्हणून ओळखतो त्या मौनी महाराजांच्या नावाने गारगोटीत मौनी विद्यापीठाची स्थापना झाली आणि शिक्षणक्षेत्रातली ‘दक्षिण काशी’ होण्याचा मानाचा तुरा गारगोटीच्या शिरपेचात खोचला गेला.

            दरवर्षी माघ शुद्ध एकादशीला मौनी महाराजांची पुण्यतिथी आणि मौनी विद्यापीठाचा स्थापना दिन साजरा केला जातो.या दिवशी मौनी महाराजांचे समाधीस्थान पाटगाव येथून गारगोटीला ज्ञान-ज्योत आणली जाते!

             गेले कित्येक वर्षे ही परंपरा श्रद्धेने चालू आहे!अव्याहतपणे!

         गारगोटीचं शैक्षणिक क्षेत्रातलं योगदान नेहमीच भरीव राहिलं आहे.छत्रपती शाहू महाराजांच्या कालखंडापासून चालत आलेलं ‘शाहू कुमार भवन’ असो, नव्वदीत चालू झालेली भुदरगड शिक्षण संस्था असो वा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा असोत….इथल्या ज्ञानदानानं इथले जातिवंत विद्यार्थी घडतात.चौथी-सातवी स्कॉलरशीप,नवोदय प्रवेशपरीक्षा,प्रज्ञाशोध आणि दहावी बोर्ड परिक्षेतला गारगोटीचा आलेख पाहता अवघ्या महाराष्ट्रानं या प्रक्रियेला ‘भुदरगड पॅटर्न’ म्हणून नावाजलं नाही तर नवलच!

        याच ‘भुदरगड पॅटर्न’मुळे पाया भक्कम असलेले विद्यार्थी पुढे जाऊन स्पर्धा परिक्षेतही नशीब आजमावतात! त्यामुळंच ‘गारगोटी’ आजकाल प्रशासकीय अधिकाऱ्यांचं आणि बॅंक अधिकाऱ्यांचं माहेरघर होऊ पाहतंय!

         का होणार नाही म्हणा.. इथल्या शिक्षणशास्त्राचा पायाच व्ही टी पाटील सर,जे पी नाईक सर यांच्यासारख्या दिग्गजांनी घातलाय!

         आजूबाजूच्या पन्नासेक खेड्यांची हक्काची बाजारपेठ असलेली गारगोटी नगरी भुदरगड तालुक्याची राजधानी असूनही आजही शहरातल्या बाजारीकरणापासून कोसों दूर आहे.फ्लॅटसंस्कृतीचा शिरकाव अजूनही झाला नाही तिथे! बैठ्या घरांच्या गारगोटीत अजूनही प्रत्येक घरापुढचं तुळशीवृंदावन शाबूत आहे.आजही रोजचे व्यवहार,शेजारणींच्या गप्पा,नाक्यावर रंगणाऱ्या मित्रमंडळींच्या मैफिली,पाहुण्यारावळ्यांच्या गोड्याखाऱ्या पंगती इतकाच काय तो आंबटगोड कोलाहल…बाकी निरोगी आणि नीरव शांतता!शहरातला पिझ्झा बर्गर,वादातीत नाईट लाईफ आणि ‌क्षणिक सुखाचं ‘विंडोव शॉपिंग’ अजूनतरी इथवर पोचलेलं नाही.

         वेदगंगेच्या निळ्याशार पाण्यावर पोसलेली हिरवीजर्द शोभा ही आमच्या गारगोटीची खरी ओळख! नजर पोहचेल तिथपर्यंत भात,ऊस,भुईमुगाची डोलणारी शेतं असा अनुभव येतो इथे!आजकाल प्रगतशील शेतकरी फुलशेती,फळबागाही करू लागलेत! अर्थांत ही सारी त्या वेदगंगेची किमया…एखाद्या कर्तव्यदक्ष गृहीणाचा साऱ्या घरभर वावर असावा ना तसा वेदगंगेचा वावर आहे इथे!

        कसदार मातीमुळं फळं-भाज्या-दूधदुभतं भरपूर! दररोज हे सारं असतंच पण बुधवारच्या आठवडी बाजारात पंचक्रोशीतले शेतकरी ही हिरवाई घेऊन येतात…धान्यधुन्य-मासळी -रानमेवा-टोस्ट-बिस्कीटं-उदबत्त्या-काचेच्या बांगड्या-चपला-कपडे ते ताडपत्र्या-सुतळ्यांपासून अगदी शेतकऱ्यांच्या लोखंडी अवजारांपर्यंतच्या साहित्यानं हा बाजार रंगबिरंगी झालेला असतो.त्यामुळं जगासाठी रविवार सवडीचा असला तरी गारगोटीकरांच्या आवडीचा तो बुधवारच!

       कसदार अन्न आणि स्वच्छ, प्रदूषणविरहित वातावरणामुळं लाभलेली निरोगी जीवनशैली हा गारगोटीकरांना लाभलेला वारसा आहे.

            याच निरोगी जीवनशैलीमुळं हॉटेलिंगची चैन ‘गारगोटी’करांना फारशी भावत नाहीच….पण तरीही कधीमधी हाक मारणारा स्टॅंडवरचा ‘क्रांती’चा बटाटेवडा मात्र प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.गेली कित्येक वर्षे त्या वडापावचं हाँटेलवजा दुकान ती तश्शीच चमचमीत चव राखण्यात जादुईरित्या यशस्वी झालंय.इथं येणाऱ्या प्रत्येकासाठी ती पर्वणी आहे!

            घरापासून दूर गारगोटीच्या कॉलेजांत शिकायला येणारा प्रत्येक विद्यार्थी घरच्या अन्नाला पारखा होतो…पण ‘सद्गुरु होम भोजनालय’ जेवणाच्या वेळी त्याला घरची आठवण होऊ देत नाही.विद्यार्थ्यांच्या पिढ्यानपिढ्या  इथे जेवताहेत पण ताटातले जिन्नस-त्यांचा दर्जा आणि चव यात कसलीही काटछाट आणि हयगय नाही‌.इथून शिक्षण घेऊन बाहेर रुजलेलेही सद्गुरूच्या थाळीला विसरुच शकणार नाहीत.इथली खाद्यसंस्कृतीच मुळात सात्त्विक आणि संपन्न आहे.

        गारगोटीला वरदान लाभलंय ते आणखी एका ऐतिहासिक वारश्याचं….भुदरगड! भुदरगड हा गिरीदुर्ग! गारगोटीपासून अवघ्या १०किलोमीटर अंतरावर असलेल्या या गिरीदुर्गाचं खरं नाव ‘भूधरगड’! पण कालौघात त्याचा ‘भुदरगड’ केव्हा झाला ते त्याचं त्यालाही समजलं नसावं बहुधा. शिलाहार राजा दुसरा भोज याने या गडाची बांधणी केली.१६६७ साली छत्रपती शिवरायांनी हा किल्ला स्वराज्यात घेतला आणि डागडुजी करुन त्याचं रुपांतर एका प्रबळ लष्करी ठाण्यात केलं.

        मौनी महाराजांच्या भेटीला पाटगावी जाताना,कर्नाटकस्वारीला जाताना ‘जाणत्या राजा’च्या पदस्पर्शानं गारगोटीची माती पुनीत झाली आहे,याचे उल्लेख इतिहासात सापडतात.जिंजीवरुन महाराष्ट्रात परतताना शिवपुत्र राजाराम महाराजांनी देखील भुदरगडावर काही काळ वास्तव्य केल.

       एकूणच गारगोटी म्हणजे इतिहासातलं सोनेरी पान आहे. याच सोनेरी पानाची दुसरी बाजू म्हणजे गावाच्या मध्यभागी डौलाने उभी असलेली क्रांतीज्योत!

       ही क्रांतीज्योत म्हणजे १९४२ सालच्या स्वातंत्र्यक्रांतीचं स्मृतीचिन्ह!१९४२ साली गांधीजींनी ‘चले जाव’चा नारा दिला आणि संपूर्ण भारतात इंग्रज सरकारविरुद्ध असंतोषाची ठिणगी अधिकच चेतली.कुणी अहिंसेच्या मार्गाने तर कुणी सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने इंग्रज सरकारचा निषेध करत होते.यावेळी देशभक्त रत्नापाण्णा कुंभार यांच्या नेतृत्वाखाली एक तुकडी कोल्हापूर जिल्ह्यात स्वातंत्र्यचळवळ करत होती.

       याच तुकडीने १३ डिसेंबर १९४२ रोजी गारगोटी कचेरी लुटून कचेरीवर भारतीय निशाण फडकविण्याची, कचेरीतील स्थानबद्ध स्वातंत्र्यसैनिकांना मुक्त करण्याची आणि कचेरीतील खजिना लुटून तो देशकार्यासाठी वापरण्याची धाडसी योजना आखली होती.

         याच वेळी खजिन्याची कुलूपे तोडत असताना अंधारात झालेल्या हल्ल्यामुळे देशभक्त नारायण वारके त्यांच्या सहा सहकाऱ्यांसह हुतात्मा झाले.

        त्यांचं हौतात्म्य या क्रांतीज्योतीच्या रुपानं अजरामर झालंय!

   या क्रांतीज्योतीमुळं गारगोटीत जन्म घेणाऱ्या प्रत्येक बालकाला,माप ओलांडून गावात येणाऱ्या प्रत्येक नवविवाहितेला,जत्रेयात्रेच्या निमित्तानं गावात येणाऱ्या हरेक पाहुण्यारावळ्याला आणि जीवाची गारगोटी करायला येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला हा इतिहास ज्ञात होतो आणि त्याचा उर अभिमानाने फुलून येतो.हा अभिमान असतो-त्या हुतात्म्यांबद्दलचा,त्या इतिहासाबद्दलचा आणि तो इतिहास ज्या गावात घडला त्या गावाबद्दलचा!

     आपल्या निसर्गसौंदर्यानं जनमानसाला भुरळ घालणाऱ्या गारगोटीनं चित्रपट निर्मात्यांनाही भुरळ घातली आहे.कित्येक चित्रपटांचं आणि टी.व्ही.मालिकांचं चित्रीकरण इथं झालंय आणि होत असतं.

    सर्जनशील गारगोटीकर कला-क्रीडा-साहित्य या तिन्ही आघाड्यांवर नेहमीच घोडदौड करतात…..हजारो पुस्तकांचं भांडार वाचकांसाठी खुलं करणारं ‘शाहू वाचनालय’ म्हणजे गारगोटीचं खानदानी वैभव आहे.छत्रपती शाहूंच्या आशीर्वादानं लाभलेलं.इथूनच तर गारगोटीतले लेखक,कवी,वक्ते जन्म घेतात!

     आपल्या ओघवत्या लेखणीने वाचकांवर अधिराज्य गाजवणारे राजन गवस ,विज्ञानकथांचं प्रस्थ निर्माण करणारे प्रख्यात शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचाही सहवास गारगोटीला लाभला आहे.

      इथल्या मातीचा गंध जगभर पसरवणाऱ्या या असामी!  गारगोटीकरांना त्यांचं आभाळभर कौतुक आहे.

    मुळात गारगोटी उत्सवप्रिय आहे.दिवाळी,दसरा, गणेशोत्सव हे सण इथं उत्साहानं साजरे केले जातात.हाच उत्साह सर्वधर्मीय सण, राष्ट्रीय सण साजरे करताना असतो.पुरणपोळी-शीरखुर्मा-केक किंवा स्वातंत्र्यदिन-प्रजासत्ताकदिनाची जिलेबी…काहीही असो कौतुक-उत्साह-आनंद सारखाच!

    राजकारणातही गारगोटी मातब्बर आहे! इथे मुरब्बी राजकारण्यांना जसा घवघवीत पाठिंबा मिळतो तशाच संधी नवख्या उमेदवारांना मिळतात आणि पुढे हेच नवखे जुने होऊन नव्या चेहऱ्यांना संधी देतात.

   निवडणूकीच्या मैदानात काट्याची टक्कर देणारे निकालानंतर मात्र पक्षपार्ट्या विसरुन हातात हात घालून फिरतात.त्यामुळं इथलं राजकारण निरोगी आणि सशक्त आहे! याच वैशिष्ट्यांमुळं गारगोटीने अनेक कार्यक्षम नेते जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला दिले आहेत.

     अर्थात….प्रत्येक गोष्टीत स्वतःच वेगळेपण जपणाऱ्या गारगोटीत अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी घडतात…..ज्याकाळी ॲलोपॅथी आणि दवाखाने-औषधे या गोष्टी खेडोपाडी पोहोचल्या नव्हत्या त्याकाळी रुग्णसेवा आणि समाजसेवेच्या ध्येयानं पछाडलेल्या ‘हेलन मूस’ या डॉक्टर स्त्रीनं ‘गारगोटी’ हे गाव हेरलं आणि या इथे देशातला पहिलावहिला ‘फिरता दवाखाना’ चालू केला आणि ॲलोपॅथी आणि डॉक्टर स्वत: रुग्णांपर्यंत पोहोचले!हेही गारगोटीसाठी भूषणावहच!

          गारगोटीची जनता निस्सीम देशप्रेमी आहे.’मी मराठी आणि आम्ही भारतीय’ हा नारा इथे सतत घुमत असतो.इथला वारा देशभक्तीचा आणि पाऊस एकात्मतेचा आहे.हिंदू-मुस्लीम-ख्रिश्चन इथे गुण्यागोविंदाने राहतात.जातीभेदाला तर इथे थाराच नाही.

      ‘स्त्रियांचा सन्मान’ हा या मातीचा आणखी एक गुणधर्म! महिला सबलीकरणाचे नवनवीन उपक्रम इथे चालू असतात.’भारतमाता महिला उद्योगा’च्या माध्यमातून स्त्रियांनी स्वतःला सिद्ध केलंय.’झटका’च्या पापड-लोणच्यांनी स्त्रियांची अस्मिता कुजवणाऱ्यांना केव्हाच झटका दिलाय!

      लघुद्योग-कुटिरोद्योगांच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला योग्य काम मिळेल याची इथे काळजी घेतली जाते. शासकीय रूग्णालय,पोलिस चौकी,तालुका न्यायालय याद्वारे नागरिकांची योग्य काळजी घेतली जाते.

     संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत घेण्यात येणाऱ्या स्पर्धेत गारगोटी गाव बक्षिसपात्र ठरले आहे.तंटामुक्त गाव, व्यसनमुक्ती अभियान यांसारखे अनेक उपक्रम इथे हिरीरीने राबवले जातात.

      ग्रामपंचायतरुपी माता गावाची सदैव काळजी वाहते आहे!

   राजकारणाच्या आखाड्यात आणि पुढाऱ्यांच्या काट्याच्या लढतीत रंगणाऱ्या पण निवडणुकीनंतर राजकीय भेद विसरुन ग्रामदैवत जोतिर्लिंगाच्या आरतीत रमणाऱ्या,लोककला लावणीला फेटे उडवून दाद देणाऱ्या आणि तरीही वेदांचा आणि ऋषीमुनींचा इतिहास जपणाऱ्या,चकचकीत काचांच्या पॉश बंगल्यांमध्ये राहूनही ‘उन्हाळी वाळवण घालायला घराला आटोपशीर अंगण हवंच!’ असा हट्ट धरणाऱ्या,खेड्यातली माणूसकी आणि शहरातल्या सुखसुविधांचा सुरेख सुवर्णमध्य साधणाऱ्या माझ्या गावाचा वारु  ऐतिहासिक  वारसा,कला,क्रीडा,साहित्य,शिक्षण,राजकारण,समाजकारण या साऱ्याच आघाड्यांवर घोडदौड करतो आहे आणि जगभरातले माझे गावकरी मातीशी असलेली नाळ आणि इमान राखून आहेत.

       म्हणूनच माझं गाव आदर्श आहे आणि ते मला माझ्या प्राणांइतकं प्रिय आहे.

       पसायदान इतकंच….

                                                                  “पुण्याचा हिशोब झाला,

                                                                  तर आशिष मला दे देवा…

                                                                  फिरुनी पुन्हा जन्म यावा,  

                                                                 अन् तो याच मातीत व्हावा!”

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *