Skip to content Skip to sidebar Skip to footer

गणपतीसणाला उखाणे घेणार ना! तयार आहेत नवनवीन, अर्थपूर्ण उखाणे

ganpati bappa quotes in marathi :

टाळम्रुदुंगाच्या साथीने गणपतीची आरती
राव आहेत माझे साताजन्माचे सोबती

गणरायाला शोभतात सुपाएवढे कान
रावांच्या नावावर दहा एकराचे रान

गणपतीच्या भिंतीवर कमळ रंगवले
माटीला टांगली तेरडा, कांगले
चिकणमातीची मुर्ती, नैसर्गिक रंग
निसर्गाशी फारकत आहे अमान्य
रावांसारखे सहचर मिळता झाले मी धन्य

गणेशचतुर्थीचा सण कोकणवासियांसाठी मोठा
दूरदेशीचे चाकरमानी चार दिवस येती घरा
वळईत भजनकऱ्यांसोबत राव माझे दंगले
त्यांचे ते ध्यान पाहून चित्त माझे हरखले

गणरायासाठी उकडीच्या मोदकांचा नैवेद्य
रावांचे अन् माझे नाते अभेद्य

गौरीगणपतीच्या सणात नाही आनंदाला तोटा
रावांनी आणल्यात बँकेतनं कोऱ्याकरकरीत नोटा

गणपतीला वहाते एकवीस दुर्वा
राव करतात माझ्या कामाची वाहवा

श्रावण गेला भादवा आला
स्वर्गातुनी भेटाया गणोबा आला
गणुच्या स्वागतासाठी घरदार सजले
अंगणी सडासारवण हौसेने केले
माझा उत्साह पाहून राव आनंदले

गणपतीसमोर समयांची जोडी
समयांच्या जोडीत तेवतात ज्योती
रावांची न माझी बहरुदे प्रीती

ढोल-ताशांची पथकं आणि मल्लखांबांची प्रात्यक्षिकंं
ही आहेत पुण्यातील गणपतींच्या मिरवणुकीची वैशिष्ट्य
रावाच्या नावाने भरला हिरवा चुडा जमुदे अमुचे सख्य

मोरेश्वराने केला होता सिंधुसुराचा वध
रावांना शोभून दिसतो रेशमी कद

थेऊर तालुक्यात रांजणगाव
रांजणगावचा महागणपती
अष्टविनायकांत महाशक्तीशाली
रावांच्या जोडीने दर्शना आली

भक्तांची चिंता हरतो थेऊरचा चिंतामणी
पुजेला बसले रावांच्या जोडीने
नेसून साडी ब्राह्मणी

गणपतीच्या आरतीला जमतात
खालच्या वरच्या आवाटातली पोरे
भजनाला वाटतात लाडू खडखडे
म्हामद्याला करती सांबारा नि वडे
निरोपावेळी रावांचे पाऊल अडखळे

चांदीच्या परडीत जास्वंदाची फुले
जास्वंदाच्या फुलांचा गणोबासाठी हार
नाव घे नाव घे जीव केला बेजार
रावांसाठी सोडून आले माहेराचे घरदार

अद घर मद घर
मद घरात कपाट
कपाटाजवळ टेबल
टेबलावर टेबलक्लॉथ
त्यावर ठेवले रुप्याचे ताट
रुप्याच्या ताटात प्रसादाचे पेढे
रावांचे नाव घ्यायला
कशाला आढेवेढे

गणरायाच्या लल्लाटी केशरकस्तुरी
रावांसोबत फिरून आले जगन्नाथपुरी

गणेशचतुर्थीदिवशी सजली रांगोळी अंगणात
फुलापानांचे तोरण शोभून दिसते दारास
ऐटीत बसलेत गणोबा मखरात
राव तल्लीन भजनकिर्तनात

सासूबाई लाघवी सासरे हौशी
रावांचे नाव घेते गणेशचतुर्थीदिवशी

लालबागच्या राजाचे घेतले दर्शन
तिथून थेट तेजुकाया मेंशन
तेजुकायाच्या गणपतीची उंची किती!
कॉटनग्रीनच्या गणपतीला दिव्यांची रोषणाई
नरेपार्कच्या गणपतीचा थाट काय वर्णावा
रावांसोबत आले मुंबईचे गणपती पहावया

गणपतीच्या सणाला पैपाहुण्यांची हजेरी
आजऱ्याहून आली आत्या पुण्याहून मावशी
झिम्मा, फुगडी,फेर धरून कंबरडे लचकले
रावांची साद कानी येताच हळूच सटकले

मोदकाच्या पारीत गुळखोबऱ्याचे सारण
रावांचे नाव घेते गणेशचतुर्थीचे कारण

श्रीगणेशाला जास्वंदीचे फुल वहाते
रावांच्या सौख्याचं मागणं मागते

अद घरात मद घर
मद घरात फळी
फळीवर पितळी हंडा
हंड्यावर तपेले
तपेल्यावर कळशी
रावांचे नाव घेते
ऋषीपंचमीदिवशी

गणपतीपुढे लावते दिवा नमस्कार करते वाकून
रावांचे नाव घेते तुमचा मान राखून

गणोबासमोर फुगड्या खेळते, फेर धरते
माहेरवाशीण मी गुज सासरचे सांगते
लाड आईबापाकडून पुरवून घेते
रावांचं नाव घेताना चक्क लाजते

गणपतीच्या हाती मोदकांची वाटी
रावांच्या नावाचे कुंकु माझ्या लल्लाटी

पुण्यातल्या दगडुशेठची आरास मनोहारी
तांब्याभांड न्हेते राव आले वाटतं दारी

गणपतीला घालते एकवीस दुर्वांचा हार
रावांच्या साथीने जीवनसागर करेन पार

गणरायाचा डंका वाजतो दाही दिशांना
अपराध भक्तांचे घेतो पोटी मोरया
रावांच्या नं माझ्या संसारावर
बाप्पा राहो तुझी कृपाछाया

गणेशोत्सवासाठी गल्लीतल्या मुलांनी काढली वर्गणी
रावांकडे केली रुपये पाचशेएकची मागणी

झूल झुंबराचंं, फूल उंबराचं
कळी चाफ्याची, लेक बापाची,
सून सासर्‍याची, बहीण भावाची,
गणपतीकडे मागते मागणं
सदा भरभराट होवो रावांची

गणरायास येती भक्तगण शरण
रावांचे नाव घेते चतुर्थीचा सण

रिद्दीसिद्धीचा भाग्यविधाता
देव गजानन बुद्धीदाता
रावांच्या दीर्घायुष्याचे मागणे
मागते तुजपाशी अनंता

अथांग गजानन अनंत गजानन
निवारी भक्तांची संकटे
राव आधी होते एकटे
माझ्याशी लग्न करून झाले दुकटे

गणपतीसाठी आणले अत्तर केवड्याचे
राव नि माझे नाते साताजन्माचे

गणेशाच्या पुढ्यात रुप्याच्या समयांची जोडी
राव करताहेत खिरापतीसाठी फळांच्या फोडी

मोरेश्वराच्या नैत्र अन् नाभीत चमचमते हिरे
सख्यांसोबत घेते फुगडीचे फेरे
रावांचे नाव घ्यायला लाजू कशाला बरे

धारवाडी साडी
हिरवाकंच खण
रावांचे नाव घेते
गणेशचतुर्थीचा सण

ऋषीपंचमीला नेसले
साडी नऊवारी
रान नं माझी जोडी
लक्ष्मीनारायणापरि

माहेर सोडून सासुरा आले
जोडली नवी नातीगोती
रावांसोबत करते
गणपतीबाप्पाची आरती

संसाररुपी रथाचे
राव आहेत सारथी
टाळम्रुदुंगाच्या गजरात
करतो बाप्पाची आरती

वरणभाताची मुद
त्यावर तुपाची धार
रावांच नाव घ्यायची
मला लागली घाई फार

जुन्नर तालुक्यात लेण्याद्री रांगा
लेण्याद्रीत आहेत अठरा गुहा
अठराव्या गुहेत गिरिजात्मजाची मुर्ती
रावांच्या प्रोत्साहनाने मला नित्य मिळते स्फुर्ती

संसाराच्या नंदनवनात
आनंदाची गाणी गाते
रावांच्या साथीने
गणेशाची पूजा करते

कानात घातले डूल
वेणीत माळले फूल
हातात हिरवा चुडा
बोटात हिऱ्याची अंगठी
गळ्यात सोन्याची ठुशी
रावांचे नाव घेते
गणेशचतुर्थीदिवशी

गेले होते आठवडाबाजारा
भरला हिरवा चुडा
मागेपुढे सोन्याच्या पाटल्या
राव म्हणाले गणपतीसणाला
घेऊ तुला नवी साडी
गेलो जोडीने दुकाना
पसंत केली साडीखण
गाडीवर बसून मग
घरी आलो भरकन

गणपतीला वहाते केवड्याचे फूल
रावांच्या रुपाची मला पडली भूल

गणपतीला आवडे गावठी गुलाब
रावांचा आहे भलताच रुबाब

चिरेबंदी वाडा, वाड्यात बारा खोल्या
देवघरात केली गणेशाची प्राणप्रतिष्ठा
पाहुणीरावळी, घरातली
मिळून केली आरती
बालगोपाळांनी खिरापत लुटली
लांबचलांब पंगत बसली
जिलबी वाढायची माझी पाळी
नाव घे नाव घे मामेसासूची हाळी
रावांचे नाव लाजतलाजत घेतले
मामेसासऱ्यांनी शाब्बास सूनबाई म्हंटले

=========================

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: