Skip to content Skip to sidebar Skip to footer

गंध भाग ४

©️®️ प्रज्ञा जोशी कुलकर्णी

सगळे पर्याय तपासून मी ही संधी घ्यायची ठरवली.पण पुन्हा वेळ द्यावा लागणार होता आणि मुख्य म्हणजे पैसाही!
              नाईलाजाने घरी फोन करून पुन्हा सात-आठ हजार रुपये मागून घेतले !बऱ्यापैकी चांगला, मित्राच्या खोलीजवळचा एक क्लास लावला.सकाळी क्लास करून संध्याकाळी अंधार पडेपर्यंत तिथेच अभ्यास करत बसायचो.तिथेच बसण्याचे दोन फायदे होते, एक म्हणजे कुठलंच बाह्य आकर्षण तिथं डोकावायचं नाही आणि दुसरं म्हणजे सारखं भूक-भूक व्हायचं नाही.पोटाचे नसते चोचले टाळून चार पैसे वाचायचे आणि तेच मग वेगवेगळ्या परीक्षांचे फॉर्म्स भरायला उपयोगी पडायचे!
                परीक्षा देऊन देऊन तयारी व्हावी इतक्या परीक्षा दिल्या मी!कित्येक कडू निकाल पचवले. संयमानं अभ्यास करत राहिलो! हातपाय हलवत राहिलो.
                अभ्यास करता-करता किमान स्वतःच्या खाण्यापिण्याचा खर्च निघावा म्हणून बारीकसारीक प्रयत्न करत राहिलो!
               आता सांगताना संघर्ष म्हणून अभिमान वाटतो पण तेव्हा मात्र लाज वाटायची ती याची की रात्री मी एका हाउसिंग सोसायटीचा वॉचमन म्हणून काम करायचो! पुण्यात स्पर्धा परीक्षा देणारे अनेक विद्यार्थी संघर्ष करतात तसाच संघर्ष माझ्याही वाट्याला आला.रात्री इकडे-तिकडे लक्ष ठेवता ठेवता अभ्यास आणि थोडाफार पैसा…. दोन्हीही व्हायचं!पाच-सात हजारांनी आईबापाचा भार हलका केल्याचं समाधान ते वेगळंच!
               सोसायटी श्रीमंतांची होती!सगळं कसं साळढाळ! मनमौजी!गावाकडची लोकलज्जा,’लोक काय म्हणतील?’ हा प्रश्र्न यांना थाराच नाही! मोकळंढाकळं… कधीकधी बेतालपणाकडे झुकणारं वातावरण! नव्या भाषेत बोल्ड! रात्रभर चहलपहल चालूच….दिवसा थोडा लगाम असायचा पण त्याउलट तिथल्या रात्री तिथल्या लोकांसाठी रंगबिरंगी! पार्ट्या आणि सोहळ्यांनी सोसायटी रंगबिरंगी होऊन जाई! सूट-टायमधले गोल गरगरीत पोटाचे सुखवस्तू पुरूष आणि भडक मेकअप केलेल्या महागड्या आणि ऊत्तान  वस्त्रांकित स्त्रियांची तिथे ये-जा चालू असे! तिथं राहून माझ्या मनात नकळत त्या विश्वाबद्दल आणि त्या राहणीमानाबद्दल एक सुप्त आकर्षण निर्माण झालं!
           रसिक तसा होतोच मी! आकर्षणांची भेंडोळी तिथं नव्यानं मला वेटोळी घालू लागली.
           धुंद अत्तराचं,नितळ गोऱ्या रंगाचं,नव्या फॅशनेबल कपड्यांचं आकर्षण वाटायला लागलं.ते मनमौजी, रंगबिरंगी जग आपलंसं वाटायला लागलं.मी त्या नव्या जगाच्या प्रेमात पडलो होतो.पुन्हापुन्हा नवनव्या अनेक गोष्टींच्या प्रेमात पडणं हे सौंदर्यासक्तीचंच तर लक्षण आहे.
           पण तसं जगायचं असेल तर अभ्यास करून चांगली नोकरी मिळवायला पर्याय नाही, हे पक्कं होतंच!मग मी अभ्यासाला जरा जोरच लावला!एकमार्गी,एककल्ली जगायला लागलो! डोळ्यांसमोर फक्त नोकरी आणि त्यानंतरचं सुखासीन जीवन!
           परिणाम म्हणून त्याच वर्षी एका नावाजलेल्या राष्ट्रीयकृत बॅंकेत माझी निवड झाली.माझ्या कष्टाचं चीज झालं.मिटल्या पापण्यांमागे घर करून बसलेल्या सुखाचं स्वप्न सत्यात आलं आणि मग मात्र मी धन्य झालो.आई-आबांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
             माझी गाडी रूळावर आली.पुरेसा पगार,ढीगभर अलॉवन्सेस, भरमसाठ सवलती, मर्यादित वेळेचं काम….आणि इतरांपेक्षा अंमळ जास्तच सुट्ट्या! पोस्टींगही पुण्यातच मिळाली!सुखं टोचायला लागली अक्षरशः…मलाही आणि जळणाऱ्यांच्या डोळ्यांनाही!
         हातात पैसा पडू लागला….! आजपर्यंत न केलेल्या, न करता आलेल्या, करायची ऐकत नसलेल्या अनेक गोष्टी खुणावायला लागल्या.खात्यातल्या पैशाकडे पाहून काटकसरी मन बंड करू लागलं. आपोआप पैसा खर्चायचा धीर व्हायला लागला.
          जशी नोकरी लागली तशी मी माझी स्वप्नं जगायला लागलो. आईबाबांना पुरेसे पैसे पाठवून उरलेल्या पैशांतून सेकंड-फोर्थ विकेंडला लॉन्ग ड्राईव्ह्ज, उंची हॉटेलांच्या वाऱ्या,कधी लेटनाईट मूव्हीज्….सगळं मनासारखं चालू होतं!
आयुष्यातची गाडी जरा जरा स्पीड घेत होती!
           गाडीवरून आठवलं!..नोकरी लागून सहा महिने झाल्यावर मस्तपैकी बुलेट घेतली.रॉयल एनफिल्ड! कॉलेजला असल्यापासून स्वतःच्या दुचाकीसाठी झुरत होतो. पण जेव्हा स्वतःच्या बुलेटवल बसून तिची पहिली डरकाळी ऐकली तेव्हा काळीज खरंच सुपाएवढं झालं माझं! दिमाखात बुलेटवरून फिरू लागलो.ती बुलेट आणि मी ….चांगली जोडी जमली होती.जिथे जाऊ तिथे दोघे एकत्र!
           आणि तो दिवस आला!त्या दिवशी मी रात्री उशीरा म्हणजे साडेबारा-एकच्या दरम्यान मूव्ही पाहून घरी येत होतो.वातावरणात चांगलाच गारवा होता.घरी जाऊन मस्त आल्याचा कपभर चहा मारायचा आणि ताणून द्यायची असं योजून मी बुलेटचा ॲक्सिलेटर फिरवला पण समोरचं दृष्य पाहून मी बावचळलो.
            स्ट्रीट लाईटच्या अपुऱ्या प्रकाशाने रस्ता बऱ्यापैकी अंधारलाच होता.दुतर्फा पोफळीच्या झाडांची महिरप होती.रस्ता तसा निर्जनच….तुरळक ठिकाणी एखाददुसरा बडा स्वतंत्र बंगला! पण त्यामुळं अशी कितीशी जाग असणार?
            आणि अशा अर्धवट अंधाऱ्या रस्त्यात एक हॉट पॅन्ट आणि तंग टॉप घातलेली तरूण मुलगी एका पुरुषाला बेदम मारहाण करताना दिसली.तो आडदांड पुरूषही सपशेल हारला होता तिच्यासमोर! ‘पुन्हा नाही कुठल्या मुलीकडे मान वर करून पाहणार…माफ करा!जाऊ द्या!’ म्हणून हात जोडून विनवण्या करत होता तो पुरूष त्या पोरीला!…मी कचकन् बुलेटचा ब्रेक आवळला आणि डोळे विस्फारून ते दृष्य पाहतच राहिलो!
            त्या पोरीनं मनाचं समाधान होईपर्यंत त्या गुंड माणसाला लाथाबुक्क्यांनी तुडवला‌.तिच्या हाय हिल्सच्या सॅन्डल्स त्या पुरूषाच्या छातीवर रूतवत ती पुन्हा एकदा छद्मी हसली आणि ‘जा बाबा जा…जीले अपनी जिंदगी’च्या थाटात त्याला निरोप दिला.
           उठायची संधी मिळाल्यावर तो पुरुष त्याच्या पुरूषार्थाला न साजेशा घाईघाईने अक्षरशः पळाला.
           ती तरूण मुलगी शांतपणे त्या पुरूषाचा पळपुटेपणा पाहत उभी होती.
           तो गुंड माणूस गेल्यावर खिशातून लायटर काढून तिने सावकाश एक सिगरेट शिलगावली.मी मागे माझ्या बाईकवर बसून तिच्या सिगारेटच्या धुराची नक्षी पाहत होतो. त्या अंधाऱ्या रस्त्यावर स्वतःच्या कुठल्याशा महागड्या आणि परदेशी बुलेटवर बसून ती मनसोक्त झुरके घेऊ लागली! काही क्षण मला ती मुलगी म्हणजे भुताटकीच वाटली होती!
           इतक्या रात्री,अंधारात आणि निर्जन रस्त्यावर एखाद्या तरूण पोरीनं हट्ट्याकट्टया पुरूषाला इतकं भयानक बडवून काढणं म्हणजे माझ्यासाठी भुताटकीच होती.काय थोडं साहस आहे का ते! माणसातल्या भुतालाच जमणार ते! अर्थात चांगल्या अर्थानं!
          पण त्या पोरीचं फोनवर बोलणं….’निकल रहीं हू…दस मिनट में पहुंचती हू!तू दरवाजा खोलके रखना!’ वगैरे ऐकून मी जरा निर्धास्त झालो! काही का असेना…त्या पोरीचा बोल्डनेस बघून डोळे पांढरे व्हायची वेळ आली होती!मुळात अशीच एखादी बोल्ड मुलगी आपल्या आयुष्यात यावी आणि आपलीच व्हावी ,हे कित्येक दिवसांचं स्वप्न होतं माझं! ‘ती पाहताच बाला,कलेजा खलास झाला!’ वगैरे ओळी आपोआप मनात पिंगा घालू लागल्या.
            गोऱ्यापान रंगाची आणि त्या रंगाचं प्रदर्शन करणारी ती मुलगी माझ्या अंगाअंगात कुठलीतरी अनामिक लहर भिरकावून गेली.तिच्यापाठी मीही तिथून निघता झालो.
            खरंतर मी काही तिचा पाठलाग वगैरे केला नाही.पण तिचा आणि माझा रस्ता योगायोगानं एकच होता! मी माझ्या घरी पोहोचण्यापूर्वी पाच मिनिटांच्या अंतरावर ती तिच्या घरी पोहोचली.मला तिचं घर माहित झालं.
            मग जाता येता कोपऱ्यावर थांबून तिच्या फ्लॅटच्या गॅलरीकडे, खिडकीकडे टक लावून पाहणं चालू झालं.
            दिवस चांगला झाला म्हणून सकाळी तिच्या फ्लॅट समोर थांबा घ्यायचा, दिवसभराचा कामाचा शीण जावा म्हणून संध्याकाळी तिच्या सोसायटीच्या दारात रेंगाळत ‘ती दिसते का?’ म्हणून वाट पाहायची.रात्री झोपल्यानंतर चांगलं स्वप्नरंजन व्हावं म्हणून रात्रीच्या जेवणासाठी बाहेर पडलो की तिच्या दिसण्याकडे डोळे लावून थांबायचं.नोकरी सोडून इतर सगळा वेळ फक्त तिच्या विचारांत बुडून जायचा!…अर्थात ही दर्शनेच्छा- ही टेहळणी.. सगळं चोरून! पुढं होऊन बोलायची हिम्मत होती कोणाच्यात?
            माझं चोरून पाहणं तिच्या लक्षात आलं असावं! एके दिवशी मी कोपऱ्यावर थांबून ती फ्लॅटमधून बाहेर येण्याचीच वाट पाहत होतो…आणि ती आली!
ती आली ते एकदम माझ्यासमोरच!
“देखता क्या है रे तू? लडकी देखी नहीं कभी?” तिनं माझ्या डोळ्यात डोळे घालून मला प्रश्र्न विचारला! तिचे डोळे जणू आगच ओकत होते!माझ्या रॉयल एनफिल्डची चावी बोलता-बोलता काढून घेतली तिने आणि आपल्या मुठीत ठेवली.
            तिच्या अनपेक्षित हल्ल्याने मीही घाबरलो पण मागे फिरून चालणार नाही हे लक्षात आलं माझ्या! मीही तिच्या डोळ्यांमध्ये डोळे रोखून उत्तरलो…” लडकियां तो बहुत देखी है…लेकिन आप जैसी नहीं!आपमें कुछ अलग है जो हररोज मुझे इधर आके खडा कर देता है!” मी धीर एकवटून बोलायचा प्रयत्न करत होतो.

=====================

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

5 Comments

Leave a Comment

0/5

error: