गंध भाग २

©️®️ प्रज्ञा जोशी कुलकर्णी
भूक आणि त्या वासामुळे न राहवून मी पहिल्यांदा स्वत:साठी एक वडा मागवला आणि तो वडापाव हातात येण्याची वाट पाहत तिथेच उभा राहिलो.
प्रतिक्षा!...हल्ली वाट पाहणं वगैरे प्रकारांचा तिरस्कार वाटू लागलाय मला..आपलं आयुष्य सालं कशाचीतरी आणि कुणाचीतरी वाट पाहण्यातच संपून जाणार बहुतेक! कधी नोकरीची, कधी प्रेयसीची,कधी आयुष्याला वळण लागण्याची! ही सारी प्रतिक्षा काही आपला पिच्छा सोडत नाही.
आज दुसरं-तिसरं काही नाही तर तो वडावाला! केव्हा आपल्या हातात वडापावची प्लेट देतोय, ही वाट पाहणं!….अरे कसली ही जिंदगी!
मी पुन्हा मान वळवून त्या वडेवाल्याकडे पाहू लागलो.
त्या घामेजल्या वडेवाल्याचे घामाचे थेंब टपटपत त्या उकळत्या तेलात पडू लागले…. चर्र चर्र असा आवाज होऊ लागला आणि पाठीमागे रमाची अस्वस्थ चूळबूळ मला जाणवू लागली.
हातातली सुटकेस तिथेच-माझ्या जवळ सोडून रमा बसस्थानकाच्या अंधाऱ्या कोपऱ्याकडे धावली. मलाही तिच्यामागे जावं लागलं मग…माणूसकी म्हणून!इच्छा नसतानाही धावपळ करत मी तिच्या मागे त्या अंधाऱ्या कोपऱ्याकडे गेलो.
तिला ती अस्वच्छता ,घामेजलेला तो वडावाला आणि त्याचा घाम तेलात पडणं पाहून मळमळून आलं होतं.मी मागेच उभा राहिलो. खूप प्रयत्नांती ओकून ती मोकळी झाली आणि माझ्या हातातल्या बाटलीतलं पाणी पितापिता मला सांगू लागली….”तुम्ही खायचा तर खा वडा…..मला नकोय काही! मी घरी जाऊन बघेन.. म्हणजे लागली भूक तेव्हा तर खाईन घरची शिदोरी!”
तिची अस्वस्थता पाहून आणि तिचं ते तसं ओकणं-बिकणं,तो दर्प….श्शी! माझीही मग इच्छाच मेली वडाबिडा खायची! तिला घेऊन मी आमच्या बॅगांजवळ पोचलो तेवढ्यात तो वडावाला करवादू लागला….”धंदेका टाईम है भाई….ये समान इधर रखके आप टाईमपास कर रे हो?..दूसरा कश्टमर कैसे खडा रहेगा?…तुम्हारे एक वडेकी ऑर्डरसे मेरा दस वडे का नुकसान हो गया! लेलो आपका एक वडा! जल्दी करो!समान उठालो इदरसे!और निकलो इदरसे!!”
मी वैतागलो.
एकतर सहा-आठ तासांच्या प्रवासानं अंग ठणकत होतं. पोटात भुकेचे कावळे….त्यात आईने सहा महिने पुरेल इतका संसार बांधून पिशव्यांची चवड माझ्यावर लादलेली! ही नवी नवरी माझ्यासोबत! ठेवलं दोन मिनीटे सामान यांच्या गाड्यासमोर तर लगेच काय उलथापालथ झाली काय?.
माझ्या डोक्याची शीर तडतडू लागली.
“एक काम कर वडावाला….वो एक वडा भी तेरे पास ही रख! मुझे नहीं चाहिए तेरा वडा!और जुबान संभालके बात कर लोगोंसे! तेरे बापकी जगह नहीं!”माझ्या तडतडण्यानं तो वडावाला थोडासा घाबरला. तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटू लागला आणि ते ऐकायला मी बिलकुल तिथं थांबलो नाही.
रमाही माझं ते रूप पाहून भांबावून गेली.तिच्या ऐकीव माहितीप्रमाणे मी शांत, समंजस, लाजाळू आणि चारचौघांत बुजून राहणारा मुलगा!त्यामुळं तिला माझं हे असं रूप अपेक्षित नसावंच आणि तिला ते अनपेक्षित होतंच यापेक्षाही माझं असं कुठल्यातरी परक्या माणसासमोर तडतडणं खुद्द माझ्यासाठीही नवीनच होतं.अगदी नवं!
या नव्या हुरहुरीनं मी विचलित झालो. त्याच अस्वस्थतेत म्हणेल तेवढ्या पैशांत मी एका रिक्षावाल्याला पटवलं आणि सगळं सामान त्या एकाच रिक्षात कोंबून कसंबसं घर गाठलं.
या सगळ्या धांदलीत भुकेचं पार विसरून गेलो होतो.पोटातले कावळेही भुकेनं मेले असावेत कदाचित!
सगळ्या पिशव्या उतरवून एक दीर्घ श्वास घेतला.बऱ्याच दिवसांनी पुण्याच्या फ्लॅटमधल्या त्या मऊशार कोचात पाच मिनीटे शांतपणे रूतून बसलो.बरं वाटलं मला….सवयीचं बरं वाटलं!
त्यानंतर टॉवेल, आवडता ढगळ टीशर्ट आणि थ्री-फोर्थ खांद्यावर टाकून लगबगीनं मी बाथरूममध्ये शिरतच होतो पण बाथरूमचं दार आतून बंद होतं.माझ्याआधी रमाने तिथं नंबर लावला होता. हट् साला….!
पुढची पाच मिनीटं मी अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होतो.राहूनराहून कपाटातल्या ब्रॅंडीच्या-वाईनच्या बाटल्यांवर चित्त जात होतं पण रमासमोर पिणं बरं दिसलं नसतं म्हणून मी स्वतःला आवर घातला.लग्नाला आत्ताशी कुठे आठ दिवस होतं होते. हातात बांधलेलं हळकुंड मनगटाला डाचत होतं पण त्यामुळे असेना का….त्या लग्नाचा विसर पडत नव्हता!ते नकोसं लग्न…लोढणं…फास….बेड्या…कितीतरी समानार्थी शब्द पटापट डोळ्ंयासमोर नाचू लागले.पण शब्द आणि वास्तव यांचं वास्तवात पटेलच किंवा नाहीच पटणार, याची काहीच शाश्वती नसते.
त्या नकोशा लग्नामुळे ही रमा आयुष्यात आणि माझ्यासोबत पुण्याला आली होती आणि तिचं येणं आत्तापासूनच खटकायला लागलं होतं मला!माझ्या आत कुठेतरी जळजळ होत होती! विरस झाला होता.दारूचा पहिला घोट जसा जळजळत आत जावा ना…तसा तिचा माझ्या एकट्याच्या घरातला तिचा प्रवेश भगाभगायला लागला होता माझ्या मनात!कडवट दारू नशा चढवते…इथे या नकोशा लग्नाने जगण्याचा कैफ खाडकन् उतरवला होता.
यापुढे या रमाला असंच सहन करावं लागणार होतं.”हट् स्साला!”….पुन्हा माझ्या तोंडून नकळत ते अस्वस्थ उद्गार बाहेर पडले.पण मग मात्र मी गप्प बसलो.ठरवून!
अर्थात या लग्नात रमाची चूक नव्हतीच! ती बिचारी सरळ साधी मुलगी…माझ्यावर पूर्ण विश्र्वास ठेवून माझ्या गळ्यात माळ घालून माझ्यासोबत इकडे, या शहरात आली! तिला कुठे माहिती होतं मला तिच्याशी लग्न करायचं नव्हतंच हे!
तिचे स्वप्नाळू डोळे माझ्या नजरेसमोर चमकले आणि क्षणार्धात मी माझ्या मूळ स्वभावाकडे फिरलो.सुखी संसाराची किती स्वप्नं घेऊन आली असेल ही मुलगी! आणि आपण मात्र कसं वागवतोय तिला?…घरच्या पाळीव मांजरी-कुत्र्यांनांही लोक यापेक्षा चांगली वागणूक देतात!
काही का असेना…. यापुढे तिला अगदी प्रेमाच्या बायकोसारखं नसेना का पण माणूसकीने वागवायला हे मात्र खरं!
बाथरूमचा दरवाजा खडखडला आणि रमा बाहेर आली.नुकतीच अंघोळ केलेली एखादी सुस्नात अतिसामान्य तरूणी जशी दिसेल तशीच सात्त्विक दिसत होती ती!सावळीशी! बुजरी!तसं पहायला गेलं तर सुंदर म्हणण्यासारखं एकही फिचर नव्हतं तिच्या चेहऱ्यात!नाक-डोळे-चेहरा…सगळं अतिसामान्य!पण तरीही ती सावळी बाला सात्त्विक होती हे मात्र खरं!आता पुन्हा साडीच नेसली होती तिने!केसांचा सैलसर अंबाडा वळला होता.
माझ्याकडे जाणूनबुजून फारसं लक्ष न देता ती परस्पर स्वयंपाकघरात वळली आणि मी बाथरूममध्ये! बाहेर हॉलमध्ये गावाकडून आणलेल्या एक-दोन पिशव्या कात्रीने कापल्याचा आवाज काय तो आला आणि मी माझ्या अंघोळीत रममाण झालो.
ब्रॅंडेड-सुगंधी बॉडीवॉशचा भरपूर पांढराशुभ्र फेस अंगभर फिरवला.दहा-पंधरा मिनीटं अंगावर कोमट-थंड पाण्याचा शॉवर घेतला तेव्हा अंगाची कसकस कमी झाली.एकदम हलकं वाटू लागलं.खूश झालो मी! कपडे करून मी बाथरूमचा दरवाजा उघडला तसा मुगाच्या डाळीच्या खिचडीचा खमंग गंध रंध्रारंध्रांतून धावू लागला.
“खिचडीला अजून एक वाफ देतेच आहे….तोवर पापड भाजते आणि वाढतेच हं तुम्हाला!भूक लागलीय ना…. माझ्यामुळे वडापावही खाता आला नाही..” माझ्याकडे न पाहताच अपराधी स्वरात रमानं शब्दांची जुळवाजुळव केली! ती घाईघाईने आवरायचा प्रयत्न करत होती.
तीची ती पाठमोरी कमनीय आणि चपळ मूर्ती पाहून कोणाही नवविवाहित पुरुषाला मोह पडला असता पण मला पडला नाही! माझ्या बाबतीत सगळंच निराळं होतं.
स्त्रीसहवासाच्या बाबतीत मी नवखा नव्हतो.माझी एक मैत्रीण होती…म्हणजे आहे!
आहे की होती? हा खरंच गुंता आहे!
मिलिषा….!माझी मिली!
तिच्या आठवणीने चपापलो मी!
गार पाण्याच्या अंघोळीनंतरही घामरंच फुटलं.
तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाही असाच घाम फुटला होता मला. तिची आणि माझी पहिली भेट खरंच भयंकर होती.जेव्हा जेव्हा ती पहिली भेट आठवते तेव्हा तेव्हा नव्यानं विरघळतो मी तिच्यात!तिच्या सिगारेटच्या धुराच्या वर्तुळांमध्ये झोल होऊन जातो एकदम! मी तिच्यात गुंतत जाणं, हाही एक झोलच होता.मोठ्ठाच्या मोठ्ठा पण अपेक्षित झोल!
कोणीही जीव ओतेल तिच्या सौंदर्यावर…इतकी सुंदर होती ती! आणि नुसती सुंदर नाही हं… ‘ब्यूटी विथ ब्रेन ॲन्ड कॉन्फिडन्स इन एव्हरी व्हेन!’
आरस्पानी आणि बिनधास्त सौंदर्य होतं ते!आयटम बॉम्ब वगैरे संज्ञा मला आवडत नाहीत म्हणून….नाहीतर ती अणूबॉम्बपेक्षाही मादक ललना होती! मी जीव ओतून प्रेम करतो तिच्यावर….! करतो? म्हणजे करत होतो असं म्हणायला हवं आता!
“येताय ना….गरमगरम खिचडी खाऊन घ्या!” रमा माझ्या घरातल्या छोट्याश्या डायनिंग टेबलवर दोन छोट्या डीश घेऊन मला खिचडी खायला बोलावत होती.
भुकेच्या भरात मी पुढे सरकलो खरा! मग चपळाईनं तिनं खिचडीवर तुपाची धार धरली.गावाकडनं आणलेलं लिंबाचं लोणचं निगुतीनं बरणीत काढून ठेवलं आणि त्यातली छोटीशी फोड माझ्या ताटात घातली.
गरमगरम खिचडी! लोणकढं तूप! लोणचं! भाजलेला पापड!
आळून घट्ट झालेल्या तूपाची लोटी रमानं शेगडीवर ठेवली होती आणि त्या चरचर आवाज करत गरम होणाऱ्या तूपाचा तूपकट वास रंध्रारंध्रात भिनत होता. भुकेला जोर चढला होता.
होती डाळतांदळाची मऊ खिचडीच पण तरीही मी पोटभर जेवलो.अगदी मनापासून!
रमासाठी अंथरूण-पांघरूण काढून ठेवलं आणि दुसऱ्या खोलीत झोपायला गेलो.पुण्यातल्या माझ्या घरची ही लग्नानंतरची पहिलीच रात्र!इतरांच्या लग्नानंतरच्या पहिल्या रात्री पेक्षा खूप वेगळी…तो माझा मधुचंद्रच होता! पण नकोशा तरी हव्याहव्याशा,कधीही पाठ न सोडणाऱ्या आठवणीं सोबत!
=====================
प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.