गंध भाग १

©️®️ प्रज्ञा जोशी कुलकर्णी
संध्याकाळी साडेसहाच्या आसपास माझी एसटी कात्रज बसस्टँडला पोचली.माझ्या गावाहून पुण्याला यायला इतर आरामदायी सोयीसुविधा नाहीतच.शेवटी लालपरीच!सहा तासांच्या लाल डब्याच्या प्रवासानं अंग जसं आंबायला हवं,अगदी तसंच आंबलं होतं.कडक उन्हाळ्याचे दिवस!घामानं अंगाची चिकचिक झालेली!तो आख्खा दिवस तसा घामानं हाश्श-हुश्श करत गेलेला!एसटीभर घामाची किळसवाणी दुर्गंधी!
पण दिवस मावळायला आला तसं गार वारं सुखावायला लागलं!घामाच्या धारा सुकायला लागल्या.त्यामुळं अधमुऱ्या संध्याकाळच्या वेळीही पश्चिमेच्या गार वाऱ्यामुळं दिवसभर मेंदूला न शिवलेली गुंगी अंगभर पसरायला लागली.शेजारी रमा चूळबूळ करत होती पण मी मात्र खिडकी सताड उघडी टाकून अंगावर वारं घेत सीट मागे घेऊन निवांत झोपलो होतो.हळूहळू एसटीच्या संथ घुरघुरीच्या तालावर मला चांगलीच झोप लागली.गेले कित्येक दिवस झोपेसाठी तरसलो होतो मी….ती त्यावेळी लागली !
“चला…. कात्रजवाले उतरा!चला पटापट!”
कंडक्टरनं दोनतीनदा कचकून बेल मारल्यावर मी झोपेतून खडबडून जागा झालो.क्षणभर कळेचना आपण कुठे आहोत! काय करतो आहोत! सीटच्या खाली कोंबलेल्या आणि डोक्यावरच्या लोखंडी कप्प्यात ठेवलेल्या तीन-चार बॅगा मी भसाभसा बाहेर खेचल्या,जमेल तशा त्या ओढत एसटीच्या दारापाशी आलो आणि दरवाजाच्या तिसऱ्या पायरीवरून थेट रस्त्यावर उडी मारली.माझ्याबरोबर तीन-चार आणखी उतारू एसटीमधून भराभर रस्त्यावर आले आणि त्यांच्यापाठोपाठ गेले आठ दिवस माझा पाठलाग करणारा तोच पैंजणांचा आवाज!
तो मंजूळ पायरव होता रमाचा! गाढ झोपेत मी तर पार विसरूनच गेलो होतो तिला! आज तीही माझ्यासोबत होती!
तिची भलीमोठी सुटकेस खरंतर तिला आवरण्यातली नव्हती पण मी ती घेणार नाही याची जाणीव असावी तिला बहुधा! हातातला हिरव्याकंच काकणांचा चुडा सावरत, सवय नसतानाही नव्या लग्नाची नवलाई म्हणून नेसलेल्या जडशीळ साडीचा पदर आवरत जमेल तशी ती तिची सुटकेस ओढत होती……आठ दिवसांपूर्वीच माझं जिच्याशी लग्न झालं,नव्हे नव्हे लावून देण्यात आलं ती ही!….माझी बायको! रमा!
माझ्या लक्षात आलं तसा मी तिच्यासाठी थोडासा रेंगाळलो.म्हणजे तसा अभिनय केला!
डिझेलच्या करपट वासाचा भकाभक धूर सोडत एसटी पुन्हा भरधाव मार्गस्थ झाली आणि मी पुण्याच्या गर्दीत रूतून पडलो.पुन्हा! नव्याने!
आजूबाजूला नुकत्याच पसरू लागलेल्या काळ्या अंधारावर मात करणाऱ्या स्ट्रीट लाईट आणि बत्त्यांच्या उजेडात स्टोव्हची फरफर चालू होती.रिक्षेवाले,टमटमवाले प्रवाशांना आकृष्ट करण्यासाठी बेंबीच्या देठापासून आरोळ्या मारत होते.
दिवेलागणीच्या वेळचं ते शहर मधुचंद्राच्या रात्री बिलोरी नक्षीचं पोलकं घालून सजलेल्या नवविवाहित तरूणी सारखं चमचमत होतं!
अंग मोडून काढणाऱ्या प्रवासावर इलाज म्हणून कोणी चहाचे भुरके मारत होतं तर कोणी टपरीवाला कांदेपोह्यांसाठी कांद्याची फोडणी मारत होता.अंडाभुर्जी आणि बिर्याणीच्या वासानं माझी भूक चाळवली.खरंतर या जगात इतर कुठल्याही भावनांवर-वेदनांवर ताबा मिळवणं सोपं वाटतं मला पण गंध…..वासाच्या बाबतीत मात्र मी एकदम हलका आहे! गंधांच्या-सुगंधांच्या कह्यात जातो मी! चाळवला जातो वासामुळे!तो स्वभाव आहे माझा!स्वभावाला औषध नसतं पण औषधांइतके अगणीत,अनंत स्वभाव असतात हे खरंच आहे!
माझ्या या गंधकह्यात स्वभावालाही पार्श्वभूमी आहे!
आमच्या गावाकडच्या घराशेजारी शुक्ल नावाचं कुटूंब राहतं! मंडळी मूळची उत्तरप्रदेशातल्या कन्नोजची…कन्नोज….अत्तरांची राजधानी! वेगवेगळी अत्तरं,सुगंधी तेलं उत्तरप्रदेशातून इकडे महाराष्ट्रात आणून विकण्याचा त्यांचा मूळ व्यवसाय! अत्तरांसाठी-सुगंधी तेलांसाठी पश्चिम घाटावरून मिळणारा कच्चा माल मिळवणं सोपं जावं म्हणून त्यांनी आमच्या गावासारखं खेडं हेरून तिथं बस्तान बसवलं..त्यालाही आता पन्नासेक वर्षं झाली असावीत!आता ते मराठी मातीत रूजलेत!
कधीमधी उर्मी आली की शुक्ल काका स्वतः त्यांच्या इथल्या घरीही एखादं अत्तर बनवून पाहायचे! छोट्या प्रमाणात का असेना पण तशी सगळी व्यवस्था त्यांच्या इथल्या घरीही होती!
आमच्या घराशेजारी असलेल्या त्यांच्या घरामुळे आमचा सडकमाळ नवनव्या सुगंधांनी भारून गेलेला असायचा! वाळा,अस्सल गुलाब,बकुळ,खस, केवडा,चंदन अशा वेगळ्यावगळ्या गंधांशी माझी जवळीक तिथूनच सुरू झाली!
धोतराचा काचा खोवून अत्तर करायला बसलेले गोल गरगरीत पोटाचे उघडेबंब शुक्ल काका आजही जसेच्या तसे आठवतात मला!उत्तरेकडचा पक्का गोरा रंग! गोल गरगरीत पोटावर रूळणाऱ्या त्यांच्या जानव्याला किल्ल्यांचा जुडगा लोंबत असे.अत्तर बनवताना शुक्ल काकांची गोलमटोल मूर्ती त्यात तद्रूप होऊन जाई.
शुक्ल काकांची मुलगी माधुरी माझ्याच वर्गात होती.नावाप्रमाणेच भारी गोड! तिच्याचकडे वशीला लावून मी अत्तर करण्याची पद्धत जाणून घेतली.
उन्हाळ्यात गारवा हवा असतो.गारव्याबरोबर तजेला हवा असेल तर हे अत्तर! सणावाराला, लग्नमुंजींच्या सोहळ्यांना, हळदीकुंकवाला आणि अगदी रोजच्या देवपूजेत अत्तराचं कोण कौतुक!
मला तर अत्तराचंही कौतुक आणि काय काय करून ते अत्तर तयार करतात हे पाहण्याचं कुतूहलही!
अत्तर बनवताना तांब्याचा गोलगरगरीत रांजण वापरला जातो.या रांजणात सुवासिक फुलं,मसाल्याचे पदार्थ अर्थात ज्या पदार्थांपासून सुगंध निर्माण करायचा आहे तो पदार्थ घातला जातो.या रांजणाला डेग म्हणतात.या डेगाला मध्यभागी भोक असलेल्या एका झाकणाने घट्ट बंद केले जाते.पोकळ बांबूची नळी डेगाच्या झाकणाच्या मध्यभागी असलेल्या भोकात घट्ट बसविली जाते.
मातीच्या वीटांनी बांधून घट्ट घडवलेल्या भट्टीवर हा डेग खूप तापवतात.मग त्या डेगामधल्या सुवासिक पदार्थांची वाफ होऊन बांबूच्या नळीतून सुरईसारख्या लांबट तोंडाच्या भांड्यात सोडतात.या भांड्याला भपका म्हणतात.हा भपका पाण्याने भरलेल्या हौदात तरंगत ठेवलेला असतो.
भपका थंड पाण्यात तरंगत असल्यामुळे थंडच असतो. येथे डेगातून आलेल्या वाफेचे परत द्रवात रूपांतर होते. भपका थंड राहण्यासाठी पाण्यात सतत हलवत राहतात. डेगामधून भपक्यात येणाऱ्या वाफेतील सुगंध भपक्यातील चंदनाच्या तेलात शोषला जातो. ही प्रक्रिया अगदी बारा-बारा तास चालू ठेवतात.सुगंधी मालातील सर्व तेल भपक्यात निघून येते. काढलेला भपका स्थिर ठेवल्यावर त्यातील तेल पाण्यावर तरंगून वेगळे होते. तेल व पाणी वेगळे झाल्यावर भपक्याला तळाशी असलेल्या तोटीवजा नळातून पाणी काढून टाकले जाते. सुगंधी तेल खास बनविलेल्या चामड्याच्या बुधल्यात ठेवले जाते.या बुधल्यातून पाण्याचा अंश चामडय़ातून पाझरतो आणि फक्त सुगंधी तेल शिल्लक राहते.ते असतं अत्तर!माधुरीच्या भाषेत इत्र!
माधुरीला लाडीगोडी लावून मी एक-दोनदा हा सोहळा पाहिलाच!आधीच स्नायूस्नायूंमध्ये भरून उरलेली सौंदर्यासक्ती मग सुंगधाला व्यापून गेली.तो खरा माझ्या गंधकह्यात स्वभावाचा मला आठवणारा आरंभ!
तांब्याच्या डेगाला उष्णता देत बारीक डोळ्यांनी भपक्याकडे लक्ष ठेवणारी शुक्ल काकांची लंबोदर मूर्ती भारी देखणी दिसे!
हा देखावा दगडी फाटकाच्या भिंतींमधल्या झरोक्यांमधून चोरून पहायला गावाकडच्या पोरापोरींची झिम्मड उडे ! पण कुजबुज कुठूनतरी शुक्ल काकांच्या कानी पडे.. शुक्ल काकांना मात्र इतरांना त्यांची कलाराधना पाहणं मुळीच खपत नसे! प्राकृतिक हिंदी मिश्रीत मराठी शब्दांनी ते जमलेल्या पोरापोरींना चुचकारत आणि हाती एखादा पेढा-बर्फी किंवा गोड खाऊ टेकवून तशाच गोड शब्दांत मंडळींना पिटाळून लावत! कारणमीमांसा काहीही असो….अत्तराची जन्मगाथा त्यांनी सहजासहजी आम्हाला कळू दिली नाही.भगीरथप्रयत्नांनी ती मी समजून घेतली हा भाग नंतरचा!पण आयुष्यभर पुरून उरेल इतकं सुगंधप्रेम मात्र भरभरून ओतलं माझ्या जडणघडणीत….ते शुक्ल काकांनीच!
सुगंधाने मी हर्षभरीत होतो.दुर्गंधाने मी कासावीस होतो. फोडणीच्या-खाद्यपदार्थांच्या खमंग वासाने मी चाळवला जातो.
तेव्हाही मी तसाच चाळवलो गेलो.. गरमागरम वड्याच्या खमंग खरपूस वासानं!
हातातल्या पिशव्या एकमेकांवर रचून मी शेजारच्या वडापावच्या गाडीकडे मोर्चा वळवला. माझ्या पाठीमागे रमाही तिची भलीमोठी सुटकेस सांभाळत मान खाली घालून उभी होती.तिचा हा पहिलाच पुणे प्रवास! तोही माझ्यासोबतचा!बावरली होती ती बहुतेक!
अनोळखी असणाऱ्या आणि जाणूनबुजून अनोळखीच राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसात फरक असतो ना…! मी दुसऱ्या प्रकारात मोडत होतो. तिला माझी नजरही अनोळखी वाटावी, यासाठीच पूरेपूर प्रयत्न चालले होते माझे! तिला माझा तुसडेपणा जाणवत होता.पण ती संयमाने घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती! जाणवत होतं ते….करणार काय बिचारी अर्थात!
उन परतलं तरीही उष्णता अजूनही मागे रेंगाळत होती.वडापाववाला माणूस कढईतल्या तेलाच्या उष्णतेमुळे आणि हातातल्या झाऱ्यासोबत झुंज देण्याच्या श्रमांनी बेसुमार घामेजला होता. वड्याच्या खमंग वासामुळे तो घामाचा उग्र दर्प झाकोळून गेला असावा इतकंच!
=====================
प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.