गं कुणीतरी येणार येणार गं

©️®️सौ.गीता गजानन गरुड.
तात्यासाहेब व जीजीची पहाटेपासून लगबग सुरु झाली. जीजी आन्हिकं आवरुन शेगडीजवळ बसली होती. तापलेल्या बिड्याला केळीच्या सोपाने तेल लावून त्यावर तांदळाच्या पीठाचं पाणी डावाने गोलाकार ओतून, लुसलुशीत जाळीदार पांढरेशुभ्र घावण काढत होती व न्हिवण्यासाठी सुपात ठेवत होती. न्हिवले की चौपदरी घडी करुन ठेवत होती.
एका बाजूला तीचं विळीवर घरचा ताजा नारळ खोवणं सुरु होतं. गड्याला साद घालून ताजी करकरीत कैरी तिने काढून घेतली होती. तीही चटणीत जायची होती..आजच्या नाश्त्याचं अप्रुप म्हणजे..तो स्वतः तात्या, लेकीकडे घेऊन जाणार होते..माहेराची पहिलीवहिली भेट म्हणून.
जीजीचं घर तळमजल्यावर असल्याकारणाने तिने इमारतीच्या आवारात ही केळी,आंबा,माड अशी झाडं लावली होती. केळीचं हिरवंगार पान तिने मंदाग्नीवर हुलपवलं नं डब्यात ठेवलं. त्यात मग हे घावणे एकावर एक रचून ठेवले. वरतूनही केळीचं पान पांघरलं नं डब्याचं झाकण लावलं. दुसऱ्या आकाराने लहान डब्यात तिने हिरवीगार आंबटचिंबट चटणी भरली. हे सारे जिन्नस तात्यांच्या खुंटीला लटकवलेल्या शबनममधे अलगद हाताने ठेवले.
तात्यांनीही चहात बुडवून घावणे खाल्ले.
“हलवायाच्या दुकानातनं मिठाई घेऊन जाऊ का गं?” तात्यांनी विचारलं.
“नको. काल नारळाच्या वड्या केल्या होत्या. त्यांचा पुडा ठेवलाय शबनममधे. डब्यांसोबत तो पुडाही द्या म्हणजे झालं. बोलता बोलता जीजीचा गळा दाटून आला. डोळ्यातनं एक टपोरा थेंब पापणकाठावर चमकला.. लक्षात येताच जीजीने पदराने डोळे टिपले नं नाक ओढलं.
तात्यांच्या नजरेतनं जीजीची ती हालचाल सुटली नाही.
तात्यासाहेब, एका सुखवस्तू कुटुंबाचा कर्ताधर्ता. कुटुंब तसं छोटंच. ते,त्यांची सौ. यमुना..जिला सारे जीजी म्हणत व त्यांची एकुलती एक कन्या मधुमिता.. जीचं लग्न झालं होतं.
“येतो हं. काही लागलच तर बाजूच्या विश्वाला साद घाल असं म्हणत तात्या बाहेर पडले. सुती सदरा,पायजमा,खांद्यावर शबनम न् पायात कोल्हापुरी चपला..हा तसा त्यांचा नेहमीचाच वेश होता.
तात्या बसस्टॉपवर पोहोचले. बस एका मिनटात आलीदेखील. तात्या बसमधे चढले. मध्यावरची सीट रिकामी पाहून तात्यांना हायसं वाटलं. ते खिडकीला रेलले. धावत्या गाडीसोबत त्यांच्या मनाचं विचारचक्र सुरु झालं. पार भूतकाळात गेले ते. त्यांना आठवली बोबडी, एवढ्यातेवढ्या कारणांवरून रुसणारी, नाक फेंदारणारी त्यांची बबी.तिचं नाव होतं मधुमिता पण ते शाळेच्या पटापुरतं..फारफार तर वर्गातल्या विद्यार्थ्यांपुरतं. घरच्यांची ती बबीच होती. तात्यांच्या सख्ख्या बहिणीने घरातनं पळून जाऊन लग्न केलं होतं. तिचं बबी हे नाव मधुमिताला ठेवलं होतं.
या पळून गेलेल्या तात्यांच्या बहिणीचं आयुष्य उध्वस्त झालं होतं. नवऱ्याला जुगाराचा नाद होता. दारु,बिडी…..हजार व्यसनं. दिसायला गोरागोमटा पण व्यसनी. तिची मारझोड ठरलेली. शेवटी वर्षभरातच कंटाळून तिने तलावात जीव दिला. बहिणीचा तो फुगून वर आलेला म्रुतदेह कित्येक वर्षे तात्यांच्या मनावर तरंगत होता..साचलेल्या पाण्यावर साठलेल्या गाळासारखा.ते प्रकरण आत्महत्या म्हणून नोंदवलं गेलं होतं.
तेंव्हापासनं तात्यांनीही छोट्या बबीसोबत कडक धोरण अवलंबल होतं. शिस्त म्हणजे शिस्त. उलट बोलली,जास्त वेळ खेळासाठी बाहेर उंदडत राहिली की घरी आल्यावर तळहाताच्या बोटांवर फुटपट्टी मारायचे.बबीला न्रुत्याच्या क्लासला जायचं होतं,गाणं शिकायचं होतं..या सगळ्या इच्छांवर नन्नाचं पांघरूण घातलं होतं. तात्यांकडचं तिचं वास्तव्य म्हणजे पिंजऱ्यातील पोपट जणू.
तिकीट तिकीट करत कंडक्टर आला नि तात्यांच्या विचारांना अल्पसा ब्रेक लागला. तिकीट घेतल्यावर ते पाकिटात ठेवून त्यांनी पुन्हा खिडकीला डोकं टेकलं. त्यांच्या बाजूला एक पंचवीसेक वर्षांची नवविवाहिता येऊन बसली. अंगावर भरजरी शालू, हातात हिरवा चुडा..तिच्या नवऱ्याने सीटमागे हात ठेवून जणू तिला कव्हर केलं होतं.
तात्या पुन्हा त्यांची बबी आठवू लागले. वर्ष झालं तिचं लग्न होऊन. इतकं डोळ्यात तेल घालूनही शेवटी व्हायचं तेच झालं. बबीच्या बबीआत्यासारखी बबीही प्रेमात पडली.
तात्यांनी बबीसाठी त्यांच्या विश्वासातलं स्थळ शोधलं. उपवर मुलाची जातीने चौकशी केली. हुशार,गुणी,निर्व्यसनी होता..एका फायनान्स कंपनीत मोठ्या पोस्टवर कामाला होता.
नवऱ्याकडची मंडळी बबीला बघायला यायची होती पण बबी कुणा कारकुनावर तिचं प्रेम आहे,सांगू लागली. लग्न करेन तर त्याच्याशीच..हट्ट धरुन बसली.
भूतकाळात आलेल्या वाईट अनुभवांमुळे,तात्यांचा प्रेमविवाहावरचा विश्वास उडाला होता. लाडक्या बबीला या अग्निकुंडात मुळीच उडी घेऊ द्यायची नाही,त्यांनी निश्चय केला.
बबी जिद्दीला पेटली होती. आठवडाभर अन्नाच्या कणाला शिवली नाही. एकतर ही अशी मरणार किंवा पळून जाणार, त्यापेक्षा तात्यांनी निर्वाणीचं सांगितलं,”बबे,जा. वाटेला लाग. तुझ्या लग्नाला आम्ही येणार नाही. या घराचा नि तुझा संबंध संपला.”
जीजीतात्यांच्या पाया पडून खरंच बबी निघून गेली. जाताना पोरीने हक्काचं म्हणून गुंजभर सोनंही न्हेलं नाही. गळ्यातली सोन्याची चेन,कानातल्या रिंगा,अगदी पायातले पैंजणही डबीत ठेवून गेली.
बबी गेल्यानंतर, कित्येक दिवस जीजी, ती डबी उघडून मुक्याने रडत बसायची. तात्या दाखवत नसले तरी आतून हलले होते. हे वर्ष त्यांना एका युगासारखं गेलं.
कालपरवाच बबीची मैत्रीण भेटली होती. “बबीला सातवा महिना लागला. तिच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम झोकात पार पडला..बबी फार सुंदर दिसत होती..” म्हणत बबीचा त्यावेळचा फुलांनी नटलेला फोटो तिने तात्यांना दाखवला.
किती सुंदर दिसत होती बबी. पोट ठळक दिसत होतं..त्यावर फुलांचा कंबरपट्टा,गळ्यात निशिगंधाची पुष्पमाला, भाळावर मुकुट.. तात्यांना इतक्या दिवसांनी लेकीचं असं दर्शन झाल्याने भरुन आलं. बबीच्या मैत्रीणीने त्यांना बबी सारखी त्या दोघांची आठवण काढते म्हणून सांगितलं..बबीचा पत्ताही दिला.
रात्री, तात्यांनी जीजीला बबीचा फोटो दाखवला मात्र, जीजीच्या डोळ्यातनं पाऊसधारा वाहू लागल्या.
“उद्याच जातो बबीकडे. आली तर घेऊनच येतो माहेरपणास.”
“खरंच?”
“हो य. नीज आता.” जीजीच्या डोक्यावर थोपटत तात्या म्हणाले होते.
“परळ व्हिलेज..चला..परळ व्हिलेज. ओ काका..उतरायचं नं तुम्हाला.” कंडक्टरच्या हाकेने ते भानावर आले. बसमधनं उतरले. मेनरस्ता पार करुन छोट्या रस्त्याला लागले.
तिथेच डावीकडची गल्ली..एकाला पत्ता दाखवल्यावर त्याने सांगितलं. तात्या त्या अरुंद बोळात शिरले. दोन्ही बाजूला चाळी,उघडी गटारी,निळी पिंप प्रत्येकाच्या दारात. प्रत्येकाच्या दारालगत छोटीसी पुष्पवाटिका.
तात्या,बबीच्या घराजवळ आले. दारालगतच्या कुंडीत तुळस बहरली होती. नुकतच तिला पाणी,हळदीकुंकू वाहिलं होतं. मातीत रोवलेल्या उदबत्तीच्या धुराची वलयं ते वातावरण प्रसन्न करत होती.
“कोण आलंय बघ, मधु?” आतून मधुमिताच्या सासूने आवाज दिला. मधुमिताने दार उघडलं. दारात तात्या उभे..तिचे तात्या.
कपाळावर चंद्रकोर, गळ्यात मंगळसूत्र.. गर्भारपणामुळे अधिकच उजळलेली..बबी, तात्या पहातच राहिले.
“मधु,अगं कोण आलंय? इतका वेळ तू तिथेच का उभी?”
मधुमिताच्या तोंडून आवाज फुटेना. डोळ्यात तळं साचलं. मधुमिताचा नवरा,सासू दाराजवळ आले. दारात मधुमिताचे तात्या उभे. प्रत्यक्ष एकदाच पाहिलं होतं मकरंदने त्यांना. मधुमितासाठी मागणी घालायला गेला होता एकदा पण तात्यांनी त्याला लायकी विचारुन परतून लावलं होतं.
मकरंदने तात्यांचं स्वागत केलं. त्यांची आईशी ओळख करून दिली. त्यांना बसायला खुर्ची दिली. मधुमितालाही पलंगावर बसवलं. मधुमिताच्या सासूने तात्यांना पाणी आणून दिलं.
“मधुचे तात्या का तुम्ही?”
“हो.”
“मधु खूप काही सांगत असते तुमच्याबद्दल, जीजीबद्दल. तुमच्या सचोटीचा,पापभिरु स्वभावाचा अभिमान आहे मधुला” तात्यांनी भरल्या डोळ्यांनी मधुकडे पाहिलं.
“बबी, बोलणार नाहीस.. तुझ्या तात्याशी? बाप बोलला म्हणून रागावलीस..एकदाही घरी यावसं वाटलं नाही!”
“ताssत्या” म्हणत इतका वेळ दाबून धरलेला बबीचा हुंदका फुटला. बराच काळ तुंबून राहिलेलं धरण फुटावं तसं डोळ्यातले झरे वाहू लागले नि तात्यांची बबी.. नवरा,सासू,सासर सगळं विसरुन तात्यांना बिलगली. स्फुंदून स्फुंदून रडू लागली. तात्या,लेकीच्या पाठीवर मायेने हात फिरवत राहिले.
“बबे,आम्ही दोघं खुशाल आहोत. आता तुला पाहिलं ना अजून जोम आला बघ माझ्यात. तू दोन जीवांची,आता. अशी रडू नकोस,बाळा. हे बघ, तुझ्या जीजीने काय पाठवलय तुझ्यासाठी. तुझ्या आवडीचे घावणे,कैरीची चटणी..कैरी आपल्या झाडाची बरं. या वर्षीच धरु लागला आपला आंबा. कसला मोहरलाय सांगू तुला. घमघमाट नुसता. आणि..आणि एक हो या धर या ओल्या नारळाच्या वड्या. नारळ तुझ्या तात्याने खवलाय..अगदी हळूवार..बघ कशी पांढरीशुभ्र आहेत ना.”
तात्यांनी एक वडी लेकीला व जावयाला भरवली. मकरंदसमोर हात जोडत म्हणाले,”जावईबापू, विश्वासातलं स्थळ बघण्याच्या नादात लेकीचं मन राखलं नाही मी. तुमची तर लायकी..शक्य झाल्यास माफ करा मला.”
मकरंदने तात्यांना वाकून नमस्कार केला व म्हणाला,”ते तुम्ही नाही तात्या..परिस्थिती बोलत होती. मी जर तुमच्या जागी असतो तर कदाचित तेच केलं असतं. आता तुमचा जावई कारकून नाही तात्या. नुकतीच प्रोबेशनरी ऑफिसरची परीक्षा उत्तीर्ण झालोय मी.”
“अरे. बढिया.” तात्यांनी जावयाचा हात हातात घेऊन त्याचं अभिनंदन केलं.
मधुच्या सासूने पिवळेधम्म पोहे तात्यांसमोर ठेवले..वरती ओलं खोबरं न् कोथिंबीरीची पेरणी,लिंबाची फोड. जोडीला कडक चहा. तात्या नाश्ता बघूनच खूष झाले.
“तात्या,ही तुमची लेक मनाने अजुनही माहेरीच बरं का. पोहे करतानाही सांगत असते..तात्यांना ओलं खोबरं लागतच पोह्यांवर..गिजगिजीत पोहे आवडत नैत. कडक चहा लागतो,सोसायटीचाच. आम्हीही ती सोसायटीच आणायला लागलो बघा. चाळीत रहातो..म्हंटलं चहा तरी सोसायटीचा पिऊ.”
महिन्यातनं एकदाच दोन नारळ आणायचो आधी. आता ही कोकणी सून आल्यापासनं..भाजी,आमटी,वरण सगळ्यात ओला नारळ..दोन दिवसाला एक तरी नारळ लागतोच. आम्हालाही आवडू लागला आता कोकणी स्वैंपाक..” मधुची सासू,व्याह्याशी पावसासारखी बोलत होती.
तात्याही मग भरभरुन बोलले. त्यांचा जावईशोधाचा चष्मा कसा चुकीचा होता..तो कोणत्या कारणामुळे..ते सारं त्यांनी जावयाला व विहिणीला सांगितलं. मधु स्वैंपाकात गुंतली. तात्यांच्या आवडीची मुगभजी,वरणभात,मटारपनीर,मुळ्याची कोशिंबीर..सगळं सासूसोबत तयार करू लागली.
तात्यांच्या लक्षात आलं, सगळीच माणसं सारखी नसतात. मागे वाईट घडलं म्हणून परत तसंच घडेल हा आपला विचार सफशेल चुकीचा होता. मधुची सासू त्यांना आग्रह करकरुन जेवायला वाढत होती. परकेपण केंव्हाच गळून पडलं. मधुचा धाकटा दिरही कॉलेजातनं आला..मग त्याच्या गप्पा. मैफील रंगली होती.
तात्यांना आता लेकीस माहेरपणाला नेतो म्हणायचं होतं पण शब्दच फितूर झाले.
तात्यांचं हे अवघडलेपण मकरंदच्या लक्षात आलं. “लेकीला माहेरी न्यायचंय नं तात्या! अहो, त्यात एवढा संकोच कशाला. तुम्ही जन्मदाते अहात तिचे. तिच्यावर तुमचा हक्क पुर्वीइतकाच आहे.”
“जरुर घेऊन जा तात्या. सगळे लाडकोड पुरवा लेकीचे. हवे तेवढे दिवस ठेवा. हां मला इथे करमणार नाही मधुशिवाय पण तिच्या आईनेही एक वर्ष लेकीच्या भेटीशिवाय तळमळत काढलच ना. आता गळाभेट होऊद्या मायलेकीची.” मकरंदच्या आईने पुस्ती जोडली.
याच जावयाला, तो मधुमितासाठी मागणी घालायला आला असता आपण त्याची लायकी काढली होती, हे आठवून तात्यांना पुन्हा गलबलून आलं.
तात्या,मधुला माहेरपणासाठी घेऊन निघाले. जावयाला व विहिणीला घरी यायचं आमंत्रण दिलं.
जीजी दारात उभी होती. तिला खात्री होती, आज तिची गौराई येणार याची. तात्यांसोबत धीम्या पावलाने येणारी बबी, तिला फुलांचा मुकुट,गळ्यात पुष्पमाला,सुरेख कंबरपट्टा,बाजूबंद यांनी अलंक्रुत साक्षात फुलराणी भासली..जीजी तिच्या ओलावल्या नेत्रज्योतींनी गर्भार लेकीला ओवाळत होती,मनी गाणं गुणगुणत होती..
चांदण्यांत न्या गं हिला, नटवा सजवा
हिला झोपाळे झुलवा
भवताली असा तिला काय हवं पुसा तिचे डोहाळे पुरवा
गं कुणीतरी गं पारूताई
गं कुणीतरी येणार येणार गं
पाहुणा घरी येणार येणार गं
घरी येणार येणार गं
गं कुणीतरी येणार येणार गं..
(समाप्त)
—–सौ.गीता गजानन गरुड.
============================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही