एका अबोलीची गोष्ट

का गं खिडकी बंद केलीस?
सुयोगने संपदाला विचारलं तसं त्यांच्या तीन वर्षांच्या गोंडस सईला त्याच्या मांडीवर ठेवत संपदा तिला रागे भरली. “टेरेसमध्ये जायचं नाही. कित्तीदा सांगितलंय मनू तुला? का हट्टीपणा करतेस!”
मम्माचा रागाने लाल झालेला चेहरा पाहून इटुकल्या सईला रडू आलं. तिने चांगलाच सूर लावला. तसं सुयोगने तिचे चिमुकले डोळे पुसले. “सई,चल आपण घोडा घोडा करुया” असं सुयोगने म्हणताच सई खूष झाली व ओणवा राहिलेल्या सुयोगच्या पाठीवर बसली. टबडक टबडक टबडक टबडक करत त्यांचा घोडा चालू लागला. हॉलला दोन फेरे मारताच बाबाघोड्याची ढोपरं दुखू लागली. तसं मग त्यांनी भातुकलीचा थाट मांडला.
एव्हाना मम्माचा राग ओसरला होता. मम्माने सईला भातुकलीसाठी सुकी फळं दिली. तिचे आवडते खारट पिस्ताही दिले. “हे बग बाबा येवला मोत्ता खाऊ दिला मम्माने” असं म्हणत सईने तिची इवलुशी खाऊनी भरलेली ओंजळ बाबाला दाखवली.
तो खाऊ नीट छोट्या डब्यात ठेवून त्यांची स्वैंपाकाला सुरुवात झाली. अगदी आजीबाईसारखं बसून सईने खोटूखोटूचा वरणभात केला. आईबाबांना पानं वाढली. स्वतःला घेतलं. ते झाल्यावर खोटुखोटूचं आईसक्रीमपण दिलं. मम्माला तर दोन स्कुप दिले तिने. मम्माने सईची पप्पी घेतली. मग टिव्ही पहात खरोखरची जेवणं आवरली. संपदाओटा वगैरे आवरेस्तोवर सुयोगने सईला खांद्यावर घेऊन जुनी गाणी म्हणत निजवलं. सुयोग गाणी गायला लागला की सईही त्याच्या मानेवर डोकं ठेवून सूर लावायची. हळूहळू तिचा सूर विरत जायचा. चिमुकले डोळे निद्रादेवीच्या अधीन व्हायचे. सई निजली तसं सुयोगने तिला बेडवर कडेला निजवलं व स्वतः हेडफोन लावून गाणी ऐकत बसला.
फ्रेश होऊन संपदा बेडरुममध्ये आली व सईला तिने जवळ घेतलं. तिच्या भुरभुरीत केसांवर हात फिरवत तिला म्हणाली,”सॉरी बेटा.” सुयोगने संपदाच्या पाठीवर हलकेच हात ठेवला,”का गं मगाशी का लाल झालेलीस? बाकी मला सवय आहे गं तुझ्या रागाची पण पिल्लुला नाही नं.” सुयोग म्हणाला.
“अरे वेडी आहे का मी उगाचच रागवायला!”
“मी असं कुठं म्हंटलं?”
“ऐक जरा नीट. त्या समोरच्या बिल्डींगमधला आपल्या समोरचा फ्लेट बंद होता नं त्यात आठवडा झाला एक जोडपं रहायला आलंय.”
“बरं मग.”
” आपली मनू टेरेसमध्ये खेळत असते ना तर त्या समोरच्या घरातली बाई..जेमतेम चाळीशीची असावी. ती सारखी एक टक मनूकडे बघतच रहाते. मधूनच हसते. मनूला हात दाखवते. मी पहिलंपहिलं बोलायचा प्रयत्न केला तिच्याशी तर डोळे वेगळेच फिरवले तिने व खाली बघू लागली. मी घरात आले की परत तिचं मनूला बोलावणं,तिला हात दाखवणं सुरु. मनूही हल्ली तिला टाटा करते. मला ती बाई जरा विचित्र वाटते रे. उगा नजर
लागायला नको माझ्या पिल्लूला. मला भिती वाटते.”
“अगं,चांगली पोस्ट ग्रेज्युएट आहेस तू आणि काय हे नजर वगैरेवर विश्वास ठेवतेस!”
“तुला नाही कळणार. तू गप्प झोप बरं.”
“असा कसा झोपू तुला मिठीत घेतल्याशिवाय!” असं म्हणत सुयोगने संपदाला मिठीत घेतलं.
दुसऱ्या दिवशी रविवार होता. जरा उशिराच उठणं झालं. संपदा न्हाऊन टेरेसमध्ये गेली व तुळशीला हळदीकुंकू वाहू लागली. नकळत तिची नजर समोरच्या टेरेसमध्ये गेली. टेरेसमध्ये आरामखुर्चीत ती बाई बसली होती व तिचा नवरा तिला चहा देत होता. संपदाने निरखून पाहिलं. तिचा नवरा कपातला चहा बशीत ओतून फुंकर मारून गार करत होता व तिच्या ओठांना लावत होता. तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत होता पण ती बाई ढिम्म होती.
रोज संपदाचं न्हाणं सुयोग ऑफिसला गेल्यावर व्हायचं त्यामुळे तिने हे सारं पाहिलं नव्हतं. तिला वाटलं नक्कीच ही बाई मंद असावी. अरेरे! पण या माणसाने तिच्याशी लग्न का केलं असेल? का ती लग्नानंतर अशी झाली असेल? अनेक विचार संपदाच्या मनात येऊ लागले तितक्यात सईच्या रडण्याचा आवाज आला तशी ती घाईघाईत बेडरुममध्ये आली. तिने सईला उचलून मांडीवर घेतलं व तिला पाजलं तशी सई शांत झाली. तिला परत गाई आली. आत्ता संपदा उठणार व कामाला जाणार तोच सुयोगने त्याच्या पिळदार बाहुपाशात तिला जखडलं.
“अरे आंघोळ केलेय मी. पुरे तझा खोडकरपणा” म्हणत संपदाने लटक्या रागाने त्याला बाजूला सारलं. सुयोग तिच्या ओलेत्या केसांतून पडलेल्या जलबिंदूंनी शहारला. शिकेकाईचा मंद सुगंध तिच्या केसांतून येत होता जो सुयोगला नेहमीच वेडं करायचा.
संपदाने सुयोगला बळेबळेच बाथरुममध्ये ढकललं व कांदेपोहे बनवू लागली. कांदेपोह्यांचा दरवळ घरभर पसरला. सुयोगने देवपूजा केली व नाश्ता करायला बसला. तेवढ्यात संपदाने सईला उठवलं. तिचं तोंड वगैरे धुवून तिला पोहे भरवू लागली तसं सईने मान फिरवत नन्ना म्हंटलं व टेरेसकडे बोटं दाखवू लागली तसं सई तिला डोळे मोठे करुन म्हणाली,”काल मी सांगितलं नं तुला तिथे जायचं नाही म्हणून.”
पण सई हटून बसली तसं सुयोग तिला घेऊन व तिची पोह्याची प्लेट घेऊन टेरेसमध्ये गेला. सई नाश्ता करायला बसली की टेरेसमध्ये चिऊताई जमा व्हायच्या. सई आपल्या इवल्या इवल्या बोटांनी चिऊताईला पोहे घालू लागली व बाबा तिला छोटे छोटे घास भरवू लागला. मध्येच त्याचंही लक्ष समोरच्या टेरेसकडे गेलं. ती बाई चिऊला एकटक पहात होती. सुयोगलाही जरा विचित्र वाटली ती.
संध्याकाळी संपदा हेअरकट करून घेण्यासाठी पार्लरमध्ये गेली. सईला छान फ्रॉक घालून सुयोग खाली असणाऱ्या बागेत घेऊन गेला. सईला लॉनवर बसायला फार आवडायचं. आजूबाजूला कण्हेरीची झाडं होती. ती पिवळी लांबडी फुलं हिरव्यागार गवतावर विखुरलेली असायची. सई इतर दादाताईंचे खेळ बघत बसायची. एखादं फुलं तिच्या ओच्यात पडलं की खुदकन हसायची. सुयोग तिथेच बाजूला बसला होता. त्याचं लक्ष बाजूच्या उंचवट्यावर गेलं. तिथं ते समोरच्या टेरेसमधलं दाम्पत्य बसलं होतं. झोका खेळण्यासाठी दोघीतिघी ताई सईला उचलून घेऊन गेल्या. सईला या तायांसोबत झोके घ्यायला फार आवडायचं. त्या तायाही तिला नीट सांभाळायच्या.
सुयोगच्या काय मनात आलं ते तो त्या दाम्पत्याजवळ गेला व त्याने त्या दोघांना नमस्कार केला. त्यातल्या नवऱ्यानेही नमस्कार केला पण त्या बाईचं लक्ष नव्हतं. ती एकटीच दुर्वांत बोट हलवत बसली होती. तसं त्या माणसाने त्याची ओळख करुन दिली. तो प्रसन्न वैद्य व त्याची बायको अबोली वैद्य. प्रसन्नाने सुयोगच्या चेहऱ्यावरची प्रश्नचिन्हं वाचली व त्याला म्हणाला,” सांगतो, उद्या दुपारी चार वाजता घरी याल आमच्या?” सुयोगने प्रसन्नाशी हात मिळवला.
दुसऱ्या दिवशी सुट्टी होती. सुयोग व संपदा,सईला घेऊन त्या समोरच्या बिल्डींगमध्ये गेले. दरवाजावरील पाटीवर नावं होती ,सौ. अबोली प्रसन्न वैद्य व श्री. प्रसन्न श्रीकांत वैद्य. सुयोगने डोअरबेल वाजवताच प्रसन्नने दार उघडलं.
प्रसन्नच्या म्हाताऱ्या आईने शिरा बनवला होता. तिने स्वतः सईला शिरा भरवला. संपदाला खूप बरं वाटलं. आपल्या जवळच्या माणसाच्या घरी आल्यासारखं. सुयोगने जेंव्हा तिला या घरी जायचंय म्हणून सांगितलं होतं तेंव्हा ती प्रचंड संतापली होती पण सुयोगने बरीच आर्जवं करुन तिला त्याच्यासोबत येण्यास भाग पाडलं होतं.
बऱ्याच दिवसांनी ती असा मायेच्या हातांनी बनवलेला शिरा खात होती. नंतर आजीने साऱ्यांना मसाला दूध दिलं तेंव्हा तर संपदाला तिची आई तिला मसालादूध बनवून द्यायची त्या आटीव,सुगंधी मसालादुधाची आठव आली. सई आजीसोबत रुळली.
सुयोगनेच मग धाडस करुन विचारलं,”वहिनी दिसत नाहीत त्या?”
प्रसन्न म्हणाला,”निजली आहे. झोपेच्या गोळ्या द्याव्या लागतात तेंव्हा झोपते. माझी अबोली कोकणातली. मी मामाच्या गावी सुट्टीला जायचो. अबोलीचं घर माझ्या मामाच्या घराशेजारी होतं. अगदी लहानपणापासून आम्ही एकत्र खेळायचो. आमराईत उंदडायचो,चिंचा पाडायचो. गाभुळलेल्या चिंचा पाडून देण्यासाठी अबोली माझ्याकडे हट्ट करायची. मग मीही तिच्या हट्टाला मान देऊन प्रसंगी अगदी लवचिक फांदीवर चढून तिला चिंचा काढून द्यायचो. परकराचा ओचा फाकवून ती त्या चिंचा झेलायची. खिशात तिखटमीठाची पुडी असायची. आम्ही दोघं व इतर भावंड मिळून चिंचा,कैऱ्या तिखटमीठ लावून खायचो.
माझ्या अबोलीला अबोलीची फुलं फार आवडायची. माझ्या मामाच्या परड्यात भरपूर अबोली फुलायची. आम्ही दोघं मिळून फुलं काढायचो. आंब्याच्या झाडाखाली बसून अबोली वळेसर बनवायची. हातभर लांब वळेसर झाला की मी मापून बघायचो. माझ्या मामीला,आईला व अबोलीला असे तीन भाग करायची, ती वळेसराचे. तिची आई तिच्या लहानपणीच देवाघरी गेली होती. वडील पोस्टमन होते. केवळ अबोलीसाठी त्यांनी दुसऱ्या लग्नाचा विचार केला नव्हता. माझी मामी,आई दोघीही अबोलीला फार जपायच्या. तिचे लाड करायच्या.
आई तर गावी जाताना मामाच्या मुलांसोबत अबोलीलाही खणाचं परकरपोलकं घ्यायची. काय गोड दिसायची ती दोन वेण्या,त्यांत माळलेला अबोलीचा वळेसर व परकर पोलका घातलेली. शेताच्या बांधावरून धावत सुटायची. मीही तिच्या मागून धावायचो.
मोकळ्या शेतात वारा घोंघावत असायचा. तोंड उघडं ठेवून तो वारा प्यायचो. कधी शेतातल्या तळ्याकाठी बसायचो. बारीक खडे तळ्यात टाकायचो. त्या संथ पाण्यावर उमटणारी वलयं बघत रहायचो. पांढरेशुभ्र बगळे शेतात यायचे. ते फार आवडायचे आम्हाला. आम्ही दोघं त्यांच्याजवळ जाऊ लागलो की ते क्षणार्धात उडून दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन बसायचे. आमच्या दोघांत दोन वर्षाचाच फरक होता. मामाची मुलं मात्र सहासात वर्षाने मोठी त्यामुळे त्यांचे खेळ वेगळे होते. ती क्रिकेट खेळायची. मला मात्र अबोलीसोबत भातुकली, विटीदांडू,सारीपाट खेळायला आवडायचं.
भातुकलीसाठी लागणारा खाऊ आम्हाला मामी,आई द्यायच्या. मी अबोलीला खोट्याखोट्या विहिरीतून पाणी शेंदून द्यायचो. अबोली मग परकराचा बोंगा एकत्र करुन खाली बसायची. सावंतवाडीची लाकडी भातुकली होती तिची. त्यात गेस नव्हता. चुल होती. बारीक काटक्या लावून अबोली चुल पेटवायची. चुलीवर आदण ठेवायची. त्यात धुतलेले तांदूळ वैरायची. भात शिजत आला की भात वाळायची. जात्यावर तांदूळ दळून भाकऱ्या थापायला घ्यायची. भाजी,आमटी बनवायची. मला जेवायला वाढायची. स्वतःला वाढून घ्यायची. मग तेवढी भांडी घासायची. मी पाणी शेंदून द्यायचो. मी मुंबईला यायला लागलो की अबोली खट्टू व्हायची. लवकर ये रे प्रसन्ना म्हणून सांगायची. मलाही तिचा निरोप घ्यायला जीवावर यायचं.
पुढे मी नववीत गेल्यावर व्हेकेशन क्लासेसमुळे गावी जाणं बंद झालं. ते अगदी नोकरी लागल्यावर मामाकडे गेलो तेंव्हा अबोली फारच बदललेली दिसली. तिच्या डोळ्यांतला अवखळ,,अल्लडपणा जाऊन त्यात लज्जेचे भाव उमटले होते. माझी अबोली अंगोपांगाने अगदी बहरली होती. ती माझ्यासाठी खास स्वतः बनवलेली ताकाची कढी घेऊन आली. तिला पहाताच मी स्तंभित झालो. ही इतकी सुंदर कशी दिसायला लागली असा मला पडलेला प्रश्न तिच्या नजरेनेच वाचला व तिने लाजून खाली मान घातली.
त्या सुट्टीत आमच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतरण झालं. विहिरीवर ती पाणी शेंदत असताना तिला मी प्रपोज केलं. ती भांबावली व तिच्या हातातला राजू सुटला. तिने लाजून तिच्या दोन्ही हातांनी तिचं लज्जित मुखकमल लपवलं होतं. मीही माझ्या दोन्ही हातांनी तिचे हात बाजूला सारुन तिच्या चेहऱ्यावरची लज्जा पहात होतो. तिची नजर जमिनीला खिळली होती. मी माझ्या तर्जनीने तिची हनुवटी वर उचलली. तिच्या अगदी जवळ गेलो. दोघांचाही श्वासोश्वास दोघांना ऐकायला येत होता.
इतक्यात पांदणीतून ‘कळशी कशी पडली गो’ असा अबोलीच्या वडिलांचा आवाज ऐकू आला व आम्ही दूर झालो. मी विहिरीतल्या चिऱ्यांना धरून खाली उतरलो व कळशी काढून दिली तशी विहिरीजवळ आलेल्या अबोलीच्या नानांनी माझी पाठ थोपटली. माझ्या शिक्षणाविषयी आस्थेने चौकशी केली. मीही इंजिनिअर झाल्याचं सांगून गोदरेजमध्ये नोकरीला लागल्याचं सांगितलं व वाकून नानांच्या पाया पडलो. नानांनीही हक्काने पेढे घेऊन ये म्हणून सांगितलं.
त्यादिवशी रात्री मामाची म्हैस व्यायली. दोनतीन दिवसांनी मामीने भल्या मोठ्या टोपात खरवस बनवला. मी केळीच्या पानात खरवस बांथून घेतला व अबोलीच्या घराकडे गेलो. अबोली शेणाने होवरी सारवत होती. नाना बाहेरच्या ओट्यावर सुपारी कातरत बसले होते. मी नानांच्या हातात खरवस दिला व म्हशीला रेडी झाल्याचं सांगितलं.
मी डोळ्याच्या कोपऱ्यातून, नाजूक बोटांनी जमिनीवर शेणाची वलयं काढणाऱ्या अबोलीकडे पहात होतो. नानांच्या ते लक्षात आलं. ते मिशीतल्या मिशीत हसले व त्यांनी अबोलीला माझ्यासाठी जायफळ घालून कॉफी बनवायला सांगितली. ते मग माझ्याशी आंब्याच्या उत्पादनाबद्दल वगैरे बोलत बसले. अबोली माझ्यासाठी कॉफी घेऊन आली. नाना पान खात होते ते मला बैस सांगून त्यांच्या कामाला गेले. सारवण जरासं वाळत आलं तसं अबोलीने करवंटीत पांढरी शेड भिजवून घेतली व तिच्या नाजूक बोटांनी ती गोलं नक्षी उमटवू लागली. कडेलाही तीन बोटांची नक्षी उमटवत जाऊ लागली तसं मी मागूनच तिला माझ्या मिठीत घेतलं. तशी ती अगदीच संकोचली. मग मीच बाजूला झालो.
दोनेक दिवसांत नाना आमच्या मामाकडे आले. त्यांनी अबोलीसाठी माझा हात मागितला. अबोली माझ्या आईवडिलांना, मामामामीला पसंत होतीच. तिच्यात नाव ठेवण्यासारखं काहीच नव्हतं. लग्नाची बोलणी झाली. अवघ्या महिनाभरात आमचं लग्न झालं. लग्न अबोलीच्या खळ्यात झालं. खळ्याला छान सारवलं होतं. आंब्याच्या टाळांचा हिरवागार मांडव घातला होता. प्रवेशद्वारावर केळीचे खांब उभे केले होते. गावातलं पारंपारिक वाजप होतं. सगळे गावकरी नानांना मानत होते. उभा गाव लग्नासाठी आला होता. जेवणात फणसाची भाजी,अळू,काळ्या वटाण्याचं सांबारं,वरणभात,बुंदीचे लाडू ,कांदाभजी होती. सगळं गावातल्याच महिलांनी मिळून रांधलेलं. विकतचं काही नव्हतं.
नानांना निरोप देताना अबोली त्यांच्या गळ्यात पडून खूप रडली तेंव्हा साऱ्या गावकऱ्यांचे डोळे पाणावले होते. इकडे चाळीतही अबोली सगळ्यांची लाडकी झाली. माझ्या लग्नानंतर सहाएक महिन्यात माझ्या वडिलांच आकस्मिक निधन झालं. माझ्या आईला मानसिक धक्का बसला होता. मी तर आतून तुटून गेलो होतो. अबोलीने आम्हा दोघांना सावरलं,पुन्हा माणसांत आणलं. नानाही महिनाभर येऊन राहिले होते. त्यांनी खूप धीर दिला मला. या कालखंडात आई व अबोली अधिकच जवळ आल्या. अबोलीने माझ्या आईला पुन्हा हसतंखेळतं केलं.
दोनेक वर्षांनी आम्हाला लेक झाली. बाळंतपण माझ्या आईने केलं. नाना सहा महिने इथेच येऊन वास्तव्यास होते. त्यांची शेती मामा बघत होता. खूप गोड होती आमची जाई दिसायला. तिच्या येण्याने घराला नवं चैतन्य आलं. जाईला पाय फुटले तसं नानांनी घुंगरुवाले पैंजण घातले तिला. ती एकेक पाऊल टाकत घरभर फिरायची व तिच्या पाठून नाना फिरायचे. चाळीत सगळ्यांची लाडकी होती जाई. पटकन कोणाहीकडे जायची. एकदा मी तिला हवेत उडवून झेल घेत होतो. असं केलं की खळाळून हसायची ती पण नेमका माझा झेल चुकला न् होत्याचं नव्हतं झालं. जाई खाली फरशीवर पडली. मेंदूला मार लागला तिच्या. तिथेच डोळे फिरवले तिने.
मला काही सुचत नव्हतं. मी जाईला उठवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होतो. अबोलीकडे पाहिलं,अबोली अचेतन झाली होती. तिच्या डोळ्यांतून पाण्याचा टिपूसही गळला नाही. आई,नाना,मी धाय मोकलून रडत होतो. माझे मामामामी आले. मामीने अबोलीला कवेत घेतलं व हंबरडा फोडला पण अबोलीच्या साऱ्या संवेदना थिजल्या होत्या. आत्ता पंधराएक वर्ष झाली या गोष्टीला. अबोलीला माणसात आणण्यासाठी नामवंत डॉक्टर केले. हळूहळू सुधारतेय ती पण हवी तशी नाही. लहान मुलांना पाहून तिच्यात बदल घडेल म्हणून बागेत घेऊन जायचो पण छे! कंपनीने मला घरुन काम करण्याची परवानगी दिली कारण अबोली स्वतःच्या जीवाचीही निगराणी करेनासी झाली होती. तिला न्हाऊमाखू घालणं,तिची वेणी घालणं,सगळं मी करतो. बऱ्याच नातेवाईकांनी, प्रत्यक्ष नानांनीही मला परत लग्न करण्याचा सल्ला दिला. अबोलीला घेऊन जातो म्हणाले पण मी स्पष्ट नकार दिला. मरेपर्यंत अबोलीची सेवा करेन म्हणालो.
आमची चाळ बिल्डरने विकत घेतली तसं इथं रहायला आलो. हा टेरेस फार आवडतो अबोलीला. तुमच्या छोटीला पाहून कधी नव्हे ते अबोलीच्या मुखावर हसू उमटलं तब्बल पंधरा वर्षांनी. याला कारण आहे हा फोटो” असं म्हणत प्रसन्नने एका कोरीव पेटीतला फोटो सुयोगला दाखवला. त्यांच्या जाईचा फोटो अगदी हुबेहूब सईसारखा होता. सुयोग व संपदा दोघं क्षणभर चकीत झाले. वातावरणात एक शांतता पसरली.
संपदा अचानक उठली व त्यांच्या बेडरुममध्ये गेली. बेडवर अबोली झोपली होती. तिच्या केसांत हात फिरवत म्हणाली,”खूप सोसलंस अबोलीताई. मला माफ कर. मी तुला चुकीचं समजत होते. तुला यातून बाहेर पडण्यासाठी आम्ही तिघंही मदत करु.”
दुसऱ्या दिवशी सुयोग व संपदाने प्रसन्नासोबत अबोलीवर उपचार करणाऱ्या मानसोपचारतज्ञांची भेट घेतली. डॉ. कांबळे यांनी सुयोग व संपदाला सांगितलं की यात रिस्क आहे. कदाचित अबोली तुमच्या सईला तिची जाई समजेल व तुमची सई तुम्हाला परत देणार नाही पण संपदाने आत्ता पाऊल उचललं होतं अबोलीला माणसात आणायचं.
रोज संपदा कामं आवरली की तासभर सईला वैद्यांच्या घरी नेऊ लागली. आजी सईसाठी लाडू,चिवडा करुन ठेवायची. सई त्यांच्या घरभर फिरायची. अवचित जाऊन अबोलीच्या मांडीवर बसायची. तिच्या गालांना,ओठांना हात लावायची. हजारोंच्या औषधांनी जे साध्य झालं नाही ते सईच्या इवल्याशा हातांच्या मायेने साध्य होत होतं.
एकदा सई आपला टेडी घेऊन आली होती. वरती पलंगावर उभी राहून ती तो खाली फेकत होती परत उचलून वरती चढत होती परत फेकत होती. भिंतीपाशी बसलेली अबोली हे सारं बघत होती आणि अचानक ती धावत आली व तिने टेडीला उचललं. माझं बाळं..माझी जाई ग..कुठे गेलीस मला सोडून असा आक्रोश करुन रडू लागली. तिचा आक्रोश पाहून सई भेदरली. तिला आजीने उचलून घेतलं व टेरेसमध्ये न्हेलं.
संपदाच्या मांडीवर डोकं ठेवून अबोली लहान बाळासारखं रडत होती..कित्येक वर्ष कोंडलेले अश्रु बाहेर पडत होते. डॉ.कांबळ्यांना हे सांगितलं तेंव्हा ते फार खूष झाले व क्रेडिट गोज टू संपदा मेडम असं म्हणाले. त्यानंतरही संपदा रोज सईला वैद्यांकडे घेऊन जात राहिली. वर्षभरात अबोली माणसात आली. स्वत:ची कामं स्वतः करु लागली. त्यानंतर वर्षभरात घरातली कामंही करु लागली. नुकतच त्या जोडप्याने अनाथालयातून एका दोन वर्षाच्या मुलाला दत्तक घेतलं. सईला दादा मिळाला. अबोलीच्या मायेमुळे तो थोड्याच दिवसांत तिला हक्काने आई म्हणू लागला.
नाना आत्ता अबोलीकडेच रहायला आले. सईला व तिचा छोटू दादा जयेशला ते बागेत घेऊन जातात ,झोपाळ्यावर,घसरगुंडीवर खेळवतात. अबोली व संपदा छान मैत्रिणी झाल्याहेत. हे सारं पाहून प्रसन्नाची आई आनंदाने डोळे टिपते.
सौ.गीता गजानन गरुड.
==================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============