Ritbhatmarathi

Search
Close this search box.

प्रत्येक व्यक्ती ही निसर्गतःच स्वतंत्र विचारांची,स्वभावाची,व्यक्तिमत्त्वाची असते…प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आवडीनिवडी आणि सवयी असतात त्यातील काही चांगल्या तर काही गैरही असतात. पण माणसाला स्वतःच्या चांगल्या सवयी प्रमाणे वाईट सवयीनंबद्दलही तेवढंच प्रेम असतं. पण जेव्हा कुणी त्रयस्थ किंवा अन्य कुणी व्यक्ती या सवयी बदलवण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तो मनुष्य असमाधानी राहतो. एखाद्याच्या सक्तीमुळे तो स्वभाव बदलावा लागला हे तो मनुष्य कधीच विसरू शकत नाही त्याचा परिणाम म्हणून तो मनुष्य चिडचिडा,हतबल आणि निराश होतो म्हणून त्याला वेगवेगळे मानसिक आजार जडतात.

अगदी स्नेहलच्या बाबतीत असंच झालं…ग्रॅज्युएट असणारी स्नेहल लग्नाआधी अतिशय आनंदी,नोकरी करणारी त्याचबरोबर घर उत्तमरीत्या सांभाळणारी अशी,नेहमी हसतमुख,अवखळ आणि बेपर्वा अशी होती.पण आज लग्नानंतर अतिशय जागरूक,अगदी व्यवस्थित आणि खूप कामसू त्याचबरोबर तितकीच उदासही झालीय…बोलघेवडी असणारी स्नेहल गप्प-गप्प आणि शांत राहू लागलीय कारण लग्नानंतर जादूची काडी फिरावी आणि स्वभाव बदलावा असं झालं होत स्नेहलच्या बाबतीत…खूप दिवसांनी मिताली आणि स्नेहल भेटल्या तेव्हा गप्पांची मैफिल रंगली अचानक दोघींची बोलणी स्वभावाविषयी झाली…

मिताली – काही म्हण…स्नेहल तू खूप बदलीस यार….

स्नेहल – बदलली म्हणजे काय गं…आता बदलवाच लागतं जबाबदारी येऊन पडते ना अंगावर…..

मिताली – ते झालंच गं दिसण्यातला बदल समजू शकते…पण वैचारिकदृष्ट्या इतकं बदलावं लागतं हे काही पटत नाही मला…

स्नेहल – काही झालं तरी आपल्या संसारासाठी आपल्या आवडी निवडीना मुरड घालावीत लागते…तुला माहिती आहे लग्नानंतर नवीन नवीन माहेरकडून गोड धोड असलेलं पदार्थ देतात त्यात मुरड घातलेली करंजी नेहमी आणि आवर्जून देतात याचा अर्थ काय तर….मुलीने आपल्या आवडी निवडींना मुरड घालणं म्हणजेच दुसऱ्यांच्या आवडी निवडीचा सर्वात आधी विचार करणं…!

मिताली – हे ठाऊकच नव्हतं मला….बरं बोलण्यातही चतुर झालात तुम्ही…मानलं बाबा…पण तुला आठवण येते का गं…मितेशची…का त्या आवडीलाही मुरड घातली कायमची…?

स्नेहल – मिताली….मला जायला हवं…घरी शंतनू वाट पाहत असेल माझी…

मिताली – स्नेहल…झालेलं विसरता येणं शक्य असतं का गं…?

स्नेहल – मिताली…नको आठवणी काढूस आधीच्या….राहवत नाही गं…आणखी त्रास होतो…[ स्नेहलच्या डोळ्यांच्या कडा अलगद पाणावतात ]

मिताली – मला आठवण काढून द्यायची नव्हती पण तू अजूनही त्या आठवणीत जगतेय…

स्नेहल – छे…काहीच नाही तसं…आणि मी कशाला आठवणीत जगू…

मिताली – हे तुझ्या हातातलं व्रीस्ट वॉच सांगतय…मितेश ने दिलेलं पहिलं गिफ्ट…

स्नेहल – मिताली ते यांनी दिलंय गं मला पहिल्या ऍनिव्हर्सरीचं गिफ्ट…

मिताली – खोटं पण बोलायला शिकलीस वाह्ह…ग्रेट आहेस तू…तुझ्या आई-वडिलांसाठी तू स्वतःच्या अपेक्षा मारून बोहल्यावर उभी राहिलीस ते काय मला माहिती नाही का…

स्नेहल – जाऊ देत ना कशाला जुन्या आठवणी उगाळून काढायच्या त्यानं आता काय होणार आहे अजून त्रासच होईल की….हा आता माझं शंतनू वर प्रेम नाहीय पण त्याच माझ्यावर प्रेम आहे गं हे विसरून चालत नाही…मग तो एवढा जीव लावतो मला मग मला त्याच्यासाठी बदलावं लागलं तर गैर काय आहे त्यात…?

मिताली – अगं पण जिजुंना असं वागताना तुझ्या असणाऱ्या इच्छा त्याच काय…शंतनूला ज्या गोष्टी तुझ्याबद्दल आवडतं नव्हत्या त्या गोष्टी प्रेमाचा बुरखा पांघरून शंतनूने तुझ्याकडून करवून घेतल्या त्याबदल्यात तुला ना प्रोत्साहन मिळालं ना सन्मान…हे चूक आहे…

स्नेहल – अगं माझ्या बाबतीत असं घडत असं नाहीय…तुला प्रिया आठवते का गं…तिचीही अशीच तक्रार आहे कारण ती तिच्या सासूबाईंपासून नाराज आहे…आता प्रिया लग्नाआधी सोशल वर्क चा कोर्स करून नाव कमावलेली अशी म्हणून प्रियाचा जास्त वेळ हा समाजोपयोगी काम करण्यात जात असे त्याचबरोबर अभ्यास,भटकंती आणि मौजमजा हा सगळा भाग एक कामाचाच भाग असल्याने प्रियाला तसं करावं लागत असे…पण लग्नानंतर परिस्थिती बदलली घरातली काम करून बाकी सगळ्याला वेळ देता येत नव्हता तर याला कारण कोण तर प्रियाच्या सासूबाई कारण आपल्यासारखं गृहिणी असावं असं तिच्या सासूबाईंना वाटायचं आता असं कसं लगेच बदलता येईल प्रियाला नाही का…मग काय दोघींचे विचार पटत

नाही मग नवऱ्याला घेऊन वेगळं राहणं नशिबात आलं प्रियाच्या…एकूण काय दोघी स्वभावाने चांगल्या असूनही एकमेकांना शत्रू समजतात ना…

इतक्यात स्नेहलच लक्ष घड्याळाकडे गेलं…आणि ताडकन उठून उभी राहिली….

स्नेहल – बाप रे मला निघालं पाहिजे सहा वाजत आलेत…

मिताली – अगं…थांब आपण दोघी बरोबरच निघुयात…

असे म्हणून दोघीही तिथून निघाल्या…खरं सांगायचं झालं तर शंतनू एवढा वाईट मुलगा नाहीय…ही गोष्ट फक्त स्नेहल ला ठाऊक आहे पण हे मितालीला पटवून द्यायची काही गरज नव्हती म्हणून मुद्दाम स्नेहलने मितालीला आपल्या घरी नेलं…घरी आल्या आल्याचं मितालीला एका उंच आणि उमद्या मनाच्या मुलाने पाणी आणून दिलं…त्याचबरोबर त्यांच्याशी हसून खेळून बोलणंही सुरु झालं…बोलता बोलता तो व्यक्ती आतमधल्या खोलीत निघूनही गेला…मितालीने स्नेहाला प्रश्न केलाही….

मिताली – शंतनू जीजू कुठे दिसत नाहीय…?

स्नेहल – अगं हे काय आता तुझ्याशी बोलून आत निघूनही गेले की…

मिताली – काय….? हे जीजू होते अगं पण मी लग्नात कुणी दुसराच…

स्नेहल – होय…बरोबर आहे तुझं…काही वर्षांपूर्वीच त्यांच्या चेहऱ्यावर सर्जरी झाली होती…

मिताली – कसं काय तू काही सांगितलंच नाही गं…

स्नेहल – आम्ही दोघे असेच बाहेर फिरत असताना माझ्यावर कुणी अज्ञात ऍसिड फेकण्याचा प्रयत्न करत होत पण माझ्यावर झालेला तो हल्ला यांनी स्वतःवर झेलून घेतला…

मिताली – अगं पण तुझ्यावर कोण का आणि कशाला हल्ला करेल गं…

स्नेहल – मितेश ने केला होता हल्ला…[ हे ऐकून मात्र मितालीच्या अंगावर काटा उभारून येतो ]

मिताली – काय…? अगं पण तो तर तुझ्यावर….

स्नेहल – हो प्रेम करत होता…पण ज्या दिवसापासून शंतनू माझ्या आयुष्यात आला त्यादिवसापासून मितेशसाठी मी वैरीण झालेली होते…त्याच क्षणापासून हे माझ्यासाठी सर्वस्व झाले…म्हणून मी यांच्यासाठी बदलले…

मिताली – अगं पण मितेशचं काय…?

स्नेहल – तो एक अटेन्शन सीकर नावाचा स्वभाव असलेला मुलगा होता….त्याला असं वाटायचं की मी त्याच्यासाठी सर्व काही झुगारून फक्त आणि फक्त त्याच्यासाठीच जगायला पाहिजे मग मी त्याच्यासाठी माझ्या सगळ्या इच्छा अपेक्षा मारून टाकाव्यात…आणि मितेश काय गं…तो तर स्वतः आईवडिलांच्या कमाईवर अजूनही जगतोय…तो मला काय सुखी ठेवणार…शंतनू तसे नाहीत…लग्नानंतर मला यांचा स्वभाव सुरुवातीला खटकत होता पण त्या प्रसंगानंतर मला यांचा विशेष असा आदर नव्याने वाटू लागला….जर चांगल्या माणसांसाठी आपण आपल्यात थोडा बदल केला तर काय वाईट आहे…

मिताली – शंतनू जिजुंना मितेशबद्दल सगळं माहिती आहे…?

स्नेहल – हो सगळं माहिती आहे….तरीही मला सोडण्याचा विचार त्यांनी कधीच केला नाही…. मी त्यांना कधीच अंधारात ठेवलं नाही गं…

दोघींची अशी बोलणी चालली होती यामध्ये कमकुवत बाजू स्नेहल ची असूनसुद्धा शंतनूने स्नेहलला मानसिक दृष्ट्या आधारच दिलाय…चांगल्या आणि समजूतदार माणसांसाठी बदललन गरजेचं आहे का हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे तर चांगल्या माणसांसाठी बदलणं खरंच गरजेचं आहे त्यांच्यासाठी आपल्या स्वप्नांना मुरड घालणं जमलं पाहिजे…प्रत्येकाच्या सवयी,स्वभाव नैसर्गिक समजून आपण त्याचा स्वीकार करत नाही उदाहरण द्यायचे झाल्यास काही लोक सकाळी उशिरापर्यंत झोपतात अशा व्यक्तींकडे आरोग्याची चिंता करणारे लोक तुच्छतेने बघतात…पण अशा व्यक्तींना रात्री जर उशिरापर्यंत काम करावे लागत असल्याने त्यांनाही साखरझोपेच सुख मिळण्याची त्यांची इच्छा असू शकते याकडे ते दुर्लक्ष करतात ‘ लवकर निजे लवकर उठे ‘ हा मंडळींचा दृष्टिकोन असतो हे बरोबर असलं त्यांच्या या सवयीनमुळे असे लोकं निंदेचे धनी ठरतात…असं म्हणतात की, माणूस वाईट नसतो त्याच्या सवयी वाईट असतात म्ह्णून,राग,तिरस्कार हा माणसाबद्दल नसावा तर त्याच्या सवयीनबद्दल असावा…

पण आपण लक्षात घ्यायला हवं की मनुष्यच काय पण त्याच्या सवयी,स्वभावही वाईट नसतात…वाईट असतो तो तिरस्कार जो तुमच्या मनात ठाण मांडून बसलेला असतो…त्या तिरस्काराला मनात स्थान देऊ नका म्हणजे ना तुम्हाला माणूस बदलावा लागेल ना त्याचा स्वभाव…! आता स्नेहलच्या बाबतीत वेगळं आहे…आता शंतनूने जर तिरस्कार मनात ठेऊन स्नेहालला बदलण्यास भाग पाडलं असत तर ते झालं नसत याची परिणीती म्हणून एक प्रकारचा द्वेष,चीड स्नेहलच्या मनात कायम राहिली असती…शंतनूच्या मनात तिरस्कार नसल्याने स्नेहलसारख्या मुलीला आपल्या आयुष्यात कायमच स्थान देऊ शकला जर याउलट शंतनूने तिरस्कार केला असता तर हे नातं केव्हाच दुभंगलं असत.