
©️®️राधिका कुलकर्णी.
येताना सासूने आणि मीनाने सोपानच्या अपरोक्ष मीनाच्या नणंदेला बघण्याचाही छूपा डाव रचला होता. त्यासाठीच त्यांना शेवंताची अडचण मधे नको होती.सगळे मनाप्रमाणे घडले तर शेवंताला काडीमोड द्यायला राजी करून सोपानचे मीनाच्या नणंदेशी बार उडवून द्यायचे मांडे सासू मनातल्या मनात खाऊ लागली होती. सासू सोपानसह मीनाच्या सासरी जाण्याकरता घराबाहेर पडली….
इकडे शेवंता मात्र एकटीच घरात बसून होती. मन आतून धुमसत होते. इतके दिवस बाहेरच्यांनी केलेला अपमान निमुटपणे गिळला शेवंताने पण आज आपल्याहून लहान नणंदेनेही तिच्या घरी येवू नको असे स्पष्ट शब्दात सांगितले इतकेच नव्हे तर परस्पर भावासाठी सोयरिक सुद्धा आणली ह्या गोष्टीने शेवंता खूप व्यथित झाली होती.
देवासमोर बसून मनसोक्त रडून घेतले तिने.
मनात असंख्य प्रश्न होते जणू आज देवाशीच सवाल जवाब चाललेला…
काय दोष होता माझा?
मी परीपूर्ण स्त्री असुनही मूल होत नसेल तर ह्यात सगळा दोष फक्त माझाच कसा?
खरच मूल जन्माला घालण्यातच बाईची इतिकर्तव्यता असते का?
आणि मूल नाहीच झाले म्हणजे तिच्या जगण्याला काहीच अर्थच नसतो का?
माझे जगणे इतके निरूपयोगी असेल तर मग मी जगतेय तरी का देवा??
माझ्या मरण्याने जर ह्यांची वाट मोकळी होत असेल तर मला ते करायची तरी हिंम्मत दे आई अंबाबाई…!
असेही मी असेपर्यंत नवरा दुसरे लग्न करणार नाही त्यापेक्षा मीच त्यांची सुटका करते. जगून नाहीतर नाही मरून तरी उपयोगी पडते.
निदान मी मेल्यावर तरी ह्या सगळ्यांचे दु:ख दूर होईल.
तिने डोळे पुसले. मनाशी काहीतरी निग्रह केला. लग्नाआधी चौथीपर्यंत शिकलेल्या शेवंताला लिहीता वाचता येत होते. जवळच वाण्याच्या वाणसामान यादीचा कागद पडलेला होता. त्यावर काहीतरी खरडले आणि आपल्या खोलीत गेली. लग्नातला शालू नेसून नवरीगत छान सजून तयार झाली.
देवघरात आली. मोठा मळवट कपाळावर माळला तसेच भांगात कुंकू भरले. तिची मूद्रा एखाद्या देवीप्रमाणे दिसत होती आता. मगाशी लिहीलेली चिठ्ठी देवघरात ठेवुन देवाला नमस्कार करून ती परसदारी गेली.
~~~~~
इकडे मीनाकडे मुलाच्या बारशाचा कार्यक्रम थाटात पार पडला.बारशाच्या घुगऱ्या खावून जेवणे उरकून निरोप घेत सोपान आईसह घरी परतला.
दार बडवले पण कोणीच दार उघडेना. त्याने जरा जोरात दारावर थाप मारली तसे दार किलकिले उघडले गेले. हलके आत ढकलताच दार लगेच उघडले गेले आणि दोघेही आत आले.
आत येताच सासूने जोरात आवाज देऊन हाक मारली
” ए अवदसे कुठे तडफडलीस? पाणी आण प्यायला.” पण स्वैपाकघरातून एक नाही की दोन नाही.
सासू रागातच उठून स्वैपाकघरात गेली. शेवंता तिथेही नव्हती. आता तिचा पाराच चढला. आपण कोणी घरी नाही पाहून कुठे तोंड कांळ करत फिरतेय म्हणत तिने अख्ख घर शोधलं. सोपानही आता जरा चिंतीत झाला. शेवंता आजवर अशी घर सोडून कधीच कुठे गेली नव्हती त्यामुळे तिला घरात न बघून सोपानही घाबरला.
त्याने मागचे आंगण, पुढचे अंगण, शेजार पाजार, गल्ली, पारावरच्या मारोतीच्या मंदिरात सगळीकडे हुडकले पण शेवंता कुठेच सापडली नाही.
आता मात्र त्याला काळजीने घेरले.
आज तिचा जो काही अपमान आपल्या माय बहिणीने केला तो तर त्यालाही सहन झाला नव्हता. आतून टोचणीही होतीच की तिच्या त्रासाला फक्त मी आणि मीच कारणीभूत आहे परंतु त्याला कधीही आपले कटूसत्य सांगायची हिंम्मत झाली नव्हती.
पण भोगावे मात्र शेवंताला लागत होते. आता त्याला पश्चा:त्ताप होत होता की मी वेळीच तोंड उघडलं असतं तर किती बरं झाल असतं.
कुठे गेली असेल शेवंता?
त्याने तिच्या माहेरी पण चौकशी केली पण ती तिकडेही नव्हती. आता काळजीचे रूपांतर भीतीत होऊ लागले.
त्याने देवघरात जाऊन देवापूढे हात जोडले. डोळे उघडताच त्याची नजर देवघरात ठेवलेल्या कागदावर पडली. त्याने थरथरत्या हातानेच ती चिठ्ठी उचलली. मॅट्रिकपर्यंत शिक्षण झालेल्या सोपानने डबडबल्या डोळ्यांनीच चिठ्ठी वाचली.
इकडे सासूचा अजुनही अखंड पट्टा चाललेलाच होता. होते नव्हते तेवढे सर्व शिव्या शाप देऊनही तिचे मन शांत होत नव्हते.
सोपान धावतच मागल्या परसात गेला.तिथले दृष्य बघून त्याच्या हातापायतल त्राणच गेलं.
सोपानने मोठ्ठी किंकाळी फो़डली
आऽऽऽऽईऽऽ….!
आई धावत परसात आली.आडात डोकावून पाहताच समोरचे दृश्य बघून तीही सून्न झाली.
परसातल्या आडात शेवंताचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता.
सोपान स्वत:वरच प्रचंड संतापला होता. एका निरापराध व्यक्तीने त्याच्या करणीची सजा भोगली होती.
समाजातल्या टाकाऊ फालतू रूढी परंपरांच्या चक्कीत पिसुन एका निष्पाप जीवाने आपल्या प्राणांची आहूती दिली होती.
काय होते ते भयानक सत्य..? काय होते चिठ्ठीत?
सोपानने आधी सगळ्यांना गोळा केले.
मग आपल्या बहिणीला आणि आईला शेवंताच्या प्रेतासमोर बसवून शेवंताची चिठ्ठी वाचून दाखवली.
प्रिय धनी,,
शेवंताचा सादर प्रणाम।
मी पापी आहे असे सासुबाई,नणंदबाई सगळ्यांना वाटते. मी नकोशी झालेय सर्वानाच. तुमच्या घराण्याला वारस देऊ शकत नाही म्हणुन सगळे हिणवतात मला.
आजवर फक्त बाहेरचे ऐकवत होते पण आज घरातल्यांनीही यायला बंदी केली मग मी जगून तरी काय करू?
मीनाताईंनी तुमच्याकरता पोरगी पाहिलीय हे कळलेय मला.
मी जीवंत असे पर्यंत तुम्ही लग्नाला तयार होणार नाहीत हे ही माहितीय मला कारण तुमचा खूप जीव आहे माझ्यावर. म्हणुनच तुमची वाट मोकळी करायचा निर्णय मी घेत आहे.
माझ्या मृत्युला कोणालाही जवाबदार धरू नये. मी हे मरण माझ्या इच्छेने स्विकारलेय. मी गेल्यावर तुम्ही नव्याने संसार थाटा आणि सगळ्यांना आनंदी करा.
जाता जाता एक प्रश्न मनात येतोय.
मूल होत नसेल तर दोष कुणाचा?
फक्त स्त्रीचा की पुरूषाचाही??
काही चुकल्यास माफ करा.
ह्या जन्मात सुख न देऊ शकलेली
तुमचीच,
निपुत्रिक शेवंता….।
~~~~~~~
पत्र ऐकुन सगळेच स्तब्ध झाले. सोपान मात्र संतापाने पेटला होता. बहिणीला उद्देशुन तो म्हणाला,
” पाहिलेस…,काय लिहीलेय माझ्या शेवंतीने?
तुम्ही दोघी माझ्या निष्पाप शेवंताला वांझोटी वांझ म्हणुन हिणवत होत्या नाऽऽऽ पण वांझोटी ती नव्हती. वांझोटा हाऽऽऽ..हाऽ तुझा भाऊ होता….”
आईऽऽऽ हे वांझोटेपण मी का पत्करले ऐकायचेय तुला.???”
तर कान उघडे ठेवून दोघीही ऐका.
हीऽऽऽ…,ही माझी बहिण मीना. लग्नानंतर पहिल्या राखीला आली तेव्हा माझ्याजवळ पाच पैसे नव्हते ओवाळणीत घालायला. आणि तू सारखं तूणतूणं वाजवत होतीस ‘पहीली राखी हाय.बहिणीला काहीतरी चांगली ओवाळणी घाल..नायतर सोयऱ्याम्होरं नाक कापलं जाईल आपलं’. तुझ्या बोलण्याने टेंशन मधे दारोदार फिरलो पण कोणीच पाच पैसे उसने द्यायला तयार नव्हते.
निराश होऊन चावडीच्या पारावर बसलो तर एक जाहिरात वाचली. ‘नसबंदी करा अन पैसे कमवा’ काही विचार न करता मी ऑफिस गाठलं. नसबंदी शस्त्रक्रियेला मी लिखीत स्वरुपात तयारी दाखवली.
त्यात मी लग्न न झालेला तरीही नसबंदी करून घेतो म्हणल्यावर त्यांनी मला अजून जास्त पैसे देवू केले. हे घे.वाच हे पुराव्याचे पेपर्स.”
त्याच पैशात तुझी राखी साजरी झाली.
नंतर लग्नाआधी मुलीशी बोलु द्या हे कितीवेळा सांगितले पण कोणी ऐकले नाही. खरेतर मी नवऱ्या मुलीशी नाही तर ही गोष्ट मी सगळ्यात आधी तुमच्याशी बोलायला हवी होती. पण मला वाटले वेळ येईल तेव्हा सांगु.
लग्नानंतर तिला तुम्ही इतके छळताल असे कुठे वाटले मला?
तुम्ही छळून छळून जीव घेतलात माझ्या निष्पाप शेवंताचा !
बघ मीनेऽऽ तिने तुझ्या पायात आपला जीव गमावला.”
आजही तिचा जीव जायला तुच जवाबदार आणि तेव्हाही मी हे ऑपरेशन करायलाही तुच जवाबदार आहेस…”
“तिने विचारलेय ना दोष कुणाचा??”
तर दोष ह्या कीड लागलेल्या समाजाचा आहे. तुमच्या सारख्या कुजक्या विचारसरणीचा आहे.
वेळोवेळी तिचा अपमान ऐकुनही सत्य सांगू शकलो नाही म्हणुन दोष कुणाचा असेल तर तो फक्त माझ्या सारख्या भ्याड नामर्दाचा आहे.
माझ्या बहिणीच्या मायेपोटी मी एका मातृत्वाला वांझ केले. जर दोष कुणाचा असेल तर तो माझा आहे.. दोष फक्त माझा आहे.
बोलता बोलताच सोपानही शेवंताच्या बाजुलाच घेरी येवुन पडला ते कधी न उठण्यासाठीच.
सोपान-शेवंता एका नवीन प्रवासाला अनंतात निघून गेले एक प्रश्न तसाच सोडून…..
दोष कुणाचा..???
———————(समाप्त)———————–
©️®️राधिका कुलकर्णी.
ह्या आधीचे भाग खाली दिलेल्या लिंक वर आहेत.
भाग १ – https://ritbhatmarathi.com/dosh-kunacha-part1/
कथा आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
Post navigation

राधिका कुलकर्णी
नाव- राधिका कुलकर्णी.
जन्म- संगमनेर.जि.-अ.नगर
सासर - हैद्राबाद
शिक्षण- बीएससी एम ए(इंग्रजी) बीएड.
लेखन वाचन ही माझी आवड आहे.
बऱ्याच कथा, कविता, लघूकथा/दीर्घ कथा लेखन झालेले.
माणसे जोडायला आवडते.
आयूष्यात कोणतेही प्रसंग आले तरी आपली सकारात्मकता सोडू नये ह्या विचारांनी कायम पॉझिटिव्ह राहते म्हणूनच आनंदी आणि समाधानी आहे.