Skip to content Skip to sidebar Skip to footer

दोष कुणाचा…..!

©️®️राधिका कुलकर्णी.

“हे बघ शेवंतेऽऽऽ तुला सांगुन ठेवतेय,नवरा कितीही चल चल म्हणुन आग्रह करेल पण तू नाही म्हणुन सांग.
बारशाचा कार्यक्रमाला वांझोट्या बाईनं जाऊ नये.अपशकून घडतो.माहितीय ना तुला?”
तरी तोंड वर करून कुठ निघालीस गं तरातरा लगेच नवऱ्यामागे??
काही यायचं नाही सांगुन ठेवतेय.
मीनाला लगीन होऊन पोरगं बी झालं पण तुझी कूस अजुन उजवली नाही.”
“तिच्या सासूला मुळीच आवडणार नाही तू आलेली. तेव्हा तु घरीच थांब. बरीच कामे पडलीएत ती उरक.आम्ही सगळे जाऊन येतो.”

शेवंताची सासू अस सगळं तिखट बोलून तिला हिणवून निघून गेली.

शेवंता म्हणजे सोपानची बायको.
सोपानच्या घरी लग्नाआधी तो धरून पाच माणस. आई वडील मोठा मुलगा सोपान,त्या पाठीवर बहीण मीना आणि आणखी एक भाऊ जो शहरात कॉलेज शिकत होता.
घरची परीस्थिती तशी ओढग्रस्तच. वडील गेल्यावर घराचा सर्व भार सोपानवर येऊन पडला. स्वत:ची थोडीफार शेती होती पण अवकाळी पावसाने त्याच्या उभ्या पिकाची नासधूस केली होती. कसबसं कर्ज काढून बी बियाणं आणून त्याने जमीन कसली होती.
ह्यावेळेला जरा बरे पीक येईल अशी आशा होती तोच ओला दुष्काळ पडला आणि काढायला आलेले पीक जमीनदोस्त झाले. ह्या पिकाच्या भरोशावरच तर बहिणीचा साखरपूडा झाला.
घरात सगळी तयारी चाललेली लग्नाची. उधार उसनवार करून कसेबसे लग्न तर पार पडले पण पावसाने करामत केली अन सोपानला प्रश्न पडला आता कर्ज कसं फेडायचं? मनात हे विचार चाललेले असतानाच राखीचा सण जवळ आला. लग्नानंतर मीनाची पहिली राखीपौर्णिमा.
भावाकडुन चांगली ओवाळणी मिळावी ह्या अपेक्षेने मीना चार दिवस आधीच माहेरपणाला आली.
सोपानच्या खिशात तर पाच पैसे नव्हते.
काय करावे? मीनाला राखीची भाऊबीज तर करायलाच पाहिजे. कुठुन पैसे आणावे? हा विचार करत गावभर प्रत्येक नातेवाईक,ओळखी पाळखीचे मित्रांना भेटून काही पैसे उधारीवर मागू लागला पण कुणाकडेच पैशाची सोय झाली नाही. असाच भटकत भटकत तो ग्रामपंचायतीच्या कार्यालयाजवळ पोहोचला.
पिंपळाच्या पारावर काही मंडळी तंबाखू मळत बसली होती. तोही निराश मनाने पारावर बसला.
इकडे तिकडे बघत असतानाच एका भिंतीवरच्या जाहिरातीवर त्याची नजर पडली. ती जाहिरात वाचुन त्याची कळी खुलली. त्याला एक मार्ग सुचला. त्याखाली दिलेल्या संपर्कावर तो जाऊन भेटला.
त्या दिवशी सोपान खूप आनंदात घरी गेला.
त्याच्या राखीच्या सणाची सोय झाली होती.

असेच काही वर्ष गेली. सोपानचेही लग्नाचे वय झाले होते. आता मधल्या काळात परिस्थितीही जरा स्थिरावली होती त्यामुळे आईने सतत सोपानच्या मागे लग्नाचा लकडा लावला.
सोपानची लग्नाला तयारी होती पण त्याची एक अट होती. त्याला लग्नाआधी मुलीला एकांतात भेटायचे होते.
पण खेडेगावात अजुनही लग्न होईपर्यंत मुलामुलीला आपापसात भेटू बोलू दिले जात नाही त्यामुळे शेवंताच्या घरच्यांशी बोलणी होऊन पसंती झाली तरीही सोपानची अट काही मान्य झाली नाही. त्याने बरेच प्रयत्न केले शेवंताची भेट घेण्याचा पण शेवंताही तशाच संस्कारात वाढलेली. तीही भेटायला नाही म्हणाली.

सावळी,नाजुक,शेलाटी शेवंता सोपानच्या मनात भरली होती. तो स्वत:ही सावळा असला तरी दिसायला देखणा होता. दोघांचा जोडा अगदी अनुरूप होता.

मग जास्त विचार न करता आपला हट्ट सोडून देऊन सोपान बोहोल्यावर चढला. लग्न झाले आणि शेवंता सोपानच्या घरी सून म्हणुन आली.
दोघांचे नव्या नवलाईचे दिवस अगदी आनंदातच जात होते.
रोजच्या रात्री एकमेकांच्या बाहुपाशात सरत होत्या. सोपान शेवंता मिलनोत्सवात नाहून निघत होते. दिवस कधी सरतो अन् कधी रात होते असे होई सोपानला. शेवंताचीही अवस्था काही वेगळी नसे.
कधी एकदा सोपानच्या मिठीत शिरते असे होई शेवंताला.दिवस अगदी मजेत चालले होते.

शेवंता स्वभावाने मनमिळाऊ शांत आणि सर्व कामात हुशार त्यामुळे लवकरच घरात सासुची लाडकी झाली.सासुला तर सुनेला कुठे ठेवू न कुठे नको असे होऊन जाई. दिवस जात होते तशी शेवंताही नव्या घरात छान रूळत होती.
घरातल्या सर्व कामांची जवाबदारी हळुहळू तिच्याच अंगावर पडू लागली. तीही सगळे आनंदाने करे. घरातून वेळ मिळाला की सोपानच्या मदतीला शेतावर पण जाई.

अशीच वर्ष सरत गेली. नव्याची नवलाई संपून लग्नाला एव्हाना दोन वर्ष झाली तरी शेवंताची कूस काही उजवत नव्हती.
सासू आडून आडून तिच्या पाळीला यायला उशीर झाला की लगेच विचारी,
“पाळी चुकली का गंऽऽऽ..?”
तेवढे पूढे गेलेले दिवस सासुकडून लाड व्हायचे आणि दोन तीन दिवसांनी बाजूला बसली की सासूच्या तोंडाचा अखंडपट्टा चालू व्हायचा.

लाडाची शेवंता आजकाल सासुच्या मनात खटकायला लागली होती कारण तिला वंशाला दिवा हवा होता जो शेवंता देत नव्हती.
शेवंतालाही आता आपण आई व्हावे असे वाटू लागले होते. दोघेही कुठलीही गर्भनिरोधक उपाययोजना करत नसुनही तिला दिवस रहात नव्हते त्यामुळे ती ही खूप उदास रहायची.
तिच्या बरोबरीच्या सगळ्या मैत्रिणी लग्न होऊन वर्षा दोन वर्षातच आया झाल्या होत्या परंतु शेवंताची काही गोड बातमी मिळत नव्हती.
नवस सायास,उपास-तापास,गंडे-दोरे,साधू-बूवा सगळे करून झाले पण कशानेच गूण येत नव्हता.शेवटी डॉक्टरकडेही दाखवून झाले पण शेवंतामधे काहीच दोष नव्हता तरीही तिला गर्भधारणा होत नव्हती.

करता करता दहा वर्ष झाली पण शेवंताला काही मूल झाले नाही. शेवटी सोपानने आपण मूल दत्तक घेऊ असा उपाय मांडला पण हा उपाय आईला मुळीच मान्य होईना. दुसऱ्याचं रक्त,कोण कुठले ते पोरं आपल्या घराचा वंश कसा चालवेल?
अशा भ्रामक समजुतीपायी शेवंता मात्र मातृत्वाला मुकली होती.

सकाळी सकाळी वांझोटीच दर्शन नको म्हणुन
बाया बापड्याही तिला बघून मुद्दाम तोंड फिरवायच्या. बाहेरचा त्रास काय कमी होता म्हणुन घरात सासुही तोंडसूख घेई. ती मुकाट्यानं सारं सहन करी.
कधी कधी खूप गलबलुन येई तिला.
कित्येक रात्री नवऱ्याच्या कुशीत शिरून खूप रडे शेवंता. सोपानलाही मनात सतत एक बोचणी लागुन राही. काहीतरी बोलायचे असे त्याला पण हिंम्मतच व्हायची नाही. मूकपणे सहन करण्याचा खूप त्रास होई त्यालाही. मग तिची समजूत घालायला तो तिला म्हणे,”आत्ता जाऊन आईशी बोलू का सांग?
तिला चांगले झापतोच जाऊन.”
पण शेवंताच त्याला नको म्हणुन रोखत असे.
आसपासच्या ओळखी-पाळखीत,नात्या -गोत्यात कोणीच तिला मुहूर्त,लग्न,बारसं किंवा सवाष्ण म्हणुन जेवायलाही निपुत्रिक म्हणुन बोलवत नसे.सरळ तोंडावर बोलत “तुझ्यासारख्या वांझोटीला कोण बोलावणार…??”
ती हे टोमणे ऐकुन कंटाळून गेली होती.त्यात भरीस भर नणंदेने भावासाठी गुपचूप दुसरे स्थळ पण आणले लग्नाकरता.
मीना आपल्या मोठ्या भावाशी बोलतानाचे संवाद तिच्या कानी पडले.
“दादाऽऽऽ..जे झाड फळ देत नाही त्याला आपण उपटून टाकतो मग हिलाच काय सोनं लागलयं?
दे सोडून. तिच्याहुन रूपाची खाण आहे माझी नणंद. करत असलास तर हो म्हण,देऊ बार उडवुन ह्या मोसमात.”
ऐकुन तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
डोईवरचा हंडा जागीच सरकला. हातातली घागरही गळून पडली. ती जागच्या जागीच थिजून गेली. डोळ्यातुन आश्रुंच्या धारा वाहू लागल्या.
तिला घरात पाऊलही ठेववेना. ती तशीच पुन्हा आडाकडे गेली. कितीतरी वेळ आसवं गाळत तिकडेच बसुन राहीली. मन रडून शांत झाल्यावर पुन्हा हंडा कळशी घेऊन घरात आली.
विषय जसा काही आपण ऐकलाच नाही ह्या दिखाव्यात ती घरात आली. नणंदेकडे पाहून खोटे खोटे छानसे हसली पण बदल्यात मीनाने रागाने तोंड फिरवले आणि तिच्याशी न बोलताच तिकडून निघून गेली.शेवंताच्या डोळ्यात तळं जमा झालं.
सोपानला तिची अवस्था कळत होती. तिची आपल्यामुळे अशी अवस्था होतेय हे माहित असुनही बोलायची हिंम्मत व्हायची नाही त्याची.

आज तर कहरच झाला होता.
मीनाने आपल्या आईला स्वच्छ शब्दात सांगितल,

“आईऽऽऽ वहिनीला माझ्या सासरी बारशाला मुळीच घेऊन येऊ नकोस. हे आमंत्रण फक्त तुला अन् दादाला आहे. माझ्या सासूला मुळीच चालणार नाही वांझोटी बाई बारशात आलेली.”
त्यावर सासूही बरं म्हणाली.

ह्याच कारणास्तव सासूने आज इतके सारे उणेदूणे ऐकवून शेवंताला घरीच रहायला सांगितले. शेवंताला कार्यक्रमात न येऊ देण्यामागे आणखी एक छूपे कारण होते ज्याची कल्पना सोपानलाही नव्हती…
काय होता तो छूपा डाव..?

(क्रमशः-1)

काय असेल सासूचा नवीन प्लॅन? हे जाणून घ्या पुढील दुसऱ्या आणि अंतिम भागात.
धन्यवाद…

©️®️राधिका कुलकर्णी.

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.