Skip to content Skip to sidebar Skip to footer

दोन खणांच घर(भाग दुसरा..अंतिम भाग)

©® सौ. गीता गजानन गरुड.

“काय चार भांडी घासून मरनार न्हाइस बाई. आमी आलोय त्ये डोळ्यात खुपतय तुज्या. हक्काचं मागाय आलोय. “

“व्हय तर हक्काचं मागताय म्हून बोलते, ते भायरचं खोकरं गाठोडंबी घिऊन जाय लागा.” शोभा काय आता माघार घेत नव्हती.

बबन बाहेरच्या संडासात  पोट मोकळं करायला गेला. बायको नं बहिणीच्या किचाटापक्षा तिथला निवांतपणा त्याला भावला पण बाहेरचं घाईवर आलेलं कुणी दारावर थापा मारू लागलं,”आरं, ए बबन्या आवर लौकर. काय झोपला का काय. होत नाय तर इसबगोल खाऊन येत  जा.”बबन्याला ओशाळवाणं वाटलं. त्याने पटापटा पाणी घेतलं नि दार उघडलं तसं बाहेर नंबराला असलेले घारुअण्णा विडीचं थोटूक ओढीत आत शिरले.

बबनने बाहेरच्या पिंपातलं पाणी मगानं घेतलं. साबण लावून हातपाय धुतले नि ओट्यावर हाथरी पसरली. प्रमोद नि संतोष,सतरंजी घेऊन व्यायामशाळेत झोपायला पळाले. नक्की झोपणारच होते काय अजून काय ते त्यांच त्यांना ठाऊक.

‘आयशीच्या अति लाडानं बिघडलेली बांडगुळं..अंगापिंडानं वाढत होती पण मुलखाची आळशी. यांना म्हणे धंदा काढायचाय. करतील जोमानं सुरुवात पण पहिला उत्साह  किती दिवस टिकेल! एका ठिकाणी बुड टेकायचं नाय दोघा भावांचं.’ दोरी ओढून झर्रकन पडदे ओढून घ्यावेत तसे बबनने बळेबळेच पापण्या मिटल्या. झोपणं गरजेचं होतं. उद्या मालकाच्या घरी जायचं होतं. त्याने बोलावलं होतं.

शोभाने पहाटे उठून पाणी तापत ठेवलं. चहाला आधण ठेवलं नं बबनला उठवलं. बाहेर ओसरीवर निजल्याने डासांनी पांघरुणाबाहेर राहिलेल्या हाताची चाळण केली होती. खाजवून खाजवून हात लाल झाला होता.

बबनने शोभाकडे पाहिलं. कालच्या बेबीच्या क्लेशाने रात्रभर ही झोपली नसणार..तिच्या सुजलेल्या डोळ्यांवरुन त्याच्या ध्यानात आलं. वाटलं, तिला छातीशी धरावी,तिच्या केसांवरुन,गालांवरुन हात फिरवावा पण थोरली उठून अभ्यासाला बसली होती. त्याने गुपचूप चार तांब्ये अंगावर घेतले नि निघायची तयारी करु लागला.

शोभाने चहाची कपबशी आणून स्टुलावर ठेवली. शोभा तशी शहाणी आहे. निघताना घरातल्या अडचणी बोलणार नाही पण तिचे विचार तिच्याही अगोदर आता आपल्याला आपसूक कळतात या विचाराने बबन हसला.

खोबरेल लावून त्याने केसांना भांग पाडला. खाकी पावडर चेहऱ्याला, गळ्याला चोळली. शर्टच्या कॉलरची टोकं उगीचच एकत्र करत परत एकदा आरशात पाहिलं.

‘दोन वर्ष झाली नवीन ड्रेस घेतला नाहीय. एक घ्यायला हवा खरा’ तो आरशातल्या प्रतिबिंबाकडे बघत स्वत:शीच म्हणाला. तसं मागून आरशातील त्याच्या प्रतिबिंबाकडे बघत शोभा म्हणाली,”या पाडव्याला तरी एक ड्रेस घेऊ तुम्हाला. कितींदा टेलरकडून उसवलेल्या कॉलरच्या शिलाई रिपेअर करुन घेऊन तीच ती शर्ट वापरणार!”

शोभाचं म्हणणं ऐकून त्याला कुठल्यातरी कथेत वाचलेलं ‘या मनाचं त्या मनाशी’ आठवलं नं तो खुदकन हसला.

“आई,पप्पा का गं हसताएत?” थोरली म्हणाली तसं शोभा म्हणाली,”विचार बाई त्यांनाच.”

बबनने थोरलीच्या डोक्यावर एक टपली मारली नं लाडात म्हणाला,”तुझी लुबबुड काय गं आमच्या नवराबायकोत!” तसं थोरलीने त्याच्याकडे लाडीक रागाने पाहिलं.

“अभ्यास कर छबी नीट. नंबर टिकवला पायजेल.” असं म्हणत तो बाहेर आला.

बेबी बाहेर घोरतच होती. तिची दिवटी पोरं प्रमोद नि संतोष व्यायामशाळेत पसरली होती. म्हातारीला शोभा चहा बशीत ओतून पाजत होती. तिच्या हलणाऱ्या हातांमुळे तिला भांडं धरता येत नव्हतं..मग पोरी नि शोभा आलटूनपालटून तिला भरवत.

मालकाच्या घरी बबन प्रथमच गेला. नुकतच वर्ष झालं होतं, मालकाचं लग्न होऊन.

टुमदार बंगला,बाहेर लॉन, मध्यभागी नितळ पाण्याचं तळं, तळ्याच्या चहुबाजुंनी ठराविक अंतरांवर लावलेली फुलझाडं..शेवंती,गुलाब,मोगरा,कण्हेर,सोनटक्का,भुतेवा,लीली, ऑफीस टाइम,चीनी गुलाब,..लाल ,निळ्या,पिवळ्या रंगांची गर्द हिरव्या शालूवर केलेली  कशिदाकारीच जणू.

‘शोभाला इथे आणलं तर किती खूष होईल. फुलवेडीच ती. कशीच दोनतीन तास  तहानभूक हरपून या फुलांतच रमून जाईल.’ त्याच्या मनात विचार आला.

मालकाने त्याचं स्वागत केलं. सुटाबुटातला दिसणारा मालक पांढऱ्याशुभ्र सदरालेंग्यात अधिकच देखणा दिसत होता.

मालकाच्या आग्रहास्तव मालकासोबत तो गुबगुबीत सोफ्यावर बसला. आपलं बुड आत रुतलं की काय असं त्याला वाटलं. इतकं मऊ आसन त्याच्या पार्शभागाने प्रथमच अनुभवलं होतं. लहान असता तर त्या मऊ सोफ्यावर त्याने दोनचार उड्या मारल्या असत्या.

मालक इकडचं तिकडचं बोलत होता. अवघडलेला बबन हो नाहीत उत्तरं देत होता. नोकराने पाण्याचे ग्लास आणून ठेवले. त्या महागड्या ग्लासांतलं पाणी पिताना त्याला उगाचच श्रीमंत झाल्यासारखं वाटलं.

मालकाची बायको चहाचे कप ट्रेमधे घेऊन आली. चहाचा कप तिच्या हातून घेताना तिच्या बोटांचा स्पर्श त्याला जाणवला. त्याने वरती पाहिलं. ती सूचक हसली. एसीतही त्याला घाम फुटला. त्याच्या हातातली कपबशी थरथरली नि चहा त्याच्या पँटवर सांडला.

“ओह. गो टू वॉशरुम. मोना प्लीज.” मालक पत्नीला म्हणाला.

बबन वॉशरुमच्या दिशेने तिच्यामागोमाग गेला. बबन बेसिनमधल्या पाण्याने पँट धुणार तोच मोनाने त्याला बाजुला करत त्या चहाच्या डागांवर पाणी शिंपडलं नि बोटांनी ते डाग चोळले. बबनला कससंच झालं. त्याच्या मांडीत जणू झिणझिण्या आल्या. मोना परत सूचक हसली. तो परत त्या गुबगुबीत सोफ्यावर बसला. परत आलेला चहा त्याने कसाबसा गिळला.

मालकाची श्रीमंती, त्याच्या दिवाणखान्यातील उंची फर्निचर, भिंतीवर लावलीली उत्तम चित्रे,मलमलचे पडदे, नटलीथटलेली पत्नी, आरशासारखी फरशी यांवरुन दिसत होती. बबनला आपलं दोन खणांचं दाटीवाटीचं घर आठवलं.

थोड्याच वेळात जेवायला बोलावण्यात आलं. सामिष जेवणाचं ताट पुढ्यात नि वाढणारी खुद्द मालकाची बायको,मोना..श्रीमंती तिच्या अंगोपांगावर बागडत होती. गळाभर दागिने,लालीने रंगवलेले लालचुटुक ओठ, काजळ रेखलेले घारे डोळे नि फुगीर गाल, भरीव छाती..हे काय चाललय आपलं..बबनला स्वत:चीच लाज वाटली नं त्याने मान खाली वळवली.

जेवून झाल्यावर मोनाने बडीशेप आणून दिली. बडीशेप देताना तिच्या बोटांचा जाणीवपूर्वक स्पर्श त्याच्या तळहाताला झाला नि अंगातनं वीजेचा लोळ गेल्यासारखं त्याचं शरीर शहारलं.

अजून मालक काम सांगत नव्हता नि बबन मात्र बेचैन होत चालला होता. त्याला आता त्या श्रीमंती पिंजऱ्यातनं पळ काढावासा वाटत होता.

“बबन”

बबनने मालकाकडे बघितलं.

“बबन, मला तुझी मदत हवीय.”

“कसली मालक. तुमच्या वडिलांच्या काळापासनं चाकरी करतोय तुमच्याकडे. खूप उपकार आहेत तुमचे. काहीही काम सांगा, करीन मी.”

“बबन, काम जरा नाजूक आहे. मी श्रीमंत आहे. पैसाअडका सगळं वडिलोपार्जित आहे माझ्याकडे पण फक्त भौतिक सुखानेच बाई खूष होते असं नाही. सरळच सांगतो, मी गादीवर मोनाशी..नाही जमत मला..मी थिटा पडतोय. तू माझ्या बायकोशी संग..फक्त महिन्यातनं दोनदा..मात्र ही गोष्ट या कानाची त्या कानाला जाता कामा नये. तुला नवीन घर घेऊन देतो. वरची जागा, भरपूर पगार सारं काही देतो..फक्त तू..फक्त..”

बबन पुढचे शब्द ऐकण्यासाठी तिथे नव्हताच. वाऱ्यासारखा पळत सुटला. घराकडे जाणारी बस पकडली. घरात येऊनच श्वास सोडला. बेबी बाहेरच्या खोलीत बसली होती. शोभा बादलीत पाणी घेऊन लादी पुसत होती.

बेबी म्हणाली,”लवकर आलास बबन. कालचं आठवतय ना. काय विचार केलास!”

शोभाने हात धुवून पाणी आणून दिलं नं बेबीकडे जळता कटाक्ष टाकला.

“आरं पोरं लायनीला लागावीत एवढंच म्हननं माझं. तुझ्याशिवाय कोन हाय माझं.”

बेबीचा हात हातात घेत शोभाकडे बघत बबन म्हणाला,”शोभा, कपडे,सामान भर आपलं. ही खोली विकुया. बेबीला पैसे दैऊ. उरलेले बँकेत ठेवू. त्यातनं घरबीर काय यायचं नाय. निदान व्याज यिल ते खाऊ. नोकरी सुटली माझी आजपासनं. आता आपण सगळी बेबीकडे. हक्काची हाय बेबी आपली.”

“आं” बेबी तोंड उघडं ठेवून भावाकडे बघत राहिली. बेबीने शेजारच्या बिट्ट्याला धाडून आपल्या मुलांना बोलावून घेतलं.

“चला घरला जायचय. कापडं भरा आपापली.”

“आगं पण आई. आमचा धंदा..त्याला लागणारं भांडवल. तू मामाकडनं घ्यायचं कबूल केलतस. आता पप्पांसमोर नाक मुठीत घिऊन जावं लागनार.”

“आता चलताय का मी जाऊ एकली,”म्हणताच पोरं समजली सिरयस मेटर आहे नि आपापली कापडं भरु लागली.  पोरांना पुढं घेऊन बेबी सुमडीत वाटेला लागली.

बेबी जात आहेसी पहाताच म्हातारी विजेच्या वेगाने उठली नि ओसरीवर आली. पाठमोऱ्या बेबीला हाक मारत म्हणाली,”मला तरी घेऊन जा गं बेबे.” बेबी होती कुठं तिचं ऐकायला!

गपपणे तिने पायाच्या काड्या उचलीत आतल्या हाथरीवर मुडपल्या.

मुलाची नोकरी गेली. पैसे मागण्यासाठी म्हणून आलेली लेक भावावर गंडांतर आलंय तर आधार द्यायचं सोडून पळाली. आता पुढे काय नं कसं व्हायचं..हिरव्यागर्द रानात वणवा पेटावा तसं तिला चिंतेने घेरलं.

उशाला ठेवलेल्या अम्रुतांजनच्या बाटलीचं झाकण खोलून तिने बामाची बोटं कपाळाला चोपडली नि पाय छातीशी दुमडून पडून राहिली.

ऊन्हं उतरु लागली.  काही वेळातच मुलींचा चिवचिवाट ऐकू आला. मुलींची परीक्षा संपल्याने त्या खुषीत होत्या.

नववीवालीची थोड्याच दिवसांत दहावीची शाळा सुरु होणार होती. सातवीवाली आपण लिहिलेली उत्तरं बरोबर आहेत का याची थोरल्या बहिणीकडून खात्री करुन घेत होती.

गल्लीत कुणाच्यातरी घरी हळद होती. मुली छान कपडे घालून तिकडेच पळाल्या. त्यांचं जेवण वगैरे तिकडेच होणार होतं.

कर्ण्यावर हळदीची गाणी सुरु होती. गल्लीत दोन्ही बाजुंना रोषणाई केली होती. लाल,पिवळे,निळे,हिरवे बल्ब तारे चमकावे तसे चमकत होते.

शोभाही बरीशी साडी नेसली नि थोडा वेळ कार्यक्रमात उपस्थिती लावून आली.

तिने लसणाची फोडणी केली नं पातळ बेसनाचं पीठलं केलं. मऊ भात नि बेसन पीठलं म्हातारीला भरवताना म्हातारीच्या डोळ्यातून वहाणारं पाणी  शोभाने पदराच्या शेवाने  पुसलं तसं म्हातारीला आणिकच गहिवरुन आलं.

तोंडाला लावलेल्या गढव्यातलं पाणी ती गटागटा प्यायली त्यातलं बरचसं तहान भागवण्यापेक्षा गळ्यात दाटलेला आवंढा जिरवण्यासाठी होतं हे शोभाला कळत होतं.

बबन खुरमांडी घालून बसला होता. त्यालाही शोभाने जेवायला लावलं. मधेच मुली आल्या.
“आई गं पाणी दे. पाय दमले नाचून नाचून.” म्हणत त्या बादलीतल्या पाण्याने गालाला लावलेली हळद धुऊ लागल्या.

“साबण लावू नका गं. पुळेर येतो.” शोभा त्यांना ओरडून सांगत होती.

“आई,रात्री आम्ही दीदीकडेच रहाणार. दोन पिक्चर आहेत. एक मराठी,एक हिंदी. मेंदीपण काढून देणार दीदी आम्हाला. तूपण ये ना. सगळ्या येणारैत..साळसेकर काकू, वडनेरे काकू, नजमा आंटी, बर्मन भाभी..तुलाही बोलावलय त्यांनी.” मुली चिवचिवल्या.

मुलींना पांघरायला शाल देऊन, बघू जमलं तर येते असं शोभाने सांगितलं. रात्री शोभा म्हातारीचं अंथरुण नीट करु लागली तसं म्हातारी म्हणाली,”आज सैंपाकघरात माझी हाथरी घाल. लगयीला जाया लागतय सारखं. बरं पडल मला.” शोभाने म्हातारीची हाथरी सैंपाकघरात पसरली नि तिला आत न्हेऊन झोपवलं.  म्हातारी पांघरुण घेऊन निजली.

बऱ्याच दिवसांनी शोभाने दोघांसाठी म्हणून अंथरुण घातलं. दिवा मालवून बबनच्या बाजुला पहुडली.

बबनने सकाळपासून घडलेला सगळा व्रुत्तांत शोभाला सांगितला..तिथलं सामिष जेवण, मालकाची बायको,मालकाची कमजोरी आणि मालकाने केलेली अवास्तव मागणी,त्याबदल्यात त्याला दाखवलेलं पैशाचं,घराचं आमिष आणि त्याच्यासमोर आलेला त्याच्या घराचा चेहरा नं त्यानं तिथून काढलेला पळ..”आता काय करायचं शोभा? मुलींची फी,शिक्षण,वाढीचं वय,लग्न, आईची औषधं..”

“बबन, तुम्ही माझ्याशी एकनिष्ठ राहिलात. प्रलोभनांपासनं दूर पळालात. एवढं मोठं साहस केलंत. तसंच आर्थिक अडचणही दोघं मिळून दूर करु. दोन हात,दोन पाय दिलेत देवाने,बुद्दी दिलेय त्याचा वापर करु. छोटेमोठे उद्योग करु नि आपलं घरकुल सावरु.” शोभा त्याच्या केसांत बोटं फिरवत बोलत होती. भिंतीच्या त्या बाजूस निजलेल्या म्हातारीला सुनेसे धीटस शब्द ऐकून अगदी भरुन येत होतं.

बबनच्या नजीक शोभा असुनही त्याला प्रणयाची इच्छा होत नव्हती तर लहान बाळासारखा तो तिच्या कुशीत शिरला होता नं त्याच्यावर पदराचं पांघरुण घालून शोभा त्याला थोपटत होती.

सकाळच्या त्या श्रीमंती थाटापेक्षा बबनला हे साध्याभोळ्या बायकोच्या सहवासातलं दोन खणांच घर मायेची ऊब देत होतं.

समाप्त

===============

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

=================

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.