दोन खणांच घर (भाग पहिला)

©® सौ. गीता गजानन गरुड.
फारसेकर चाळीतल्या इतर घरांसारखंच हे दोन खणांच घर. त्यात बबन, पत्नी शोभा,दोन गोजिऱ्या मुली नि म्हातारी आई एवढी माणसं झापात कोंबडी कोंबावी तशी रहात होती. म्हणायला दोन खोल्या पण आतली खोली अगदीच लहानशी, त्यातच स्वैंपाकाचा ओटा, मांडणीवरची थोडकी भांडी,कोपऱ्यातली मोरी, मोरीच्या कठड्यावर रचून ठेवलेली टाकी,तांब्या,पितळेचे हंडे,कळशा..तीच काय ती श्रीमंती.
पोरी न्हात्याधुत्या झाल्यापासनं मोरीला दार लावून घेतलं होतं नाहीतर पडद्याने काम पुरायचं. महिन्यातनं आळीपाळीने तिघी मायलेकी बाहेरच्या व्हायच्या मग म्हातारीची बडबड चालू..पाण्याच्या हंड्याला हात लावू नका गं.. देव्हाऱ्याकडे जाऊ नका.
शोभा म्हातारीच्या सांगण्याप्रमाणे करत आली. पोरी ऐकेनात. अजाणतेपणी का होईना काही ना काही चूक व्हायची, त्यांच्या हातनं नं म्हातारी मग याची शिक्षा भोगावी लागंल ..तो बघतोय असं असंबद्ध बडबडत बसायची, पिरपिर करणाऱ्या शेमड्या पोरासारखी नकोशी वाटणारी तिची बडबड.
कुणी गप्प बस सांगायची खोटी..आता म्हातारी कुडी तुम्हाला जड झाली. माझ्या मरणाची वाट बघताय. घर माझ्या नावावर हाय. भायर पडा इथनं असं काहीबाही जोरजोरात ओरडत रहायची. शेजाऱ्यांची चंगळ व्हायची नि बबनला कानकोंड व्हायचं.
बबन एका कंपनीत कामाला होता. सध्याच्या यांत्रिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर नोकरी जातेय की रहातेय अशी भितीची टांगती तलवार त्याच्या डोक्यावर तरंगत असायची.
शोभा, पापडाचं पीठ आणून पापड लाटून द्यायची. रोजची भाजी,मिरचीकोथिंबीर त्यातनं सुटत होती. खर्घ का कमी होते!
मधुमेहाचं दुखणं पाठीशी लागलेल्या दमेकरीण सासूच्या औषधगोळ्यांसाठी,रक्ततपासणीसाठी दर महिन्याला ठरावीक रक्कम लागत असे शिवाय अधीमधी म्हातारीचा दमा चाळवला की म्हातारी जातेय की रहातेय असं व्हायचं, मग डॉक्टरला घरी बोलवावं लागे. त्याची अधिकची व्हिजीट फी द्यावी लागे.
फाटलेल्या वस्त्राला सुईदोऱ्याने शिवून नीट करुन ल्यावं तसे बबन नि शोभा त्यांचा संसाराचा गाडा हाकत होते.
बबनलाही वाटे,कधी बायकोला घेऊन नाटकाला जावं,तिला आईसक्रिम खाऊ घालावं, तिच्या गच्च वेणीच्या पेडांवर रुळतील असे श्रीदेवी सिनेमात माळते तसे चारपाच गजरे स्वतःच्या हातांनी तिच्या वेणीत माळावे, मुलींना नवीन फ्याशननुसार ड्रेस घ्यावे, सँडल घ्याव्या.
या चिवचिवत्या चिमण्या काही वर्षांत भुर्रकन उडून जातील, सासरी तोवर त्यांचे सगळे लाड पुरवावे पण मनी योजलेलं सगळंच साधत नव्हतं, ते एक सामान्य जोडपं होतं. इतर सामान्यांसारखीच त्यांचीही सामान्य स्वप्नं होती,आशाआकांक्षा होत्या आणि त्या मिळवण्यासाठी ती जोडी धडपडत होती.
मुली तशा हट्टी नव्हत्या. आईने छान वळण लावलं होतं. आपला अभ्यास सांभाळून आई सांगेल ती कामंही हातावेगळी करायच्या. चाळीतली लोकं बबनच्या मुलींना नावाजायची.
दुष्काळात तेरावा महिना तसा बबनची थोरली बहीण,बेबी तिचे तरणेताठे दोन मुलगे घेऊन आली. बेबीला माहेरी आली की जेवणात पातळ भाजी,.सुकी भाजी, कुरडया, स्वीट डिश लागे. तिचं करुन पापडाच्या लाट्या लाटायला शोभा बसली की तिचा जीव मेटाकुटीला येई. म्हणून मग ती बेबी आली की पापडाचं काम घेत नसे.
बेबीचं नि म्हातारीचं बरं गुळपीठ जमे. म्हातारी मग अगदी सडसडीत होई. तिचा दमाबिमा कुठच्याकुठे पळे नि जेवणात चार घास ती जास्त खाई.
चार दिवस झाले तरी बेबी जायचं नाव घेईना. तिचे दोन मुलगे आरामात खातपित होते नि गल्लीत उंडारत होते. बबनची शर्टही घालू लागले. भाचे म्हंटल्यावर बबनला होय,नको बोलता येत नव्हतं.
नुसते उंडारले तर ठीक, नाक्यावर बसून चाळीतल्या येणाऱ्याजाणाऱ्या पोरींना इशारे करणं,शिट्या मारणं..हे त्यांचे धंदे शोभाला शेजारणींकडून कळायचे नि तिला कानकोंड व्हायचं.
बेबीची मुलं लहानपणी खरंच चांगली होती. शोभाकडे सुट्टीला येऊन रहायची पण बेबीनेच त्यांचे वंशाचे दिवे म्हणून अति लाड करणं सुरु केलं नि त्यांना डोक्यावर बसवून घेतलं.
बेबी, म्हातारीचं ऐकून बबनच्या मुलींवर उगीचच दातओठ चावायची. त्यांना लागेल असं बोलायची. शोभाच्या धाकामुळे मुली उलट उत्तर करत नसत पण बेबीआत्या त्यांना आवडेनाशी झाली होती.
शोभा नि बबन बाहेरच्या नळावर पाणी भरायला जायचे. बबन पाणी भरायचा नि शोभा, ते हंडे घरात न्यायची. मुली आईकडचे हंडे,कळशी बाहेरल्या पिंपात, टाकीबिकीत ओतून ठेवायच्या. पंधराएक मिनिटात सगळं पाणी भरावं लागे.
कधीकधी तर दोनदोन दिवस पाणी येत नसे, मग मुली बिनाअंघोळीच्या शाळेत जात. म्हातारीची अंघोळही बुडे.
नशीब, बेबी आली तेंव्हा पाणी तरी नियमित येत होतं पण बेबी काय एक हंडा घ्यायला पुढे येत नव्हती. सासरी घरात नळ असल्याने असल्या अंगमेहनतीची सवय गेली असं मशेरीची बोटं दातांवर फिरवत शेजारणींना ठसक्यात सांगे.
पाणी भरताभरता, शोभानं बबनला म्हंटलं,”बेबीताईंना विचारा की कधी जाणार म्हणून. पोरं ठीक नैत तिची. उनाडकी मेली.”
“करेनात उनाडक्या. जातील ती. माहेरपणाला बहीण आलेय. तिला जातेस कधी विचारु! टाळकं ठिकाणावर हाय ना तुझं!” बबन शोभावर डाफरला.
“रहाण्याचं काय नै, पण शिस्तीत रहावं. बापाचे गुण घेतलेत पोरांनी. माझ्या पोरींच्या अंगाखांद्यावरनं त्यांच्या नजरा फिरतात.” शोभा पुटपुटली.
“चल काहीतरीच. सगळे भ्रम आहेत तुझे. जा घरी लवकर पाणी भरायला हवं.” बबन डाफरला तशी शोभा डोक्यावर हंडा घेऊन चालू लागली. तिचा पोलका घामानं भिजला होता.
गोरटाली मान नि पाठ चमकत होती. बबनच्या मनात आलं..किती दिवस झाले शोभाला जवळ घेऊन! पोरी मोठ्या काय झाल्या. शोभा त्यांना घेऊन म्हातारीसोबत बाहेरल्या खोलीत नि आपली मुटकुळं स्वैंपाकघरात नाहीतर बाहेरच्या ओसरीवर.
शोभाला वाटत नसेल, आपल्याजवळ यावं..वीजबिल,राशन,वाण्याचं बिल, मुलींच्या फिस, बाजारहाट..यातच वेढून गेलीय बिचारी.
कधी दुपारी अर्धा दिवस रजा टाकून मुद्दाम लवकर यावं तर ही मांडीवर पाट नि पाटावर साडी घेऊन फॉल लावत बसलेली. जरा आत ये म्हंटलं तर अर्जंट द्यायचीय. साळसेकर वैनी येतील न्यायला.’
“अहो बबनभाऊ, उठा तंद्रीतून. आमचा नंबर आहे आता. इथेच झोपलात कं काय!” समोर साळसेकर वहिनी बादल्या,हंडे घेऊन उभी.
बबनचं लक्ष साळसेकरनीच्या फुलाफुलांच्या साडीकडं गेलं. त्या साडीलाही फॉल शोभानेच लावली होती. शोभाची रेशमी बोटं त्या साडीवर फिरताना त्याने पाहिली होती. साळसेकराची वरकमाई भारी म्हणून बायकोला हव्या त्या साड्या घेऊन द्यायचा.
खरंतर चाळीत रहायची गरजच नव्हती साळसेकरला पण चार भावांची खोली एकट्याला बळकवायची होती. त्यामुळे त्या खोलीत एखाद्या वारुळावर नागोबा ठिय्या धरुन बसावा तसा तो बसला होता.
घराच्या भिंतींच्या ठिकऱ्या उडाल्या होत्या पण साळसेकर चौघांची खोली म्हणून तिला प्लास्टर किंवा रंगकामही करत नव्हता.
“असे बघताय काय माझ्याकडे!” साळसेकरीन भसाड्या आवाजात बोलली तसं बबन भिजल्या उंदरासारखा घराच्या बिळाकडे वळला.
जेवताना बबनची नजर भाच्यांकडे गेली नि शोभा बोलत होती त्यातलं तथ्य त्याला जाणवलं. दोन्ही भाचे मुलींकडे अभद्र नजरेने बघत होते. बबनला शिसारी आली. कसंबसं त्याने स्वतःला सावरलं.
मुलींनी खाल्ल्यासारखं केलं नि उठणार तोच बबनने भाच्यांकडे नजर वळवत विचारलं,”काय प्रमोद कितवीत?”
“कॉलेज सोडलं मामा, दोन वर्ष झाली. घरीच असतो आता.”
बबनने दुसऱ्याकडे बघितलं,”संतोष तू रे?”
“मामा, मीबी यावर्षी सोडणार कॉलेज. बारावी केली तेवढी बास. शिक्षणात काय राम नाय रायला.”
“मंग पोटापान्याचं काय करणार?”
“तेच तर चाललय यांच्या बापाशीचं. शिक्षान सोडलं म्हून अंगार यतात माज्या पोरांच्या. आता न्हाय तेंच डोसकं शिक्षनात तर कसला धंदा काढतील, रिक्षाबिक्षा घिऊन दिली तर चालवतील तर ते न्हाय. यक पैका हातातसून सुटत नाय तेंच्या.”
“म्हून भांडून आलीस!’
“तर काय. म्या सरळ सांगितलं. म्हायरच्या घरात वाटा हाय माझा. त्यो घिऊन पोरास्नी पैकं दिन. तेच्यासाठीच आलीय म्या.”
“अगं पण बेबी, माझ्याकडं कुठं आलंत पैकं. चार म्हयने कंपनी चालू तर चार म्हयने बंद अशी गत हाय. कंदी कामारसून काढतील नेम न्हाय बग. तेत आता थोरली छबी धावीला जाईल. तिच्यासाठी कलास लावाय पायजेल. मास्तर म्हनत व्हते, पोरगी हुशार हाये. चांगलं मार्गदर्शन लाभलं काय जिल्ह्यात नाव काढंल.”
“आरं कितीबी शिकली तरी पोरीची जात ती पोरीची जात.माझ्या ढवळ्यापवळ्यांची सर नाय बग त्यास्नी. ते तेवढं पैशाचं बघ.”
“न्हाय जमायचं.”
“न्हाय जमायचं म्हंजी. आरं माजा हक हाय म्हायरच्या प्रापर्टीवर.”
आता मात्र शोभा गुरगुरली.
“आक्काबाई, येवढं हक्काची भाषा बोलतायसा तर हे दमेकरी मढं भायर बसलया ते उचलून घिऊन जा की. तेबी हक्काचंच हाय नव्हं तुमच्या.”
“कोनाला गं मढं म्हंतीस..तुजा मुडदा बसिवला त्यो.” म्हातारी फुत्कारली. झालं तिघींचं हे किचाट सुरु झालं.
पोरी उठून शेजाऱ्यांकडे अभ्यासाला पळाल्या. त्यांची परीक्षा चालू होती. शोभा मागनं ओरडत होती,”अगं,भांडी तरी घासून जावा. मी एकटीच काय म्हून मरु.”
“काय चार भांडी घासून मरनार न्हाइस बाई. आमी आलोय त्ये डोळ्यात खुपतय तुज्या. हक्काचं मागाय आलोय. “
“व्हय तर हक्काचं मागताय म्हून बोलते, ते भायरचं खोकरं गाठोडंबी घिऊन जाय लागा.” शोभा काय आता माघार घेत नव्हती.
बबन बाहेरच्या संडासात पोट मोकळं करायला गेला. बायको नं बहिणीच्या किचाटापक्षा तिथला निवांतपणा त्याला भावला पण बाहेरचं घाईवर आलेलं कुणी दारावर थापा मारू लागलं,”आरं, ए बबन्या आवर लौकर. काय झोपला का काय. होत नाय तर इसबगोल खाऊन येत जा.”बबन्याला ओशाळवाणं वाटलं. त्याने पटापटा पाणी घेतलं नि दार उघडलं तसं बाहेर नंबराला असलेले घारुअण्णा विडीचं थोटूक ओढीत आत शिरले.
क्रमश:
=================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============