दोन ध्रुवावर

अरुंधती केबिनमधे आली आणि तिने एसी ऑन केला.प्रचंड उकाडा होता.मार्च महिना असून उन्हाचा तडाखा चांगलाच होता.तिने ग्लासमधे पाणी ओतलं.
अरुंधती एक प्रख्यात,यशस्वी मानसोपचारतज्ञ होती.तिच्या हाताला यश होतं. कितीतरी तरुण मुला, मुलींना तिने डिप्रेशन मधून बाहेर काढलं होतं. घटस्फोट व्हायच्या आधीचा प्रयत्न म्हणजे कौन्सल्लिंग. त्या केसेस पण तिच्याकडे येत.
समिराने दारावर नॉक केलं, “मॅम,मे आय कम इन?”
“प्लिज कम समिरा.”अरुंधती म्हणाली.
“मॅम,आज तीन अपॉइंटमेंटस् आहेत.”समिराने अरुंधतीला फाईल्स दिल्या.
“ओके,ह्या तिन्ही केसेसना वेळ लागणारच.अवघड आहे.पेशंटला पाठव आत.”
“ओके मॅम.”समिराने केबिनचा दरवाजा बंद केला.
मोबाईलची रिंग वाजली म्हणून अरुंधतीने बघितलं.
भारतीचा फोन होता.
“एक मिनिट भारती, प्लिज होल्ड ऑन.”
अरुंधतीने इंटरकॉम वर समिराला; पेशंटला दहा मिनिटाने आत पाठव म्हणून सांगितलं.
“हं बोल भारती.”
“अरु, एक डिव्होर्सची केस आली आहे माझ्याकडे.बघ प्रयत्न करून.नाहीतर आहेच दोन ध्रुवावर दोघे आपण.” भारती म्हणाली.
“आज बारा पर्यंत तर मी बिझी आहे,साडेबारा वाजता पाठव.”
“ओके,तुला त्यांचे डिटेल्स एसएमएस करते.बाय.”
भारती; अरुंधतीची शाळेतली मैत्रीण.योगायोगाने दोघी लग्नानंतर पुण्यात आल्या.शाळेतली मैत्री अजूनही तशीच घट्ट होती.
तीनही पेशंट बघून झाल्यावर अरुंधतीने चहा मागवला.
समिराने केटलीतला चहा कपात ओतला.
“समिरा,मला निघायला अजून तास तरी लागेल.तु हवं तर जा घरी.”अरुंधती चहा घेत म्हणाली.
“पण मॅम आजचे पेशंट झालेत.”
“एक नवीन केस आहे,साडे बारा पर्यंत येतील.तु जा घरी.संध्याकाळच्या किती आहेत अँपॉइंटमेंटस्?”
“मॅम,संध्याकाळी चार पेशंट्स आहेत.”समिराने फाईल्स कपाटात ठेवत सांगितलं.
“ओके,सी यु इन द इव्हीनिंग.”
अरुंधतीने मोबाईल बघितला.भारतीने केस डिटेल्स पाठवले होते.डिव्होर्सची केस.लग्न होऊन फक्त सहा महिने झाले होते.सहा महिन्यात घटस्फोट?
असं काय कारण असावं की इतक्या कमी कालावधीत दोघेही एकमेकांना नकोसे व्हावे?वर्षानुवर्ष संसार करून सुद्धा नवरा बायको एकमेकांना पुरते ओळखत नाही.तिने चहा संपवला इतक्यात केबिनच्या बाहेरून एका स्त्रीचा आवाज आला.
“डॉक्टर, आत येऊ का?”
“येस प्लिज,या.” अरुंधतीने टेबलवरचा कप बाजूला ठेवला.
साधारण पंचविशीची एक साधी मुलगी आत आली.
तिच्या पेहेरावावरून मध्यमवर्गीय वाटत होती.ती खुर्चीवर बसली.काही न बोलता तिची चुळबुळ सुरू होती.
“तुमचं नाव मिसेस रिमा पाठक. राईट?”अरुंधतीने विचारलं.
“नुसतंच रिमा म्हणा डॉक्टर.मिसेस आणि पाठक नको वाटतं आता.”
“मिस्टर पाठक?ते नाही आले तुमच्याबरोबर?”
“मी सध्या मामाकडे आहे.मला माहित नाही.”रिमाच्या कपाळावर आठ्या पडल्या.
इतक्यात केबिनचे दार उघडून मध्यम उंचीचा,दणकट पुरुष दारात दिसला.चेहऱ्यावर मग्रुरी.
“मी संदेश पाठक. आत येऊ का?बाहेर रीसेप्शनिस्ट दिसली नाही म्हणून दार उघडून आलो.”
“हो या,प्लिज बी सिटेड.”अरुंधती म्हणाली.
जरा वेळ शांतता पसरली.अरुंधतीने संदेशलाच विचारलं, “घटस्फोटाचे कारण कळू शकेल?”
“अहो,एक नाही, दहा कारणं आहेत.आम्ही जुन्या पुण्यातले नारायण पेठेत राहणारे.घरचं वातावरण जुनं आहे. आमच्या घरी असली थेरं चालत नाहीत.”
“काय थेरं केली मी?” रिमाने संतापाने विचारले.
“एक मिनिट,हे कोर्ट नाही हे लक्षात असू द्या.इथे सामंजस्याने काही गोष्टी टाळता येत असतील तर त्याचा मी प्रयत्न करते.”अरुंधतीने दोघांनाही स्पष्ट सांगितले.
“आमच्या घरी हे ड्रेस घालणं चालणार नाही.ह्यांना नाश्त्याला पाव बटर खायची सवय आहे.असलं भिकारडं आम्ही खात नसतो.ह्यांना पारोशाने स्वयंपाक करायची सवय आहे.आम्ही खपवून घेणार नाही.”
अरुंधती त्याचं बोलणं ऐकून अवाक झाली.घटस्फोटाची इतकी फुटकळ कारणं असू शकतात?तिला त्या माणसाशी बोलायचीच इच्छा होईना.
“रिमा, तुम्ही बोला.तुम्हाला काय सांगायचं आहे?
“काय बोलू डॉक्टर?तुम्ही ऐकलच आत्ता.ह्या गोष्टींवरून आमच्यात वाद होतात.माहेरचा उद्धार होतो.मधे मी सर्दी,खोकल्याने हैराण झाले होते पण घरचीच औषध घ्यायची ही सक्ती.गोळ्या,सिरप घ्यायची मनाई.कसं काय अख्ख आयुष्य काढणार ह्या माणसाबरोबर?” रिमा रडायला लागली.
“रिमा, तुम्ही शांत व्हा.मिस्टर पाठक, अहो कुठल्या शतकात जगता आहात तुम्ही?ड्रेस घालायचा नाही,साडीची जबरदस्ती.आणि पाव,बटर हे भिकारडं खाणं?आवडतं एखाद्याला.तुमचे विचार तुम्ही लग्नाआधी स्पष्ट केले होते का? आणि नारायण पेठेत राहता म्हणून काय झालं?जग इतकं पुढे चाललंय,आपल्यालाही त्या प्रवाहाबरोबर थोडंफार तरी जायला हवं.रिमाताई तुमच्याशी किंवा तुमच्या घरच्यांशी नीट वागत नाहीत,ही कारणं मी समजू शकते.पण तसं तुमच्या तोंडून काहीच आलं नाही.थोडासा विचार करा,दोघेही स्वतःला मुरड घाला.एक सुवर्णमध्य साधा.इतक्या क्षुल्लक कारणासाठी विभक्त होऊ नका.”अरुंधतीने दोघांनाही समजावलं.
“मॅडम,मला वाटलं होतं की तुम्ही ह्यांना काहीतरी समजावून सांगाल पण तुमचा रोख माझ्याचकडे आहे.अहो,राहुरीसारख्या छोट्या गावातून ह्या आलेल्या.घरची परिस्थिती बेताची.ह्यांना काय राजकुमार किंवा फिल्मी हिरो मिळणार होता का?मी आहे असा आहे.पटलं तर राहायचं नाहीतर कोर्टात भेटा.” असं म्हणून संदेश सरळ केबिनच्या बाहेर गेला. अरुंधतीला बोलायला अवसरच दिला नाही.
रिमा हुंदके देऊन रडायला लागली.अरुंधतीला कळेना काय करावं.ती खुर्चीवरून उठली आणि रिमाच्या पाठीवरून हात फिरवायला लागली.तिने थोडा विचार केला आणि रिमाला विचारलं,
“रिमाताई, तुमचा निर्णय पक्का असेल तर कौन्सल्लिंगला काही अर्थ नाही.द्विधा मनस्थिती असेल तर काहीतरी मार्ग निघू शकतो.”
“नाही डॉक्टर, मला नाही राहायचं अशा माणसाबरोबर. इतकी वर्षे लहान गावात आयुष्य गेलं.पुण्यासारख्या शहरात लग्न होऊन जाता येईल,इथे मी स्वत:चं अस्तित्व निर्माण करेन ही स्वप्न उराशी बाळगून मी ह्या लग्नाला होकार दिला.इतक्या हास्यास्पद कारणांसाठी मी तडजोड करू?तुम्ही एक स्त्री आहात. तुम्हाला तरी हे पटतं का?”रिमाने सरळ प्रश्न केला.
अरुंधतीकडे ह्याचं उत्तर नव्हतं.”ठीक आहे.मी तुमच्या वकील भारती ह्यांच्याशी बोलते.तुम्ही घरी गेलात तरी चालेल.काही मदत हवी असेल तर माझ्याकडे जरूर या.” “थँक्स डॉक्टर, निघते मी ”
रिमा गेली आणि अरुंधतीचं डोकं सुन्न झालं. इतक्या डिव्होर्सच्या केसेस हाताळल्या.काही ठिकाणी यश देखील मिळालं.पण ह्या केसमधे तिला पुढे काहीच करावंसं वाटलं नाही.तिचं मन रिमाच्याच बाजूने कौल देत होतं. एक स्त्री म्हणून नाही तर एक माणूस म्हणून.तिने भारतीला फोन लावला.
“भारती, रिमा आणि संदेशचा घरस्फोट होणच योग्य आहे, नाहीतर पुढे अनर्थ घडू शकतो इतकंच मी सांगते.आय विश यु गुड लक.” तिने मोबाईल बंद केला आणि खुर्चीवर मान टेकवून डोळे मिटून शांत बसली.तिला वाटलं, उमलण्याआधीच एक कळी सुकायला नको….
————————-समाप्त—————————
(सत्य घटनेवर आधारित)
©️®️ सौ मधुर कुलकर्णी, पुणे.
================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.
=============
1 Comment
Hello World! https://apel.top/go/gu4winrshe5dgoju?hs=9e4ff4d769aca27b9d9bd1e7312cb41a&
bl0bxa