Skip to content Skip to sidebar Skip to footer

दिवाळी का साजरी केली जाते आणि दिवाळीच्या ५ दिवसांचं महत्व

diwali information in marathi: आपण सगळेच सण अगदी उत्साहात साजरे करतो. पण त्यातल्या त्यात अतिशय उत्साहाने साजरा करण्यात येणारा, सगळ्यात मोठा आणि दिव्यांची उधळण करणारा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी ही कधी चार तर कधी पाच दिवसांची असते. संपूर्ण जगभरात अतिशय उत्साहाने साजरा होणारा हा सण. यालाच आपण दीपावली असेही म्हणतो. दीपावली हा खरतर संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ दिव्यांच्या ओळी असा आहे. भारतीय कॅलेंडरनुसार कार्तिक महिन्याच्या अमावस्येला आपण दिवाळीची सुरुवात करतो. अमावस्या ही साधारण पणे अशुभ मानली जाते. पण प्रत्यक्षात ती वाईट नसते. त्यामुळे दिवाळी ही कार्तिकी अमावस्या पासून सुरू होते. दिवाळी हा हिंदू धर्मातील खूप प्राचीन सण आहे. शरद ऋतूतील सगळ्यात मोठा आणि उज्वल करणारा हा सण मानला जातो. दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच दिवाळीत खूप दिवे, लाईटच्या माळा आणि आकाश कंदील लावले जातात. संपूर्ण घर दिव्यांनी उजळून निघते.

पू म्हणजे पूर्तता

जा म्हणजे पुर्णतेतून जन्माला आलेले

म्हणूनच पूर्ततेतून जन्माला आलेली पूर्णत्व देणारी पूजा आपण प्रत्येक सणावारात करतो. पूजा केल्याने परिपूर्णता आणि समाधान मिळते शिवाय वातावरणात सकारात्मक सूक्ष्म लहरी तयार होतात. त्यामुळे पूजा महत्त्वाची ठरते. दिवाळीत आपण गाय, बैल या प्राण्यांची, भगवान कुबेर, देवी लक्ष्मी, देवी सरस्वती, आरोग्य देणारी देवी धन्वंतरी आणि सगळ्यांचा लाडका बाप्पाची पण पूजा करतो. आपल्या जवळ असलेल्या धनाची म्हणजेच पैशांची म्हणजेच लक्ष्मीची आणि विद्या म्हणजेच ज्ञान म्हणजेच सरस्वतीचीही पूजा केली जाते.

जाणून घ्या त्र्यंबकेश्वरला गंगा नदीचा उगम कसा झाला?

भगवान श्रीराम वनवास संपवून, देवी सीतेचे हरण करणाऱ्या रावणाचा वध करून जेंव्हा अयोध्येत परत आले तेंव्हा अयोध्या वासियांनी दिवे लावून रांगोळी काढून त्यांचे स्वागत केले होते त्यामुळे आपण दिवाळी साजरी करतो असेही म्हटले जाते.

चला तर बघुया प्रत्येक दिवसाचे खास महत्त्व आणि त्यामागे असलेली रंजक कथा ही.

हा दिवाळीचा पहिला दिवस.  दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशी पासून होते. या दिवशी सगळे घर दिव्यांनी आणि लाईटच्या माळांनी सजवले जाते. अंगणात सुबक रांगोळी काढली जाते. हा दिवस सोने, चांदी खरेदीसाठी किंवा कोणतेही शुभ काम करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. असे म्हणतात की आपल्या शरीराला निरोगी ठेवणाऱ्या श्रीमंत देवी धन्वंतरीचा या दिवशी वाढदिवस असतो. म्हणूनच या दिवशी देवी धन्वंतरीची पूजा केली जाते. धन म्हणजे पैसा म्हणजेच देवी लक्ष्मी या दिवशी सगळ्यांच्या घरात प्रवेश करते. जिथे दया, प्रेम, अपार मेहनत आणि प्रयत्न केले जातात त्यांच्याच घरात लक्ष्मी देवी कायमस्वरुपी टिकून रहाते. या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय होतो आणि सगळीकडे सकारात्मक ऊर्जा पसरते.

हा दिवाळीचा दुसरा दिवस. यालाच छोटी दिवाळी असेही म्हणतात. या दिवशी पहाटे लवकर उठून सूर्योदय होण्यापूर्वीच अंघोळ करतात. सूर्योदय पूर्वी अंघोळ झाली नाही तर आपण नर्कात जातो असे मानले जाते. या दिवशी घर स्वच्छ केले जाते, दारात सडा रांगोळी करण्यात येते आणि बरेच लोक नातेवाईकांना मित्र परिवाराला देण्यासाठी भेटवस्तू खरेदी करतात.

या दिवशी लवकर अंघोळ करण्यामागे एक कथा आहे.

कथा :

असुरांचा राजा नरकासुर प्रागज्योतीसपूर( नेपाळचा दक्षिण प्रांत) येथे राज्य करीत होता. एका युद्धात इंद्रावर विजय प्राप्त केल्यावर, देवांची माता अदिती हिची सुंदर कर्णकुंडल त्याने हिसकावून घेतली व देव आणि संतांच्या सोळा हजार कन्यांना आपल्या अंतःपुरात कैदेत ठेवले.

नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने ह्या दानवाचा वध करून, त्या सर्व कन्यांची मुक्तता केली व अदितीची मौल्यवान कर्णकुंडलं परत केली. त्या महिलांनी सुगंधी तेलाने मर्दन करून आणि स्नान करून स्वतःला शुचिर्भूत करून घेतले. म्हणून प्रातःस्नानाची ही परंपरा वाईट प्रवृत्तीवर दिव्यतेच्या विजयाचे प्रतीक आहे. ह्या दिवशी शुभ संकल्प घेण्याची रीत आहे.

दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी असते लक्ष्मी पूजन. हा सगळ्यात महत्त्वाचा दिवस. या दिवशी देवी लक्ष्मी, देवी सरस्वती, भगवान कुबेर आणि गणपती बाप्पाची पूजा करण्यात येते. असे म्हणतात की देवी लक्ष्मी या दिवशी पृथ्वीवर येते. देवी लक्ष्मीला घरी आमंत्रित करण्यासाठी आणि कायमस्वरूपी तिने आपल्याच घरी रहावे यासाठी सगळे घराच्या दारावर दिवे लावतात आणि दारे खिडक्या, बाल्कनी सगळं उघडे ठेवतात. तसेच या दिवशी पूर्वी घरातील दागिने, पैसे आणि विद्या जी एक प्रकारे धन मानली जाते त्याचीही पूजा केली जात असे. हल्ली घरात कोणी पैसे, दागिने ठेवत नाही त्या ऐवजी एक रुपयाचे नाणे किंवा चांदीचे नाणे ठेवून पूजा करण्यात येते. या दिवशी सूर्यदेव दुसऱ्या चरणात प्रवेश करतो.

हा दिवस अतिशय शुभ दिन मानला जातो, कारण ह्या दिवशी बऱ्याच संतांनी व महात्म्यांनी समाधी घेऊन आपल्या नश्वर देहाचा त्याग केला होता. ह्या महान संतांमध्ये भगवान श्रीकृष्ण व भगवान महावीरांचा समावेश आहे. ह्याच दिवशी प्रभू रामचंद्र, सीतामाई व लक्ष्मणा सोबत, १४ वर्षांचा वनवास सोसून अयोध्येत घरी परतले होते.

दिवाळीच्या ह्या दिवसाबद्ल एका कथेचा कटोपनिषदमध्ये उल्लेख आहे.

कथा :

नचिकेत नावाचा एक छोटा मुलगा होता. त्याला असे वाटायचे की मृत्यू देवता यम हे रूपाने अमावस्येच्या काळरात्री सारखे भयाण असावेत. पण तो प्रत्यक्ष जेव्हा त्यांना भेटला तेव्हा त्यांचा शांत चेहरा व सामान्य रूप बघून आश्चर्यचकित झाला. यमाने नचिकेताला समजावून सांगितले की केवळ मृत्यूची काळोखी गुहा पार केल्यानंतरच मनुष्य श्रेष्ठ ज्ञानाचा प्रकाश बघू शकतो आणि त्याचा आत्मा परमात्म्यासोबत एकरूप होण्यासाठी देहाचा त्याग करतो. तेव्हाच नचिकेताला सांसारिक आयुष्य आणि मृत्यूच्या महत्वाची जाणीव झाली व तो आपल्या साऱ्या शंकां दूर सारून दिवाळीच्या उत्सवात सहभागी झाला.

सगळे व्यापारी या दिवशी भगवान कुबेर आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात. तर लहान मुले फटाके फोडून दणक्यात देवी लक्ष्मीचे स्वागत करतात.

जाणून घ्या हरिद्वारमध्ये गंगा स्नानास अनन्य साधारण महत्व का आहे?

जाणून घ्या करवा चौथ व्रत, पूजा विधी आणि उद्यापन कसे करावे.

हा दिवाळीचा चौथा दिवस. यालाच बली प्रतिपदा असेही म्हणतात. हा दिवस साजरा करण्यामागे काही कारणे आहेत.

– याच दिवशी राजा विक्रम सिंहासनावर आरूढ झाला.

– भगवान श्री कृष्णाने इंद्र देवाच्या कोपाने झालेल्या अतिवृष्टी पासून गोकुळ वासियांचे रक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला.

त्यामुळे पाडवा साजरा केला जातो. या दिवशी नवरा बायकोला भेटवस्तू देतो. तसेच भगवान श्रीकृष्णाची गोवर्धन पूजा करण्यात येते. ग्रामीण भागात घरातील पशूंना म्हणजेच गाय, बैल, म्हैस आणि बकरी यांना सजवले जाते आणि घरातील फराळाचे गोड पदार्थ खायला दिले जातात.

दिवाळीची सांगता भावा बहिणींच्या अतूट नात्याचे सेलिब्रेशन करून केली जाते. हा दिवाळीचा पाचवा आणि शेवटचा दिवस. भारतातील काही राज्यात याला ” टिका ” असेही म्हणतात. हा दिवस रक्षाबंधन सारखाच असतो पण वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. या दिवशी सगळे भावंडं दिवाळीच्या आणि भाऊ बीजेच्या निमित्ताने एकत्र येऊन काही क्षण आनंदात घालवतात. बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घ आणि चांगल्या आरोग्याची कामना करते तर भाऊ बहिणीला भेटवस्तू देऊन तिचे रक्षण करण्याचं वचन देतो.

तर असा हा उत्साहाचा आणि महत्त्वपूर्ण सण नेहमीप्रमाणे आनंदाने साजरा करूया आणि आनंद द्विगुणित करुया.

=============

Leave a Comment

error: