धार्जिण

©® सौ. गीता गजानन गरुड.
वनरुम किचनची चाळीतली खोली. खोलीत अंथरुणाला खिळलेली नानी आणि तात्या दोघंच. तात्यांनी जेवणाचा डबा लावला होता. सकाळचा चहा, शिरा,उपमा, दुपारचं जेवण,संध्याकाळचा चहा नं रात्रीचं जेवण सगळं बाहेरुन यायचं.
खानावळीतला आचारी बदलला की स्वैंपाकाची चवही बदले पण पर्याय नव्हता. गेली चार वर्ष नाना नानीला सांभाळत होते. संधिवाताने फार लवकर अधू केलं होतं तिला. देहाचा सांगाडा झाला होता अगदी तरी पावसासारखी बोलायची नानी. प्रश्नांवर प्रश्न विचारुन नानांना बेजार करायची. अगदी मशीनला कपडे लावलेत की नाही, कपड्यांच्या घड्या केल्यात का पासून कचरेवाला येऊन गेला का, दूधवाल्याचं बील किती झालं, फुलवाला फुलं देतो नं नीट..अशी तिची प्रश्नावली सुरु असे. नाना तिच्या बाजूला पेपर घेऊन बसायचे नि तिला विचारुन कोडं सोडवायचे.
“ए नलू, फुलातल्या मधाचं नाव सांग बघू.”
“त्यात काय सोप्पय. मकरंद. आमच्या वर्गात होता. गोरासा,उंचापुरा,कुरळ्या केसांचा,पिंगट डोळ्यांचा. बाई त्याला नेहमी धडा वाचायला सांगायचा. वाचन तर इतकं छान होतं मकरंदचं..जीवं कानात गोळा करुन ऐकावं असं..स्वल्पविराम, पुर्णविराम..सगळ्यांना योग्य तो न्याय द्यायचा.”
“बरंच आठवतं गं तुला. काल उशाला गोळ्या ठेवल्या त्या घ्यायला विसरलीस आणि शाळेतला मकरंद.”
“होताच तसा मकरंद.” असं म्हणत नानी चक्क लाजली. चेहऱ्याला सुरकुत्या पडल्या तरी माझ्या नलूचं मन अगदी लहान मुलीसारखं आहे.” नाना मनात म्हणाले.
दोघांनी मिळून कोडं सोडवत आणलं
“इथे या आडव्या तिघात काय लागतय बघ बरं जरा. तीन अक्षरी हवाय. शेवटी ‘ण’ येतय बघ.”
नानीने जरासा विचार केला मग नानांच्या हातावर टाळी देत म्हणाली,”अहो, ‘धार्जिण’ बघा बसतोय का.”
“हो गं, अगदी चपखल बसला बघ” म्हणत नानांनी कोडं पुरं केलं. मग त्यांनी पेपरची घडी करुन टेबलवर ठेवली. नानीला अघळपघळपणा बिलकुल खपत नसे. नानांच्या मागे लागून लागून ती सगळं जागच्या जागी ठेवून घेत असे.
धार्जिण हा शब्द नानांच्या डोक्यातून गेला तरी नानीच्या जीभेवर घोळत राहिला.
नानीने तिच्या कर्त्या काळात सासरमाहेर दोन्ही धरुन ठेवलं होतं. दोन दिरांची लग्नं लावून दिली होती. माहेरी असताना वडिलांच्या प्रपंचाला हातभार लावण्यासाठी शिकवण्या घेतल्या होत्या..पण हे नातलग तिला धार्जिण नव्हतेच मुळी. नाना सेवानिवृत्त झाले. त्यांच्याकडची गंगाजळी नानीच्या आजारपणात आटू लागली तसं दिरांनीच काय अगदी पाठच्या भावानेही नानीकडे पाठ फिरवली.
नानीचा सख्खा भाऊ तिला डावलून रक्षाबंधन,भाऊबीजेला चुलत बहिणींकडे जाऊ लागला. नानीला बघायला, तिची विचारपूस करायला येईनासा झाला. नानी मग हातवारे करुन भांडे. नानांकडे या लोकांची तक्रार करे.
दोघांना खरंच दिवस जाता जात नसे. उजव्या बाजूला एक कुटुंब होतं खरं पण ती दोघं नवराबायको दिवसभर नोकरीनिमित्ताने बाहेर असायची. रात्री पाठ टेकायला घरात यायची. अगदी महिनामहिना द्रुष्टीभेट होत नसे.
डाव्या बाजूच्या नांदोस्करणीचं चारेक वर्षापुर्वी नानीशी वाजलं होतं. नांदोस्करीण बोलत नव्हती नानीशी. नुकतंच ते बिर्हाड खोली विकून परगावी रहायला गेलं होतं.
एका सकाळी नानांना खाली लॉरी उभी राहिलेली दिसली. कुणीतरी नवीन भाडेकरु..कोणत्या मजल्यावर येत असतील बरं! नाना त्यांचं सामान बघत काही वेळ उभे राहिले. बाजूच्या नांदोस्करांच्या खोलीचं दार उघडलं गेलं.
“चला नवीन शेजार आलं,” नाना स्वत:शीच म्हणाले.
रात्रभर खोकल्याच्या उबळीने नानीला झोपू दिलं नव्हतं. आता कुठे तिचा डोळा लागला होता.
“शेजाराची जाग आली असती तर एव्हाना सतरा प्रश्न विचारले असतेस,” नाना झोपलेल्या नानीकडे बघत म्हणाले.
थोड्या वेळात डबा आला. वरणाचं पातळ पाणी,जाडगेला भात नं गवारीची भाजी..नानांना बघूनच कंटाळा आला.
नानी उठली तशी नानांनी तिचं स्पंजिंग केलं. तिच्या पांढुरक्या केसांना तेल लावून वेणी घातली. टिकलीच्या पाकिटातली टिकली काढून तिच्या कपाळाला लावली.
तिच्यासमोर आरसा धरला तशी ती खुदकन हसली.
नानांनी तिला चहा भरवला. तो घेतल्यावर नानीला जरा तरतरी आली. बाहेर उन्हाने आपले हातपाय पसरले होते. नानांनी तिची कॉट एडजस्ट करुन तिला बसतं केलंं.
खिडकीतून दिसणाऱ्या जाभंळीच्या झाडाला अगदी बारकुलीजांभळं धरली होती. साळुंकी, बुलबुल, चिमण्या अधनंमधनं येऊन फांद्यांवर बागडून जात होती. नानांनी पक्ष्यांना दाणे टाकले तसे ते फांदीवरतून खाली आले नि दाणे टिपू लागले. पिवळ्या चोचीची सांळुकी, इवलासा पिसारा नाचवणारा नाचरा, चिमण्या नं बुलबुल आळीपाळीने येऊन दाणे टिपत होते नि ते पहाण्यात नानी गुंग झाली होती. नानांनी आता तिच्यासाठी उपम्याची प्लेट भरुन आणली . नानीने चमचाभरच उपमा खाल्ला. तिला नकोसा वाटला. तिने मानेनेच नको म्हणून सांगितलं.
“अगं नलू, असं करुन कसं चालेल. गोळ्या घ्यायच्या आहेत नं.’ तरी नानीतलं हट्टी मुल ऐकेना. तिने तक्रारीच्या सुरांनी नानांकडे पाहिलं. नानांना तिच्या हट्टीपणाचा राग नं तिच्याविषयी दया दोन्ही एकदम आली.
नानांना आधीचे दिवस आठवले. नानी किती सुरेख स्वैंपाक करायची! तिचा वावर असेतागत धुळीला काय हिम्मत होती टेबलखुर्च्यावर बसकण मारायची. शेजाऱ्यापाजाऱ्यांना शेजारपाळं नेऊन द्यायची.. पण आता तिला बेचव अन्नखावं लागत होतं. नानांना वाटायचं, चुकलच आपलं. नानी स्वैंपाक करत असताना जरा लक्ष दिलं असतं तर..तिला मदत केली असती तर आज ही अवलंबून रहाण्याची वेळच आली नसती.
नाना त्यातल्या त्यात काहीतरी करायचे. कधी खिचडी टाकायचे तरी कधी आमटीभात करायचे पण आतासे त्यांनाही झेपेनासं झालं होतं. नानीचं सगळं आवरुनसवरुन थकून जायचे बिचारे.
हिंगाच्या फोडणीचा सुगंध नानीच्या नाकात शिरला.
किती महिन्यांनी नानी असा ताज्या फोडणीचा सुगंध घेत होती.
नानांना नानी का प्रसन्न झाली ते कळालं.
ते तिच्याजवळ बसत म्हणाले,”अगं नांदोस्करांच्या घरात नवीन भाडेकरु आले आहेत कुणी. सकाळीच सामानाची लॉरी खाली उभी होती. तू इतकी छान झोपली होतीस म्हणून उठवलं नाही तुला.”
आपल्याला ते सामान वर आणताना बघायला नाही मिळालं याची नानीला चुटपूट वाटली पण ती जास्त वेळ टिकली नाही.
बटाट्याच्या कापांचा खरपूस गंध जो आला ख़िडकीतून. तेलकांद्यावर परतलेली रेतीतली मेथी..सगळं ताट नानीच्या डोळ्यापुढे उभं राहिलं..अगदी अगदी पोह्याचा पापड,मिरगुंड नं कुरडईसुद्धा. न जेवताही नानीला जेवल्याचं समाधान मिळालं.
नानी एकदम खूष झाली. तापत्या,भेगाळलेल्या जमिनीवर एखाद्या कृष्ण मेघाने पर्जन्यधारा बरसाव्या, धरतीने त्या धारा अंगोपांगी झेलत ,सचैल न्हावं तसं काहीसं झालं नानीचं.
नानांनी नानीची समजूत काढली. दोघांनी आलेला डबा कसा का असेना घशाखाली ढकलला. नानीची झोप झाली होती पण नाना पहाटेच उठायचे त्यामुळे दुपारची जरा वामकुक्षी घ्यायचे. खाली चटई अंथरुनं ते जरा लवंडले होते. नानीच्या पावसासारख्या गप्पा चालू होत्या. तिला हुंकार देत कधीतरी नानांचा डोळा लागला.
चारेक वाजता दारावर टकटक झाली.
“कोण बरं आलं असेल यावेळी?” नानी असा विचार करत नानांना हाकारु लागली.
“अहो उठा जरा. बाहेर दार कोण वाजवतय बघा की जरा.”
नानांना जाग आली. कॉटला धरुन ते क्षणभर बसले. लगेच उठले तर त्यांना आताशी अंधारी येत असे म्हणून डॉक्टरी सल्ल्यानुसार ते जरा उठून बसत मग उभे रहात.
नाना सावध झाले. उभे राहिले नि दाराकडे गेले. दार उघडलं तर समोर कुणीच नव्हतं.
“उगा कोणीतरी मस्करी केली असेल..”असं ते म्हणणार तोच त्यांचं लक्ष खाली गेलं. पहातात तर काय कुरळ्या केसांची, भोकर डोळ्यांची, गोबऱ्या गालांची एक छोटुकली पुढ्यात उभी.”
“कोण गं तू? नावं काय तुझं?” नाना गुडघ्यात वाकून तिला विचारु लागले. तेवढ्यात छोटीची मम्मा आली. तिने तिला कडेवर उचलून घेतलं.
“सॉरी हं. आमच्या मनूला दारं ठोकवायची खोड आहे.”
मनूच्या मम्माचं बोलणं ऐकून नाना हसले.
“या या आत या.” म्हणाले.
“आम्ही नांदोस्करांच्या खोलीत रहायला आलोय. जरा गाळण हवी होती चहाची. आमची कुठे सापडेना.” मनूची मम्मा म्हणाली.
मम्माचं बोलणं चालू होतं तेवढ्यात मनूने मम्माच्या कडेवरुन नानीच्या कॉटवर उडी मारली.
मम्माने मनूवर डोळे वटारले तसं आजीने मम्माला ”चालतय, लहान लेकरु आहे ते,” असं सांगितलं.
नाना गाळणी घेऊन आले.
मनूची मम्मा म्हणाली,”मन्या, चल बघू घरी आता.”
इतक्यात मोठाले डोळे करत नं इवलेसे हात वरती करत मनू ओरडली,”सापडली..मला सापडली.”
“कोण..कोण सापडली तुला?” मनूच्या मम्माने विचारलं तसं मनू म्हणाली,”ती नै का तू मला गोष्ट सांगतेस नेहमी..चल रे भोपळ्या टुणुकटुणुक..चल रे भोपळ्या टुणुकटुणुकवाली आज्जी सापडली. ही बघ.” नानीकडे बोट करत मनू चित्कारली. “
“आता ही लेकीकडे जाईल. तुपरोटी खाईल नं जाडजूड होऊन परत येईल.” मनूचे बोबडे बोल ऐकून नानीने तिच्या गालांवर आपली सुरकुतलेली बोटं फिरवली न म्हणाली,”लेक होती गं मला. अगदी तुझ्यासारखीच पाणीदार डोळ्यांची पण तीही धार्जिण नव्हती मला. रस्त्यावर माझं बोट सोडून धावत होती नं गाडीखाली..तिथेच संपलं सगळं.”
नानीला तो चाळीसेक वर्षापुर्वीचा अपघात आठवला, मनूएवढाली तिची लेक क्षणार्धात शांत झाली होती,निश्चल झाली होती.” तो प्रसंग आठवून तिच्या डोळ्यातनं पाणी वाहू लागलं. नानांनाही गलबलून आलं.
मनूच्या मम्माला मनूचा राग आला . ती पुढे झाली. तिने नानीच्या खांद्यावर हात ठेवून तिला थोपटलं, म्हणाली,”आजपासून मला तुमची लेक समजा. ही लेक नक्की धार्जिण असेल तुम्हाला, वचन देते.”
त्यादिवशीपासनं मनूची मम्मा दिवसातनं दोनदा तरी नानानानींची ख्यालीखुशाली घेऊ लागली. फावल्या वेळात नानीच्या पाऊसगप्पा आवडीने ऐकू लागली. मनूला भातुकली खेळण्यासाठी नानाआजोबा हे हक्काचं गिर्हाईक मिळालं. नानी तिला परीच्या गोष्टी सांगू लागली. काही गोडधोड, सणाचं केलं की मनूची मम्मा आवर्जून नानानानीसाठी ताट घेऊन जाऊ लागली.
गुढीपाडव्याच्या दिवशी मनुच्या मम्माच्या हातची आमरसपुरी खाताना नानी नानांना म्हणाली,”ही मनूची मम्मा खरंच धार्जिण आहे हो आपल्याला.” नानांनीही हसतहसत मान डोलावली.
जुन्या खोडांना नव्याने चैत्रपालवी येऊ लागली.
माणसाला चार मायेच्या शब्दांची, आपुलकीची गरज असते, हे मनूच्या मम्माला चांगलच ठाऊक होतं. ती मायेची पखरण ती या थकल्या जीवांवर निरपेक्षपणे करु लागली होती.
समाप्त
===================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============