देवत्वाचा भास

विषाणूच्या साथीमुळे सर्जाची कंपनी बंद पडली होती. सर्जाकडचे साठवणीचे पैसे केंव्हाच संपले होते. कुणी दयावंतांनी आणून दिलेलं धान्यही संपलं. आताशा त्या झोपडपट्टीच्या प्रभागात कोण मदत करायला यायलाही मागेना.
सर्जाच्या बायकोने पीठाच्या डब्याचं झाकण उघडलं. तळाला थोडं पीठ शिल्लक होतं. त्या पीठाच्या दोन पातळशा भाकऱ्या करुन पोरांना वाढल्या.
नेहमी दोन वेळ साधसुधंच पण भरपेट जेवणारी सर्जाची बाळं पार खंगून गेली होती. शाळा सुरु असली की शाळेत खिचडी मिळायची. आत्ता विषाणूच्या हाहाकाराने शाळा केंव्हाची बंद झाली होती.
सर्जाने पोरांच्या केसांतून हात फिरवला. लहानगा तर आई एक अंड्याची पोळी दे म्हणून आईपाशी हट्ट करुन राहिलेला. त्याच्या डोळ्यातली आसवं त्याच्या गालावर सुकली होती. रडून रडून पोट पार खपाटीला गेलं होतं. पोराचं ते खपाटीला गेलेलं पोट पाहून सर्जाचं काळीज पिळवटलं.
भूक..भूक आणि भूक
भुकेपुढे सगळे प्रश्न फोल ठरतात. सगळे संस्कार माना झुकवतात.
सर्जाला पोरांची अवस्था बघवत नव्हती.’ काय बी करायचं, जे मिळलं ते काम करायचं, नाहीच मेळलं तर चोरीमारी करायची पण लेकरांना जगवायचं,’ अशी खूणगाठ सर्जाने मनाशी बांधली. कोरा चहा पिऊन तो बाहेर पडला. नेहमीच्या नाक्यावर आला. तिथेच रोज तो व इतर मजूर काम मिळवण्यासाठी येऊन उभे रहायचे. त्या नाक्यावर चिटपाखरूही नव्हते. सगळी दुकानं बंद होती.
सर्जाने गुडघ्यात पाय दुमडले व डोकं त्यांत खुपसून तो रडू लागला. थोड्याच वेळात त्याच्या कानाशी ओळखीचा आवाज व त्यापाठोपाठ टाळी ऐकू आली. तो एक तृतीयपंथी होता. जेंव्हा हाताला कामं होती तेंव्हा सर्जा त्याला कधी चहा द्यायचा तर कधी नाश्ता द्यायचा,बिडीकाडी द्यायचा.
तो तृतीयपंथी सर्जाला म्हणाला,”अरे इतना बडा मर्द होकर रोता कायको है। आज काम नहीं मिला पर कुछ ही दिन बाद जरुर मिलेगा।”
सर्जा म्हणाला,”काय सांगू लका तुले, माझी पोरं उपाशी हायती. माझा जीव तुटतोय र त्यांच हाल बघून. आमी दोघं पाणी पिऊन राहू पण मग आमच्या लेकरांच काय? तेंचे हाल माझ्याच्यान नहीं बघवत.”
यावर तो म्हणाला,”तू चल मेरे साथ। तुझे जितना चाहिए उतना किराना मैं लेके देता हूँ।” हे ऐकून सर्जा नको म्हणाला तसा तो म्हणाला,”क्यों रे, हम लोग इन्सान नहीं है क्या? हमारे पास भी दिल है रे तुम्हारे जैसा। मैं तैरे पे मेहरबानी नहीं कर रहा हूँ। उधारही समज के ले ले। तेरा अच्छा वक्त आयेगा तो मुझे लौटा देना। कुछ भी करना पर गलत काम कभी मत करना।” असं म्हणत तो सर्जाला दुकानाजवळ घेऊन गेला व चांगला दोन महिनाभर पुरेल एवढा किराणा त्याने सर्जाला घेऊन दिला.
सर्जाने त्याच्या पायांवर लोळणच घातली. त्या तृतीयपंथीयात आज त्याला देवत्वाचा भास होत होता.
समाप्त
बोध: माणुसकी हाच खरा धर्म आहे व माणुसकी असणाऱ्या माणसांत देव वास करतो.
–गीता गरुड.
===========
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.
=============