Skip to content Skip to sidebar Skip to footer

देवीची गणितं (बोध कथा)

©️®️ गीता गरुड.

काशीबायला बऱ्याच दिवसांनी फोन आला होता. समोरच्या पाटलांच्या वाड्यात तेंव्हा फोन होता. काशीबाय तुझा फोन आलाय ममयवरनं अशी हाळी गणप्याने, पाटलाच्या गड्याने दिली.

काशीबाय तेंव्हा अंगणात सारवण करत होती. हाती शेणाने भरलेला खराटा होता. हातपायही शेणाने माखले  होते. लेकाचा फोन म्हंटल्यावर आनंदून जाऊन तिने तसेच शेणाचे हात गालावर धरले. नवी बाहुली मिळाल्यागत तिचे डोळे लुकलुकले.

काशीचा घरमालक सखाराम डाफरला,”असं काय कराय लागलीस नव्या नवरीवानी. जाय अगुदर ते हात,ताँड धू मंग घी फुन. कुठं पळून न्हाय जायाचा त्यो.” सखाराम लयच स्ट्रीक्ट होता. प्रल्हाद घराकडे असताना लय राबवून घ्यायचा पोराला. प्रल्हादाची थोरली बहीणपण बापाच्या धाकापायी  माहेरी यायला कचरायची.

प्रल्हाद खूप हुशार होता. सगळे धडे त्याच्या तोंडपाठ असायचे. पाढे तर जीभेवर खेळायचे. प्रत्येक इयत्तेतले मास्तर त्याच्यावर खूष असायचे पण म्हाताऱ्याला मुलाच्या हुशारीचं अप्रुप नव्हतं. परीक्षा असली तरी तो प्रल्हादला बैल राखायला रानात पाठवायचा मग बैलांना चरत ठेवून, लांब जाऊ नका अशी तंबी देत प्रल्हाद चड्डीत लपवून आणलेलं पुस्तक काढून अभ्यास करत बसायचा.

कधी गुरंसोरं दुसऱ्याच्या शेतात गेली नि बाकडे तक्रार आली की बा त्याला टकलीपासून पायाच्या नखापर्यंत शेपडावून काढायचा. रात्री उपाशी ठेवायचा, मग त्यालाच कसा पाझर फुटायचा नि काशीबायला सांगायचा,”जाय लेकराच्या पाठीला तेल लाय. दोन घास मुखात घाल जाय तेच्या. कशी घोरत पडलियास मुडद्यावानी. काशीबाय मग पडत्या फळाची आज्ञा मानत लेकराला खाऊ घालायला धावायची.”

प्रल्हादवर शाळेतल्या शिक्षकांचा लय जीव होता. शिक्षकांनी सांगितलेलं कोणतंही काम तो नाकारत नसे म्हणूनच दहावीपर्यंत शिकला तेवढा मोप झाला म्हणणाऱ्या सखारामाची शाळा घेऊन त्यांनी त्याला प्रल्हादला पुढच्या इयत्तेत टाकायला लावलं होतं.

प्रल्हादही बा सांगील ती कामं करत कॉलेजचं शिक्षण घेऊ लागला होता, पार्टटाइम नोकरी करून घरी पैसेही पाठवायचा. पुढे त्याला नोकरी लागली नि तो शहरात रहावयास गेला. तिथेच बाजुला रहाणाऱ्या गौतमीशी त्याचं सूत जुळलं.

प्रल्हादने घरी येऊन गौतमीशी लग्न करणार असल्याचं सांगितलं. गावातल्याच मुलीशी प्रल्हादने लग्न करावं अशी सखारामची इच्छा होती. प्रल्हादने त्याला न विचारता लग्नाचा घेतलेला निर्णय सखारामला मुळीच आवडला नाही.

प्रल्हाद मोठ्या बहिणीला वडलांची समजूत घालण्यासाठी घेऊन आला पण सखाराम आपल्या म्हणण्यावर ठाम होता. शेवटी आईवडिलांच्या पाया पडून प्रल्हाद शहराकडे वळला. काशीबायला मग प्रल्हादचं लग्न लागल्याचं लेकीकडून कळलं. लेक गेली होती भावाच्या लग्नाला. वैनी मोप शिकलेली हाय. बगळ्यावानी गोरीपान हाय नि चांदन्यावानी तिचं हसनं हाय. मोप बुकं शिकलीया. नोकरीबी करती..हे सगळं सुनेचं वर्णन ऐकून काशीबायचं काळीज सुपाएवढं झालं होतं.

लग्नानंतर प्रल्हादने घरी एकदादोनदा फोन केला होता तेंव्हा काशीबाय घाबरत घाबरत नव्या सुनेशी बोलली होती. आवाज किती मंजूळ, अगदी रानातल्या पाखरानं किलबिल करावं तसा. काशीबायला आता नातरवाचे वेध लागले होते. दोन वर्ष झाली तरी प्रल्हादकडून तसली गोड बातमी मिळत नव्हती.

चार दिवसापुर्वी ती देवळात गेली होती नि अर्धातासभर तिची नि देवीची स्पेशल मिटींग झाली होती. मिटींगीत काशीबायने देवीकडे नातवंडासाठी हट्टच केला होता. ‘देवीमाय, कंदी काय मागलं न्हाय आतापातूर तुझ्याकडं. जे पदरात घातलस ते खुशीनं घितलं. येकच इच्छा हाय बघ. नातवंड हवं एकतरी,’..नि देवीच्या डोळ्यात तिला होकार दिसला होता पण हे गुपित तिनं तिच्यापाशीच ठेवलं होतं. नवऱ्याला सांगितलं तर खुळ्यात काढायचा.

परत गणप्याचा आवाज आला,”मावशे, येतीयास नव्हं. कवाधरनं फोनवर वाट बघतुया प्रल्हाद दादा.”

“होय रं आलीच बघ,” म्हणत तिने धुतलेले हात पातळाला पुसले नि विगी विगी गेली. पाटलीण बसलीच होती कान लावून.

काशीबायने फोन हातात धरला नि हालू केलं तसं प्रल्हाद म्हणाला,”आई, किती गं येळ. कवाधरनं फोन धरून बसलुय मी.”

“व्हय रं. तुझा फुन आला नि परत मागचं दिस डोळ्यासमुर आलं बघ. मंग त्यातच हरवाय झालं. तरी नशीब गणप्यान पुन्यांदा हाळी दिली.”

“आई, तुला गोड बातमी सांगायचीय. आज्जी होणारेस तू आज्जी.”

“खरं सांगतुयास माझ्या लेकरा. देवी पावली बघ..म्हंजे मला वाटतच हुतं.”

“काय वाटत हुतं. तुला कुनी सांगाय आलतं माज्या अदुगर?” प्रल्हादने असं विचारताच काशीबायला देवीचा प्रसन्न बोलका चेहरा आठवला नि ती हसत म्हणाली,”हाय माझं गुपित. तुला नाय सांगायची त्ये पन तुला सांगून ठेविते, माझ्या सुनबायला जप. तिला जास्ती काम कराया लावू नग़स. मदत कर तिला सैपाकात, पानीबिनी तूच भरत जा , जड काय उचलाय देऊ नगंस.”

“होय आई नक्की करतु मदत तुझ्या सुनबायला. आता ठ्यु का फोन?”

“ठीव.” असं म्हणत काशीबायने फोन गणप्याकडे दिला आणि थोडा वेळ पाटलिणीसोबत बोलत बसली.

घरी आल्यावर तिचा चेहरा पाहूनच सखारामला कळलं काहीतरी गोड, आनंदाची बातमी आहे ते. त्यालाही आता लेकाची आठवण येत होती पण सांगणार कोणाला नि माघार घ्यायची कशी?.. प्रल्हादने आपल्या आयशीला फुन लावला? आपल्याला लावावासा का न्हाय वाटला? काय खानार हुतो का काय मी त्याले? का घिऊन न्हाय आला आपल्या बायकोला आईवडलांचे आशीर्वाद घेयाला? ..अनेक प्रश्नांनी त्याच्या मनात गर्दी केली .

काशीबायनं मात्र  गोडाचा शिरा केला नि पानातनं घेऊन गेली देवीला द्यायला. देवीसमोर शिरा ठेवत म्हणाली, “देवीआई सुनेच्या पोटात दान घातलंयस. आता लक्ष ठिव तिच्यावर. मी गेलो असतो पन कारभाऱ्याचं काय करू? मला लेक हवा नि नवराबी हवा. दोघात माझं खिमाट होतय बघ. तुला समदं ठाव हाय. माझ्यासमुर माझ्याच चिंता. तुझ्यापुढं तर आख्ख्या जगाची चिंता आसती. निवेद गोड मानून घी गरीबाघरला. परत सांगतो,सुनेकडं लक्ष दी माझ्या. मीबी जानार हाय तिला बघायले पन बघू धन्याचं मन बदलतय का त्ये मंग दोघंबी जाऊ ममयला.”

प्रल्हाद पंधरवड्यातनं एकदा फोन करून काशीबायला त्याची नि बायकोची खुशाली सांगत होता. पाचेक मह्यने झाले असतील नि असाच एका रात्री फोन आला प्रल्हादचा. पाटलीणबायनं हाळी दिली तशी काशीबाय जेवणावरनं उठून गेली.

तिचं मन नुसतं कावरंबावरं. का बरं केला आसल फुन म्हणून. प्रल्हाद म्हणत होता,”आई गं, गौतमीला निजून राह्याला सांगितलय डाक्टरांनी. घरातलं कोन करनार आता? मोठा प्रश्नच पडलाय बघ. गौतमीचे आईवडीलबी येत नैत, त्यांना आमचं लग्न मान्य नव्हतं. आमाला कोनाचा आधार गं आई? इतकं काय पाप केलतं आमी?”प्रल्हाद फोनवर रडत होता.

परत आलेली काशीबाय सखारामला कासावीस दिसली. तिच्या जीवाची उलथापालथ त्याला कळत होती. काय करायचं कसं बोलावं..नक्की काय झालंय कळणार कसं? सखाराम तिच्या शेजारी जाऊन बसला तसा दाबलेला तिचा हुंदका बाहेर पडला.

“रडतेस कशापायी? आशी काय आग लागलीया?” त्याने जरा खालच्या सुरात विचारलं.

“माझ्या सुनबायला बरं न्हाई. तिला निजून र्हायाला सांगितलय डाक्दरनं. कोन करनार आता तिचं. तेंनी लव मेरीज केलं ह्योच गुन्हा तेंचा पण समदी सगीसोयरी लांब गेली. आता काय जीव देवा का तेंनी?”

सखारामने तिच्या तोंडावर हात धरला”वंगाळ बोलू नगस भरल्या घरात. जा तेच्याकडं नि र्हा पाचेक मह्यने. मी बघीन माझं काय त्ये.”

“काय बघनार तुमी तुमचं? दोन टायमाला भाकरी लागती? येती का थापायले? बघनार म्हने माझं मी. मला इतलीबी काळजी नि तितली बी. तुम्हाले आसं टाकून नाय जानार मी.” मग बोलणंच खुंटलं. रात्रभर सखारामने विचार केला. नव्याची चाहूल लागली हाय.  नवीन मानूस येनार हाय. तेच स्वागत केलं पायजेल. राग धरून बसून चालायचं न्हाय. गेलं पायजेल.

सकाळी त्यानेच उठून चहा बनवला. काशीबाय तोंड धुवून आली तशी तिच्यासमोर चहाचा कप ठेवत म्हणाला. लाडवासाठी, चिवड्यासाठी सामायन कायकाय लागंल त्ये सांग. जाऊन आणतो. तुझ्या लेकाला लाडूचिवडा आवडतो ना तुझ्या हातचा. उद्याची तिकटं काढून हानतो.कापडं भर पिशीत. जायचंय ममयला,दोघं बी जायाचं जोडीनं.

काशीबाय बदललेल्या दादल्याकडे अपुर्वाईने बघत राहिली. ही गणितं देवीचीच, तिने मनोमन देवीस हात जोडले.

समाप्त..

==================

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

2 Comments

Leave a Comment

error: