
कार्तिक स्नान म्हटलं की विठ्ठल-रुक्मिणीची दृष्ट काढण्यासाठी सुवासिनींनी गडबड असतेच की…आज नेमकी कुणाच्या हातून दृष्ट काढणार याची उत्सुकताच वाटत असे…छोटी परी आपल्या आजीबरोबर अगदी न चुकता काकडारतीसाठी मंदिरात जात असते…नेमका काकडारतीच्या अभिषेकाचा मान परीच्या आजीचा म्हणजेच शोभा आजींचा होता…
आजीबरोबर परीची आई म्हणजे पूर्वाताई नाकात नथ,अंगावर पैठणी अशा वेशभूषेत आल्या होत्या..काकड आरतीच्या अभिषेकाचा मान म्हणजे तो मिळवायलाच हवा ना…म्हणून हा साजशृंगार..परी खूप सारे प्रश्न विचारून आपल्या आजीला भंडावून सोडत असे…
परी – आजी…आज देवाला दही,दूध,तुपाने अभिषेक ना…?
आजी – हो गं…बाळा…त्याला पंचामृत असे म्हणतात…अजून आपण तुळशीच्या मंजिरी असतात ना त्याचा हार करतो बरं…त्याने किती प्रसन्न वाटत ना गाभाऱ्यात…
परी – आजी…गाभारा म्हणजे काय गं ?
आजी – बाळा…आत्ता आई देवाला अभिषेक घालायला कुठे जाऊन थांबली आहे…तर गाभाऱ्यात…त्यालाच तर गाभारा म्हणतात..समजलं…आता एकही प्रश्न विचारू नकोस…आरती संपली की सगळ्या प्रश्नांची उत्तर देईल मी..
परी – बरं…[परी हातात टाळ घेऊन सगळ्यांसोबत ठेका धरत वाजवू लागली]
काकडआरती जवळ-जवळ संपली…नेहमीप्रमाणे सुवासिनींची दृष्ट काढण्यासाठी गडबड सुरु झाली…बाकीचे भाविक चहा आणि नाश्त्यासाठी थांबलेले होते…
शोभा आजी वयाने आणि मानाने मोठ्या असल्याने सगळ्या बायकांनी त्यांना दृष्ट काढण्यासाठी आग्रह केला पाठोपाठ लाडकी परीही गाभाऱ्यात गेली…आजीने मस्त एक फुल आपल्या हातात घेतले आणि बाकीच्या दोन-तीन बायकांनीही हातात एकेक फुल घेतले आणि विठूरायाची दृष्ट काढू लागल्या…शोभा आजींनीही मस्त ठेका धरला…
कुरुळे जावळ मस्तकी शोभते…
कस्तुरीचा टिळा साजरा दिसतो…
पिवळा पितांबर नेसले गं सोनी,
दृष्ट उतरवा रे सावळ्यावरुनी..
लोन उतरवा रे माधवावरुनी ॥धृ॥
सरळ नासिक भुवया वरुनी
लोन उतरवा रे माधवावरोनी ॥
जळो-जळो दृष्ट याला कोणी केली..
सख्या विठ्ठलाची मूर्ती कोमेजली…
जानकी जीवन करी लिंबलोन..
दृष्ट उतरवारे सावळ्यावरुनी..
लोन उतरवारे माधवावरोनी.. ॥धृ ॥
सगळ्या बायका विठ्ठलाची दृष्ट काढून झाल्यावर रुक्मिणीची दृष्ट काढण्यासाठी पुढे सरसावल्या…तोच सूर,तोच ठेका…
दृष्ट काढूया…माय माझ्या रुक्मिणीची दृष्ट काढूया..
दृष्ट काढूया गं प्रेमे गाऊया..॥
लाल पैठणी नेसली…हिरवी चोळी अंगा ल्याली…
माझ्या राजाची गं राणी..कशी वेल्हाळ शोभली…
दृष्ट काढूया गं…प्रेमे गाऊया..
माय माझ्या रुक्मिणीची दृष्ट काढूया..
दृष्ट काढूया गं…प्रेमे गाऊया…॥धृ ॥
चतुर भुज नारायणी…भक्तांची गं कुलस्वामिनी..
तुजला शरण आलो मी…
दृष्ट काढूया…दृष्ट काढूया गं प्रेमे गाऊया…
बोला पुंडलिकवरदा हरी विठ्ठल…श्री ज्ञानदेव तुकाराम..
पंढरीनाथ महाराज की जय…II
दृष्ट काढून झाल्यावर सर्व सुवासिनींनी एकमेकांना हळदी-कुंकू देऊन निरोप घेतला…घरी आल्यावर…परी आपल्या आजीच्या मागे मागे करू लागली…
परी – आजी… अगं तू मला सांगणार होतीस ना…
आजी – काय बाळा…?
परी – आजी… अगं आई बघ कधी कधी माझी दृष्ट काढत असते…आज तू तर देवाची दृष्ट काढलीस की…देवाची कोण दृष्ट काढत का ?
आजी – हम्म…परी बाळा….देवाचीही दृष्ट काढतात…मला सांग…तुला मराठी महिने माहिती आहेत ना…?
परी – म्हणजे काय आजी…चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन…बरोबर ना ?
आजी – अगदी बरोबर…कार्तिक महिनाच आहे ना हा…मग या महिन्यात देवाला अंघोळ घालतात , सजवतात…आणि मग दृष्ट काढतात…
परी – आजी…आपण तर सगळे देवाचे भक्त…मग आपली कशी काय गं नजर लागते…
आजी – अगं तसं नसत…आपण भक्त आहोतच की तरीही आपण एक श्रद्धा म्हणून करतो…म्हणजे आपल्याला देव आवडतो ना म्हणून…आता तू कशी आम्हा सर्वांना आवडते…तू सजल्यावर छान दिसते…मग तुझी नाही का मी दृष्ट काढत…तशीच आपण सगळे देवाची दृष्ट काढतो…खरं तर…नजर लागण…दृष्ट काढणं या सगळ्या जुन्या समजुती…आपल्याला बरं वाटावं,समाधान मिळावं म्हणून आपण असे प्रयत्न करत असतो…
इतक्यात परीची आई सुंदर पैठणी नेसलेल्या वेशात परीला दूध घेऊन येते…त्याचबरोबर आजीसाठी चहाही घेऊन येते आणि शोभा आजी आपल्या नातीला म्हणतात-
आजी – बघ…तुझी आई किती सुंदर दिसतीय आज…कधी नव्हे ती साडी नेसलीय…शिवाय नथही घातलीय..खरंच खूप सुंदर दिसतीय तुझी आई…
परी पळत-पळत किचनमध्ये जाऊन मीठ घेऊन येते आणि आजीच्या हातात देते…व म्हणते-
परी – आजी घे काढ आता दृष्ट माझ्या आईची…खूप सुंदर दिसतीय ना ती..
आजी – लबाड…ये गं अशी पुढं…तुझ्या लेकीची ऑर्डर आहे…आज मी माझ्या सुनेची दृष्ट काढते…
आई – आई…तुम्ही पण ना…काहीही..हम्म…काढा आता…
आजीनेही आपल्या सुनेची दृष्ट काढली…घरात पुन्हा एकदा अगदी प्रसन्न वातावरण झालं.
Post navigation

प्रतिभा सोनवणे
मी प्रतिभा. गृहिणी आहे. लिहायचा अनुभव नव्हता पण लिहिता लिहिता लिखाणाची आवड निर्माण झाली आणि मनात असलेल्या भावना रीतभातमराठीच्या व्यासपीठावर कथा स्वरूपात छापल्या.