दीप अमावस्या पूजन विधी, म्हणावयाचे मंत्र. गटारी का गतहारी अमावस्या?


दिव्यांची आवस: Deep Amavasya Information 2022
१. दिव्यांचे महत्त्व
मंदिराच्या गाभाऱ्यात तेवणारा दिवा हा आपणास जीवनात कितीही संकटे आली तरी खचून न जाता देवावर विश्वास ठेवून आपले प्रयत्न , आपले कर्म करत रहावे हाच जणू संदेश देतो. दिवा हे तेजाचे प्रतिक मानले जाते. दिवा लावल्याने पावित्र्य, चैतन्य आणि सकारात्मकता घरात येते.
आपल्या मनातील उद्विग्नता, हुरहूर ही इवलीशी ज्योत नाहीशी करते. दिव्याच्या ज्योतीकडे पहात राहिल्यास मनाला सात्विक समाधान मिळते.
आधुनिक काळात दिव्यांचे अनेक प्रकार आपण पाहतो मात्र असे असुनही पणती, निरांजन, समई , दगडी दिवा या ज्योतिर्मयस्वरुप दिव्यांचे महत्त्व अबाधित आहे कारण, एका ज्योतीने दुसरी ज्योत पेटवता येते.
अंधार कितीही गडद असला, तरी इवलीशी पणती तो अंधार फाकवते. त्यामुळे दिवा लावणे सकारात्मकतेचे लक्षण मानले जाते. दिवा आपल्या मनातील आशावाद जीवंत ठेवतो. अशा या दिव्यांचे ऋण मानण्यासाठीच जणू पुर्वजांनी दीप अमावस्येचा प्रघात घातला आहे.
घरातील इडापिडा,विघ्न टळून जावी, घरात सुखसमाधान नांदावे याकरता आषाढ अमावस्येस दीपप्रज्वलन करून त्यांच्याकडे मनोभावे प्रार्थना करावी.
Deep amavasya 2022 date :
२८ जुलै २०२२
Deep Amavasya Information 2022
२. दिव्यांची आवस कधी साजरी करतात?
आषाढ महिन्यातील अमावस्येस दिव्यांची आवस असे म्हणतात. यादिवशी आपल्या घरातील सर्व प्रकारच्या दिव्यांची पुजा करण्याचा प्रघात आहे.
३. दिव्यांच्या आवसेची इतर नावे कोणती?
दिव्यांची आवस ही आषाढ महिन्यातील पौर्णिमेला येत असल्याने तिला दीप अमावस्या, गतहारी अमावस्या असेही म्हणतात.
४. या पुजेसाठी लागणारे साहित्य
१. अष्टगंध
२. हळदकुंकू
३. वस्त्र
४. कोरे कापड
५. अक्षता
६. नैवेद्यासाठी फुटाणे,खडीसाखर, उकडीचे दिवे,तुप
७. दिव्यांसाठी तेल, कापसाच्या वाती
८. सुपारी
९. दुर्वा,आघाडा,पिवळी फुले
१०. रांगोळी
हेही वाचा
आषाढी एकादशीचे महत्व आणि माहिती
जेजुरीचे खंडेराया माहिती आणि इतिहास नक्की वाचा (jejuri khandoba)
५. दिव्यांची पुजा कशी करावी?
१. आपल्या घरात असणारे लामणदिवे, समया, निरांजन, सर्व प्रकारचे छोटेमोठे दिवे घासून लख्ख करावे. स्वच्छ कापडाने पुसून घ्यावे.
२. फरशी ओल्या फडक्याने पुसून घ्यावी. तीवर चौरंग ठेवावा. चौरंगाभोवताली रांगोळी काढावी.
३. चौरंगावर कोरे कापड घालावे. त्यावरती सर्व दिवे ओळीने मांडावेत. दिव्यांत तेल, वाती घालून त्यांना प्रजव्लित करावे. त्यांभोवती फुलांची आरास करावी.
४. दिव्यांना हळदकुंकू,अष्टगंध वहावे, वस्त्र, दुर्वा,आघाडा,पिवळी फुले वहावी. अगरबत्ती,धुप दाखवावा. कर्पुरारती करावी.
५. फुटाणे,लाह्या,खडीसाखर तसेच पाच/सात उकडीच्या दिव्यांचा नैवेद्य दाखवावा.
६. दिव्याचा मंत्र व श्लोक(शुभंकरोती) म्हणावा.
७. दिव्यांची कहाणी वाचावी.
८. दिव्यांस मनोभावे नमस्कार करावा, प्रार्थना करावी.
६. लहान मुलांचे औक्षण
दीप अमावस्येदिवशी घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांचे औक्षण करावे व त्यांना उकडीच्या दिव्यांचा प्रसाद खावयास द्यावा.
७. दीपप्रज्वलनाचा मंत्र
दीपपूजनाचा झाल्यानंतर, ‘दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस: तेज उत्तमम । गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:॥’, असा मंत्र म्हणून दिव्याची प्रार्थना करावी.
या मंत्राचा अर्थ असा की, हे दीपदेवा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस, तेजामध्ये उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. दीपपूजा महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. यामुळे पूर्ण वर्षभर दीप पूजेची फलश्रुती प्राप्त होते.
८. दिव्याचा श्लोक
शुभं करोति कल्याणम आरोग्यं धनसंपदा ।
शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोsस्तुते ।
दिव्या दिव्या दिपत्कार कानी कुंडले मोतीहार ।
दिव्याला पाहून नमस्कार ॥१॥
दिवा लावला देवांपाशी, उजेड पडला तुळशीपाशी ।
माझा नमस्कार सर्व देवांपाशी ॥२॥
ये गे लक्ष्मी बैस गे बाजे, आमुचे घर तुला सारे ।
तिळाचे तेल कापसाची वात, दिवा जळो मध्यान्हात ।
घरातली इडापिडा बाहेर जावो बाहेरची लक्ष्मी घरात येवो।
घरच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो ॥३॥
दीपज्योति: परब्रह्म दीपज्योति: जनार्दन ।
दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोsस्तुते ॥४॥
अधिराजा महाराजा वनराजा वनस्पति ।
इष्टदर्शनं इष्टान्नं शत्रूणांच पराभवम् ।
मुले तो ब्रह्मरुपाय मध्ये तो विष्णुरुपिण: ।
अग्रत: शिवरुपाय अश्वत्थाय नमो नम: ॥५॥
९. गतहारी या शब्दाचा चुकीचा अर्थ व वापर
गतहारी या शब्दाचा बरीचजणं गटारी असा समज करतात व गटारी अमावस्या संबोधून यादिवशी यथेच्छ मदिरापान करतात. आपली संस्कृती मदिरापानाची शिकवण मुळीच देत नाही.
गतहारी म्हणजे जो आपण उन्हाळ्यात आहार घेत असतो त्यात बदल करणे. या चातुर्मसात हवामान रोगट असते. त्यामुळे आपणास पचतील असे अन्नपदार्थच या काळात खावे असा संकेत आहे. मात्र गतहारी या शब्दाचा अपभ्रंश होऊन गटारी हा शब्द बऱ्याचठिकाणी रुढ झाला. श्रावणात बरेच लोक मांसाहार करत नाहीत म्हणून ते गतहारी अमावस्या यादिवशी भरपूर मांसाहारी पदार्थ खाऊन घेतात, काहीजण दारू पिऊन गटारी पार्टी करतात,नशेत तर्र होतात, अशांना नशा करण्यासाठी बहाणाच मिळतो. या गैरवागणुकीने आपल्याच सणांना आपणच बट्टा लावल्यासारखे होते.
दिव्याच्या अवसेची कहाणी
ऐका दीपकांनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. तिनं एके दिवशी घरांतला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला.
इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेव्हां आपण तिचा सूड घ्यावा, असा सर्वांनी विचार केला. त्यांनीं रात्रीं हिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी हिची फजिती झाली. सासू-दिरांनी निंदा केली, घरांतून तिला घालवून दिली.
हिचा रोजचा नेम असे, रोज दिवे घांसावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडीसाखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या, दिव्यांच्या अंवसेचे दिवशीं त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. त्याप्रमाणं ही घरांतून निघाल्यावर तें बंद पडलं.
पुढं ह्या अवसेच्या दिवशीं राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखालीं मुक्कामास उतरला. तिथं त्याच्या दृष्टिस एक चमत्कार पडला. आपले सर्व गांवातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांपाशी गोष्टी करीत आहेत. कोणाचें घरीं जेवावयास काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली, वगैरे चौकशी चालली आहे. सर्वत्रांनी आपाआपल्या घरीं घडलेली हकीकत सांगितली.
त्यांच्यामागून राजाच्या घरचा दिवा सांगूं लागला. बाबांनो, काय सांगू ? यंदा माझ्यासारखा हतभागी कोणीं नाहीं. मी दरवर्षी सर्व दिव्यांत मुख्य असायचा, माझा थाटमाट जास्ती व्हायचा, त्याला यंदा अशा विपत्तींत दिवस काढावे लागत आहेत. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं. असं होण्याचं कारण काय ?
मग तो सांगूं लागला. बाबांनो, काय सांगूं ? मी ह्या गांवच्या राजाच्या घरचा दिवा. त्याची एक सून होती, तिनं एके दिवशीं घरांतला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरानें विचार केला, हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे, तेव्हां आपण तिचा सूड घ्यावा. असा सर्वांनी विचार केला. रात्रीं तिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणांत नेऊन टाकली. दुसरे दिवशी तिची फजिती झाली. सासू-दिरांनीं निंदा केली, घरांतून तिला घालवून दिली. म्हणून मला हे दिवस आले. ती दर वर्षी माझी मनोभावं पूजा करीत असे. जिथं असेल तिथं खुशाल असो ! असं म्हणून तिला आशीर्वाद दिला.
घडलेला प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाहीं अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिलें आहे काय म्हणून चौकशी केली.
तिला मेणा पाठवून घरीं आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरांत मुखत्यारी दिली. ती सुखानं रामराज्य करूं लागली. तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो ! ही सांठा उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.
१०. संदेश
दिव्यांबद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी आपण दिव्यांची आवस साजरी करतो. आषाढातील अंधारलेल्या कुंद वातावरणात दिवे प्रज्वलित केल्याने घर उजळून निघते. यानंतर दुसऱ्या दिवसापासनं श्रावण सुरु होणार असतो.
श्रावण महिना म्हणजे सणांचा महिना. यात दिव्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
दिव्याची मिणमिणती, स्वयंप्रकाशित ज्योत ही आपल्या मनातील शक्ती जाग्रुत करते. दिवा हा प्रेरणादायी आहे. तो स्वतः जळून इतरांना प्रकाश देतो. दिव्याची ज्योत आपणास त्यागाचे महत्त्व सांगते. कोणतीही अपेक्षा न बाळगता आपल्या तसेच इतरांच्या जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी झटत रहावे हाच संदेश दीपज्योत आपणास देते.
– ©® गीता गरुड.
=============