Skip to content Skip to sidebar Skip to footer

दहादा विचार करून बोलावं!

©️®️ गीता गरुड.

भारतीने सकाळी लवकर उठून, आन्हीकं उरकली व देवपूजा केली. आदल्या दिवशी आणलेली चाफ्याची फुलं देवाला वाहिली. सोनचाफ्याच्या मंद सुवासाने घरभर दरवळ सुटला. मग ती घरातली कामं भराभर हातावेगळी करत गेली. कपडे भिजत टाकले  नि सिंकमधली भांडी घासून टाकली.

कपडे धुवायला येणाऱ्या काशीला आज थोडा उशीरच झाला होता. भारती तोच विचार करत होती. तिने  खिडकीतून बाहेर पाहिलं, रात्रीपासनं जोरदार कोसळणाऱ्या पावसाने आता शांत लय धरली होती. तरुणपणातल्या घिसाडघाईनंतर टक्केटोणपे खाऊन आयुष्य जसं परिपक्व होतं नि मग असा परिपक्व माणूस मापातच बोलतो, मापातच खातो,पितो,उठतो,बसतो, अगदी झोपतोही मापातच निसर्ग नि माणूस किती इंटररिलेटेड असतात नाही. हे जाणवून ती स्वत:शीच हसली.

खिडकीच्या  डावीकडच्या बदामाच्या झाडाचा पर्णसंभार अगदी ठराविक अंतराने खालून वर वर पसरला होता, त्यातलं प्रत्येक पान पावसाचं पाणी पिऊन त्रुप्त झालं होतं. प्रत्येक पानाला वाटत असावं, ही आपली हक्काची जागा पण छे! वेळ आली की पिकलं पान वाऱ्यासोबत गरागरा फिरून धुळीत मिळणार अगदी अगदी माणसांसारखं. हे माझं हे माझं म्हणता माणसं तरी शेवटी जाताना सोबत काय घेऊन जात असतील..जगण्याची आस की विरहाचं दु:ख..ते दु:ख, त्या विवंचना, ते रागलोभ यांना भडाग्नी नष्ट करु शकत असेल का? नसेल..नसेलच त्याशिवाय का जन्ममरणाच्या चरख्यात माणसाला, देव पुन्हा पुन्हा पिळून काढतो त्या कानिफनाथ रसवंतीग्रुहातला रसवाला ऊस यंत्रात घालून त्याचं साफ चिपाड होईस्तोवर पिळून काढतो तसंच की.

ऊसाचा रस म्हंटल्यावर भारतीला नाक्यावरच्या ऊसाच्या दुकानातल्या सत्यभामा काकूंची आठव आली. सत्यभामा काकूचा मुलगा नोकरीला, सून घरचं करते नि काकूचे यजमान कसल्यातरी  दिर्घकाळच्या दुखण्याने आजारी म्हणून मग सत्यभामा काकूच दिवसभर ते दुकान सांभाळायची.

ऊस यंत्रात घालून, त्याच्या घड्या करकरून रस काढी. शेजारीच तापत  ठेवलेल्या कढईतल्या तेलात बटाटेवडे तळत असे, त्यांचे दरही अगदी माफक बहुदा तिला दुवा हव्या असाव्यात घरमालकांसाठी नाहीतर या जमान्यात कोण देतं आठनऊ रुपयात वडापाव तेही चांगल्या तेलात तळलेले.

भारतीला सवयच होती, माणसांचं निरीक्षण करायची. त्यांचे स्वभाव जाणून घेण्याची.

विचारांची अशी आवर्तनं चालू असतानाच काशी आली. काशी लादी नि धुण्याला यायची पण रस्त्याने चालताना कोण म्हणेल तिला की धुणं धुवायला जाते म्हणून. अगदी रुबाबात रहायची. केसांना मेचिंग क्लीप लावायची, भुवयाही कोरायची, तोंडाला पावडर, डोळ्यांत काजळरेघ, ओठांना लिपस्टीक नि पदरही अगदी व्यवस्थित काढलेला असायचा.

“येऊ का बाई आत?” काशीने हसत विचारलं.

“काशी, अगं आतच आलीएस तू. अजून कुठे येतेस!”

“म्हंजे बाई अशी बोलायची पद्धत आसती म्हून इचारतो झालं. बाई वायच च्या बनवा की. तुमच्या हातचा च्या पिल्याबिगर कामाला मजा येत नाय बघा.” काशी टिपॉयवरच्या वस्तू नीट लावून ठेवत म्हणाली.

भारतीलाही चहा हवाच होता. वेलची, आलं कुटून तिने चहात टाकलं  नि चहाचे कप घेऊन बाहेर आली.
“हां फर्मास झालाय बघा बाई,”चहाचा घोट घेत काशी बोलली.

“आज लेट का गं झाला तुला इतका? नेहमी नऊपर्यंत येतेसच येतेस.”

काशी खाली बसत म्हणाली,”म्याटरच तसा झाला बाई. सकाळची पाचपांड्यांकडं भांड्यांना गेलो व्हतो तवा पाचपांड्यांच्या रुपलचं नि तिच्या आयशीचं बोलणं आयकत बसलो. रुपलची आईस तिला समजावत व्हती, बाय सासरी जा बाय सासरी जा म्हून पन रुपल थोडीच आयकायला. तुला माझं इथं रहानं पसंद नसलं तर मी येगळी रहाते माझी माझी, आसं म्हनू लागली.

काय बाय सांगावं..ह्या रुपलच्या लग्नात कमी का पैकं खर्च केलं! पन नुसता पैका खर्च केला काय झालं का बाई, तुमीच सांगा. आमी येक अडानी पन ही शिकंलीसवरल्याली शानी मानसं. त्यास्नी कळाय पायजेल,पोरगी सासरला जाईत नाय म्हंजी, तिला तिच्या दादल्याची आठव येत नाय म्हंजी दादल्यातच कायतरी मिस्टीक आसनार बगा. म्हंजी ते पिच्चरात दाखिवतात तसं भायरचे संबंध..आजकाल पोरापोरींच तसंच आसतं.”

“नसेल गं तसं काही.” काशीच्या बडबडीला पूर्णविराम देण्यासाठी भारती म्हणाली खरं, पण रुपलच्या बाबतीतली ही बातमी ऐकून तिला वाईट वाटलं. भारतीची मुलगी भार्गवी नं रुपल दोघी एकत्र शाळेत जायच्यायायच्या त्यामुळे रुपलच्या आईशी भारतीची छान मैत्रीचे सूर जुळले होते. भार्गवी लग्न होऊन नवऱ्यासोबत परदेशी गेली. रुपलचं लग्न सहा महिन्याआधीच तर झालंं होतं.

काशी पुन्हा म्हणाली,”तर मंग त्या मुलातच कायतरी डिफेक्ट आसनार हंडरेड एण्ड वन परसेंट सांगते बघा. त्याशिवाय नवी नव्हरी अशी नव्हऱ्याला सोडून यायची न्हाय!

मायलेकी काय बोलीत व्हत्या ते क्लीअर समाजलं नाय पन समजल बघा अजून काय दिसांत..आनि मंग हिनं घटस्फुट घितला नि जर का हिच्या पोटात त्याचं लेकरू आसलं बिसलं तर ही कायमची बांधली गेली त्या पोराबरुबर. बाई कितीव शिकलीफाकली तरी बाईचं नशीब काय बदलत नाय बगा बाई.”

काशीच्या सुसाट सुटलेल्या जीभेचा भारतीला खूप राग आला.

“हे आता मला सांगितलंस तसं तू किती जणांना सांगत फिरणार काशी! त्या रुपलच्या नवऱ्याच्या जागी तुझा भाऊ असला नि तुझ्या भावाबद्दल असं कुणी बोललं तर..”भारतीने तिला विचारलं.

“दात काढून हातार ठिवीन बोलनाऱ्याचे. माझा भाव जिमबिम करतू. असा तगडा हाये. पिचिंदर न्हाई. आजून दोन वर्सानी लग्नाचं बघनार हौत तेच्या.”

“मग तुझी वहिनी बारीकसारीक कुरबुरीने माहेरला गेली नि तिच्याबद्दल कुणी काही आवई उठवली तर बरं वाटेल तुला!” भारतीचं बोलणं ऐकून काशी सटपटली.

“बाई, झ्याक झालता च्या. येळ नाय मला जास्ती. कपडे फुगत ठिवलेत ना. येतो चोळून हाताबरुबर.” असं म्हणत काशी बाथरुमात पळाली. भारती विचार करत होती..का बरं या माणसांना आवडतं लोकांच्या आयुष्यात डोकावायला. कुणाचं काही चांगलं झालं तर ते पसरवणार नाहीत पण वाईट ती बातमी कधी एकदा सगळीकडे पेटत्या काडीसारखी भिरकावतो असं होतं यांना. काय मिळतं त्यातून? समाधान..छे! आसुरी आनंद मिळत असावा कदाचित.

काशी कपड्याचे पिळे वाळत घालून पळाली. दुपारी रुपलची आईच  आली भारतीकडे. खूप त्रस्त वाटत होती.
“बघ नं भारती, रुपल परत जाणारच नाही म्हणते सासरी.”

“अगं पण का?”

“काही विशेष नाही. तिच्या नणंदेला म्हणे अमेरिकेत करमत नाही. ती आपल्या मुलाला इकडे घेऊन आलेय नि इकडेच शिकायला घालणार म्हणे पण सासूसासऱ्यांसोबत रहाणार नाही. तिथे ते कसलं बाई आयसीएसई बोलतात त्याची शाळा नाही म्हणे म्हणून मग माहेरीच रहाणार..असं म्हणताहेत खरं पण रुपलला बाहेरून कळलय की तिच्या नणंदेच्या नवऱ्याचे तिथल्या कुणाशीतरी आणि म्हणून ती इकडे माहेरीच रहाणारय. ती सर्विस करणार नि तीचं बाळ रुपलने सांभाळायचं.

रुपलची सासू नि नणंद दोघी याच विषयावर काथ्याकूट करत असतात. त्या दोघींच विश्व वेगळं त्यात रुपलला प्रवेश नसतो म्हणे. रुपल त्यांच्या गप्पांना बसली तर लगेच विषय बदलतात. रुपल म्हणते असं आपल्याच घरात परक्यासारखं रहायला मला तरी जमायचं नाही. नवऱ्याने भाड्याने किंवा ओनरशीपचं घर घेतलं कीच जाईन. माझं तर डोसकंच चालत नाहीए. काय करायचं या पोरीचं!”

“रश्मी, तू जरा शांतपणाने घे सगळं. उगा त्रागा करू नकोस. आवाज वाढवलास तर लोक टाळ्या वाजवणार, त्यांना गप्पांना तेवढाच विषय.”भारती तिला धीर देत म्हणाली.

“असं मी कसं गं करेन. मी नाही हो कुणाला काही बोलले.”

“कुणाला बोलली नाहीस ठीक पण कुणी घरी असताना..”

“म्हणजे काय म्हणायचं काय आहे तुला. नीट काय ते सांग गं बाई.”

“घरात परकी माणसं असताना घरातल्या गोष्टी हळू आवाजातही बोलू नयेत एवढंच म्हणणं माझं.”

“म्हणजे काशी. थांब बघतेच तिला.”

“काय करणार आहेस? कामावरून काढून टाकणार? दुसरी मिळेलसं वाटतं तुला सहजासहजी? तुझा हा असा संधिवात..जमतील तुला काशीला काढलस तर घरची भांडीकुंडी, कपडे, लादी.”

रुपलच्या आईने दिनवाणा चेहरा केला व म्हणाली,”खरंच गं भारती. या कामवाल्यांशिवाय नाही जमायचं उतारवयात पण त्यांनीही असा गैरफायदा घेऊ नये. आता कितीजणींना सांगत सुटेल देव जाणे.”

“नाही सांगायची. मी तंबी दिलेय तिला तशी. तू नि तुझे मिस्टर मिळून जावयाशी , विहिणबाईशी बोला. चर्चेतून मार्ग निघेल बघ. त्यांची बाजूही समजून घ्या. लेक अशी संसार टाकून आलेय म्हंटल्यावर काय वाटत असेल त्या माऊलीला!

रश्मी,तुझ्या लेकीच्या पाठीशी निदान तिचा नवरा आहे. तिच्या लेकीच्या नवऱ्याने दुसरीशी संबंध ठेवले हे कळल्यावर काय झालं असेल तिचं!

तुझ्या लेकीचं, रुपलचंही काही चुकत नाहीए. तिचं नवं नवं लग्न. तिलाही वाटत असेल सासरच्यांनी कोडकौतुक करावं वगैरे. ही फेज आहे गं एक. होईल पार.”

रुपलच्या आईस भारतीचा सल्ला रास्त वाटला. तिने व तिच्या यजमानांनी रुपलच्या सासरच्यांची भेट घेतली. रुपलची नणंद तर बसलेल्या आघाताने अर्धी झाली होती. ती म्हणाली, “काकू, माझं चुकलं असेल तर क्षमा करा मला. माझ्यामुळे माझ्या भावाचा संसार तुटू देणार नाही मी. मी नोकरी शोधतेय मग मी माझ्या लेकाला घेऊन वेगळी राहीन ओ. रुपलला सांगा, ये तुझ्या घरी. मी खरंच निघून जाईन कुठंतरी.”

रुपलचे वडील म्हणाले,”बाळा, माझी रुपल तशीच तू. हे माहेरचं घरही तुझंच आहे. तू  हक्काने रहा माहेरी. माझ्या रुपलला मी समजावेन नीट पण तुही रुपलशी हसूनखेळून वागत जा आणि राहिलं तुझ्या नोकरीचं..ती मी देतो लावून. त्याची काळजी नको करूस.”

रुपलचा नवराही रुपलला येऊन भेटला. चारपाच भेटींत रुपलचा राग विरघळला नि ती स्वत:च आईला म्हणाली,”आई गं, आता जाते मी तिकडे.”

आईने मुद्दामच विचारलं,”तिकडे म्हणजे कुठे?”

“माझ्या घरी,”रुपल लाडीक स्वरात म्हणाली. रुपलची नणंद नोकरीला लागली. तिचा मुलगाही शाळेत जाऊ लागला.

रुपलच्या आईने भारतीचे आभार मानले.

काही दिवसांनी काशी परत एकदा भारतीला म्हणाली,”बाई, रुपल माहेरी आलेय. कोरड्या उलट्या काढत होती. मी पाहिलं स्वतःच्या डोळ्यांनी. काहीतरी गोड बातमी दिसतेय.”

भारती म्हणाली,”काशी, तुच तर गेल्यावेळी म्हणत होतीस..तिच्या नवऱ्यात काहीतरी कमी वगैरे किंवा त्याची भानगड.. मग आता हे कसं काय!”

काशी खजिल होत म्हणाली,”सॉरी नं ओ बाई.”

भारती म्हणाली,”काशी, एकदा तोंडातून गेलेला शब्द परत घेता येत नाही. कुणाविषयी काहीही बोलताना दहादा विचार करून बोलावं. कोण कोणत्या यातनेतून जात असतो हे समजून घेता येत नसलं तरी ठीक पण म्हणून त्याची खिल्ली उडवू नये.”

काशी म्हणाली,”पटलं बाई. पुन्यांदा नाय असं करायची. आता च्या ठेवा वायच. घसा सुकला लेक्चरान.”

पालथ्या घड्यावर पाणी…असं म्हणत भारतीने चहाला आधण ठेवलं.

समाप्त

===========

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: