दादा माझ्यासाठी पण एक !

शालू आणि राहुलचं नुकतच लग्न झालं होतं.शालूच्या सासरी खटले होते. शालूचे सासूसासरे, दीर, नणंद असं मोठं कुटुंब होतं. राहुल तिन्ही भावंडात सगळ्यात मोठा होता. शालू आता सासरी चांगलीच रमली होती. सगळं काही चांगलंच होतं. सासरी खाण्या पिण्याची चांगली चंगळ होती. पण एकचं खंत होती ती म्हणजे सासरचे मंडळी थोडे बुरसटलेल्या विचारांचे होते.
राहुल सासूच्या एकदम धाकात होता. आईंच्या पुढे राहुलचं काही नाही चालायचं. शालू बिचारी दिवस रात्र काम करायची, पण तिला सासू किंवा नणंदेकडून काहीही मदत मिळत नव्हती. लग्नाला जवळ २ महिने होऊन गेले होते, पण शालू आणि राहुल कुठे फिरायला नव्हते गेले आणि घरात तर एकदम एकांत मिळत नसायचा. राहुलला शालूच्या चेहऱ्यावरचा त्राण दिसू लागला होता.
एके दिवस राहुलने मुव्हीचा प्लॅन बनवला. संध्याकाळी ऑफिस मधून घरी येताना त्याने २ टिकेट्स खरेदी केली होती. घरी आल्यावर लगेच शालूजवळ गेला आणि तिला मुव्हीची टिकेट्स हातात देत तयार होयला सांगितलं. सासूने विचारल्यास राहुलने सांगितलं कि आज शालूला घेऊन मुव्ही बघायला जात आहे.
बाबारे!! बाबा! हे ऐकताच सासूने घरात तमाशा करण्यास सुरुवात केली. नको ते बोलल्या त्या शालूला. शेवटी राहुलने त्यांना खूप मनवल्यावर त्या तयार झाल्या, पण सोबत नणंदेला आणि दिरालाही घेऊन जायला सांगितलं. आज राहुल आणि शालूला खूप दिवसातून एकांतपणा मिळणार होता. पण तोही प्लॅन फस्त झाला होता.
हळू हळू दिवस गेले. पण घरातली परिस्थिती काही बदलली नव्हती. कुठे बाहेर तर जाता येईना म्हणून राहुलनेच शालूचा त्राण कमी करण्यासाठी आणि तिच्या चेहऱ्यावर हसू बघण्यासाठी, तिच्या साठी गिफ्ट्स आणायला सुरुवात केली होती. पण तिथेही राहुलचं कुटुंब आड येण्यावाचून थोडीच राहणार होतं. राहुलने शालूसाठी काहीही आणलं तरी तीच गोष्ट नणंदेसाठी देखील आणावी लागायची. मग ती एखादी साडी असो, वा बांगड्या असो, वा काहीही छोट्यातली छोटी गोष्ट. राहुलने काहीही आणलं कि नणंद देखील हट्ट करायची आणि मग दरवेळी घरात तमाशा होयचा आणि त्यात नणंदेला सासूचा देखील चांगलाच सपोर्ट असायचा. शालूने सुरवातीला फार सहन केलं. पण मग तिला आता ह्या सगळ्याचा कंटाळा येत होता. पण ती काहीच करु शकत नव्हती.
असेच आता लग्नाला २ वर्ष उलटून गेले होते. ह्या दरम्यान नणंदेच्या लग्नाचा देखील बार उडाला होता. नणंदेच्या लग्नाला नुकतेच ४ महिने झाले होते आणि ती एके दिवस अचानक माहेरी आली. नणंदेच्या सासरी देखील खटल्याचं कुटुंब होतं. आज नणंद आली आणि आईसमोर आपल्या सासरच्या बद्दल गाऱ्हाणं गाऊ लागली. नणंदेच्या घरी सुद्धा तीच परिस्थिती होती ज्याला २ वर्ष शालू सामोरी गेली होती. पण आज शालूच्या सासूने नणंदेला न समजावता तिला पाठीशी घातलं होतं. नणंद आपल्या रूम मध्ये बसली होती, तेव्हा शालू चहा घेऊन तिच्या खोलीत गेली. शालूने तिला समजावून सांगितलं कि एवढ्याशा गोष्टी मुळे असं तडका फडकी माहेरी येणं बरोबर नाही. तेव्हा नणंद तिच्या अंगावर धावून गेली आणि म्हणाली,
“वहिनी, एवढं सगळं झालं आणि तरी सुद्धा तू माझ्या सासरच्याकडून बोलतेय. तुला कदाचित माहित नसेल कि मी कुठल्या परिस्थिती मधून जातेय. मला आणि माझ्या नवऱ्याला जरा सुद्धा एकांत मिळत नाही. लग्नाला ४ महिने झाले तरी आम्ही कुठे फिरायला नाही गेलो. एवढंच काय तर माझ्या साठी सुयोगने (शालूच्या नणंदेचा नवरा) काहीही आणलं कि ते सगळं माझ्या नणंदेसाठी सुद्धा आणावं लागत. मला ह्या सगळ्याचा आता त्रास होतो “
शालू सगळं शांतपणे ऐकत होती.
नणंदेचं बोलून झाल्यावर शालूने तिला फक्त एकचं वाक्यात उत्तर दिलं.
” बस्स फक्त एवढंच? अगं मग एवढ्याच गोष्टी साठी रुसून माहेरी येणं कितपत योग्य आहे ? असाच जर तडका फडकी निर्णय घ्यायचा तर मलाही २ वर्षांपूर्वी असाच निर्णय घ्यायला हवा होता कारण मी ऑलरेडी ह्या सगळ्या परिस्थतीतून गेली आहे. “
शालूचं हे ऐकून नणंदेच्या डोक्यात प्रकाश पडला आणि तिला आपली चूक कळून आली होती.
ती म्हणाली कि,
” वहिनी, तू किती मोठ्या मनाची आहेस ग. २ वर्ष तू एवढं सगळं सहन केलं, पण आम्हाला कुणालाच त्याची जाणीव नाही झाली. मला माफ कर. “
शालू – ” ए वेडाबाई पुरे झालं आता. उशिरा का होईना तुला कळून चुकलं ना. आता माहेरपणाला आली आहे तर निवांत राहा आणि पहिले सुयोग दाजींना फोन कर. ते काळजी करत असतील “
थोड्याच दिवसात शालूची नणंद सासरी गेली. पण जाता जाता आपल्या आई ला बजावून गेली होती. शालूच्या सासूमध्येही बराच बदल आला होता. घरात आता सगळेच खुश होते. उशिरा का होईना पण शालूच्या घरच्यांना तिच्या भावना कळल्या होत्या.
क्रमश:
बोध : आपल्या जबाबदाऱ्या समजून त्या व्यवस्थित पार पडणे ह्यात काहीच वावगं नाही, पण त्या जबाबदाऱ्यांच्या दबावाखाली स्वतःला झोकून देणे आणि स्वतःसाठी जगण्याची भाषाच बदलून टाकणे हे चुकीचे आहे. खटल्याचं घर असेल तर प्रत्येकाने प्रत्येकाला समजून घेणे आवश्यक आहे. ह्या कारणाने घरात आनंदाचं वातावरण टिकून राहते.
==================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============
1 Comment
Sanvi Agrawal
Nice website 👌 👍