
संध्याकाळची वेळ होती. गोदा आजी आपली रामरक्षा म्हणत हॉलमध्ये बसल्या होत्या आणि त्यांच्या शेजारी साक्षी म्हणजे गोदा आजींची नात खेळत बसली होती. इतक्यात रविना खूपच लगबगीने ऑफिसमधून आली आणि अक्षयला म्हणाली, “अरे त्या फर्निचरवाल्याचा फोन आला होता मला, विचारत होते कि नवीन शोकेस कधी डिलिव्हर करायचं म्हणून….तुलाही केव्हाचा फोन लावत होते पण तू उचलला नाहीस..”
रविना बाथरूम मधूनच हाथ पाय धुता धुता बोलत होती. रविना फ्रेश होऊन आली आणि अक्षयला बोलली, “अक्षय एकदाकी आपलं नवीन वॉर्डरोब आलं कि हे लोखंडी कपाट, टेबलाचे खण आणि हा टेबलही…. सगळा जुना पसारा विकून टाकू नाहीतर भंगाराच्या दुकानात विकून टाकू या. किती अंत पाहायचा रे ह्या सगळ्या सामानाचा.”
अक्षय – “अगं एवढी कसली गडबड करतेस. मलाही माहित आहे कि नवीन वॉर्डरोब येणार आहे. येऊ दे ते मग बघू या आपण जुन्या सामानाचं काय करायचं ते.”
गोदा आजी मात्र आपल्या जाड भिंगाच्या चष्म्यातून त्या दोघांकडे पाहत होत्या आणि आपली रामरक्षा पुटपुटत होत्या. रामरक्षा म्हणताना त्यांच्या खोल मनात विचारांचं काहूर माजलं होतं. त्या तश्याच देवघरात गेल्या आपलं गाऱ्हाणं देवापुढे मांडायला आणि ओक्शाबोक्शी रडू लागल्या.
“देवा का रे तू असा निर्दयी झालास. माझ्या सामानांना जुन्या बाजारात विकणार आहेस तू? उद्या मलाही जुन्या बाजारात विकणार हि लोकं?”
गोदा आजी खूप केविलवाणी देवापुढे माथा टेकवून रडत होती. तिच्या रडण्याचा आवाज अक्षयने ऐकला आणि अक्षय देवघरात आला. अक्षयला बघून गोदा आजीने स्वतःला सावरलं आणि आपलं मन लेकापुढे मोकळं करू लागली.
“अक्षय बाळा हे कपाट तुझ्या बाबांनी आपल्या साठवलेल्या पैशातून आणलं होतं रे आणि तुझ्याचसाठी…तू जसा झालास तसं कपाट नव्हतं रे आपल्याकडे आणि मग तुझे छोटे छोटे कपडे ठेवायला जागाच नव्हती. म्हणून तुझ्या बाबांनी काटकसर करून साठवणीच्या पैशांतून हे कपाट आणलं होतं.”
“ह्या कप्प्यात तुझे कपडे ठेवायचे मी आणि इकडे तुझं पावडर आणि टिन ठेवायचे. तू थोडा मोठा झालास आणि त्यात तू मग तुझं अभ्यासाचं सामान ठेवायला लागलास….आता ३० वर्षे झाली पण हे कपाट अगदी आहे तसंच आहे.” कपाटाच्या आठवणी सांगताना गोदा आजी फार हळवी झाली होती.
अक्षयने आजीला जवळ घेतलं आणि समजावलं, “आई, तू किती मनाला लावून घेतेस गं!! रविनाच्या बोलण्याचा वाईट अर्थ घेऊ नकोस. अशाने गैरसमज होतील आणि मग मनं दुखावतील. मला दोघींचीही मनं सांभाळायची आहेत.”
“रविना म्हणाली म्हणून मी थोडीना तुझ्या आठवणी जुन्या बाजारात भंगाराच्या भावात विकणार का? तुझ्या आठवणी खूप मोलाच्या आहेत गं.” असं म्हणत अक्षयने गोदा आजींना भावनिक दिलासा दिला.
आईचा मूड ठीक व्हावा म्हणून अक्षय गोदा आजीला म्हणाला, “आई आज तुझ्या हातची डाळिंबाची उसळ खायची इच्छा होतेय गं..बघ आजच ऑफिस मधून येताना डाळिंबं आणली मी बघ.”
गोदा आजी मिश्किलीने – “करते रे बाबा…बरं तरी माझ्या हाताची चव लक्षात आहे अजून तुझ्या..”
अक्षय – “आई!!!! तू पुन्हा सुरु झालीस….”
गोदा आजी – “नाही रे बाबा..असंच म्हणाले मी..”
अक्षयने गोदा आजींना तर समजावलं पण आता रविना आणि गोदा आजीचं मन कसं राखायचं ह्याबाबत विचारचक्र अक्षयच्या मनात सुरु झालं. इतक्यात रविना आली, “कसला एवढा विचार करतोय अक्षय आणि आज आपली नवीन शोकेस येणार होती ना काय झालं त्याचं?”
अक्षय – “परवा येईल आपलं शोकेस…एक छोटा प्रॉब्लेम झाला म्हणे फर्निचरवाले काका.. “
रविना – “बापरे किती वाट पाहायची माझ्या वॉर्डरोबची!!!! ” उद्या ऑफिस असल्याने रविना झोपली.
परवाचा दिवस उजाडला. अक्षय आणि रविना दोघेही ऑफिसला निघून गेले. अक्षयने मुद्दाम सकाळीच फर्निचर वाल्या काकांना बोलावले होते. काकांनी वॉर्डरोब घरी डिलिव्हर केले आणि अक्षयने सांगितल्या ठिकाणी लावून दिले. वीक डे असल्याने रविना आणि अक्षय ऑफिसमध्येच होते.
वॉर्डरोब अक्षय रविनाच्या रूम मध्ये लावून झाल्यावर काकांनी जुने कपाट आणि टेबल खणाचा सेट बाहेर आला. तेवढ्यात गोदा आजी,
“अरे बाबा हे कुठं घेऊन चाललात तुम्ही…ठेवा ते कपाट खाली…हात नाही लावायचा त्याला”
फर्निचर वाल्याने लगबगीने अक्षयला फोन लावला, “साहेब तुम्हाला दुरुस्ती करायची कि नाही? आजी तर हातही लावून देईनात मला त्या कपाटाला.”
अक्षय – “आईकडे फोन द्या..मी बोलतो आईशी.. “
काकांनी गोदा आजींकडे फोन दिला आणि अक्षय त्यांना समजावून सांगू लागला, ” आई आपलं जुनं कपाट कुठेही चाललं नाहीये…आपण त्याला फक्त एक चकाकी देत आहोत. फर्निचरवाल्या काकांना सांग तुला जसं हवं अगदी तसेच बनवून घेऊ आपण…”
गोदा आजींच्या जीवात जीव आला….”तुला काही खायला देऊ का रे पोरा?”
“आजी एक ग्लास पाणी द्या फक्त.”
पाण्याचा ग्लास खाली केल्यावर फर्निचरवाला मिश्किल पणे आजींना म्हणाला , “आता करू मी काम ?”
गोदा आजी – “हो बाबा कर सुरुवात…माझ्याही डोक्यात काही कल्पना आहेत बघ….ह्या टेबलाला नवीन सन्मायका लाव आणि हे खण म्हणजे तुम्ही ह्याला ड्रॉवर म्हणतात रे….तर याला शंखाच्या आकाराच्या मुठी बसवून दे…”
फर्निचर वाला गोदा आजींना सहमती देऊन , “बरं आजी..आणि ह्या कपाटाला काही करता येईल का आजी म्हणजे काही कल्पना आहेत का तुमच्या डोक्यात?”
गोदा आजी – “हो रे बाळा, ह्या कपाटाचा आरसा माझ्या आठवणींसारखाच धूसर झालाय..ह्याला काही करता येईल का रे…? “
“हो ना आजी का नाही? आपण हा आरसा बदलून टाकू या…चालेन ना?
गोदा आजीने त्यांना सहमती दर्शवली. काकांनी लगेच पेंटर आणि काचवाल्याला बोलावून घेतलं आणि पटापट गोदा आजीने सांगितलं तसं काम केलं. संध्याकाळ पर्यंत टेबल आणि कपाट एकदम चकचकीत झालं.
संध्याकाळी अक्षय आणि रविना ऑफिसमधून आले,
रविना – “अरे हे कधी झालं? किती छान दिसतंय हे कपाट….काय रे अक्षय मी एवढ्या वेळा ह्याला विकायची गोष्ट केली तू आधीच का नाही अशी आयडिया दिली..?”
अक्षय – “आई, पहा बरं किती मस्त दिसतंय कपाट आणि टेबल….त्याच्यावरची धूळ आपण झटकून टाकली आणि त्याला एक नवीनच चकाकी आली. तसंच माणसांचेही आहे….मनातल्या त्या गंज चढलेल्या वाईट विचारांनाही मनातून काढणं गरजेचं आहे. वरकरणी आपण स्वच्छ राहतो पण मनावरची धूळच आपण स्वच्छ केली नाही तर बाह्यरुपाला काहीच महत्व नाही.”
आपल्या सर्वांच्या घरी वृद्धांचा वास आहे. त्यांची मनं जपायचा प्रयत्न करा. जुन्या वस्तू असतील तर वाडवडील जिवंत असेपर्यंत त्या अडगळीमध्ये फेकून नका देऊ. जुन्या विचारसरणीच्या लोकांनी त्या वस्तू आठवणींच्या कोपऱ्यात ठेवलेल्या असतात त्यांचा आदर करा.
© RitBhatमराठी
===============
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============
हेही वाचा
Post navigation

सारिका सोनवणे
नमस्कार मी सारिका. पुण्यातल्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून (COEP) संगणकाची पदवी घेतली. आणि गेली १० वर्षे आयटी मध्ये जॉब करते आहे. गेल्या १० वर्षांत आयटी मध्ये खूप काही शिकायला मिळालं. परदेशातही जायची बऱ्याचदा संधी मिळाली. पण आता १० वर्षे होऊन गेली आणि कुठंतरी मनात खोलवर रेंगाळत असलेली स्वप्ने जागी झाली आणि ठरवलं कि आता बास करायचं आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा. वाचनाची पहिल्यापासूनच आवड होती. वाचता वाचता असं वाटलं आपणही लिहू शकतो आणि मग रीतभातमराठीच व्यासपीठ सुरु केलं. आणि हळू हळू स्वतःसोबत इतर लेखकांना जोडत गेले. लिखाणासाठी नवोदित लेखकांना रीतभातमराठीच्या माध्यमातून उत्तम व्यासपीठ मिळावं हीच सदिच्छा.