
®️©️ राधिका कुलकर्णी.
प्रसाद पोहोचला असेल एव्हाना.पण मग मेसेज कसा नाही आला अजून त्याचा?
आशूच्या मनात विचारचक्र फिरत होते. एकीकडे मुलांची जेवणे उरकत होती. सतत फोनवर नजर. काही मेसेज आहे का?
काय करावे? मेसेज करू का? की वाट पाहू अजून थोडी?
“आशू,ताट वाढ गंऽऽ. भूक लागलीय सपाटून.”
श्रीधरच्या आवाजाने विचारचक्र भंगले आणि आशू भानावर आली.
हो हो. पानं घेतलीएत. ये लवकर.
सगळी रूटीन कामे सवयीने उकरत होते तरीही का कुणास ठाऊक आज जराशी अस्वस्थच होती आशू.
प्रसाद सारखा शांत,धीरगंभीर , स्थिर आणि विचारी मुलगा मेसेज करणार नाही हे शक्यच नव्हते.
कारण आशू आपण सुखरूप पोहोचलो की नाही ही काळजी करेल हे जाणून तरी एवढी औपचारिकता तो नक्कीच पाळेल. असे असताना आज त्याचे स्वभावा विरूद्ध वागणे तिला खटकत होते.
उशीर खूप झाल्याने मेसेज करण्याचा विचार तिने झटकला.
सकाळचा रोजचा साडेपाचचा गजर वाजला तशी जागे होवुन आशूने सगळ्यात आधी मेसेजेस चेक केले. पण अख्खी रात्र जाऊन आता सकाळ झाली तरीही प्रसादचा कोणताही मेसेज आलेला नव्हता.
मग न राहवून आशूनेच मेसेज केला,
” हायऽऽ!
गूड मॉर्निंग!
होप यू रीच्ड सेफली. प्लिज इनफॉर्म.”
सकाळची ही एक कृती करून आशू आपल्या कामाला लागली.
आजतर मुलांच्या शाळेतही पालकसभा होती. श्रीला जमणार नव्हते म्हणून तिकडेही आशूलाच जावे लागणार होते.
श्री सगळ्यांना ऑफिसला जाता जाता शाळेत ड्रॉप करणार होता म्हणून आशूलाही घाईनेच आवरावे लागत होते.
आठ वाजता सगळेजण एकत्रच बाहेर पडले.
नेहेमी प्रमाणेच मुलांचा प्रोग्रेस रिपोर्ट आणि इतर सूचना असा सगळा कार्यक्रम चालू होता.
परीक्षेपूर्वीची शेवटचीच चाचणी परीक्षा. ह्यानंतर आता डायरेक्ट वार्षिक परिक्षाच होणार होत्या त्यामूळे ह्या मार्कांवर जास्त महत्त्व दिले जात होते. नेहेमी प्रमाणेच पोरांचे निकाल पहिल्या पाचात होते त्यामूळे आशू खूपच समाधानी होती.
सगळ्या पालकांच्या गप्पा आणि चर्चेत किती अन् कसा वेळ गेला कळलेच नाही. जवळपास साडे अकरा बाराच्या सुमारास मुलांसह आशू घरी आली.
आज क्लासला सुट्टीच द्यावी असेच वाटत होते आशूला
तेवढ्यात दारावरची बेल वाजली. मुलेच होती.
“मॅम आम्ही तासापूर्वीच येवून गेलो.”
“हो ठिक आहे,बसा.
आज आपण प्रश्नपत्रिकाच सोडवू गणिताची.”
मुलांना पेपर सोडवायला देवून आशू जराशी फ्रेश झाली.
फोन तर मुलांच्या शाळेत असल्यापासून बंदच होता.
घाईघाईने तिने आधी फोन चेक केला. बरेचसे सटरफटर गृप मेसेजेस पडले होते शिवाय एका मेसेजच्या.
प्रसादने तिच्या सकाळी पाठवलेल्या मेसेजला अजूनही रिप्लाय दिला नव्हता. साधा सीनमधे पण गेला नव्हता.
आता तिची सहनशक्ती संपत चालली होती.
तिने सरळ फोनच लावला.
रिंग वाजून वाजून थांबली पण काहीच प्रतिसाद नव्हता पलिकडून.
” हे काय आहे? काय होतेय हे सगळे?
काय झालेय?
तो ठिक तर आहे ना?
प्लेन पोहोचलेय ना…..??”
आता काळजीची जागा अनामिक भीतीने घेतली होती.
“काय करू म्हणजे त्याची खुशाली कळेल ?”
ह्याचा विचार करत होती पण डोकेच काम करेनासे झाले होते तिचे.
गेल्या कित्येक दिवसात आज पहिला दिवस असा होता की प्रसाद आशूशी एक शब्दही बोलला नव्हता.
तिचे मन सैरभैर झाले होते. प्रसाद इतका बेजवाबदार कधीच नव्हता. मग आज असे काय झालेय कि कुठूनच काहीच संपर्क होत नव्हता? ??
अचानक आठवले. त्यांचा आणखी एक वर्गमित्र आणि प्रसादचा जिगरी दोस्त मनिष,त्याला विचारू का?
पण काय विचारू? अचानक असा फोन केला तर मनिष काही वेगळा विचार तर नाही ना करणार?
शेवटी हिय्या करून फोन केलाच.
मनिष म्हणजे एकदम दिलखूलास व्यक्तिमत्त्व. तो म्हणजे गृपची संजीवनीच जणू.कोणतेही प्लॅनिंग करायचे असो मनिष मस्ट असायचा.
मग ते गेट टुगेदर असो कुणाकडे काही कार्य असो छोटीमोठी पार्टी असो हा सगळ्यांचे प्रतिनिधित्व करायला सगळ्यात आधी हजर.कुणाच्यात काही अनबन गैरसमजातून अबोला काहीही झाले तर मनिष मध्यस्थी करून त्याच्यातले गैरसमज दूर करून देणार.कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी प्रत्येकाच्या मदतीला सगळ्यात पहिले धावून जाणाराही मनिषच असायचा. अंतर कितीही लांब असो पण हा तिथे पदरमोड करून पोहोचवायचा.. आणि प्रसादचा तर एकनिष्ठ हनूमान होता मनिष..
रींग जात होती. तेवढ्यात आवाज आला.
” हॅलोऽऽऽ!! बोल आशू !!
आज कशी काय आठवण झाली गरीबाची ?”
“अरे काय हे?”
ही कसली चेष्टा..तुझी आठवण तर रोजच येते फक्त मुहूर्त आज सापडला.
बोल कसा आहेस?”
” मी मस्त… तू बोल ना.. आज काय विशेष?”
” अरे वाटले की बोलावे तुझ्याशी. तू तर काही फोन करत नाहीस मग मीच केला.”
अगं सध्या श्येड्यूल खूप टाईट झालेय. सतत फिरती चाललीय कामानिमित्त…
मनिष बोलत होता आणि आशू मनाशी विचार करत होती की आता पूढे कसा विषय काढायचा प्रसाद बद्दल.?
” तू कशी आहेस ? काय चाललेय तुझे ? “
मनिषच्या वाक्याने मी भानावर आले.
“मी पण मस्त. सध्या परिक्षांचे दिवस आहेत ना त्यामुळे जरा बिझी आहे.
“तू सांग काय म्हणतोय तुझा बेटरहाफ?
आशूने हसत हसतच प्रश्न केला.
तोही गडगडाटी हास्य करत बोलला,
” खरय बाई! अगदी मस्त उपमा दिलीस.
अगंऽऽ माझी बायको सुद्धा बऱ्याचदा हे असेच म्हणते.
तु्म्हाला प्रसाद भाऊजी असले की बायकोचीही आठवण येत नाही.
“हं!”
आशूनेही हसुन दुजोरा दिला.
अगंऽ, दोन चार दिवसांपासुन बाहेरच होता तो. आज आला तर भेट होइलच.
ओहऽऽ.!!
” अरे मी त्यालाही फोन केला, पण उचलला नाही त्याने. वाटले आज बोलूया सगळ्यांशीच तर बघ तुझ्या मित्राने फोनच नाही उचलला.
आशूने जराशा तक्रारीतच गंम्मत करतीय हे भासवले.
” अरेच्या!!! असेय का?
थांब मी कॉन्फरन्स कॉल लावून बघतो. त्याला सरप्राइज देऊ मस्त आणि एकत्रच बोलू.
त्याने लगेच फोन लावला. पलिकडून प्रसादचा आवाज ऐकायला आला.
हॅलो,काय रे आत्ता ह्यावेळी कसा केलास फोन?
सगळे ठिक ना?
” हो रे सगळे ठिक आहे. एक मिनिट थांब एक सरप्राईज आहे ऐक..
“एऽ बोल गंऽ.”
असे मनिषने म्हणताच आशू घसा खाकरून बोलली
” हाय प्रसाद! कसा आहेस?
” मी ठिक. तू ??
” मी ही. अरे मी फोन केला होता तूला तासाभरापुर्वी ?
“हो का? सॉरी !! अगं माझी महत्त्वाची मिटिंग चालू होती.
आत्ताही जरासा बिझीच आहे. चला तुम्ही बोला.मी नंतर बोलतो. बाय मन्या,बाय आशू. “
दोघांचा घाईघाईने निरोप घेत त्याने फोन डिसकनेक्ट पण केला.
मग आशू आणि मनिषने घर मूले नोकरी अशा इकडच्या तिकडच्या गप्पा मारून एकमेकांचा निरोप घेतला..
आशूसाठी ही गोष्ट अतर्क्य होती की मिटिंगमधे बिझी असताना त्याने मनिषचा कॉल घेतला होता पण त्या आधी काहीच वेळापूर्वी केलेला माझा कॉल मात्र ……
असे तो का करत असेल??
प्रश्नांची एवढी गर्दी डोक्यात कधीच माजली नव्हती..
डोळ्यांच्या कडा पाणावल्या पण आश्रू बाहेर पडत नव्हते.
प्रत्येक सुखानंतर दु:ख येते. दु:ख मिळाल्याखेरीज सुखाची किंमत कळत नाही असे म्हणतात.
कदाचित मैत्रीचे सूख मिळाले होते म्हणुनच की काय त्याची दूसरी बाजूही आज अनुभवत होते.
त्यातल्या त्यात समाधानाची बाजू एकच ती म्हणजे तो सुखरूप पोहोचला होता.
माझ्या मनात आलेल्या वेड्यावाकड्या शंका तरी आता दूर झाल्या होत्या.
तरी एक प्रश्न अजुनही अनुत्तरीतच होता. काल जाईजाई पर्यंत भरभऱून तारीफ करणारा हा माणूस आज इतक्या त्रयस्थपणे का वागत होता???
तिन्हीसांजेच्या मंद दिव्यासमोर आज नकळत मी माझ्या मैत्रीसाठी प्रार्थना करत होते..
क्रमश:-7
®️©️राधिका कुलकर्णी.
काय होईल पूढे? प्रसादच्या तिऱ्हाईतासारख्या वागण्यामागे काही खास कारण असेल? काय असेल ते कारण?
जाणून घ्यायला वाचत रहा वर्गमित्र चे पुढील भाग.
धन्यवाद.
@राधिका..

राधिका कुलकर्णी
नाव- राधिका कुलकर्णी.
जन्म- संगमनेर.जि.-अ.नगर
सासर - हैद्राबाद
शिक्षण- बीएससी एम ए(इंग्रजी) बीएड.
लेखन वाचन ही माझी आवड आहे.
बऱ्याच कथा, कविता, लघूकथा/दीर्घ कथा लेखन झालेले.
माणसे जोडायला आवडते.
आयूष्यात कोणतेही प्रसंग आले तरी आपली सकारात्मकता सोडू नये ह्या विचारांनी कायम पॉझिटिव्ह राहते म्हणूनच आनंदी आणि समाधानी आहे.