Ritbhatmarathi

Search
Close this search box.

®️©️राधिका कुलकर्णी.

आज परत एकदा प्रसादला संधी मिळाली पेक्षा त्याने दुसऱ्या कुणाचे तरी काम ‘मी करतो’ सांगून जाणूनबुजून ते काम मिळवून मुंबईला जायची संधी पटकावली.. कामानिमित्त मुंबईला जावे लागले हे घरी सांगणे सोपे पडणार होते.आणि आशूची भेट घेता येणार याचा त्याला सगळ्यात जास्त आनंद होता..
त्याने मुंबई जायचे पक्के होताच आशूला फोन केला..

“हाय आशू!”

” बोल प्रसाद..आज कसा फोन ह्यावेळी?
ऑफिस नाही का तुला? “

” मी ऑफिशियलीच फोन करतोय मॅडम. “

” कायऽऽ! म्हणजे काय? नीट समजेल असे बोल. “
आशूने अचंब्याने विचारले

“अगंऽऽ म्हणजे आज एका ऑफीशियल व्हिजीटच्या निमित्ताने मी मुंबईत आलोय. तेच सांगायला फोन केला.. बरं तू काय करतेस आज?

” काय करतेय म्हणजे? “

” अगं म्हणजे काही महत्त्वाच्या कमिटमेंट्स नसतील तर भेटूया का? “

” हो ऽऽ.. चालेल. ये ना घरी..मी वाट पाहते. “

” अगं एऽऽ .. घरी नको.बाहेर निवांत भेटू.जर तुला शक्य असेल तरच.. “

” अरे ऋषीला अजून पुरते बरे वाटत नाहीये.तू घरी आलास तर आपल्या गप्पा पण होतील आणि मुलांनाही सोडून जावे लागणार नाही… “

” प्लिज आशू थोड्यावेळ ये ना.. बरं तुझ्या एरीयातले एखादे कॉफी शॉप तू सांग.. पण भेटू बाहेरच. मला जे बोलायचे आहे त्यासाठी घर ही जागा मला कंफर्टेबल वाटत नाही.. “

” बरं ठीक आहे.असे कर पॅरेडाईज कॅफे ला भेटू. “

” ओके पण वेळ? “

” तू सांग. “

” बरं मी असं करतो माझे इकडच्या ऑफीसचे काम उरकतो आणि मग तुला कळवतो.. तुला सांगितल्यानंतर यायला किती वेळ लागेल? “

अंमऽ.. मी पंधरा मिनिटांच्या आत पोहोचेल.जास्त लांब नाही मला..”

” ओके डन. मग आपण दोनला पॅरेडाईज कॅफेला भेटू . ठिक आहे! “

” यसऽ बॉस.. मी वेळेत येईन. तू तुझे काम संपले की मेसेज कर. “

दोन वाजता भेटायचा प्लॅन फायनल होऊन फोन संपला तशी आशूची एकच धावपळ उडाली. घरातली बरीच कामे रेंगाळत पडलेली आता तिला जायच्या आधी उरकायची होती.. ती पटापट एक एक काम आवरायला लागली.. बघता घड्याळाचे काटे पुढे सरकत सरकत कधी दोन वर काटा गेला ते कळलेच नाही तरीही तिची कामे अजून संपलीच नव्हती.
प्रसादचा मेसेज येऊन पडलेला बघून तर तिची अजूनच धावपळ उडाली..

“अग् किती वेळची वाट बघतोय,कुठेस तू?
लवकर ये.”
प्रसाद पॅरेडाइज कॅफे ला तो वाट पहात बसला होता पण घरातले आवरता आवरता उशीरच झाला होता निघायला.
त्याच्या मेसेजनी अजूनच दडपण आले. कुणाला ताटकळत ठेवणे आशूला फारसे रूचायचे नाही पण आज वेळ पाळण्यात ती चुकली होती हे मात्र खरे.
घाईघाईत एकदाची ती घराबाहेर पडली.
ऊन मी म्हणत होते. सर्वांगाला अमावस्येसारखी झाकोळून तिने गाडी पॅरेडाईज कॅफेला दामटली.
हश्श हुश्श करत कशीबशी पोहोचली तर प्रसाद वाटच बघत होता. आल्याआल्या तिच्यावर तूटूनच पडला,
” काय हे किती उशीर? एक तास नुसते पाण्याचे ग्लास पिउन पिऊन पोटाचा तंबोरा झाला माझ्या.”

त्याचे बोलणे ऐकून आशूला हसूही येत होते अन् किवही.पण तिने हसू दाबले कारण तिला हसताना पाहून स्वारी अजूनच भडकली असती.

“सॉरी बाबा सॉरीऽऽ! तू इतक्या शॉर्ट नोटीसवर आल्याचे कळवलेस मग वेळ लागणारच ना. घरात मुलेबाळे आहेत, त्यांची सोय लावून यावे लागते मला. तुम्हा पुरूषांसारखे थोडेच आहे निघ म्हणले की निघायला.
” बरं बरं.. बास आता. पूढे बोलुयात की हाच टॉपिक कंटिन्यु करायचाय ?”

त्याच्या खोचकपणात दडलेला मिष्किलपणा समजत होता मला.
” बरं ठिक आहे.
पण आधी काहीतरी थंड मागव बाबा. मला खूप तहान लागलीय.”

वेटरऽऽऽ.!

“काय घेशील?”
“मला पायनॅपल ज्युस.” आशूने आपली आवड सांगितली.
त्याने स्वत:साठी कोल्डकॉफी ऑर्डर केली.

थोडा वेळ फक्त शांततेत गेला.
आशू वाट बघत होती तो काय बोलतोय ह्याची.
पण बऱ्याचदा मनातल्या गोष्टी बोलताना शब्द फारकत घेतात.मौन होतात.गळा बंद होतो.तसे काहीसे झालेले.
वातावरणातील ती शांतता आता तिला जीवघेणी वाटत होती.
” आज किती उकाडाय ना रे? “
शांततेचा भंग करत काहीतरी बोलायचे म्हणून आशू बडबडली.

” हम्मऽऽ…. “

एवढा एकच हुंकार देवून प्रसाद शांत बसला.
तिला समजेचना की ह्याला नेमके बोलायचेय तरी काय?
तेवढ्यात त्यांच्या ऑर्डरप्रमाणे ज्युस आणि कॉफी आली. आपापली पेयं पित पित दोघेही इकडे तिकडे उगीचच नजर फिरवत वेळ मारून नेत होते.

प्रसाद न जाणो आशूलाच बघतोय असा आशूला भास होत होता.
तिने सरळ कटाक्ष त्याच्यावर टाकला आणि खुणेनेच काय असे विचारले.
पण तो तसाच एकटक तिच्यावर नजर रोखून बघत होता.
प्रसादचा असा अविर्भाव ती आज पहिल्यांदाच अनुभवत होती. समजत नव्हते की त्याच्या नजरेच्या विळख्यातून स्वत:ची सुटका कशी करून घ्यावी.
काय सांगायचेय ह्याला?

अंगावर जरासा भितीचा काटा उभा राहीला आता.
नुसत्या विचारांनीच मनाची घालमेल व्हायला लागली तिच्या. ह्याच्या मनात काही भलतेसलते विचार
तर ऽऽऽऽऽऽ……!

आमचे खाणेपिणे संपले तसे बील देवून प्रसाद तडक उठला आणि बाहेरच्या दिशेने चालायला लागला.
आशू आश्चर्यचकीत भांबावल्या नजरेने त्याच्याकडे बघत राहिली.
तो मात्र तिच्याकडे न बघताच पूढे वळला.
काहीतरी खूप महत्त्वाचे बोलायचे म्हणून इतक्या उन्हात त्याने मला बोलावून घेतले अन् फक्त ज्यूस पिऊन एक अक्षरही न बोलता हा उठला देखील…
आशूचा पारा जरासा चढलाच आता.

तो जसा जायला वळला तिने त्याचा हात मागून खेचला.
वीजेचा झटका लागावा तसा तो मागे वळला.
तिने त्रासिक सुरातच विचारले,
” एक तास माझी वाट पाहून मी आल्यावर फक्त एक ज्युस पिण्यासाठी भेटायला बोलावले होतेस का मला ?
काय बालिशपणा आहे हा प्रसाद?
एक लक्षात ठेव.आता बोललास तर ठिक नाहीतर मग पून्हा मीच बोलणार नाही कधी..

रागाने स्वतःची पोतडी(पर्स) उचलून आशू तरातरा आपल्या स्कुटी जवळ पोहोचली.

गाडी स्टार्ट करून ती आता निघणार तोच प्रसाद गाडीपाशी पोहोचला. तिचा हात धरुन तिला अडवतच तो म्हणाला….
” कुठे निघालीस , किती चिडतेस तू?
“चिडू नको तर काय करू?तू काही न सांगता सवरता सरळ दरवाजा गाठलास.मी तुझ्या सोबत आहे ह्याचेही भान विसरलास. मग मी काय करणे अपेक्षित आहे तुला?”
ओके… ॲम सॉरी.मी कसल्यातरी विचारात होतो.
प्लिज थांब जावू नकोस.
आणि मला बोलायचेच आहे पण इथे नाही. कुठेतरी शांत जागी जिकडे माणसांची गजबज गोंधळ आणि डिस्टर्बन्स नसेल. म्हणून तिथुन उठलो. समजले का वेडाबाई ?”
” अशी जागा मुंबई मध्ये मिळणे कठीण आहे तुला.. “
‘शोधा म्हणजे सापडेल’ चल निघूया.”

विस्मय ,भय,राग, हसू अशा अनेक छटा एकाचवेळी आशूच्या मन:पटलावर रंग चढवून गेल्या.
निमूटपणे त्याच्या मागे कधी चालायला लागली तिचे तिलाही समजले नाही.

त्याने तिची गाडी कॅफेलाच सोडून त्याच्या गाडीत तिला बसायला सांगितले. त्याच्या सांगण्यानुसार ती त्याच्या कारच्या समोरच्या सीटवर जाऊन बसली..

गाडी त्या गजबजलेल्या रस्त्यावरून धावत चालली होती. कुठल्यातरी अगम्य रस्त्यांवरून ते चालले होते. तो सगळा नवीन एरीया होता.कुठे चाललोय काहीच कळत नव्हते.त्यात प्रसादही अगदी शांत. कोणीच कुणाशी बोलत नव्हते. तिला मनातल्या मनात भीती वाटत होती..छाती धडधडत होती. कुठे चाललोय आपण.?
जवळपासच जायचे म्हणून ती घरात कुणालाच सांगून निघाली नव्हती. पण आता कुठे जातोय किती लांब,परत कधी येणार? अशा सगळ्या काळज्यांनी तिचे मन पोखरायला लागले.
शेवटी हिय्या करून आशूने विचारलेच , ” प्रसाद कुठे चाललोय आपण? ” प्रसादने उत्तर देणे टाळले.

त्या शांततेने तिला जास्तच धडधडायला लागले.

“प्रसाद,अरे मी तुझ्याशी बोलतेय.. उत्तर तर दे, कुठे चाललोय आपण?”

” तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? मग कोणतेही प्रश्न न विचारता चल माझ्या बरोबर.”

तो ज्या अधिकारवाणीने आशूशी बोलत होता ते पाहून तिला आश्चर्य वाटले. ह्याआधी तो ह्या स्वरात तिच्याशी कधीच बोलला नव्हता उलट त्याच्या शांत मृदू स्वभावाचे तिला नेहमी कौतुक वाटायचे..आज मात्र त्याचा सगळा आविर्भावच निराळा होता.
पण आता तिला कुठे जातोय हे माहीत करून घ्यायचेच होते..
” अरे विश्वासाचा काय प्रश्न इकडे प्रसाद! तू घराजवळच्या कॅफेत बोलावलेस म्हणून मी घाईत कुणाला न सांगताच निघाले घरून.. आता आपण कुठे जात आहोत ती जागा सांगितलीस तर तसा निरोप देता येईल ना मला पोरांना.. आता उगीच सरप्राइज वगैरे नको.. कुठे चाललोय किती वेळ लागेल हे सांग पटकन..”

” तुला चार वाजेपर्यंत घरी सोडतो.. काळजी करू नकोस.आणि आता प्लीज जास्त प्रश्न विचारु नकोस.

मुकबधीर अवस्थेत आशू फक्त प्रसादकडे पहात होती..

तो अगम्य रस्ता त्यांच्या नात्याला कोणत्या दिशेला दिशाहीन घेऊन चालला होता…….. ?

(क्रमश:19)
®️©️राधिका कुलकर्णी.

नमस्कार मंडळी,

कसा वाटला हा भाग?
वर्गमित्र कथा आवडतेय की नाही ?
हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.)
धन्यवाद.