

®️©️राधिका कुलकर्णी
प्रसाद आशूच्या जवळ येवून पोहोचला.तोही आशूप्रमाणेच आश्चर्यचकीत,काहीसा संभ्रमीत.
अचानक तिला समोर बघून झालेला आनंद सारे सारे
चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.
” Wowwww Ashu !
looking gorgeous yar !”
त्याच्या कॉम्प्लिमेंटने आशू लाजली जराशी.
साडीत तो तिला असे प्रत्यक्षात पहिल्यांदाच बघत होता.त्यात लग्न म्हणून तिने हलकासा मेकअपही केलेला.
“अग् पण इकडे कशी तू?”
प्रश्न विचारत असला तरी त्याची नजर काही आशूवरून हटत नव्हती.
उत्तरादाखल आशूनेच त्याला प्रतिप्रश्न केला,
“मी तर लग्नाला आलेय. कालच सांगितले नव्हते का तुला. !
ती पाटी बघ ‘वेणूगोपाल वेड्स विदीशा’ दिसतेय का, त्या लग्नासाठी आलोय आम्ही. नवरा मुलगा श्रीचा कलिग आहे.
“पण तू काय करतोएस इकडे?”
“माझ्या तर भाच्चीचेच लग्न आहे ना. मी कालपासूनच इकडे आहे.”
What a coincidence yar !
आपल्या दोन्ही लग्नाचा हॉल एकाच ठिकाणी आणि आपल्याला माहीतच नाही.
तुला माहितीय काल तू ‘आज भेटायला जमणार नाही’ असे म्हणल्यावर मला किती वाईट वाटले होते.!
केवळ तुझी भेट होईल म्हणून मी श्रीला हो बोलले होते लग्नासाठी, नाहीतर एरवी मी श्रीच्या कुठल्याच ऑफीशियल पार्ट्या फंक्शन्सला जात नाही..पण तुझ्यासाठी तयार झाले आणि तुच नाही म्हणालास.. आणि आता एकदा हो बोलून बसले ना श्रीला म्हणुन त्याच्यासाठी बळजबरीने यावे लागले आज..
पण बघ आपली भेट झालीच शेवटी.
really feeling delighted!
आशू अति उत्साहात बोलतच सुटली.
प्रसाद मात्र एकटक आशूकडेच बघतोय..
आशूच्या लक्षात येताच त्याला हलवून ती म्हणाली
“अरे एऽऽऽ लक्ष कुठेय तुझे!”
” कूठे काय..तुलाच बघतोय.. आपलं ते..तुझेच ऐकतोय..
जीभ चावत प्रसादने सारवासारव करत उत्तर दिले. त्याची बदमाशी ओळखून आशूही त्याला फटका मारून म्हणाली
“चल वात्रट कुठचा !”
“अगं खरच खूप सुंदर दिसतीएस..
मी मगाशी सहज बाहेर आलो होतो आणि वळताना एका ललनेवर नजर पडली.. कोण ही सुंदरा बुवा ! म्हणून बघतोय तर तुच… माझा विश्वासच बसेना की ती तूच आहेस. एकदा वाटले की तुझ्यासारखी दिसणारी असेल पण आवाज पण सेम.. एक-दोन हाकाही मारल्या पण तू फोनमधे बिझी होतीस. म्हणून मग कॉल केला, तुच आहेस का खात्री करायला.
इतकी सुंदर कोण ही बाई !! प्रसाद तिची फूल खेचत होता..
प्रसाद ऽऽऽ चावटपणा पूरे आता…! आणि काय रे म्हणजे सुंदर बायकांना ताडतोस होय रे.. ?”
” अब क्या करे किसी शायर ने खूब कहा है
खुबसूरती आँखो से पिलो दूर से
हाथों से छूकर उसकी महक कम ना करो।
” अग आई गं! कोणत्या शायरने असली भंगार शायरी केलीय रे?”
“श्रेष्ठ शायर कवी प्रसादजींची शायरी आहे ही…”
“प्रसादऽऽ आज तर फूल टू सुटलाएस की..!”
जस्ट किडींग यार! अगं पण श्री कुठेय??
“अरे, तो वर त्याच्या ऑफिस फ्रेंड्सबरोबर. मी खरेतर आईच्या फोनमूळे खाली आले. तो वाट बघत असेल माझी. त्याला नाही माहित की मी इकडे खालीय ते.”
चल वर जावू तुही भेट त्याला.”
” yes,offcourse !! चल .”
दोघेही वर गेले. श्री आशूलाच नजरेने शोधत होता इतक्यात आशू प्रसादला घेऊन समोरून येताना बघून श्रीलाही आश्चर्य वाटले. एकमेकांशी औपचारिक गप्पा झाल्या आणि प्रसादने दोघांनाही त्याच्या कार्यात जेवणाचा आग्रह केला. काय करावे विचार करता करता अखेरीस दोघांनी त्यांची विभागणी केली. म्हणजे श्री वर त्याच्या मित्राबरोबर आणि आशू प्रसादच्या लग्नात सामील झाली.
ह्यानिमित्ताने प्रसादच्या सर्व फॅमिलीचीही ओळख होणार होती.
त्याच्या बायकोशी मेधाशी पहिल्यांदाच भेट होणार होती आशूची. सगळीच एक्साइटमेंट होती.
प्रसादने सगळ्यांच्या ओळखी करून दिल्या. त्याची बायकोही छान बोलली. मुलेही गोड. त्याची छकूली तर लग्नात मस्त मिरवत होती करवली होती ना.
नंतर जेवताना हळूच प्रसाद कुजबुजला.
” इतक्या गडबडीत आता आपले बोलणे शक्य आहे का?
त्यावर आशू म्हणाली,
” मला काहीच प्रॉब्लेम नाही.तू बघ कसे जमवतोस. कारण हे तुझ्याच घरचे कार्य आहे. मधेच सोडून जाणे तूला शक्य असेल तर जावू कुठेतरी बाहेर. मी सांगते तसे श्रीला.”
” हो गं बाई ! तूला काहीच प्रॉब्लेम नाही पण माझी बाई ओरडेल नाऽ. ऐन लग्नातून मैत्रिण भेटली की गेलात लगेच सगळे सोडून.. हाहाहाहाहा..”
मलाही हसू आवरत नव्हते.
“मग सांग कसे करूयात? इकडेच बोल नाहीतर.
बाहेर बसूया कट्ट्यावर ? “
आशूने पर्याय सुचवला.
” एऽऽऽऽ वेडीएस का? काही काय? कोणी बघितले तर उगीच नसती आफत. नको बाहेर.”
” ओके ऽ मग इथेच बोल.
आहे काय एवढे बोलण्या जोगे? कळू तर दे. “
” नाही गं. अशा घाईत सांगणे शक्य नाही. निवांत भेट व्हायला हवी. “
” तुम्ही परत कधी निघताय मुंबईला? “
” मला नाही माहीत रे. “
” श्री निघू म्हणला की निघणार. “
” तसे नाही. जर तूम्ही रात्री लेट निघत असाल तर भाच्चीला वाटी लावून हॉल चारला रिकामा केल्यावर मग मी मोकळा होइन.”
” नाही रे.इतक्या वेळ नाही शक्य बहूतेक. कारण मग पोहोचायला उशीर होइल आणि मूले घरी वाट पहात बसतील. फार फार तर दोनला निघू. “
” काय गं हेऽ. मला किती बोलायचेय अन् वेळच मिळत नाहीये. शीट यार !
आज भेटलो तेही इतक्या विचित्र योगायोगाने. ज्यात मी इच्छा असूनही कार्य सोडून येऊ शकत नाहीये..”
“मग पूढे काय आता?”
आशूनेच प्रश्न केला त्याची झालेली कोंडी बघून.
“आता काय!! पून्हा दुसऱ्या निवांत भेटीची वाट पाहणे. एवढेच हाती आहे.”
“अरे देवा!! आता पून्हा कधी भेट ती?
मला तर नाही शक्यता दिसत लवकर.”
” काळजी का करतेस एवढी.मीच येइन की.नाहीतरी ऑफिसच्या कामानी मी येतच असतो मधून अधून.
तसा आलो की भेटू.”
” बर मग ठिक आहे.ये तू कधीही. चल मी निघते आता. श्रीला वाटेल दिले सोडून मित्र भेटला की.”
“एऽऽ, थांब ना जरावेळ अजून. मनच भरत नाहीये बोलून. काहीतरी सुटतेय असे वाटतेय.”
“अरे अरे !! बस बसऽऽ , किती डायलॉगबाजी!!
आहे मी.बोल.”
“हाहाहा..! तसे नाही गं सखे. म्हणजे भेट झाली तरी बोलणे झाले नाही. म्हणून काहीतरी सुटल्यासारखे वाटतेय. आणि तसेही तुझ्याशी बोलतच रहावे वाटतेय आज. “
“प्रसाद ऽऽ.. Don’t be flirt ! “
“आता जे खरंय ते खरंय..ह्यात काय फ्लर्ट..”
थोडा गंभीर होत मग प्रसाद म्हणाला,
” आजकाल आपले बोलणे कमी होतेय माहितीय मला पण तुझ्याशी बोलून खूप बरे वाटते.माहित नाही काय पण तूला सांगून शेअर करून मन हलके अन् फ्रेश वाटते. त्यात तुच तर एकमेव मैत्रीण आहेस हक्काची जिची केली कधी थोडी मस्करीत छेडछाड तरी ती वाईट वाटून घेणार नाही माहितीये मला म्हणून बोललो आज.. तुला राग आला असेल तर सॉरी!”
अरे वेडा आहेस का? मी पण गंमतीतच चिडत होते.आय कॅन अंडरस्टॅंड.. सेम हिअर डिअर.
बरं चल निघते आता बोलू लवकरच. बाऽऽय. “
प्रसादने अचानक माझा हात हातात घेतला.थोडावेळ तसाच धरून ठेवला.. त्याच्या तळव्यांचा तो भिजट स्पर्श मला प्रसादच्या डहूळलेल्या अंतरंगाची सुक्ष्म जाणीव करून देत होता
त्या स्पर्शात काहीतरी वेगळीच अनूभूती होती. मी निश्चल उभी त्याच्या हातावर माझ्या हात ठेवून त्या आश्वासक स्पर्शाने भावनिक आधार देण्याचा प्रयत्न करत होते. पण त्याच्या गहिऱ्या डोळ्यात बरेच काही होते..जे मी वाचण्याचा प्रयत्न करत होते पण आज तो तळ गाठणे मलाही अशक्य झाले होते..
मी तशीच माझे हात त्याच्या हातातून सोडवून काही न बोलता परत जायला वळले.
पाठीमागून कोणीतरी पाठलाग करतेय असा सतत भास होत होता. लिफ्टमधे शिरताना समोर नजर गेली तव्हा प्रसादची नजर मलाच बघत होती.
(क्रमश: 17)
®️©️राधिका कुलकर्णी.
नमस्कार मंडळी,
कसा वाटला हा भाग?
वर्गमित्र कथा आवडतेय की नाही ?
हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.)
धन्यवाद.


राधिका कुलकर्णी
नाव- राधिका कुलकर्णी.
जन्म- संगमनेर.जि.-अ.नगर
सासर - हैद्राबाद
शिक्षण- बीएससी एम ए(इंग्रजी) बीएड.
लेखन वाचन ही माझी आवड आहे.
बऱ्याच कथा, कविता, लघूकथा/दीर्घ कथा लेखन झालेले.
माणसे जोडायला आवडते.
आयूष्यात कोणतेही प्रसंग आले तरी आपली सकारात्मकता सोडू नये ह्या विचारांनी कायम पॉझिटिव्ह राहते म्हणूनच आनंदी आणि समाधानी आहे.