
®️©️राधिका कुलकर्णी.
“हॅलो सखीऽऽऽऽऽऽऽ!!!!”
“कुठे आहेस?”
“वेळ आहे का बोलायला?”
“Am so so happy today.wanna share something with you .”
प्रसादचे मेसेजेस बघून आश्चर्यच वाटले.
हा सूर्य असा पश्चिमेकडून कसा उगवला आज.!!
मला मनातल्या मनात विचार करूनच हसायला आले.
हसायला ह्यासाठी की मी ज्याला सूर्य म्हणाले होते मूळात तो स्वभावाने अतिशय शांत,शीतल चंद्रासारखा.
कधी कधी मीच सूर्याचा तापटपणा दाखवायचे पण त्याने कधीही राग केला नाही की चिडून नाराज होवून बोलायचेच नाही असे केले नाही.
उलट शांतपणे ऐकून मलाच हसवून शांत करण्यात पटाईत.
पण हा रवी मात्र आज शशी बनून पश्चिमेकडून उगवला होता हे नक्कीऽऽऽ
# ## ## ## ## #
आज एक ऐकून बरे वाटले की त्याच्याकडे काहीतरी खूप छान बातमी होती.
कित्येक दिवसांनी आज त्याला इतके आनंदी बघत होते मी.गेल्या काही दिवसापासून सतत तणावात असलेला माझा मित्र आज वेगळ्याच उत्साहात दिसत होता.
मलाही कधी एकदा फोन करू असे झालेले.
पण म्हणतात ना,
‘नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न’
तसा आजचा दिवस.
मला भविष्यवाणी करून जरी कोणी सांगितले असते ना की आज आप्तभेटीत अडथळे येतील वगैरे वगैरे तरी माझा विश्वास बसला नसता. पण पूढला अख्खा दिवस ज्या पद्धतीने घडामोडी घडत गेल्या वाटलेच नाही की आज असेही काही घडेल.
नेमके जेव्हा अशी काहीतरी घाई असते ना,कोणीतरी येते किंवा मग कामात काम असे काही वाढत जाते ना,
ह्याला आजचा दिवस तरी कसा अपवाद असणार!
माझे हातातले काम संपवून फोन हातात घ्यायला श्रीचा फोन.
कसलेसे कुरीअर पार्सल येणार होते जे चुकून दूसऱ्याच पत्त्यावर पोहोचवले होते डिलिव्हरी बॉयने.
ते आता मला कलेक्ट कर म्हणत होता श्री.
“ए मी नंतर जाईन ना श्री,मला ना एक अर्जंट कॉल करायचाय रे प्रसादला.”
“अग् नाही गं ज्याच्या घरी पडलेय त्यांना घाईने बाहेर जायचेय म्हणे.”
“ते आपल्यासाठी थांबताएत.”
“आपल्यामूळे कोणी ताटकळत नको बसायला.”
“तू आधी निघ.”
मग काय नवरोबाची आज्ञा शिरसावंद्य मानून जराशा नाखूषीनेच निघाले.
सखू आली होती म्हणून बरं.ती आता मूलांकडे बघेल.मला तासभर तरी लागणारच होता.
“ताई,मला पुन्यांदा पुढल्या घरला जायचेय कामाला”
किती येळ थांबू मी?
“अगं मी लवकर येते. तरीही तूझे काम झाले की सगळे दरवाजे लावून मूलांना दार बंद करायला सांगून तू जा.
“वेळ असेल तर थांब मी येइपर्यंत.”
वृंदावन गार्डन हाईट्सच्या 23 व्या मजल्यावर मूर्ख माणसाने फक्त आडनाव आणि फ्लॅट नंबर सारखा म्हणून तिकडेच पार्सल डिलीव्हरी करून गेला होता.
ते काका-काकू माझीच वाट पहात होते. वयस्कर मंडळी पाहून नकळतच मी नमस्कार केला दोघांना. कुरीअरवाल्याच्या चूकीमूळे हा त्रास झाला आणि तुम्हाला वाट पहावी लागली म्हणून मी पुन्हा त्यांची क्षमा मागीतली.
साहजिकच स्री सुलभ कुतूहलापोटी काकूंनी माझं माहेर काय,कुठले चौकशी केली. मी साताऱ्याची म्हणल्यावर काकुंचे डोळे चमकले. त्यांचे माहेर पण साताऱ्याचेच होते.
मग आई बाबांचे नाव, गाव, काय करतात सगळ्या चौकशा झाल्या. तेव्हा कळले की काकूंच्या माहेरहून पण आमची जवळची ओळख आहे.
काकूंचे नाव वसूधा पेंडसे.आम्ही पेडणेकर.काकू आणि माझी आत्या क्लासमेट्स निघाल्या. मग काय गप्पा इतक्या रंगल्या की काकुंनी मला क्षणात त्यांची भाच्चीच बनवून टाकली. अर्थात दोन बायका बोलायला लागल्यावर जे व्हायचे तेच घडले. त्यांचा बाहेर जायचा प्लॅन बोंबलला होता आणि काका एव्हाना जवळच्या दिवाणावर मस्त घोरासूराचे आख्यान लावून बसले होते.
काकू त्यांच्या शाळेतल्या माझ्या आत्यासोबतच्या आठवणीत इतक्या रंगून गेल्या की वेळ कसा गेला कळलेच नाही. त्यांचे त्यावेळचे खेळ भातुकल्या,भोंडले, क्रोशा आणि विणकामातली चढाओढ काय काय आठवणी.
एका एका दिवसात कसे ताटावरचे क्लॉथ विणून पूर्ण करायच्या ह्या सगळ्या आठवणींचे पदर उलगडताना त्यांच्या पापण्या ओलावल्या..
” एऽऽ कुठे असते गं बेबी हल्ली? “
त्यांनी उत्सुकतेने प्रश्न केला.
त्यांच्या प्रश्नात त्यांना मैत्रीणीला भेटण्याची ओढ स्पष्ट दिसत होती. त्यांच्या मनाची अवस्था माझ्याहून जास्त कोण समजू शकणार होते?
मग मी गुपचूप काकूंना न सांगताच आत्याचा नंबर डायल केला.
फोन उचलला आणि तिला सांगितले की ” तुझी एक
मैत्रीण तुझ्याशी बोलू इच्छितेय.. कोण ते तू ओळख..”
आणि फोन मी काकूंच्या हाती दिला.. मग काय त्यांच्या गप्पांना असा काही ऊत आला की मी पण काकांसारखी पुतळाबाई होऊन बसले. पण त्यांच्या गप्पांत मी ही रंगून गेले. इतक्या वर्षांचा आठवणींचा साठा कधी चेहऱ्यावर हसू तर कधी डोळ्यात आसू असे ते वेगवेगळे भावनिक पदर उलगडताना बघत मी पण थोडी भावूक झाले.
माझा प्रसादसोबतचा फक्त काही आठवड्यांचा काळ दूराव्यात गेला तर तेव्हढ्यात मी किती सैरभैर अस्वस्थ झाले होते. ह्यांची भेट तर तब्बल ४० ते ५० वर्षांनी होत होती. मग हे तर साहजिकच होते ना पण माझी चलबिचल वाढली होती कारण घरी मूले एकटीच होती. मला घरी जायला लेट होत होता..
शेवटी माझी अडचण काकूंनीच हेरली आणि त्यांनी आत्याला सांगितले..
” बेबी मी तुझ्या भाच्चीकडून हा नंबर नोट करून घेते आणि माझ्या नंबरवरून कॉल करते गं. बिचारी बरीच वेळची ताटकळत बसलीय. चल ठेवते हं आता.”
काकूंनी बेबी आत्याचा नंबर त्यांच्या फोनमध्ये सेव्ह करून घेतला माझ्या मदतीने आणि मग चहा घेऊन मी निघाले.
असे करून जे काम पंधरा मिनिटात उरकायचे तिकडे दोन तास वेळ गेला. मलाही हे तेव्हा लक्षात आले जेव्हा त्यांच्या भिंतीवरच्या लोलक घड्याळाने दोन वाजल्याचा टोल दिला.म्हणजे गेला तासभर मी तिकडेच होते.
कसेबसे पून्हा येते,भेटूया,
काकू तुम्ही दोघे आता एकदा जेवायलाच या घरी असे निरोपाचे बोलत फोन नंबर पत्ता सगळ्याची येथेच्छ देवाणघेवाण करत मी पाय काढता घेतला.
हूश्श!खाली आले गाडीला किक मारली अन् थोडे पूढे जातेय तोच काकूंचा फोन.
गाडी बाजूला लावत मी फोन घेतला.
“अग् आशू, तू पार्सल इकडेच विसरलीस की.!”
अरे देवा!! गप्पांच्या नादात ज्यासाठी आले तेच विसरले.
किती बाई वेंधळेपणा!!
चरफडत स्वत:लाच चार शीव्या(मनातल्या मनात)
घातल्या आणि वळवली गाडी.
बिचाऱ्या काकू खाली येवून थांबल्या होत्या माझी वाट पहात पार्सल घेवून.
त्यांना मधाळ स्पेशल ठेवणीतले पेडणेकरी हास्य आणि थँक्यू फेकतच गाडी जोरदार पळवली घराच्या दिशेने.
अर्ध्या रस्त्यात गाडी रिझर्व्ह वर आलेली इंडीकेटरवर दिसली म्हणून पट्रोल पंपावर गेले तर तिकडे ही गर्दी.
आजचा दिवसच खराब साला.
इतकी वैतागले होते पण पर्याय नव्हता.
पेट्रोल भरून गाडी पून्हा अक्षरश: पिटाळली.
घरी पोहोचले तर तिकडे नविनच घोळ झालेला.
घरातच खेळा बाहेर जावू नका असे सांगितल्यामूळे मूले घरातच बॅटबॉल खेळताना बॉल भिंतीवरच्या फ्रेमला लागून ती फूटली होती.त्याच्या काचा घरभर पडल्या होत्या आणि मला कळू नये म्हणून घाईघाईत साफसफाई करण्याच्या प्रयत्नात धाकट्या चिरंजींवानी बोट कापून घेतले होते.
सोहमने डेटॉल लावून मलम लावले होते पण दोघेही घाबरले होते मी काय म्हणते ह्या विचारांनी.
आता मला त्यांचे उतरलेले चेहरे बघून त्यांना रागवावे की जवळ घेऊन कोकरांची समजूत घालावी हेच कळत नव्हते.
ह्या नादात प्रसादशी बोलण्याचे मी विसरून गेले.
जेवणे उरकून ऋषीला घेवून आधी फॅमिली डॉक्टरकडे गेले. टिटानियसचे इंजक्शन दिले.
येताना आईसक्रीम घेऊन घरी आलो.
खूप दमायला झाले होते.
“घेणे ना देणे,तेल लावणे ” म्हणतात ना तशी अवस्था झाली होती आज.
थोडीशी डुलकी काढू म्हणुन पडले तर झोपच लागली गाढ.
कसल्याशा आवाजाने घाबरूनच जागी झाले.बेल वाजतीय श्री आला की काय!
किती झोप लागली अशी अवेळी?
मनात पुटपूटतच दार उघडले.दारात कोणीच नव्हते.मग काय वाजले.?
अरे देवा! माझा अलार्म फोनचा.
6 वाजल्याचा अलार्म वाजत होता.अलार्मचे तोंड दाबले अन् फोनकडे बघीतले तर एक फोनही येऊन गेला होता प्रसादचा.
त्याला उद्या बोलते असे सांगू हा विचार करेपर्यंत श्रीचा फोन…
“अग् ,पार्सल कलेक्ट केलेस का?”
“हो श्री.आणलेय.”
“अग् मग कधी सांगणार.मी इकडे वाट पहात होतो तुझ्या फोनची.”
“बर ठिक आहे. बोलू नंतर.”
सगळे एका दमात बोलून श्रीने फोन ठेवलाही.
जेव्हा एखाद्याशी खूप उत्कटतेने बोलायचे असते नेमके तेव्हाच अशा काही अडचणी गोफ धरून नाचायला लागतात की चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूगत आपली अवस्था होते.
कदाचित ती वेळ आपल्यासाठी योग्य नसावी म्हणून ह्या अडचणी आल्या असाव्यात अशी मनाची समजूत करून घालून मी कामाला लागले.
कडक चहाची फार गरज होती आत्ता ह्याक्षणी.
प्रचंड डोके दूखत होते आज.
(क्रमश:15)
®️©️राधिका कुलकर्णी.
Post navigation

राधिका कुलकर्णी
नाव- राधिका कुलकर्णी.
जन्म- संगमनेर.जि.-अ.नगर
सासर - हैद्राबाद
शिक्षण- बीएससी एम ए(इंग्रजी) बीएड.
लेखन वाचन ही माझी आवड आहे.
बऱ्याच कथा, कविता, लघूकथा/दीर्घ कथा लेखन झालेले.
माणसे जोडायला आवडते.
आयूष्यात कोणतेही प्रसंग आले तरी आपली सकारात्मकता सोडू नये ह्या विचारांनी कायम पॉझिटिव्ह राहते म्हणूनच आनंदी आणि समाधानी आहे.