Ritbhatmarathi

Search
Close this search box.

®️©️राधिका कुलकर्णी.

मुलांच्या सुट्ट्या अनाऊंस झाल्या तशी ट्रिपच्या तयारीला वेग आला.. पॅकिंग अलमोस्ट झाले होते.. तरीही पुन्हा पुन्हा काही नवीन तिकडच्या हवेला गरजेच्या गोष्टी आठवतील तसे कोंबणे चालूच होते.
शेवटी एकदा जायचा दिवस आला आणि आम्ही आधी विमानतळ नंतर दिल्लीहून पूढे कॅबने सिमल्याकरता निघालो… जसजसे दिल्ली सोडून सिमल्याच्या जवळ जवळ जात होतो हवेतील गारवा त्याची जाणीव करून देत होता.

सिमल्याच्या थंड वातावरणात मनाला एक वेगळीच उभारी आली होती.
एकदम ताजेतवाने टवटवीत वाटत होते सगळे.
माल रोडवरची ती वर्दळ गजबजाट,नवविवाहीत जोडपी हातात हात,माना खांद्यावर झुकवून असे चालत होते जणू ढगांवर तरंगताएत.
आमच्यासारखेही काही होतेच पण ही तरूणाईची मजा काही वेगळीच. आकाशात विविध रंगी उधळण झाल्यावर ते जसे मनाला रोमांचीत करते तसे तिथले वातावरण चित्तवृत्ती प्रफुल्लित करत होते.तरूण जोडपी जगाचे भान विसरून त्या रोमांचक वातावरणात अधिकच एकमेकांत विरघळून तरंगत होते.त्या प्रणयाराधन करणाऱ्या युगूलांचे अवखळ कटाक्ष,अंग घासत डोळ्यांच्या विभ्रमातून बोलणारी अबोल भाषा वाचताना बघून नकळत मन भूतकाळात गेले.
श्री आणि मी ही लग्नांनंतर इकडेच आलो होतो फिरायला.
ती सगळी नवलाई,अल्लडपणा,थोडी हुरहूर,थोडी थरथर,ते नकळत होणारे हवेहवेसे स्पर्श,तो शहारा, थोडी लज्जा,थोडासा अवखळपणा अन् मग बिचकून आजूबाजूला बघत आलेले जगाचे भान, सगळे सगळे क्षणात डोळ्यापूढुन तरळून गेले. बारा वर्षामागील काळ चलचित्रासारखा दृष्टीपटलासमोरून सरकला.

“तूला आठवते का आशू, इक़डे उभे राहून आपण हिमाचली पेहरावातले फोटो काढले होते! आठवले?”
श्रीच्या बोलण्याने मी भानावर आले.
“होना.”
“चल आता ही काढूया?”
त्याचा उत्साह नुसता ओसंडून वहात होता.
मग काय मुले आणि आम्ही पून्हा तसेच पेहराव करून फोटो काढून घेतले.
मुलांनाही ह्या सगळ्याची मजा वाटत होती. ते प्रचंड एन्जॉय करत होते.
श्री मधेच एकदम रोमँटिक मुडमधे डोळे बिळे मारून काहीतरी दाखवायचा. मला त्याची खूप गंम्मत वाटत होती. श्री आज अगदी बारा वर्षे मागे गेल्यागत तरूण झाला होता.
जाखू मंदिरात जाताना तर पायऱ्या पायऱ्यांच्या ओबडधोबड रस्त्यांवर पोलीस बसवावेत पहाऱ्याला तशी माकडांची फौज बसलेली.
ते बघुन वाटले जणू रामायणातली सगळी रामाची वानरसेनाच गोळा झालीय.
हातातली कोणतीही वस्तू टिकू देत नव्हते.गॉगल पैशांचे पाकीट,पर्सेस,पाण्याच्या बाटल्या देवाच्या प्रसादाच्या पुड्या काहीही ते क्षणात ओढून घेवून जायचे.

सिमला,कूलू,मनालीचे सगळे टुरीस्ट पॉईंट्स बघताना प्रचंड धावाधाव होत होती.पण मजा येत होती
नालडेराच्या देवदार आणि पाइन वृक्षाची ती झालर बघून तर इथून पून्हा परतूच नये असे वाटत होते.
गाईड सवयीप्रमाणे किती कोणकोणत्या पिक्चर्सचे शुटींग तिथे झालेय ह्याची येथेच्छ माहिती पुरवत होता.
प्रेमी युगूले मग लगोलग त्याच झाडांखाली,वेगवेगळ्या पोझेस मधेफोटो काढून घेत होेते.
तेव्हाची म्हणजे लग्नानंतर इथे फिरायला आलो तेव्हाची एक गंम्मत आठवली अन् आताही लाजून चूर व्हायला झाले आशूला.
तिथल्या भल्या मोठ्या झाडाखाली गाईड असेच शुटिंगची माहीती सांगत असताना आशू सहज त्या झाडामागे गेली होती अन् दूसऱ्या बाजूने श्री कधी आला तिला कळलेच नाही. काही समजायच्या आत जोरात स्वतःकडे खेचून श्रीने आशूचा एक पुसटसा किस घेतला आणि डोळा मारून निघून पुन्हा घोळक्यात सामीलही झाला. एवढ्या लोकांच्या नजरा चुकवून त्याने केलेले ते धाडस बघून मीच ओशाळले होते.पण तो मात्र सतत संधी मिळाली की अशी धिटाई करत होता.
श्री पहिल्यापासून हा असाच खट्याळ अन् खोडकर !
आत्ताही त्याच्या डोळ्यात मी तिच चमक पहात होते

सोलंग व्हॅलीतला रोपवे, पॅराग्लाइडींग, रॅफ्टींग नुसती धमाल चालली होती मुलांची.
रोहतांगपासचे दूरच दूर पसरलेले बर्फाच्छादित डोंगर बघून तर मन तृप्त होत होते.
जणू धरित्रीने आपला धवल पदर दूरच दूर पसरलाय असे भासत होते. स्वर्ग जर कूठे असेल तर तो हाच असे वाटत होते
मधेच हिमवर्षावाचा अनुभव मन अन शरीराला सुखावून टाकणारा होता.
बर्फाळ जमिनीवर गमबूट अन् ते कोट घालुन फिरताना असे वाटत होते की आपण जणू चंद्रावर चालतोय. पाय जमिनीवर नाही पांढऱ्या ढगांवर टेकवतोय अन् ते आत आत जावून पून्हा बाहेर येताहेत.
आईस स्केटींग करताना तर मी तिनदा पडले.
श्री,सोहम् आणि रूषी फिदीफीदी हसत होते मला पाहून.
उठताही येईना मला तर पण
मूले मात्र मस्त झूरझूर जमिनीवर गाडी चालवावी तसे स्केटींग करत होते.
याक आणि घोड्यांची सवारी तर विचारू नका!!
नुसती रोमहर्षक सहल.
ते घोडेही एवढे कुशल.आपल्याला त्या डोंगराळ चिंचोळ्या मातीच्या कच्च्या रस्त्यावरून साधे चालणेही अशक्य तिथे हे प्राणी इतके सफाईने चालतात.कित्येकदा पाय घसरला तर वितभर अंतराच्या दरीतच पडू की काय अशी भीती वाटावी इतक्या कठीण वाटा,पण ते प्राणी मात्र आपल्याला व्यवस्थित योग्य जागी पोहोचवतात.खरच कमाल आहे तिथल्या जगण्याची अन् जगणाऱ्यांची.

मनिकरणला तर निसर्गाची आश्चर्यकारक अनुभूती पहायला मिळाली.
खाली काही फुटांवर हाताचा बर्फ व्हावा स्पर्श केल्यास इतक्या थंड पाण्याची नदी वाहतेय आणि वरती गुरूद्वाऱ्यात मात्र त्याच जागी उष्ण पाण्याचे झरे. म्हणजे तांदूळाची दिलेली पुरचूंडी त्या पाण्यात धरताच अवघ्या दोन मिनिटात भात शिजून बाहेर येत होता.
बर एक उष्ण पाण्याचे तर त्याच्या बाजूचे दुसरे मात्र पुन्हा शितल पाण्याचे कुंड. निसर्गाची ही उत्कृष्ट कमाल फक्त इथेच अनुभवत होतो आम्ही.
मूले तर काय घे तांदूळाची पुरचुंडी अन् बनव भात असा खेळच चालला होता.त्यांच्या साठी ते खूपच कुतूहलास्पद होते.
घरी गिझर लावुनही इतके गरम पाणी मिऴत नाही आणि इकडे असेच येतेय हीच त्यांना गंम्मत वाटत होती.मी ही लहानात लहान होवुन त्या खेळाची मजा लुटत होते.

हा हा म्हणता सहा दिवस कसे संपले कळलेही नाही आणि पून्हा परतायचा दिवस आला.
उद्या पासुन परतायची तयारी करायची होती.
आणले होते त्यापेक्षा डबल वाढ झाली होती सामानात खरेदी पायी.
त्या साठी आधी एक नविन बॅग खरेदी करावी लागणार होती आता.
पूर्ण प्रवासात फोन फक्त घरी खुषाली कळवण्या पुरताच वापरात आला होता.
इकडे आल्यापासून माझा फोन तर डब्बाच होवुन बसला होता जणू.
दिवसभर इतके फिरणे व्हायचे की फोनची आठवण ही येत नसे आणि दुसरे म्हणजे नेटवर्क बऱ्याचदा नसायचेच एवढ्या उंचीवर त्यामुळे फोन आपोआपच स्विच्डऑफ व्हायचे.
त्याचा एक फायदा म्हणजे श्रीधरला कोणताही ऑफिशिअल कॉल आला नाही डिस्टर्ब करायला पूर्ण ट्रीप संपे पर्यंत आणि मलाही!!!

सगळ्या सत्याच्या दुनियेपासुन दूर निसर्गाच्या कुशीत आम्ही अक्षरश: आकंठ न्हाउन निघत होतो. अहोरात्र.
तीच सगळी गर्द धवलांकित हिरवाई मनात भरगच्च भरून परतीच्या प्रवासाचे वेध लागले होते आता.

(क्रमश: -11)
®️©️राधिका कुलकर्णी.