
©️®️राधिका कुलकर्णी.
सकाळ पासुन माझी लगबग चाललेली.काय करू अन् काय नको असे झालेले.घर सापडेल ना नीट?कुठे वाट बीट चुकणार तर नाही ना.?
आल्यावर काय बोलु? काहीच समजेनासे झाले होते.थोडा आनंद थोडीशी धास्ती,संमिश्र भावनांची नुसती खिचडी चाललेली डोक्यात.
तेवढ्यात दारावरची बेल वाजली.तो च असेल, मी लगेच झरकन दार उघडायला जवळ जवळ धावलेच.पुन्हा मागे आले ओझरते आरशात स्वत:ला ठिक करत दार उघडले.
दारात तोच उभा हसतमुख चेहऱ्याने. काळजाचा ठाव घेतला त्याच्या हसण्याने.
मीही सुहास्यवदनाने त्याला आत घेतले.
शाळेतला माझा वर्गमित्र आज अचानक घरी येतोय म्हणल्यावर मी ही त्याच वयात जाउन पोहोचले.मनपाखरू कधी शाळेच्या वर्गात बागडायला लागले कळलेच नाही.
इतक्यात जाणवले की तो त्याच्या बॅगेत काहीतरी शोधत होता.
“प्रसाद ,काय शोधतोएस?”
“काही नाही ग,पाण्याची बाटली शोधतोय काल निघताना घेतलेली..”
आत्ताशी कुठे मी भानावर आले.त्याला आल्यापासुन पाणी ही विचारायचे विसरले होते.
“किती मी बावळट.. !!”
विचार करतच किचन मधुन पाण्याचा ग्लास ट्रे मधे घेतला आणि घाईतच येत होते.लक्ष मात्र त्याच्यावरच.
इकडे ट्रेतला ग्लास वाकडा होतोय हे माझ्या लक्षातच येत नव्हते.पाणी जवऴपास त्याच्या अंगावर सांडण्याच्या बेतात,त्याने ट्रे सावरला, ” अग् हळु हळु ..किती घाई!!”
मलाही समजत होते की मी उगिचच नर्व्हस होतीय..कदाचित त्यानेही हे हेरलेय का?
त्या विचाराने पुन्हा घाबरायला झाले अन् वरवर हसुन मी नॉर्मलच असल्याचा दिखावा करत आमच्या औपचारिक गप्पा सुरू झाल्या.
त्याची फॅमिली कामकाज मुले बाळे इ.तो सांगत होता.
एका मोठ्या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर म्हणुन काम बघत होता.काही इन्टरव्ह्युज् साठी वन ऑफ द कमिटी मेंबर हा ही होता.आणि तेच इंटरव्ह्युज घ्यायला आला होता तो.
शाळेतला प्रसाद तर मला आठवतच नव्हता फारसा.
म्हणजे पहिल्यांदा जेव्हा शाळेचे गेट टुगेदर झाले तेव्हा तर अशा नावाचा कोणी आपल्या वर्गात आहे हेच मला आठवत नव्हते.पण नंतर गप्पामधुन एफ बी च्या माध्यमातुन मैत्री वाढली आणि वर्गातला अनोळखी चेहरा कधी छान मैत्रिच्या नात्यात गुंफला गेला कळलेच नाही.
तो बराचवेळचा बोलत असावा पण मी भूतकाळातच इतकी माझ्याच विचारात गुंग होते की,
“अग,ऐकतेस ना? लक्ष कुठेय तुझे?”ह्या त्याच्या बोलण्याने मी भानावर आले.
“अरे,बोल ना,ऐकतिय मी”.
मी म्हणले खरी ,पण माझे कानच फक्त ऐकण्याची औपचारिकता निभावत होते.
कशीबशी सारवासारव करत मीही माझे पति घर संसार असे सगळे बोलुन त्याला दुजोरा दिला.तो बऱ्यापैकी सहज होता पण मी का उगिचच कॉन्शस होत होते काही कळत नव्हते.
चहा, नाष्टा गप्पा असे सगळे चालु असतानाच नवराही आला.
त्याला सकाळीच मित्र येणार सांगितल्याने तोही नेहमी पेक्षा लवकरच काम संपवुन घरी आला.त्यांच्या गप्पा सुरू झाल्या आणि मी ही किचनमधे स्वैंपाकाच्या तयारीत गुंतले.
रात्रीचे जेवण उरकले आणि श्रीधरने खास प्रसादच्या आवडीचे आणलेले आईसक्रीम मी सर्वांना सर्व्ह केले.मग पुन्हा गप्पा सुरू झाल्या.
श्रीधर आणि प्रसाद तर अशा गप्पा मारत होते जणु तेच जन्मजन्मांतरीचे बालमित्र आहेत.पुरषांच्या आवडीचे दोन विषय कॉमन असतात.
एक राजकारण आणि दुसरा क्रिकेट.पण ह्या दोघांचा आणखी एक विषय समान होता ‘ शेअर्स मार्केटींग ‘. मग काय मी आपली नावाला तिथे होते ह्यांच्या गप्पांत.
शेवटी कंटाळुन मी बोलले,
“अरे चाललेय काय तुमचे?”
“श्री, प्रसाद माझा मित्र आहे हे विसरू नकोस. आल्या पासुन तुच बोलतोएस, माझ्या वाट्याला येवु दे की”
ह्यावर प्रसाद – (मिश्किल हसुन),” तु काय ग कुठेही बोलशील.श्री शी कधी होणार बोलणे?
त्यावरही दोघांनी टाळ्या देवुन दाद दिली.
मनोमन मीही आनंदी च होते त्यांच्यात
तयार झालेला बाँड बघुन.
वेळ कसा गेला समजलेही नाही.बाराचे ठोके पडले तसा प्रसाद भानावर आला.
” बापरे!!12 वाजले? मला निघायला हवे.”
त्याने निघायची तयारी केली.
तेवढ्यात माझ्या फोनवर मेसेज ची घंटी वाजली.
एवढ्या रात्री कोणाचा मेसेज? असा विचार करतच त्याला टाटा करून आम्ही घरात आलो.
मेसेज बघुन आश्चर्य़च वाटले.प्रसादने मेसेज केला होता,” तुझ्या मुलांच्या रूम मधल्या वॉशरूमचे कबर्ड उघडुन बघ.
there is something for you.”
भीती ,आनंद आणि आश्चर्य मिश्रीत भावनांची एकच गर्दी झाली डोक्यात.
घाईघाईने वॉशरूमचे कपाट उघडले.
त्यात एक अगदी छोटेसे ,लाल चमकीच्या कागदात गुंडाळलेले पुडके होते.वर नाव ही होते माझे “आशु.”
काय असेल आत?बघायची ईच्छा इतकी अनावर होत होती पण मुलांची झोपमोड होउ नये आणि श्रीधर ही मला शोधत आला तर..?
म्हणुन मोह टाळला आणि सरळ झोपायला गेले.
प्रसाद सहसा मेसेेजेस करत नसायचा.त्याच्या मते मेसेज करणे म्हणजे वेळेचा अपव्यय.त्यापेक्षा फोन करून 5/10 मिनिटे बोलले की समोरचा व्यक्ति आनंदी तर होतोच आणि कमी वेळेत जास्त मेसेज(विना गैरसमज )पोहचवता येतो.
आजकाल मलाही त्याच्या बऱ्याचशा
गोष्टी पटायला लागल्या होत्या.
आणि होतेही असेच ना..आपण मेसेज एका अर्थी लिहीतो.समोरच्याला वेगळेच काहीतरी वाटते आणि मग ते असे नाही तसे आहे हे समजावण्यात अर्धा अधिक वेळ वाया जातो.मुळ मुद्दा सांगायचा राहुनच जातो ते वेगळेच.ह्या सगळ्यात खरच किती वेळ आपण वाया घालवतो नाही का??
माझे मनातल्या मनात हे विचार करता करता कधी झोपेने ताबा घेतला कळलेच नाही…
आज सकाळी सकाळीच पुन्हा त्याचा “गुड मॉर्निंग “मेसेज पाहुन मला आश्चर्यच वाटले.
सोबत टीप(-गिफ्ट आवडले का?
नंतर सवडीने फोन करेन..)बाय.
सकाळी सगळ्यांच्या शाळा, ऑफिस, डबे ,माझेही क्लासेसच्या नादात ते गिफ्ट बघायचे मी साफ विसरून गेले
दुपारचे दोन वाजले असतील.नुकतिच जेवण उरकुन पेपर चाळत मी बेडवर पडले होते.
पुन्हा मेसेजची रींग वाजली.
हो त्याचाच मेसेज….. पण ब्लँक..!!
खूप हसायला आले.त्याला कसे कळले की मी अजुनही गिफ्ट उघडुन बघितलेच नाहीये.
म्हणुन तो रिमाईंडर मेसेज होता का?
तसेच असेल.कमी शब्दात जास्त पोहोचवणे हीच तर त्याची पॉलिसी.
त्या एका ब्लँक मेसेजनी नकळत त्याने किती काय काय विचारले होते मला.
हि अबोल भाषा किती बोलकी असते नाही का !!!
(क्रमश:- 1)
©️®️राधिका कुलकर्णी.
Post navigation

राधिका कुलकर्णी
नाव- राधिका कुलकर्णी.
जन्म- संगमनेर.जि.-अ.नगर
सासर - हैद्राबाद
शिक्षण- बीएससी एम ए(इंग्रजी) बीएड.
लेखन वाचन ही माझी आवड आहे.
बऱ्याच कथा, कविता, लघूकथा/दीर्घ कथा लेखन झालेले.
माणसे जोडायला आवडते.
आयूष्यात कोणतेही प्रसंग आले तरी आपली सकारात्मकता सोडू नये ह्या विचारांनी कायम पॉझिटिव्ह राहते म्हणूनच आनंदी आणि समाधानी आहे.