चुकीची कबूली (लघुकथा_स्पर्धा_जाने_२२)

#रीतभातमराठी_लघुकथा_स्पर्धा_जाने_२२
® अनुजा धारिया शेठ
“सतरा साते किती?” सांग पटकन, असे ओरडत विजयने सान्वी वर हात उचलला.. वीणा मध्ये पडली, अहो काय करताय.. आता लहान आहे का ती..
लहान नाही म्हणूनच ओरडतोय, अजून पाढे पाठ नाहीत तिचे.. आता स्काॅलरशिपला बसले, आमच्या ऑफिस मधील कूलकर्णीने त्याच्या मुलीला स्काॅलरशिप मिळाली म्हणून पेढे वाटले. लोकांना सांगताना लाज वाटणार नाही एवढे मार्क्स तरी मिळवा, पण इथे नुसता उजेड आहे. विजय खूप रागाने बोलत होता..
सान्वी खूप घाबरली, तिने त्या गोष्टीच दडपण घेतले तिचे अभ्यासात लक्ष लागत नव्हते एवढी भीती वाट्त होती तिला..
तिचे हात कापत होते, भीती मुळे ती स्काॅलरशिपचे पेपर सोडवू शकली नाही.. परीक्षा संपली, आई बाहेरच होती तिच्या सोबत घरी आली.. बाबा काय बोलतील? ह्या भीतीने तिला झोपच लागत नव्हती. सान्वी एकदमच शांत झाली होती.. कोणाशीच काही बोलत नाही आपल्याच विश्वात असायची. वीणाने विजयच्या कानावर घातले, पण तापट स्वभावाच्या विजयने वीणालाच बोल सुनावले, तुझ्या या लाडापायीच बिघडले ती…
स्काॅलरशिपचा निकाल जवळ आला आणि अजूनच घाबरून गेली ती. सान्वीला स्काॅलरशिप तर मिळाली नाही, त्यात ती पेपरच लिहू शकली नव्हती तर पास तरी कशी होणाऱ.. आता बाबा ओरडतील, या भीतीने कोणालाही न सांगता निघून गेली, घरी आलीच नाही. उशीर झाला म्हणून वीणा-विजय काळजी करत होते.. विजयने तर विणावर तोंडसूख घेतले. सर्व मित्र-मैत्रिणींना फोन करून झाले… कोणालाच काही माहीती नव्हते, त्यांना खूप काळजी वाट्त होती. नको-नको ते विचार मनात येत होते. वीणा मनातून खूप घाबरली होती, तरी तसे न दाखवता शांतपणे विचार करत होती.
विणाने विजयला सांगितले, ती आत्तुला नेहमीं सांगतें सर्व… थांबा मी फोन करते वैशूताईंना, असे म्हणत वीणाने वैशूला फोन केला… ह्यावेळेस मात्र वैशूला पण काहीच माहित नव्हते.. वैशूने त्या दोघांनाही धीर दिला.. खरंतर तिलाही काही सुचत नव्हते तरी मी बघते, असे म्हणून फोन ठेवला…
वैशूने स्वतःला सावरले, ती बाहेर पडली शोधायला… कुठून सुरुवात करायची असा विचार करत असतानाच वैशूला तिच्या बालमैत्रीणीचा म्हणजेच स्वातीचा फोन आला. तिने सान्वीला ट्रेन मध्ये बसलेली बघितले आणि फोन केला..
वैशू, सॉरी मी तूला जरा स्पष्टच विचारते, पण तुझ्या दादाची मुलगी सान्वी आता मी ज्या ट्रेन मध्ये आहे तिथे आहे.. नक्की तीच आहे की.. तिचे हे वाक्य ऐकताच वैशू जोरात ओरडली.. काय? आग काय बोलतेस? मला सांग कुठे आहेस? मी आता येते.. तू तिला सांभाळ प्लीज, मला सांग मी लगेच येते..
वैशू तू शांत हो, मी आहे.. आमची ट्रेन आता इथे काही वेळ थांबत आहे.
अगं पण मला तिथे यायला २ तास तरी हवेत.. वैशू काळजीने म्हणाली.
स्वाती म्हणाली, काळजी करू नको. आम्ही हि ट्रेन सोडतो, पुढच्या ट्रेन साठी त्यांना आमचे रीझर्व्हेशन अड्जस्ट करायला सांगतो. तू ये सावकाश मी आहे.
वैशूने तिच्या नवर्याला संदीपला सोबत घेतले, दादा- वहिनीला फक्त सान्वी सुखरूप आहे, मी थोड्या वेळात तिला घेऊन येते असे सांगून तीने फोन कट केला.
विजय मात्र आपल्या बहिणीवर पण संशय घेत होता, सगळे मिळून आहेत मला माहिती आहे, काय बोलायचं? पोरीची जात.. नको तेवढी लाडावून ठेवले तुम्ही.. असे म्हणत त्याने वीणाला परत बोल सूनावयला लागला..
तिथे शांत बसलेल्या त्याच्या आईने मालती ताईंनी त्याच्यावरच आवाज चढवून बोलू लागल्या.. विजय बसं.. किती बोलशीला.. प्रसंग काय हाया.. ती बिचारी लेकीच्या काळजीने आधीच चोळी-मौळी झाले त्यात अजून किती आगतांडव करशीला..
“चार बुका शिकला म्हणून शाना झाला काय रं तू”
आपल्या आईने असे बोलल्यावर मात्र विजय शांत झाला. तिथून निघून गेला.
वीणाने सासूबाईंच्या मांडीवर डोक ठेवून रडू लागली, आई, सानूने काही बर वाईट तर.. विष -बिष घेण्याचा प्रयत्न तर केला नसेल ना… वैशू ताई काहीच बोलल्या नाहीत..
ए पोरी गप्प बसं.. अस अभद्र बोलू नको.. अगं कसल ईष नी कसलं काय? हि “
माणसाची जातच सगळ्यात ईषारी हाय बघ, स्वताला जे हवं ते मिळाल नाय ना कि ते ईष त्या माणसाला डिवचून डिवचून पाजतोच.. माझ्या ईठ्ठलाला साकड घातलय म्या… माझी पोर सुखाने येऊ दे.
इकडे त्या ठिकाणी पोहचे पर्यंत वैशू खूप काळजीत होती. संदीप तिला धीर देत होता. मनात अनेक चांगल्या वाईट विचारांचे वादळ उठले होते.. 2 तासाचे अंतर सुद्धा तिला युगायुगांसारखे वाटत होते.. हो नाही करत ती पोहचली.. तिला सान्वी स्टेशनवर बसलेली दिसली, बाजूला स्वाती होती..
वैशूला बघताच आत्तू म्हणून तिने मिठीच मारली, खूप रडली.. जणू काही किती तरी दिवसांपासून मनात साचलेले आभाळच डोळ्यांमधून रीते होत होते.
वैशूने तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला.. संदीपने तिला तिच्या आवडीची कॅडबरी दिली.
स्वातीने वैशूला बाजूला घेऊन सांगितलं की ट्रेन सुरू झाली आणि सान्वीने ट्रेन मधून उडी टाकायचा विचार करत दारापाशी आली, तेवढ्यात ट्रेन मधील काही लोकांच लक्ष गेले गोंधळ झाला म्हणून मी पुढे येऊन बघितलं तर काय सानू… मी आधी नीट ओळखल नाही ग.. मग् तिच्याशी जरा बोलले आणि तूला फोन केला. वैशूला हे ऐकून धक्काच बसला तीने स्वातीचा हात हातात घेऊन भरल्या डोळ्याने तिचे आभार मानले. तू देवा सारखी धावून आलीस ग नाहीतर काय झालं असत? विचारच करावत नाही ग…
वैशू सावर आता.. पण असे काय झालं ग कि, तिने हा विचार केला. मला विजूदादाचा स्वभाव माहिती आहे म्हणून तूला हक्काने विचारलं.. परत अशी वेळ नको येऊन देऊ बाई.. तू बोल दादाशी.. हल्लीची पिढी वेगळी आहे ग बाई, पूर्वीसारख आता नाही राहीलं ग.. स्वाती म्हणाली.
वैशूने तिचे परत आभार मानले, लगेच सानूला घेऊन घरी जायला निघाली.. बाबा काय बोलतील? या विचाराने सान्वी कापत होती. संदीपकाका मला नाही जायच घरी, भीतीने थरथरत सानू म्हणाली. वैशूने तिचा हात हातांत घेऊन धीर दिला. सानू झोप बर माझ्या मांडीवर डोक ठेवून.. कसलाच विचार करू नको आता.. मी आहे ना..
घरी येताच सान्वी आत्तूच्या मागेच उभी राहिली.. आजीने आधीच ताकद केल्यामुळे विजय गप्प होता.. आजीनं दारातच तिच्यावरून भाकरतुकडा ओवाळून टाकला.. तिच्या चेहेऱ्यावरून हात फिरवला आणि बोटं मोडली. तिथे उभ्या असलेल्या शेजारच्या दामुकाकांना नारळ काढायला लावला. लोटी काढून घरात घेतले.
आजीनं सानुला आज भरवलं, सानू घाबरून खूप रडत होती. आजी हलक्या हाताने तिला थोपटत होती. सानु झोपलेली बघताच वैशू खूप ओरडली विजयला.. बदल तूझा स्वभाव आता.. बस झालं..
आरे दादा आज स्वाती देवा सारखी धावून आली नसती ना तर आपली सानू… असे म्हणत रडत रडत तीने सर्व हकीकत सांगितली.. सर्वांनाच धक्का बसला. वीणा खूप रडू लागली. आजीनं सर्वांनाच शांत केले. जे झालंय तें जाऊ द्या.. पुढचा विचार करा आता..माझ्या अडाणीच ऐका.. तिला कोणी बी काही बोलायचं नाय आता.. थोडे दिस जाउदे मग् बघू..
खर आहे आई तुझे असे म्हणत वैशूने विजयला थोडे शांतपणे समजून सांगितलं, अरे दादा अमीर खानचा तारे जमीं पर हा पिक्चर बघितला होता मी, त्यातला एक डायलॉग नेहमीं लक्षात ठेव, “अपनी अॅम्बीशन्स का वजन अपने बच्चोंके नाजूक कंधोपर डालना… It’s worse than child labour..”
आपण पाठ केलेले पाढे आपल्या आता लक्षात आहेत का सांग मला? प्रत्येक मूल वेगळे असते त्यामुळे त्याची आवड निवड बघून आपण त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे.. तू मला सतराचा पाढा म्हणून दाखव.. आठवतोय का? विजय मानेनेच नाही म्हणाला, मग् त्यावेळी तिला किती मारलेस तू.. भीती मुळे येतं होते तें पण सर्व विसरली, पेपरच लिहिला नाही तीने तर पास कशी होईल? आणि मग् परत आता तू ओरडशील म्हणून हे पाऊल उचलल तिने.. असो जाऊदे झालं तें झालं यापुढे आपण काळजी घेऊ…
विजयला आपली चूक कळाली, त्याने सान्वीला जवळ घेतले, अन आपली चूक कबुल देखील केली…. तो म्हणाला खरच मी विसरूनच गेलो होतो की प्रत्येक मूल वेगळे असते आणि
” लहान मुले ही तर देवाघरची फुले असतात“.
वाचकहो कथा पूर्ण काल्पनिक आहे, पण आपल्या आजू बाजूला नक्कीच अशा घटना घडतात.. आताची शिक्षणपद्धती खूप स्पर्धात्मक झाली आहे. पण या स्पर्धेच्या युगात धावताना आपण आपल्या मुलांना जिंकवताना किंवा एक पालक म्हणून यशस्वी होताना आपल्या मुलांचे किंवा आपले नाते हरवणार तर नाही ना याचा विचार करायला हवा.