Skip to content Skip to sidebar Skip to footer

‘ चूक कोणाची?’

वेदांग आणि निशाचे लग्न ठरले. खरंतर वेदच्या आईला, सुधाकाकूंना निशा पसंत नव्हती. कारण ती घरुन काम करीत होती. काकूंना तर वेळेत कामाला जाणारी आणि वेळेत घरी येणारी सून हवी होती. कारण त्यांनी आयुष्यभर तसेच काम केले होते आणि त्यांना त्याचा जास्तच अभिमान होता.

मग ‘आपल्याला तशीच सून हवी’ असे त्यांचे ठाम मत होते. कारण नोकरी करणे म्हणजे समाजात प्रतिष्ठा मिळणे.अशी काहीशी समजूत होती त्यांची. पण निशा आणि वेद एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करायचा निर्णय घेतला. निशाच्या घरी वेद पसंत होता तर काकूंना निशा पसंत नव्हती. पण वेदच्या हट्टापुढे त्यांना नमत घ्यावं लागलं आणि लग्नाला होकार द्यावा लागला.

लग्न होऊन निशा सासरी आली. काही दिवस छान गेले. आता वेद आणि निशाने आपापल्या कामाला सुरुवात केली. वेद वेळेत ऑफिसला जात होता तर निशा घरातील सारी कामे आवरून कामाला सुरुवात करत होती. पण सासुबाईंना हे रूचेना. अडून- अडून त्यांनी निशाला जॉब करायला सुचवले. पण तिच्या कामाची घडी बसली होती. आता पुन्हा नव्याने सुरुवात करायची म्हणजे थोडे अवघड वाटत होते तिला.

‘सून ऐकत नाही आपले’ म्हणून सुधाकाकू चिडल्या. “मी आयुष्यभर नोकरी केली, घर उभारले, माझ्या पैशांनी एक -एक वस्तूंनी घर सजवले, काटकसर केली..आजच्या मुलींना काही करायला नको!” असे साऱ्या नातेवाईकांना सांगू लागल्या.

“अगं, आपला जमाना वेगळा होता आणि आजचा काळ वेगळा आहे. आता ऑनलाईन असते सारे काम. घरी राहून काम केले काय अन् ऑफीसमध्ये केले काय? काम ते कामच असते. घरातून काम केल्याने घरीही वेळ देता येतो. आले – गेले पाहुणेही भेटतात. मुलांनी आपलेच ऐकावे असा हट्ट बाळगू नये. स्वतःबद्दल वृथा अभिमान बरा नव्हे.”
वेदचे बाबा आपल्या बायकोला समजावून थकले.

मग ऐकतील त्या सुधाकाकू कसल्या! काही दिवसांतच एक -एक पाहुणे मंडळी घरी येऊ लागली. ‘आमची सून घरीच असते,’ असे म्हणत सुधाकाकू आपल्या पाहुण्यांना जेवायला बोलावू लागल्या. आता ‘ऑफिस सांभाळायचे, की घर?’ अशी निशाची तारांबळ उडू लागली. सारं काम तिच्यावर टाकून सासुबाई तिची गंमत पाहू लागल्या. ऐनवेळी आलेल्या पाहुण्यांना त्या आग्रह करून जेवायला बसवू लागल्या.

हळूहळू निशाच्या लक्षात येऊ लागलं. ‘सासुबाई मुद्दाम करतात हे सारं.’ तिने वेदच्या कानावर घातलं. वेदने विचारताच सुधाकाकू म्हणाल्या, “अरे ती घरीच असते ना? मग थोड घरचं पाहिलं तर कुठे बिघडलं?”
आता मात्र निशा चिडली. “अजून नवीन आहे मी या घरात. सांभाळून घ्यायचे सोडून तुम्ही असे का वागता? आणि कामाचे म्हणाल तर मी माझ्या आवडीचे काम करते. भलेही चार पैसे कमी मिळोत, पण माझं मन रमत या कामात. तुम्ही आयुष्यभर नोकरी केली म्हणून मीही तेच करावं, असा नियम नाही ना? लग्नाआधी सारं माहित होत तुम्हाला..”

“..म्हणूनच विरोध केला मी.” वेद एकुलता एक मुलगा आमचा त्याचा हट्ट नडला बाकी काही नाही. पाहिलंस ना वेद, तुझी बायको कशी उलट बोलते ते.” सुधाकाकू निशाचे बोलणे मध्येच तोडत तावातावाने म्हणाल्या.
“अगं पण आई, तिने तिला आवडणारे काम करावे या मताचा आहे मी. तू अनेक वर्षे नोकरी केलीस, ही निवड तुझी होती. तुला जबरदस्ती केली नव्हती कोणी. तशी तू ही करू नको. इतकंच.”

हे ऐकून सुधाकाकू भडकल्या. ‘काल आलेल्या बायकोसाठी मुलगाही उलट बोलतो,’ म्हणून रडू लागल्या. परिस्थिती विचित्र वळणावर गेली हे पाहून निशाने आपल्या सासुबाईंची माफी मागितली.
पण “हे घर मी उभं केलं. इथे तुम्हाला जागा नाही.” असे म्हणत सुधाकाकुंनी रागाच्या भरात वेद आणि निशाला घरातून बाहेर पडायला सांगितलं.

वेदसाठी हा धक्काच होता. त्याने आईला समजवायचा प्रयत्न केला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
परिणामी काही दिवसांतच वेद आणि निशा वेगळे राहू लागले. पण खूप विचार करुनही वेदला मात्र अजून या प्रश्नांचे उत्तर सापडले नाही..’या साऱ्यात नक्की चूक कोणाची होती!!’

समाप्त

=========================

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: