चिऊचा झगा

©️®️ सौ. गीता गजानन गरुड.
“चिऊ गं तिन्हीसांज झाली. घरात ये बघू.” तासाभरात आईचिऊने साताठ तरी हाका मारल्या.
बेबीचिऊ एका लहानशा फांदीवर बसून खाली अंगणात चाललेला मुलींचा खेळ पहात होती. ‘कितीकिती छान वेण्या यांच्या नं झगेतर किती सुंदर रंगीबेरंगी, बिट्ट्यांचे,फुलाफुलांचे. लाल,पिवळा,जांभळा..तर्हेतर्हेचे रंग यांच्या झग्यांवर. नाहीतर माझी ही करड्याकाळ्या रंगांची पिसं..हाच काय तो झगा. कायमचा.
किती बरं होईल, मलाही असे घेरदार झगे मिळाले,वेण्या घालता आल्या तर.’ बेबीचिऊ या विचारात असताना पुन्हा आईचिऊची साद तिला ऐकू आली. ती जराशी दचकली नि घरट्यात आली. बाबा चिऊ खाऊ घेऊन आले होते नं जरा पहुडले होते.
आईचिऊने बेबीचिऊला भरवायला पान घेतलं पण छे! बेबीचिऊ मान फिरवू लागली. सकाळपासनं दाण्यांसाठी एवढी उडाउडी केलेली आईचिऊही वैतागली. तिने सणकन धपाटा घातला, बेबीचिऊच्या पाठीवर तसा बेबीचिऊने आलाप लावला.”मलापण झगा पाहिजे,वेण्या पाहिजेत, अंगणातल्या मुलींसारख्या.”
“नाही जेवायचं तर नको जेवूस तिकडे. एकेक दाणा चोचीतनं आणताना आम्हाला जीव मुठीत धरुन उडावं लागतं. कधी कोणत्या पतंगाचा मांजा वाटेत असेल नं पंख कापेल सांगता येत नाही तर कधी दाणे टिपताना चुकून मुलांनी टाकलेले च्युईंगम गिळले गेले तर परत घरटं दिसेलच याचा नेम नाही. सदा फासावर जीव लटकलेला.”
हे सारं ऐकत असलेली बाजूची आज्जीचिऊ इवलाली काठी टेकत टेकत त्यांच्या घरट्याजवळ आली.
“आईचिऊ ए आईचिऊ.”
“अरे वा. आज्जीचिऊ, या या बसा. तुम्ही जरा समजूत घाला हो या रडूबाईची. “
“काय एवढं मुसुमुसु रडणं चाललंय बेबीचिऊचं. ते बघायला आली हो.” आज्जीचिऊ म्हणाली.
आईचिऊनं मग बेबीचिऊचा विचित्र हट्ट सांगितला.
“बेबीचिऊ, बघ जरा माझ्याकडे. नको ते हट्ट करु नयेत. शहाणी ना तू.”
बेबीचिऊ हूं नाही की चूं नाही. आज्जीचिऊ तिची समजूत घालून थकली नि निजायला गेली.
दोन दिवस बेबीचिऊने ना आईने दिलेले दाणे खाल्लै ना बाबाचिऊने आणलेले रुचकर किडे. बेबीचिऊ उपाशी राहिल्याने अगदीच मलूल झाली.
शेवटी आज्जीचिऊला बेबीचिऊची अवस्था बघवेना. तिने रात्री विचार केला..कोण बरं देईल झगा शिवून? आणि तिच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. हात्तिच्या..शिंपी पक्षी देईल की शिवून. ती पहाटेच सगळं आवरुन शिंपी पक्ष्याकडे गेली.
नदीजवळील झाडावर शिंपी पक्षी आपलं घरटं विणत होता. दोन मोठाली पानं घेऊन त्याने त्यांची पुंगळी बनवली होती व वनस्पतींचे तंतू घेऊन चोचीचा सुईसारखा उपयोग करत तो आपलं घरटं शिवत होता. शिंपी पक्षीण त्यात मऊसूत रुईची गादी करत होती.
शिंपी पक्षी, आज्जी चिऊला पाहून म्हणाला,”आज्जीचिऊ, आज सकाळीचशी. जरा आरामात उठावं. कशाला उडतेस इकडेतिकडे. तुला काय हवं ते सांग. मी आणून देतो.”
आज्जीचिऊ म्हणाली,”तू देशीलच रे पण माझे पंख नि पाय धड असेस्तोवर मी काही कुणावर बोझ बनणार नाही. असं लागतच कितीसं मला!” या समोरच्या झाडावरनं टपटप अळ्या गळताहेत. लांब जायचीही गरज नाही. बरं ते जाऊदे. माझं काम जरा वेगळंच होतं नं नाजूकही.”
“आज्जीचिऊ, सांग तर खरं. आम्हाला जमलं तर जरुर करु.”शिंपी पक्षी म्हणाला.
“तुम्हाला जमणारच. शिवणकला आहे नं तुमच्या अंगात.”
“तुला पण घरटं शिवून देऊ का?”शिंपी पक्ष्याने विचारलं.
“नाही रे बाळांनो. माझी नात ठाऊक आहे नं बेबीचिऊ. तिने इथल्या अंगणात बागडणाऱ्या झगेवाल्या मुली पाहिल्या माणसांच्या.”
“बरं मग?”
“बेबीचिऊ माझी काही खातपित नाहीए. नुसती हट्ट धरुन बसलेय की छानसा झगा पाहिजे नि वेण्या पाहिजेत.”
“अग्गोबाई! हा कसला विचित्र हट्ट. एवढी छान करडी पिसं दिली आहेत बाप्पाने.” शिंपी पक्षीण म्हणाली.
“बालहट्टापुढे कुणाचं काही चालतं का?
तुम्हीच दोन झगे शिवा, माझ्या नातीच्या मापाचे. मी रंगीत टिकल्या आणून देईन चमचमत्या. त्याही लावा.”
शिंपी पक्षी नं पक्षीण कामाला लागली. बदामाच्या झाडाची लालसर पानं नं हिरवी पानं आणली. शिंपी पक्षीणीने पानं बेतली नि दोघांनी मिळून धाग्याने झगे शिवले. वेण्यासाठी मक्याच्या कणसाचे सोनेरी तुरे आणले नि त्याच्या वेण्या बांधल्या. आज्जीचिऊने आणून दिलेल्या चमचमत्या टिकल्या झग्याला लावल्या.
दोघंही मग झगे द्यायला जोडीने गेली. झगे पहाताच बेबीचिऊ उठू बसली. मक्याच्या सोनेरी वेण्या तिच्या केसांत शिंपी पक्षीणीने शिवल्या. घेरदार चमचमत्या टिकल्यांचा झगा बेबीचिऊने घातला नं ती एवढी खूष झाली..एवढी खूष झाली की तिने दोनचार गिरक्या घेतल्या. मग आईचिऊने तिला मक्याचे कोवळे दाणे भरवले.
अगदी ऐटीत बेबीचिऊ घरट्याच्या बाहेर पडली. फांदीवर बसली. त्या मुली खेळायला आल्यात हे बघून खाली उतरली नि त्यांच्या अधेमधे आपला झगा दाखवण्यासाठी फुदूक फुदूक करु लागली. रात्रीही ती झगा घालूनच निजली पण सकाळी बघते तर काय झगा अगदी मलूल झाला होता, वेण्याही वाळल्या होत्या. वेण्यांची सोनेरी केसं, गादीवर विखुरली होती.
बेबीचिऊ तशीच घरट्याबाहेर आली. तिच्या मैत्रिणी तिच्याकडे पाहून हसू लागल्या. ती झग्याची पानं मलूल झाल्याने तिच्या पायांत आली नि तोल जाऊन ती खाली पडली.
आई चिऊ चिव चिव चिव करत आली. आपल्या बाळीला उचलून घेऊन घरट्यात गेली. शिंपी पक्ष्याने बेबीचिऊसाठी मऊ रुईची गादी आणली. सगळीजणं तिची काळजी घेऊ लागली.
बेबीचिऊला कळलं, आपणं नको तो हट्ट करुन आईबाबांना गोत्यात आणलं. आईचिऊ तर सारखी रडत होती. आज्जीचिऊ, बेबीचिऊच्या तुटलेल्या पंखाला मुळी उगाळून लावत होती. तरी महिनाभर बेबीचिऊला पडून रहावं लागलं. मग एके दिवशी आज्जी चिऊ बेबीचिऊला म्हणाली,” आता तुझा पंख जोडला गेला हं. आता उंच उडण्याचा सराव करायचा, आईच्या देखरेखीखाली.
बेबीचिऊ म्हणाली,”खरंच गं आज्जी, बाप्पाने हे छान पंख दिलेत मला. मी कुठेही उडून जाऊ शकते पण त्यांकडे माझं लक्षच नाही गेलं उलटपक्षी मी त्या मुलींच्या झग्यांवर , वेण्यांवरच भाळले.
आज्जीचिऊ तिला आपल्या पंखाच्या उबेत घेत म्हणाली,”शहाणी माझी नात ती. आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानण्यास शिकलं पाहिजे, पिल्लू. अती हाव वाईटच असते. देवाने प्रत्येकाला विशिष्ट असे अंग,कला देल्याहेत. त्यांचा वापर करायला शिकलं पाहिजे आणि हे देणाऱ्या परमेश्वराचे रोज आभार मानले पाहिजेत.
बोध: समाधानी जीवन जगले पाहिजे. अवाजवी हट्ट करु नयेत.
(समाप्त)
==================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.
=============