Skip to content Skip to sidebar Skip to footer

चिट्ठीवाले आशिक

दुर्गा आणि अपर्णा दोघी बहिणी. दोघींमध्ये अगदी दोन वर्षांचंच अंतर असल्याने समवयस्क होत्या आणि बहिणी असूनही एकमेकींच्या घट्ट मैत्रिणीही! त्यामुळे दोघींमध्ये कधी प्रेम उतू जायचं तर कधी कधी चार चार दिवसांचा अबोला ! त्यांची आई मात्र ह्या दोघींचीही मनधरणी करण्याने वैतागून जायची;”काय ग कारट्यानो, किती तुमचा उच्छाद!कधी भांडाल कधी गळ्यात पडाल काही नेम नाही तुमचा!सासरी जाल ना आपापल्या तेव्हाच काय ती सुटका होईल माझी आणि तुमचीही एकमेकांपासून!!” असं म्हटलं की दोघीही पुन्हा आईला सतवायला तिच्या अवतीभवती फिरत नको करायच्या आईला!

दोघी बहिणीत दुर्गा मोठी आणि अपर्णा लहान.दोघींची शिक्षण वगरे पूर्ण झालेली, दुर्गा तर नोकरीला ही लागलेली आणि अपर्णा नोकरीच्या शोधात होती.त्यामुळे दोघींच्या लग्नाचं वय झालेलं आणि काही स्थळं ही सांगून येऊ लागली होती.

आजचा दिवस त्यासाठी खास होता कारण आज दुर्गाला पाहायला पाहुणे येणार होते, त्यामुळे तिच्यापेक्षा अपर्णा च जास्त उत्साहात होती.तिनं कोणता ड्रेस घालायचा ते मेक अप, मॅचिंग ज्वेलरी वगरे वगरे सगळं अपर्णानेच ठरवलं.शिवाय पाहुण्यांची खाण्या पिण्याची तयारी करण्यासाठी अपर्णाने आईलाही मदत केली.

“अपू,हे नको ग गळ्यातलं किती बटबटीत दिसतंय,हा ड्रेस नकोच” ,असं हे नको ते नको करत एकदाची दुर्गा तयार झाली आणि तिच्या सोबत अपर्णा ही!

संध्याकाळी पाहुणे आले आणि रीतसर कांदे पोहे कार्यक्रम सुरू झाला. दुर्गा साठी आलेला मुलगा अभिजित, त्याचे आई बाबा आणि धाकटा भाऊ अभिषेक व एक दोन मित्र असे पाच सहा लोक होते. दुर्गा ला बाहेर बोलावलं गेलं आणि दुर्गा ला पाहताच अभिजित ला ती खूपच आवडली ,मुला मुलीचं एकांतात बोलणं झालं, तसं अभिषेक आणि अपर्णा च्याही छान गप्पा झाल्या, अभिषेक चांगलाच बडबड्या होता आणि अपर्णा फक्त ‘ हूं हूं’ करत त्याच्या गप्पा ऐकत होती. इकडे बोलणं झाल्यावर अभिजित च्या चेहऱ्यावर उमटलेल्या हास्यामुळे बहुतेक सर्वानाच अंदाज आला होता की ‘जमतंय’ म्हणून!!

पण लगेचच कुठे काही निर्णय सांगा म्हणून ‘ दोन दिवसात’ कळवतो म्हणून पाहुण्यांनी निरोप घेतला.

पाहुणे गेले खरं मग मागची आवराआवर करण्यासाठी दुर्गा आणि तिची आई दोघी आत गेल्या आणि दिवाणखान्यात फक्त अपर्णाच राहिली ,आईनं तिला बाहेरच आवरायला सांगितले म्हणून तीही उगाच इकडे तिकडे काही छोटी मोठी आवराआवर करत होती तर flower pot खाली तिला छोटीशी चिट्ठी सापडली,’ अजून तुझा फोन नंबर नाहीये माझ्याकडे पण उद्या संध्याकाळी तळ्यापाशी भेट ,खूप बोलायचंय -अभि’ आता ही चिट्ठी वाचून अपर्णा चांगलीच गोंधळात पडली ‘ हा अभि म्हणजे नक्की कोण? अभिजित की अभिषेक?’

काय करावं ,दुर्गा ला सांगितले तर उगाच काही कारण नसताना आपलं आणि अभिषेक च काही सुरू होतंय की काय म्हणून ती डोकं खाईल , त्या पेक्षा आपणच जाऊन बघू ‘ अभिजित असेल तर त्याला स्पष्ट सांगू गोंधळ झाला ते आणि अभिषेक असेल तर ह्या आगाऊपणा बद्दल सूनवु त्याला!’ अपर्णाने घरात कोणालाच काहीही न सांगता स्वतः चं काय ते ठरवलं.

इकडे अभिजित ला काळजी होती की,चिट्ठी तर ठेवून आलोय आपण पण आता ती लिहिलेली चिट्ठी नेमकी दुर्गा ला मिळाली तर बरं नाहीतर व्हायचा गोंधळ!! चिट्ठी लिहून खरंच गाढवपणा च केला त्यापेक्षा दुर्गाला स्पष्ट सांगायला हवे होते पण पहिल्याच भेटीत कसं विचारणार म्हणून टाळलं त्याने!! देवा,वाचव बाबा ह्या मूर्खपणा तून!!”

‘आता असं करू की संध्याकाळी जाऊ यात तळ्यापाशी; दुर्गा आली असेल तर बोलू मनातलं , नाहीतर बघू काय करायचं ते ! सोबत अभिषेक ला नेऊ यात ,त्याला काहीच आयडिया नको द्यायला असंच दोघे भाऊ फिरायला गेले आणि योगायोगाने दुर्गा भेटली असे होईल मग कोणाला काही संशय येणार नाही.’ अभिजित स्वतःच्याच प्लॅन वर बेहद्द खुश झाला.

ठरल्या प्रमाणे अभिजित असंच काही कारण सांगून अभिषेक ला तळ्याकडे फिरायला जाऊ संध्याकाळी म्हणत त्याला घेऊन बाहेर पडला.

इकडे अपर्णा तिच्या लाडक्या गुलाबी जांभळ्या ड्रेस मध्ये तयार झाली आणि संध्याकाळी बाहेर पडली,बाहेर जाताना दुर्गाने हटकले तिला पण ‘काही नाही ग ,एका मैत्रिणीकडे जायचंय, तिचं काहीतरी काम आहे माझ्याकडे ‘ असं म्हणत आणि पुढील प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरं देत देत तिथून सटकली.

तेवढयात तळ्याकडे एकटी अपर्णाच येत असताना नेमकं अभिजित ने पाहिलं आणि झालेला गोंधळ त्याच्या क्षणात लक्षात आला !! ‘ अरे यार,हे तर भलतंच घडलं!” आता काय करावं म्हणून त्याने अभिषेक ला ‘ अरे तू पुढे हो ,मी आलोच दोन मिनिटात ‘ असं म्हणत तिथून पळ काढला.

आता इकडे एकट्या अभिषेक ला पाहून अपर्णा तडकली,तिनं कुठलाही पुढचा मागचा विचार न करता अभिषेक ला सुनवायला सुरुवात केली.

‘ अभिषेक, काल तुझ्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या तर तू लगेच हा अर्थ काढलास !! लगेच चिट्ठी लिहून भेटायला बोलावलस, भारीच फास्ट चाललीये तुझी गाडी , मुलीला भेटायला बोलावण्याआधी काही गोष्टी असतात ,डायरेक्ट एकटीला भेटायला बोलावतोस म्हणजे काय!” अपर्णाचा पारा चांगलाच चढला होता !

पण बिचाऱ्या अभिषेक ला तिचं हे धबधब्यासारखं बोलणं पार डोक्यावरून गेलं.’ कसली चिट्ठी? कधी लिहिली? कोणी भेटायला बोलावलं? ही काय डोक्यावर पडलीये का?’ असे अनेक प्रश्न तिला विचारायचे होते अभिषेक ला पण त्यापूर्वीच अपर्णा तिथून ताडताड निघून ही गेली होती.

इकडे अभिजित ची बोबडी वळली होती,’ काय गाढवपणा करून बसलो यार! लिहिले कोणासाठी आणि घडले भलतेच! आता मात्र हे प्रकरण फार अंगाशी येण्याआधी आपली चूक कबूल करण्यातच शहाणपण आहे !’ नाईलाजाने का होईना पण त्यानं तातडीनं दुर्गाच्या बाबांना फोन केला आणि दुर्गा शी बोलण्याची इच्छा सांगितली .

बाबांनी दुर्गाला फोन दिला आणि मग अभिजित ने घडला प्रकार दुर्गा ला सांगितला!

हे सगळं ऐकून दुर्गा नुसती हसतच सुटली,तिचे बाबाही फोनवर हसत असलेल्या लेकीला पाहून खुश झाले ,त्यांनी लगेच दुर्गाच्या आईला ‘ दुर्गाचं जमतंय बहुतेक!’ अशी गोड बातमी दिली.

दुर्गा फोन ठेवते तोच अपर्णा पाय आपटत घरात येती झाली आणि तिच्या ह्या अवताराकडे बघत दुर्गाला अजूनच हसू फुटलं! इतकं की त्या हसण्याचा अपर्णाला रागच आला , ती दुर्गावर बरसली ‘ तुला काय झालंय फिदीफिदी करायला!’

दुर्गाने तिला सोफ्यावर बसवलं ,पाणी प्यायला दिलं आणि झालेला गोंधळ सविस्तर सांगितला.

आता हसण्याची बारी अपर्णाची होती ,दोघीचं पार सातमजली हास्य ऐकून आई बाबा ही बाहेर आले ,त्यांनाही झाला प्रकार ऐकून हसूच आलं ,पण अपर्णाने ताबडतोब अभिषेक ची माफी मागावी असं सर्वानुमते ठरलं नव्हे सर्वांनी तसं फर्मान च काढलं!
अपर्णा लाही ते पटलं, तिने फोन करून मग अभिषेक ची मनापासून माफी मागितली.

अभिषेक लाही तोवर सगळं समजलं होतं. त्यानं ही हसून अपर्णा ला माफ केलं.

अभिजित ला आपण केलेल्या वेडेपणासाठी इतकं कानकोंड व्हायला झालं की पुन्हा जेव्हा दोन्ही घरचे लोक भेटले तेव्हा फक्त हसण्याचे फवारे उडत राहिले , चिट्ठी चा किस्सा चांगलाच गाजला आणि अभिजित ला ‘दुर्गाचा चिट्ठीवाला आशिक ‘ अशी पदवी ही मिळाली!!

आणि पुढे काय झालं म्हणून काय विचारता?

आज दुर्गा आणि अपर्णा दोघीही अनुक्रमे गुलाबी आणि जांभळ्या पैठणीत गौरीहर पूजत आहेत!!

आणि त्यांचे ‘चिट्ठीवाले आशिक’ तिकडे अंतरपाटा पलीकडे त्यांची वाट पाहत उभे आहेत!!

गुलाबी चिट्ठी पासून सुरू झालेली ही कथा अंतरपटापर्यंत येऊन सुफळ संपूर्ण झाली!!!

– सौ बीना समीर बाचल©®

=================

तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

=============

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: