चिनूचा_गंपतीबाप्पा


चिनूकडे यावर्षी प्रथमच गणपती बसवायचे ठरले.
चिनू व त्याच्या आजोबांनी गणपतीच्या शाळेत जाऊन शाडूच्या मातीचा बाप्पा मुर्तीकारांबरोबर बसून तयार केला. शेंदरी रंगाचं पितांबर ल्यालेली बाप्पाची मुर्ती फारच लोभसवाणी दिसत होती.डोळ्यांचं रेखीव काम व रंगकाम मुर्तीकार काकांनी केलं.छोटासा उंदीरमामा बनवला.🐀
बागेतल्या दुर्वांचा चिनूने व आजीने मिळून बाप्पासाठी भरगच्च हार बनवला .आईने भरपूर उकडीचे मोदक,उकडीच्या करंज्या व इतर नैवेद्य तयार केला.
घरातली सर्व मंडळी बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठेच्या तयारीला लागली.भटजीकाकांनी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली.सुरेल स्वरात सर्वांनी आरती म्हंटली.चिनूच्या बाबांनी तळीचे ताट धरले होते.चिनू टाळ वाजवत जोशात उंदरावर बैसोनी दुडदुड्या येशी म्हणत होता.त्याने आजोबांच्या सूचनेनुसार महिनाभर आधी आरत्यांचा रोज सराव केला होता.कारण आरत्या येत असतील तरचं बाप्पा आणायचा अशी अट चिनूला त्याच्या बाबाने घातली होती.चिनूने त्याचं वचन पाळलं होतं.👦
चिनूच्या मुखातून अस्खलित ,सुश्राव्य आरती ऐकताना चिनूच्या आजीआजोबांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले.चिनूच्या आत्त्याने तर त्याची पापीच घेतला.चिनूने पटकन गाल पुसून टाकला.
चिनूच्या आईने नैवेद्याचं पान वाढलं.घरभर उकडीच्या मोदकांचा सुवास दरवळत होता.अगरबत्ती,धुप,केवडा,सोनचाफा,सगळे सुगंध एकरुप झाले होते.आजोबांनी बाप्पाला नैवेद्य दाखवला व आईने चिनूला लवकर पंगतीत जेवायला बसायला सांगितलं कारण त्यांच्या इमारतीत बेसमेंटमध्ये सार्वजनिक गणपती बाप्पाच्या इथे लहान मुलांच्या कवितावाचन,चित्रकला,निबंधलेखन अशा स्पर्धा होत्या.
चिनू खालच्या टीमचा लीडर असल्याकारणाने सगळी मुलं त्याला मोठमोठ्याने हाका मारुन खाली बोलवत होती.👬
चिनू बाप्पाजवळ उभाच होता.आई किती बडबडली, जेवायला ये पण हलेना.बाकीची मंडळीही त्याच्यामुळे जेवायची खोळंबली होती.
शेवटी चिनूचे आजोबा चिनूजवळ गेले,”काय झालं चिनूशेट?काही राहिल्यासारखं वाटतय का मुर्तीत?”
चिनू म्हणाला,”नाही ओ आजोबा मुर्ती खूप भारी झालेय.पण..पण हा बाप्पा नैवेद्य खातच नाहीए.बाप्पाने खाल्ल्याशिवाय मी मुळीच काहीही खाणार नाही.”असं म्हणत चिनू रडू लागला.😢
चिनूजवळ त्याची आजी आली.आजीने त्याला पुस्तकातला दोन ओळींचा श्लोक पाठ करायला सांगितला.चिनू आजीला कधीचं नाही म्हणत नसे,रागातही.कारण आजीआजोबा तर त्याचे बेस्ट फ्रेंड होते.
चिनूने तो श्लोक थोड्याच वेळात पाठ केला व आजीला म्हणून दाखवला.जरासा चुकला..चिनूने परत पाठ केला..परत म्हणून दाखवला.आजोबा खूश झाले पण आजी ऐकेना.आजी म्हणाली ,”नाही,चिनू कशावरुन तु श्लोक पाठ केलास?श्लोक तर अजुनही माझ्या पुस्तकातच आहे.चिनू गोंधळला.
मग आजीने त्याला तिच्या मांडीवर घेतलं, त्याचे डोळे आपल्या पदराने पुसले व चिनूला म्हणाली,”चिनूबाळ तु श्लोक पाठ केलास ते श्लोकाचं सूक्ष्म स्वरूप तु आत्मसात केलसं.स्थूल स्वरुपात श्लोक पुस्तकातल्या पानावरच रहातो.तसाच आपला हा बाप्पा आपण वाढलेला नैवेद्य सूक्ष्म स्वरुपात खातो.स्थूल स्वरुपात नैवेद्य ताटात रहातो..पण बाप्पा सूक्ष्म स्वरुपात त्याचा आस्वाद घेऊन आपल्याला अनेक आशिर्वाद देतो.”
आत्ता चिनूच्या डोक्यात प्रकाश पडला.चिनूचे डोळे लकाकले.त्याने आजीला गोड पापी दिली व सर्वांबरोबर वदनी कवळ घेता म्हणून मोदकांचा समाचार घेऊ लागला.☺️☺️
बोध: देवावर श्रद्धा असावी.
–गीता गरुड.
===================