Skip to content Skip to sidebar Skip to footer

चिंटूची सहामाही

गणपती बाप्पा आले..गेले.मग आला नवरात्रोत्सव..गरबा..दसरा..चिंट्याने सोन्याची देवाणघेवाण केली व सकाळी उठून शाळेत गेला. आज शाळा सुटताना  बाईंनी सहामाही परीक्षेचं वेळापत्रक दिलं..अन् चिंट्या जरा तंतरलाच. चिंट्याची फाटली.एवढ्ढासा वेळ हातात..कसं होणार?👼

चिंटू जिने चढताना सुधाआजीने विचारलं,”का हो चिंटूशेट  बाईं ओरडल्या का? एनी टेंशन?”

चिंट्याने कारण सांगितलं. आजीने त्याला घरी बोलावलं. छान ग्यालरीतल्या झुल्यावर बसवलं अन् गुळपापडी खायला दिली.

चिंटू एकदम खूश झाला.आजीच्या हाताला चवच भारी.😋मग तिने चिंटूच्या आईला फोन करुन चिंटू थोड्या वेळाने येईल,माझ्याकडे आहे असं सांगितलं.

आजी म्हणाली,” अरे चिंट्या घाबरतोस कशाला,रोज थोडा थोडा अभ्यास करुन ठेव प्रत्येक विषयाचा मग परीक्षेच्या आदल्यादिवशी ताण येणार नाही..धडे अगदी मन लावून दोन तीनदा वाचून काढ.तुझ्या मनाने मुद्देसूद उत्तरं लिही. सुवाच्य म्हणजे वाचता येईल असं अक्षर काढ पेपरात.

घोकंपट्टी करु नको. नाहीतर वेळेवर काही आठवत नाहीनी भितीने गाळण उडते. ब्लँक व्हायला होतं.

गाईड असेल तर दे माळ्यावर टाकून.पाठ्यपुस्तकं महत्त्वाची. त्याच्याबाहेर काही येत नाही. जुने पेपर घे आणि  वेळ लावून सोडव म्हणजे तुझा आत्मविश्वास वाढेल. आक्रुत्यांचा सराव कर.

एक दोन गुणांना असणारे जोड्या लावा,गाळलेल्या जागा भरा,एका वाक्यात उत्तरं,लघुत्तरी उत्तरं..सगळं काही धडे वाचलेस की तुला आपसूक येईल बघ. पाठ करत बसायची गरज नाही.

विज्ञानातल्या संज्ञा व इतिहासातल्या सनावळ्या एवढंच काय ते पाठ कर.

पेपर सोडवताना कोणता प्रश्न आधी,कोणता नंतर लिहायचा हे आधीच ठरवून ठेवं.तुला सोप्पे वाटत असलेले..हातचा मळ असलेले प्रश्न आधी सोडव. मग अवघड प्रश्नांची उत्तरं लिही.

पेपर सोडवून झाला की तु स्वतःच बाई आहेस असं समजून तुझा पेपर तपास. चुका दुरूस्त कर. अक्षरावर अक्षर लिहू नको. चुकलेल्या अक्षरांवर काट मार व पुढे बरोबर उत्तर लिही.

प्रत्येक प्रश्नाला योग्य प्रश्नक्रमांक घातला आहे की नाही ते तपास. परीक्षेच्या आदल्यादिवशी जागरण करु नको. निवांत झोप..नाहीतर पेपर सोडवताना डोळ्यासमोर अंधारी येते..ब्लँक व्हायला होतं,मळमळतं,डुलकी येते.

परीक्षा चालू असली तरी अधुनमधून टिव्ही बघायला काहीच हरकत नाही.आवडतं कारटून पहायचं. अधेमधे आवडीचे खेळ खेळायचे. काहीतरी खाऊ खायचा. मी तुला गुळपापडी करुन देईन ती खात जा.

अरे हाय काय नी नाय काय.कसला घाबरतोस तू सुधा आजी असताना.”

सुधाआजीने चिंटूच्या हातावर टाळी दिली.चिंट्या एकदम खूश झाला.म्हणाला,” आजी तू छान समजावून सांगितलंस. मी असंच करीन. आईबाबा नुसते सहामाही सहामाही करत बसतात. त्याने टेंशन आलेलं. आत्ता नो टेंशन. तू तो गुळपापडीचा डबा मात्र पाठवून दे हं.😋”

ता गरुड.

===================

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Leave a Comment

error: