चाकोरीबाहेर (भाग नववा)

©
सौ.गीता गजानन गरुड
जानकीला ते आपल्या वस्तीत घेऊन गेले. त्यांची अम्मा भाकऱ्या बडवत होती. धिप्पाड देहाची,केसाचा मधोभध भांग,कपाळावर मोठी टिकली,भडक साडीतली अम्मा पाहून जानकीची धडधड अजून वाढली.
जानकीला पाहून काही हिजडे चवताळले,” हाय दैया,क्यों ये आफत लेके आई?”
“अरे, वो गली के कुत्तेकमीने साले टुट पडे न इसके ऊपर.”
“तो क्या हुआ? कौनसा पहाड टूट पडा? ये खुदकी रक्षा खुद नहीं कर सकती क्या? खाली बडी बडी बातें करते है ये बडे लोग. इनके सोसायटी में गये तो भिकारी के माफीक भगा देते है हम लोग को।” चमेली वेणी हलवीत बोलली.
अम्मा एका हाताने तिला थांबवत म्हणाली,”चमेली,सब लोग एक जैसे नहीं होते। सबको एक माप से मत तोल।”
अम्माने जानकीला पाणी दिलं. चटणीभाकरी खायला लावली. तिच्या डोक्यावरुन मायेने हात फिरवला तसा जानकीचा धीर चेपला.
चमेली जानकीच्या समोर बसत म्हणाली,”अम्मा से डर मत पगली। हम लोग कोई भूतपिशाच नहीं है।
तुम्हारे जैसे ही इन्सान है। हाँ,वो बात अलग है कि तुम लोग हमें इन्सान नहीं समजते।”
अम्मा म्हणाली,”अब चुप भी कर चमेली। अपना अपनेपास रख। कभी भी सुख बाँटने का।
अब जाके सो जाओ तुम लोग।
कल पंडित के घर बेटा हुआ है वहाँ बधाई देने जाना है तुमको। अच्छी तरह से सजधज के जाना।”
अम्माचा निरोप घेऊन सगळ्या झोपायला गेल्या.
रात्री जानकीने तिची कहाणी अम्माला सांगितली नि कुठेतरी वुमन होस्टेलमधे माझी सोय कर अशी याचना केली.
अम्मा बोलली,”बेटी,तू डर मत। अपने मायके आयी है ऐसे समझ। इधर तुझे कोई धोखा नहीं होगा। अब तू मेरी जिम्मेदारी है।
जल्द ही मैं तेरे रहेने का इंतजाम किसी हास्टेल में करवा दुँगी। तब तक इस माँ की हाथ का खाना खाएगी ना क्या बाहर से मँगाऊ तेरे लिए?”
“अम्मा तेरे हाथ का ही खिला मुझे।” असं जानकी म्हणताच अम्माने तिच्या गालावर कडाकडा बोटं मोडली.
“राघवच्या आततायी बोलण्यावर वत्सलाबाई त्याच्यावर कडाडल्या होत्या. “या घरात कुणाला राहू द्यायचं न कुणाला नाही ते मी ठरवणार राघव. लोकांना मी घाबरत नाही. मी माझ्या मनाचं ऐकते.
माझ्या मनानं.मला कौल दिला..ती मुलगी कात्रीत सापडलीय..तिला आधार द्यायचा..बास..यावर आता अजून भाष्य नको.”
“तुम्ही स्वतःला महाराणीच समजता ना वत्सलाबाई, पण कधीतरी सिंहासनावरुन खाली उतरा नि सामान्य माणसांसारखं वागा मग तुम्हाला माझ्या बोलण्यातला मतितार्थ कळेल.”
“राघव, तुमचं बोलून झालं असेल तर तुम्ही जाऊ शकता.” वत्सलाबाई म्हणताच मुठी आवळत राघव आपल्या खोलीत निघून गेला.
मायामावशीही गप्प गप्प होती. रात्र होत आली तशी पानं घेऊ का विचारू लागली.
वत्सलाबाई जानकीचा मागमूस नाही म्हणून हाक मारायला व जेवायला बोलवायला गेल्या.
जानकीस साद देऊनही काहीच जाग मिळेना तसं त्यांनी दार ठोकवायला सुरुवात केली तर लोटलेलं दार आपसूक उघडलं.
दांडीवर जानकीचे कपडे नव्हते. पुस्तकं नव्हती.
गेली कुठे ही पोरगी आणि तेही या अवस्थेत.
वत्सलाबाईंनी मावशीला बोलवून घेतलं.
“बघितलंस माया,चिरंजीवांचे प्रताप. यांच्या अरेरावी बोलण्यामुळेच जानकी निघून गेली असणार.”
“अरे कर्मा, कुठे गेली असेल पोर. तिला ना आई ना बाप ना भाऊ ना बहीण. पोलीसात कळवूया का आपण?” मावशी काकुळतीला येत म्हणाली.
“नको,पोलीसांत नको. आम्ही आमची माणसं लावतो कामाला. जास्त लांब नसणार गेली ती.”
“हेलो जगदिश.. अशी अशी बाई..मी फोटो पाठवते बघून घे..लवकरात लवकर शोधून आण तिला. आणि हो तिच्या केसालासुद्धा धक्का नाही लागला पाहिजे, समजलं.”
“चल माया, तो वरचा आहे ना तो सुरक्षित ठेवेल आपल्या जानकीला. त्याच्यावर विश्वास ठेवू आपण.”
“बरं झालं गेली ब्याद.” राघव हात झटकत म्हणाला.
“थोडं तरी माणुसकीने वागा राघव,”वत्सलाबाई कडाडल्या.
“आंटी कुठे गेली आज्जी? मला आंटीची आठवण येतेय खूप. माझा प्रोजेक्टपण राहिलाय करायचा.” चिनू रडवेला झाला..मुसमुसू लागला.
राघवने त्याच्या बनियनने चिनूचे डोळे पुसले.”चल चिनू तू नि बाबा मिळून प्रोजेक्ट करू. कसला प्रोजेक्ट करायचाय तुला,सांग पटापट.”
चिनूने अर्धवट रंगवलेला पॉट ,पेन्सिल आणून राघवच्या हातात दिली.
“हे डिझाइन अर्ध्या पॉटवर आंटीने काढून दिलय तसंच सेम टू सेम काढा उरलेल्या भागात.नंतर मला पेंटींगलापण मदत लागेल.”
राघवने जानकीने काढलेलं चित्र पाहून काढायचा प्रयत्न केला पण त्याची चित्रकला सुमार दर्जाची असल्याकारणाने त्याला ते जमेना.
शेवटी चिनूनेच ते चित्र कसंबसं काढलं नि रंगवलं.
आंटी असती तर याहून कितीतरी छान रंगवून झालं असतं..आंटी कलर कॉम्बिनेशन बरोब्बर सांगते..तुम्ही तर काय तरी उलटंपुलटं सांगता..चिनू गाल फुगवत म्हणाला.
“उद्या येईल बाळा तुझी आंटी,” मावशीने त्याची समजूत काढली.
राघवला मात्र सुंठीवाचून खोकला गेल्यासारखं वाटत होतं कारण तो नकळत का होईना जानकीकडे ओढला गेला होता..तिचा नजीकपणा,तिच्या उरांचं धपापणं त्याच्या छातीला अजुनही जाणवत होतं आणि मग निलांबरीची आठवण येऊन तो व्याकुळ होत होता.. त्याला अधिकच अपराध्यासारखं वाटत होतं.
दुसरीकडे त्याचंच मन त्याला विचारत होतं,” असा त्रागा करुन काय मिळवलंस. ती धडकली असेल अजाणतेपणी..पण म्हणून या अवस्थेत तीचं घराबाहेर पडणं..कुठे गेली असेल ती..राघवला झोप येईना. फार अपराधी वाटू लागलं..त्याचंच मन त्याला आता खाऊ लागलं.
जर तिचा हेतू वाईट असता तर मग ती घर सोडून गेलीच नसती..
रात्रभर, तो सज्जात येरझारा घालत होता नि अधनंमधनं त्याची नजर गेस्टरुमकडे जात होती. सज्जातला दिवा पेटत असलेला पाहून मायामावशीने राघवच्या रुमच्या दारावर टकटक केलं. राघवने दार उघडलं.
“मावशी,तू..झोपली नाहीस अजून..”
“तुम्हाला असं तडफडताना पाहून नीज येईल का मला?”
“काय करु मी मावशी..कशाला वत्सलाबाईंनी त्या मुलीला जवळ केलं..कोणाचं पाप घेऊन फिरत असेल कुणास ठाऊक..”
“राघव” मायामावशी कडाडली.
“एका स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवताय तुम्ही. एकदाही असं नाही वाटलं तुम्हाला, की तिचीही काही बाजू असेल..ती समजून घ्यावी..
राघव, अहो बाप परागंदा झाला जानकीचा तेव्हापासनं आईनं सांभाळ केला तिचा..नातेवाईकांनीही पाठ फिरवली होती.
दोघी सोबतीने रहात होत्या तर काळाचा घाला बसला नि मायलेकीची ताटातूट झाली. आईविना पोर ती, मामाकडे राहू लागली तर तिथेही सुख मिळालं नाही तिला..
वाळवंटात नंदनवन भेटावं तसा तो मामाच्या घरातला भाडोत्री तिला वाटला..पण त्याने व त्याच्या पत्नीने जानकीच्या निष्पापपणाचा गैरफायदा घेतला.
तुला दुसरेपणाला करुन घेऊ सांगत तिच्याशी संबंध ठेवले न् पोर फसली ओ. तुम्हीच सांगा..अशा फसलेल्या मुलींनी विहीर जवळ करावी की विष घेऊन पोटातल्या बाळाचा नि स्वत:चा जीव द्यावा..”
“माझं खरंच चुकलं मावशी.” राघव मान खाली घालून म्हणाला.
“आणि पाप म्हणता न् तसं काही नसतं राघव…देवाचा अंश असतो तो जो स्त्रीच्या उदरात रूजतो. माझ्यासारख्या अभागी स्त्रीला विचारा..बाळाची किंमत..”मावशीने डोळ्याला पदर लावला.
“मावशी गं चुकलो म्हंटलं ना मी. बरं झालं माझे डोळे उघडलेस,” मावशीचे हात हातात घेतत राघव म्हणाला.
जानकीला मात्र कितीतरी दिवसांनी अम्माच्या सानिध्यात आईची उब मिळाली होती.
पहाट झाली तशी अम्मा उठली.
जानकीचा हात तिच्या पोटावर होता. तिने तो अलगद बाजुला केला.”भगवान,तेरा लाख लाख शुकर है। कुछ दिन के लिए तो मुझे इस लडकी की माँ बनाया। आज ही इसके लिए होस्टेल ढुंढने बोलती हुँ। जी तो करता है,इसको मेरे पास रखू।
इसकी डिलीवरी करु। फिर मुझे नाती मिलेगा पर नहीं ज्यादा लोभ बुरी बात है। इसे इसके लोंगोंमेंही भेजती हूँ, पर नजर रखुंगी सदा। इसको संभालुंगी फुल की तरह।”अम्माने जानकीच्या गालावरुन हात फिरवला.
चमेलीने चहा ठेवला होता.
शबनम,छम्मोला ती हाकारत होती. जानकी उठून बसली होती. शबनम,चमेली,छम्मो न्हाऊन आल्या.
आज त्या भरजरी साड्या नेसल्या होत्या. भरपूर पावडर,भडक लाल तांबड्या लिपस्टीकी,अंगभर इमिटेशन ज्वेलरी,आय मेकअप, डिझायनर बिंदी,केसांच्या हेअरस्टाईल्स,त्यावर लावलेल्या खड्यांच्या पिनी..कुठेतरी फंक्शनलाच चालल्या असाव्यात असं वाटत होतं.
अम्माच्या हातचा गरमागरम नाश्ता खाऊन त्या निघाल्या. कुणाच्या खांद्यावर महागडी पर्स तर कुणी रत्नजडीत पोटली हातात मिरवीत होती.
अम्माच्या आवाजाने जानकी भानावर आली,”क्या देख रही है जानकी? ये चमकदमक..ये सब करना पडता है री।
ताली बजानी पडती है। तब जाकर ये पापी पेट भरता है हमारा। हम को भी लगता है हमारी भी औलाद हो,नाती हौ पर नहीं हो सकता यह सब।”
मग तिने जानकीच्या पोटावर हात फिरवत म्हंटलं,”आज मैं तेरे लिए श्रीखंडपुडी बनाती हुँ। खाएगी ना।”
जानकीने होकार दिला. मोरीत आंघोळ करायला गेली.
दुपारी ती तिची पुस्तकं वाचत बसली पण चिनूच्या आठवणीने तिच्या मनात कालवाकालव होत होती.
चिनूचे प्रश्न..तुझ्या पोटातलं बाळ कधी बाहेर येणार आंटी? ते तुझ्याशी बोलतं का? ते मला दादा म्हणेल नं..किती प्रश्न..जानकी त्या गोड आठवणी आठवून एकटीच हसू लागली.
संध्याकाळी सगळ्याजणी घरी परतल्या. टाळ्या वाजवत शबनम म्हणाली,”आज एक *ने छम्मू की साडी खींची। कोई बडे की औलाद थी। क्या करते हम। तालिया बजाबजाकर गालियाँ दी *को।” एक तो कोई नौकरी नहीं देता। ऐसे घुमकर पैसा माँगते है तो इनकी खोटी नियत वो भी करने नहीं देती।”
अम्मा म्हणाली,”होते है कोई गंदे लोग। क्या करे इसी दुनिया में जीना है हम लोगों को। “
ताटात श्रीखंडपुरी पाहून छम्मो भडकली,”ये क्या मटन नहीं बनाया अम्मा? ये मीठा क्यों? इस चिकनी के लिए क्या?”
“जबान संभालकर बात कर छम्मो। वो मेहमान है हमारी।”अम्मा ओरडली..तशी छम्मो गपचूप जेवली. मोरीत आचवायला गेली तर सकाळचे बादलीतले कपडे गायब.
“अम्मा,तेरी तबियत ठीक नहीं रहेती। क्यों धोये तुने कपडे?” शबनम विचारताच अम्मा म्हणाली,”अरी मैने कहाँ, मेरे से नहीं होता। तुम्हारे कपडे जानकी ने धोये। सुखाके भी रखे है।” हे ऐकताच शबनम,चमेली,छम्मो..सगळ्या जानकीवर खूष झाल्या.
—————
आज तरी आंटी आली असेलना..चिनू विचार करत घरी आला..पण आंटीचा पत्ता नव्हता.
दारात आंटीने काढलेली सुरेख रांगोळी नव्हती. देव्हाऱ्यात आंटीने गुंफलेले हार नव्हते.
चिनूने एवढूसं तोंड केलं. न जेवताच तो बिछान्यावर पालथा पडून मुसमुसत राहिला. मावशीने त्याला हरतर्हेने समजावलं पण काही उपयोग झाला नाही.
वत्सलाबाईंनी ऑफिसातून जगदीशला फोन लावला,”जगदीश,तुला काम सोपवलेलं आठवतय ना! काही ट्रेस लागला का?”
“मेडम, मी सगळ्यांना कामाला लावलय. सगळी वुमेन हॉस्टेलं पिंजून झाली. कुठेच पत्ता नाय पन प्रयत्न चालूएत बघा.”
वत्सलाबाईंनी फोन ठेवला नि केबिनमधे येरझारा घालू लागल्या.
राघवला वत्सलाबाईंच्या हालचाली दिसत होत्या..त्यांचा अस्वस्थपणा,त्यांची तगमग कळत होती. वाटत होतं..जावं त्यांच्याकडे..सॉरी म्हणावं पण शब्दांची जुळवाजुळव होईना.
मावशीबाईंचा फोन आला,”चिनूला ताप भरलाय. डॉक्टरांना बोलवून आणलं. औषध देऊन गेलेत,” म्हणाली.
राघव वत्सलाबाईंसोबत घरी पोहोचला.
रात्रीपण चिनूने काहीच खाल्लं नव्हतं. तापाने ओठ लालबुंद झाले होते.
डॉक्टर परत आले. ताप उतरत नाहीसं पाहून तेही काळजीत पडले.” कसली धास्ती घेतलीय का याने..परीक्षा वगैरे.”
“नाही ओ डॉक्टर,उलट आता तर पुर्वीपेक्षा कितीतरी सोप्पे जातात त्याला विषय.”वत्सलाबाई काकुळतीने म्हणाल्या.
“चिनूबाळा डोळे उघड..डोळे उघड राजा.” राघवच्या हाकेने चिनूने डोळे उघडले.
क्रमश:
जानकीची सोय होस्टेलमध्ये होईल का?
चिनूला कधी बरं वाटणार?..जाणून घ्यायचंय नं..भेटू पुढच्या भागात.
–सौ.गीता गजानन गरुड.