Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©️®️गीता गजानन गरुड.

जानकी,मायामावशीला आपली कहाणी सांगत होती..

मला दया आली त्याची. एका रात्री सगळी निजानीज झाली असताना, मी त्याच्यासोबत पळून गेले. मामाने बहुधा मला शोधण्याचा प्रयत्न केला नसावा. मी त्याच्या भाडोत्र्यासोबत पळून गेले हे उघड होतं.

त्याच्या घरी त्याच्या पत्नीनं माझं स्वागत केलं.
फार छान बोलायची ती माझ्याशी,अगदी सख्खी बहीण जशी. कसला पोटाचा रोग झालाय सांगायची.

दिवसभर मी त्यांच्यासोबत असायचे. तिच्या हाताखाली थोडीबहुत कामं करायचे. मामाकडच्या ढोरकामाचा मलाही उबग आला होता. मामाचं घर सोडून आले ते बरंच केलंसं वाटू लागलं. रात्री तो माझ्या खोलीत झोपायला येऊ लागला. पहिलंपहिलं मला, मी त्याच्या बायकोची प्रतारणा करतेय असं वाटायचं.

मी अजिबात खुलत नसे, अंग आकसून घ्यायचे मग एकदा तीच म्हणाली..”माझ्या आजारपणामुळे मी यांना  पत्नीसुख देऊ शकत नाही.
तू मनात कुठलाही किंतु न बाळगता माझ्या पतीशी संग कर. वैशाखात मी स्वतः तुझं यांच्याशी लग्न लावून देईन,मग मी डोळे मिटायला मोकळी. “

एवढं सगळं तिने सांगितल्यावर माझा तिच्यावर विश्वास बसला. पोटदुखीचा असा काही बेमालूम अभिनय करायची की बघणाऱ्याच्याच पोटात कळा याव्यात. मी तिच्या भूलथापांना बळी पडले. मनात म्हंटलं, सवती होणार असलो म्हणून काय झालं..राहू बहिणीबहिणीसारख्या.

नाहीतरी मामा माझं लग्न एखाद्या म्हाताऱ्याशी,बीजवराशी अथवा व्यसनी माणसाशी लावून देणार असता त्यापेक्षा या माणसाची दुसरी पत्नी बनून रहाणं काय वाईट! मी साधासरळ विचार केला आणि सर्वार्थाने त्याच्या स्वाधीन झाले..

माझं सर्वांग तो चेतवत होता. मला उत्तेजित करुन मगच आपला कार्यभाग साधायचा. कुठलीही जोरजबरदस्ती नव्हती. अशा कितीतरी रात्री आम्ही प्रणयाराधनेत एकत्र जागवल्या. माझं तारुण्य मी त्याच्यावर उधळलं. नदी जशी सागराशी समर्पित होते तशी मी त्या माणसात समर्पित झाले. माझ्या अंगाखांद्यांवर त्याचं अस्तित्व उमटू लागलं तशी त्याची बायको माझे अधिकच लाड करु लागली.

मीही फुशारले..त्याच्या अधिकाधिक जवळ गेले नि शेवटी व्हायचं तेच झालं.  त्याने त्याचा ठसा माझ्या उदरात उमटवला.

माझी पाळी चुकली. मला गरगरु लागलं.अस्वस्थ वाटू लागलं,उलटी,मळमळ..ती बेहद्द खूष झाली. तिनं गोल गिरक्या घेतल्या.. ती इतकी हसत होती..इतकी हसत होती..जणू हर्षवायूच झाला असावा..मीही आनंदले. रात्री तो माझे अजून लाड करेल या विचाराने माझं सर्वांग पुलकित झालं. आईची आठव आली. आईचा बारीकसा फोटो माझ्यापाशी होता..तो उजेडात धरला..फोटोसमोर बसले नं डोळे मोठे करुन आईला सांगितलं,”बघ आई, नातवंड येणार हाय तुझं. खूष ना तू आता. आशीर्वाद दे तुझा..”असं म्हणून फोटोजवळ मस्तक टेकवलं.

जेवणं झाल्यावर मी माझ्या खोलीत बसले होते. रातराणीला स्पर्शून वाऱ्याची मंद झुळूक खोलीत शिरली. आकाशात चांदण्यांचा मंडप सजला होता. चांदवा उठून दिसत होता..मी लटकेच त्याला म्हंटलं..थांब, माझा चांदवाही येईल थोड्याच वेळात आणिक खुदकन हसले, गालातल्या गालात. आरशात पाहिलं मी निरखून स्वतःला..बदललेय का मी..गालांना हात लावला. पोटावर हात ठेवला न् आतल्या त्या सजीव जीवाला म्हंटल़ं..आता येतील पप्पा. तुझ्याशी बोलतील, गप्पा करतील..बघच तू आणि मग परत आरशात पहात म्हणाले..तुझ्याशीही बोलतील हो.

मी त्याची वाट पाहून दमले..थोडा रागच आला मला..आल्यावर चांगलं धारेवर धरायचं ठरवत होते, इतक्यात ती दोघंही माझ्या खोलीत आली. ती म्हणाली,” जानकी, मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐक..कोणती पत्नी आपला पती कोणा दुसऱ्या बाईंच्या हवाली करेल..मी केला..त्याला कारण आहे. मी चार वेळा दुवेतली. तिसऱ्या चौथ्या महिन्यातच गर्भपात व्हायचा. मला मूल हवंच पण ते माझ्या नवऱ्याचा अंश असलेलं हवं.

तुझ्याबद्दल हे बोलले तेंव्हाच मी ठरवलं..तूच आम्हाला बाळ देऊ शकशील. अर्थात तू तयार झाली नसतीस.. म्हणून काही दिवस यांनी माझ्या संमतीने तुझ्याशी नवराबायकोचे संबंध ठेवले, तुझ्या मनात किंतु येऊ नये म्हणून मला उदरशूल असल्याचं खोटंच सांगितलं, तुझं लग्न यांच्याशी लावून देईन असं बोलले तुला आणि तू खरं मानलस..इतकी कशी गं खुळी तू! अजागळ तर आहेसच..बावळटही आहेस. सगळंच खरं मानलंस..

तुझ्या उदरात यांचा अंश उमलला. आमच्या प्रयत्नाला यश मिळालं..आजवर तुझे उगाच का लाड केले मी!पण,आता मात्र तुला स्पष्टच सांगतो..हे मूल जन्माला आलं की तू ते आमच्या स्वाधीन करुन निघून जायचंस. याबदल्यात तुला योग्य तो मोबदला आम्ही देऊच. इथे तुला कशाचीही ददात पडणार नाही. तुझं बाळंतपण होईस्तोवरचा सगळा खर्च,तुझी साडीचोळी,जेवणखावण सारं आम्ही पाहू.”

मी डोळे विस्फारून त्या नवराबायकोकडे पहात होते. त्या दोघांनी माझ्या विश्वासाचे लचके तोडले होते.

मला जाळ्यात अडकवलं होतं त्यांनी आणि..आणि मी सहजगत्या अडकले होते.. एखादा भ्रमर कमलपुष्पाकडे आकर्षित व्हावा न् कमळाने आपल्या पाकळ्या मिटून घ्याव्यात तशी माझी अवस्था झाली होती. माझ्या आयुष्याची माती केली होती, त्या नवराबायकोंनी.

मी..मी थडाथड माझ्या थोबाडीत मारत सुटले..किंचाळले..ओरडले..खूप खूप रडले. भिंतीवर डोकं आपटलं. त्याच्याकडे लाचारीने पाहिलं. मला वाटलं ..तो माझी बाजू घेईल..पण तोही हसत होता.

ती छद्मीपणे हसत म्हणाली,”रडून, असा हंगामा करुन काहीच उपयोग होणार नाही,जानकी. इथून बाहेर गेलीस तर तुझीच शीथू होईल. कुमारीमातांना जगात काय मान मिळतो ते तू जाणतेसच! त्यापेक्षा इथे मानाने रहा.”

एकदीड आठवडा मी कसाबसा घालवला, तिथे. मला सारखी आईची आठवण यायची. ती हयात असती तर..तर मी मामाकडे रहायला गेलेच नसते आणि मला तो नराधम भेटला नसता..मी त्याच्या मायावी थापांना भुलले नसते.

आतासा तो रात्री त्याच्या बायकोसोबत असायचा. मला त्याच्या शरीराची घ्रुणा येत होती..रात्र रात्र तळमळत असायचे मी..स्वतःलाच कोसायचे..अशी कशी फसले म्हणून..

ती मला दटावून खायला लावायची. एका दुपारी, ती दोघं देवळात गेली होती, नवस फेडायला.  मी स्वतःला बजावलं..हीच संधी आहे जानकी..पळत सुट.. मागीलदाराने पळत सुटले. माझ्यापाशी त्याने दिलेले थोडे पैसे होतेच. मी एसटी पकडली. शेवटच्या स्टॉपला उतरले. पोटात अन्नाचा कण नव्हता. अंगात चालायचं त्राण नव्हतं. समोरच पाणपोई होती. कशीबशी पावलं टाकत तिथवर जाण्यासाठी रस्ता ओलांडत होते..थोडं अंधारल्यासारख़ झालं..पाऊल पुढेच टाकता.येईना. तोल जाऊ लागला.. दुरुन येणाऱ्या गाडीची धडक लागली आणि पुढचं तुम्हाला ठाऊक आहेच मावशी.”

मावशी तिच्या डोक्यावर हात फिरवत राहिली.”एकेकाचे भोग असतात पोरी. भोगावेच लागतात. तुझे भोगून झाले समज. वत्सलाबाईंच्या छत्राखाली आलीस ना..आता भिती सोड. सगळं नीट होईल बघ. आणि हो अशी दु:खी राहू नकोस. तुला बाळ हवं नं तुझं.”

“हो मावशी,माझ्या रक्तामासाचं बाळ मी का नाकारु. माझ्या बाळाची काय चुकी! मी वाढवणार त्याला. आता बाळासाठी जगेन मी.”

“बरं मग आनंदी रहायचं आता. कसलाच विचार करायचा नाही. भूतकाळात गुरफटून रहायचं नाही. तुला पुढे शिकायची इच्छा असेल तर तसं सांग, वत्सलाबाईंना..त्या तुझ्या शिक्षणाची व्यवस्था करतील.”

मावशी निघून गेल्यावर जानकी थोडावेळ बागेत फिरली. नुकताच पाऊस पडून गेल्याने पानापानांवर पाण्याचे थेंब चमकत होते. पायाखालचं ओलेतं गवत  मऊशार लागत होतं.

रात्री वत्सलाबाई जानकीला बंगल्यात घेऊन आल्या. वत्सलाबाईंनी तिची चिनूशी ओळख करुन दिली. चिनूला घर बनवायचं होतं पुठ्ठ्याचं.

उद्याच्या उद्या शाळेत न्यायचं होतं. नेमका राघव बाहेरगावी गेल्याने आता एका रात्रीत घर बनवायचं कधी नि झोपायचं कधी चिनूला मोठा प्रश्न पडला होता. वत्सलाबाईंनी असं सांगताच जानकी त्याच्याजवळ गेली. तिने कात्रीने पुठ्ठ्याचे काही आकार कापले व ते चिनूला जोडून दाखवले.

चिनूचे डोळे चमकले. जानकीने जुना झाडू मागून घेतला. त्याच्या काठ्यांनी दारं,खिडक्यांच डिझाइन तयार केलं. छतावरती झाडूची पुढची टोकं चिकटवली.

अगदी फार्म हाऊस जसं तयार झालं. चिनूने टाळ्या वाजवल्या. मग सगळीजणं एकत्र जेवली. मावशी जानकीसोबत झोपायला जाणार होत्या पण जानकी म्हणाली,”खरंच नको. मी झोपेन एकटी.”

चिनू म्हणाला,”तुला भीती नाही वाटत अंधाराची?”
यावर सगळीच हसली. चिनू आता अडलं काही तर बिनदिक्कत जानकीला विचारु लागला.

वत्सलाबाईंनी तिचं मुक्तविद्यापीठात नाव घातलं. तिचा अभ्यास सुरु झाला खरा पण डोहाळेही कडक लागले होते. तिचं खाणं कमी झालं होतं. वत्सलाबाईंनी तिचं इस्पितळात नाव घातलं.

मावशी तिला नियमित औषधगोळ्या घ्यायला लावत होत्या. मेतकूट भात, ताकाची कढीभात..असं तिला जे पोटात जातय ते करुन खायला घालत होत्या. मावशीच्या रुपात जानकीला तिची आई दिसायची. चिनूही बाहेर ट्युशनला जाण्याऐवजी जानकीसमोर बसून अभ्यास करु लागला होता. जानकीला ओकारी आली की विचारायचा,”तू बाहेरचा वडापाव खाल्लास का? तू सारखंसारखं बाहेरचं का खातेस?” जानकीला त्याचे बाळबोध प्रश्न ऐकून हसू यायचं.

वीस दिवसांनी रात्री राघव परत आला. मावशीने त्याला जेवायला वाढलं. चिनूसाठी त्याने भरपूर चॉकलेट्स व गाड्या आणल्या होत्या. राघव चिनूच्या खोलीत गेला. चिनू शांत झोपला होता.बऱ्याच दिवसांनी लेकाला पाहून राघवला बरं वाटलं. त्याने चिनुच्या गालाची पप्पी घेतली.

“मावशी,त्रास नाही दिला नं तुला चिनुने?”

“त्रास कसला..थोडा हट्टी आहे इतकच.पण आता बऱ्यापैकी शांत झालाय हं चिनूबाळ.”

“तो कसा?”

“आहे एक गंमत,” मावशी मिश्किलपणे हसत म्हणाली.

“असो. आता मला प्रचंड झोप आलेय. मी झोपतो  जाऊन.” असं म्हणत राघव वरच्या मजल्यावरील त्याच्या खोलीत निघून गेला.

नऊएक वाजता त्याला जाग आली. तो नेहमीच्याच बिन बाह्यांच्या बंडीवर व बॉक्सरवर दात घासत बाहेर आला. वत्सलाबाई केंव्हाच्या निघून गेल्या होत्या.

भरतकाम केलेला आकाशी चुडीदार घातलेली, ओलेते केस पाठीवर सोडलेली जानकी, मावशी मावशी हाकारत आली. ती राघवला धडकली. तिच्या ओढणीच्या ओचातली जुईची फुलं खाली विखुरली.जानकीने वर मान करुन त्याच्याकडे पाहिलं नि बाजूला होणार इतक्यात तिच्या केसांची बट राघवच्या लॉकेटमधे अडकली.

“अहो अहो थांबा जरा.” राघवच्या तोंडून अस्पष्टशे शब्द निघाले. पाच मिनिटं तरी दोघं त्या अवघड अवस्थेत लॉकेटमधून बट सोडवण्याच्या प्रयत्नात होती.  जानकीची बट त्या खेचाखेचीत दुखावली..हलकासा राग तिच्या चेहऱ्यावर उमटरला. राघवनेच शेवटी अलगद एकेक केस सोडवला नि कशीबशी एकदा जानकीची  सुटका झाली तशी ती खोलीवर पळाली. राघवने ती फुलं वेचून टेबलवर ठेवली,तितक्यात मावशी बाहेर आली.

“अगं बाई,जुईची फुलं..जानकी येऊन गेली का! किती मागे लागलेली पोर मला गजरा शिकव म्हणून. पावसाने पार झोडपून गेली होती वेल. आता कुठे बहरतेय.”

“अगं पण मावशी कोण ही जानकी? आणि तिचं आपल्याकडे काय काम?”

क्रमश:

चिनूला जानकी आंटी आवडली..राघवचं काय? आवडेल का ती राघवला..का अजुन काही वाढून ठेवलय जानकीच्या नशिबात.. पहायचंय नं..नक्की भेटुया पुढील भागात. प्रतिक्रिया देत रहा.

–सौ. गीता गजानन गरुड

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *