
©️®️गीता गजानन गरुड.
हॉस्पिटलची फीज भरुन वत्सलाबाईंनी जानकीला गाडीत बसवलं. मावशीलाही जानकीस घेऊन येतोय अशी वर्दी दिली.
मावशीने जानकीला घरात घेतलं.
वत्सलाबाईंचं एवढं मोठं घर ..आतलं उंची फर्निचर, मऊमुलायम गालिचे, गुळगुळीत भिंती,त्यावर लटकवलेली निसर्गचित्रे नि आकाशातले तारेच जणू घरात आणून टांगलेत असे चमचमणारे भव्यदिव्य झुंबर पाहून जानकी अंग चोरुन बसली.
मायामावशीने तिला चहा आणून दिला. तो पितानाही तिच्या हातातली कपबशी थरथरत होती. वत्सलाबाईंना तिचा संकोचलेपणा जाणवला.
वत्सलाबाईंनी तिच्या पाठीवर हात ठेवत तिला थोपटलं. कितीतरी वर्षांनी असा मायेचा हात आपल्या पाठीवरुन फिरतोय हे तिला जाणवलं..त्या तेवढ्याशा सुखानेही ती दचकली.
वत्सलाबाई मावशीला म्हणाल्या,”माया, मी हिच्यासाठी कपडे वगैरे संध्याकाळी येताना घेऊन येते. बरं,हिच्या रहाण्याची काय व्यवस्था?”
“त्याची तुमी काळजी करु नका,बाईसाहेब. गेस्टरुम गेल्याच आठवड्यात साफ करुन घेतलीय. आज बेडशीट बदलली. फुलदाणीत फुलं लावून ठेवलीत.”
वत्सलाबाईंनी समाधानाने मान डोलवली व जायला निघाल्या.
मावशी,जानकीला गेस्टरुममधे घेऊन गेली.
“जानकी बाय, आजपासून तू इथं रहायचं. कोणताही किंतु मनात आणू नकोस. काही दुखलंखुपलं तर निसंकोचपणे सांगायचं मला.”
या घरात आल्यापासनं प्रथमच जानकीने तोंड उघडलं,
” मावशी,..चालेल नं मावशी म्हंटलं तर..”
“अगं हो,किती घाबरतेस. नक्की आवडेल मला तू मावशी म्हणलेलं. या घरात वत्सलाबाई, त्यांचा मुलगा राघव,नातू चिन्मय,मी आणि इतर नोकरचाकर रहातात. मीही एक आश्रित या घरची पण तसं मला कधीच जाणवू दिलं नाही या घराने, घरातल्या माणसांनी.
बरं तू आराम कर जरा. समोर बगिचा आहे. सुगंधी फुलझाडं आहेत. पोर्चमधे झोपाळा आहे. बिनदिक्कत जाऊन बैस. बरं वाटेल तुला. गोष्टीची पुस्तकं वगैरे वाचायची आवड असेल तुला तर त्या शोकेसमधे छानछान पुस्तकं आहेत. विजया वाड,शांता शेळके,मंगला गोडबोले..सगळ्या भेटतील तुला. वाचावं माणसानं. वाचनाने आयुष्य सम्रुद्ध होतं. मनावरचा ताण हलका होतो.”
“माझ्या मनावरचा ताण नाहीसा होणं कठीण आहे मावशी. सगळं गमावलेली आहे मी.”
“असं बोलू नये राणी. तुझी हरकत नसेल तर कर मन मोकळं माझ्याजवळ. सांगावसं वाटलं तरच हं.”
“हो मावशी..म्हणतात ना दु:ख कुणालातरी सांगितल्याने हलकं होतं. माझं हक्काचं कुणीच राहिलं नाही आता.
तुमच्याशी बोलून बरं वाटलं. तुम्हालाच सांगते माझी कर्मकहाणी.. मावशी,माझं गाव तिकडे दूर सुखरपेंडीमधे.
माझे वडील माझ्या जन्मानंतर काही दिवसांत परागंदा झाले. आईने खूप शोध घेतला म्हणे पण कुठेच ठावठिकाणा लागला नाही त्यांचा.
तसे चुलते आहेत मला पण वडील परागंदा झाल्यानंतर काही महिन्यांतच त्यांनी हाकलून लावलं आईला. एक छोटसं खोपटं बांधून त्यात आई मला घेऊन राहू लागली.
लोकांच दळणकांडण,पाणी भरणं..असं करुन आम्हा दोघींचा चरितार्थ चालवू लागली. आईच्या मायेच्या पंखाखाली मी मोठी होत होते. तिने मला शाळेत घातलं. शिकायची मला फार आवड होती.
मास्तर आई कुठे भेटली की तिला अभिमानाने सांगायचे,”लताबाई,तुमची लेक नाव काढणार. एकपाठी आहे पोर. खूप शिकवा तिला.” मास्तरांचे हे बोल ऐकले की आईचं काळीज सुपाएवढं व्हायचं. आई माझ्यासाठी शेवबुंदी घेऊन यायची. मला मालपोहे करुन घालायची. मी खाताना, कौतुकाने बघत बसायची.
चांगलं चाललं होतं आम्हा मायलेकींचं. एकमेकींच्या आधारानं जगत होतो. तिला मी न् मला ती. पण नियतीचा डाव काही वेगळाच होता.
आई माझ्यासाठी दहावीची पुस्तकं घेऊन आली होती. खूप अभ्यास कर..गावाचं नाव कर, जानके, माझ्या गालांवर तिचे रापलेले हात फिरवत सांगायची.
अजुनही तो दिवस आठवतो मला. आई नदीपल्याड कामाला गेली होती. सगळीकडे अंधारुन आलेलं. शाळा लवकर सोडली होती. मी मैत्रिणींसोबत भरभर चालत घरी आले.
दुपारचे दोन वाजले तरी आईचा पत्ता नव्हता. आईच्या वाटेकडे डोळे लावत मी कशीबशी भाजीभाकरी खाल्ली. वाऱ्याचा झोत घोंगावत ओसरीवर आला. भिंतीवरील क्यालेंडरची पानं फडफडू लागली. पालापाचोळा हवेत गिरक्या घेऊ लागला. झाडं जणू झिम्मा खेळत होती. कोणत्याही क्षणी,उन्मळून पडतील असं वाटत होतं. लख्खकन चकाकलं. विजेचा लांब आसूड आकाश फाडून बाहेर आला आणि लुप्त झाला. पाठोपाठ प्रचंड कडकडाट झाला.
मी पाय छातीशी गच्च धरुन माजघरातल्या भिंतीला टेकून बसले. आकाश पुन्हा लकाकू लागलं. मी कानात बोटं घातली,डोळे गच्च मिटून घेतले. कुणीतरी सपासप मारावं तसे पावसाचे सपकारे सुरू झाले. पाऊस न थांबता कोसळू लागला. घरात बऱ्याच ठिकाणी गळू लागलं,तिथं भांडी न्हेऊन लावली.
तिन्हीसांज झाली तरी पाऊस आवरायचं नाव घेत नव्हता. जणू उभा दावा मांडला होता त्याने.
आई घरी कशी येणार..मला चिंता लागून राहिली होती. देहाचे डोळे करुन मी आईची वाट बघत होते.
बाजूच्या घरातली म्हातारी मला चार धीराचे शब्द सांगून गेली. तिच्या सांगण्याप्रमाणे मी दिवाबत्ती केली. माजघरातला दिवा लावला. त्या उजेडाने थोडासा जीवात जीव येतो तोच लाईट गेली. मिट्ट काळोख..देव्हाऱ्यातल्या मिणमिणत्या दिव्याचाच काय तो उजेड.
होऊर आला..होऊर आला..कुणीतरी ओरडत होतं. माझ्या काळजात धस्स झालं. हळूहळू अंधार अधिकच गडद होऊ लागला. रातकिड्यांचा आवाज वांझोटी शांतता भग्न करत होता. पावसाची रिपरिप चालूच होती. शेजारची म्हातारी माझ्या सोबतीला आली. तिनेच जेवणाचं ताट आणलं होतं. मी एक घास तिच्या आग्रहास्तव तोंडात घातला पण तो तोंडातच फिरु लागला.
मी हात धुतले नि गुपचूप दिव्याच्या मंद ज्योतीकडे पहात बसले.
म्हातारीसाठी नि माझ्यासाठी गोधडी अंथरली. म्हातारीला पांघरुण दिलं नि कुशीला वळून दिव्याच्या मिणमिणत्या ज्योतीकडे एकटक बघत बसले.
दिवसभराच्या मानसिक ताणाने माझे डोळे केव्हातरी आपसूक मिटले. .आणि डोळ्यासमोर आला तो होऊर..ते नदीचं रौद्ररुप..साकवावरून सावकाश येणारी माझी आई..आणि.. आणि अचानक तो साकव मोडून पडला.
माझी आई त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर..मी जोरात किंचाळी ठोकली आssई. माझं सगळं अंग घामाने भिजलं होतं.
म्हातारी सूस निजली होती. माझे हुंदके घरात भरुन राहिले होते. उजाडलं तसं घराकडे माणसं जमा होऊ लागली.
दबक्या आवाजात बायांचं बोलणं चालू होतं. मामा मामीला घेऊन आला. मला कळेना हे काय चाललय. मामी मला मिठी मारून रडू लागली. काही वेळाने मला बाहेर न्हेलं..बाहेर..बाहेर..मावशी..मावशी..सगळं संपलं होतं गं..सगळं संपलं होतं. आई मला सोडून गेली होती..कायमची.”
मावशीने जानकीला जवळ घेतलं. तिला पाणी दिलं प्यायला. तिच्या केसांवर हात फिरवत राहिली. जानकीने डोळे पुसले.
जानकीने रडू आवरलं न् पुढे बोलू लागली..”मावशी,तिथून पुढे माझा र्हास सुरु झाला. क्रियाकर्म झाल्यावर मामा मला त्याच्या घरी घेऊन गेला. मामीला मी नको होते पण तसं स्पष्ट बोलताही येत नव्हतं तिला. मामाने दहावीसाठी माझं नाव शाळेत घातलं. मी खूप मन लावून शिकायचा प्रयत्न करत होते.
मामी मला टोमणे मारायची. माझी अभ्यासातली प्रगती तिला सहन होत नव्हती. मामाही मामीच्याच बुद्धीने चालणारा. घरातली धुणेभांडीवाली काढून टाकून ते काम त्यांनी माझ्या गळ्यात मारलं.
दोनदोन बादल्या धुणं,तीनवेळची भांडी.. सगळं मामी माझ्या गळ्यात मारायची. स्वतः पान खात बसायची. मामीच्या लेकीचे मात्र भरपूर लाड व्हायचे. शेवबुंदी आणली की फक्त मामीच्या लेकीलाच दिली जायची. मला मग आठवायची..माझी आई..दिवसभर राबून माझ्यासाठी शेवबुंदीची पुडी आणणारी आणणारी. त्याही परिस्थितीत मी एकेक इयत्ता पास होत होते.
मला शिकायचं होतं भरपूर. . पण..परत माझं दुर्भाग्य आडवं आलं. मामीकडे एक भाडोत्री होता. त्याच्या देखणेपणाची भुरळ पडली मला. कधी आणि कशी वहावत गेले माझं मलाच कळलं नाही. तो खूप गोड स्वप्नं दाखवायचा. त्याचं जेवण,चहा घेऊन गेले की मधाळ हसायचा..लाघवी बोलायचा.. शिवाय पॉण्ड्स पावडरचा डबा, गंधाची बाटली, शाम्पूची पाकिटं, क्याडबरी..असं बरंच काही द्यायचा मला.
मीही अडनिड्या वयाची. फसले त्याच्या लाघवी बोलण्याला. मामेबहीणीच्या लक्षात आलं..माझं विचित्र वागणं..ती तशी स्वभावाने बरी..तिने मला त्याला न भेटण्याची..त्याच्याकडून भेटवस्तू न घेण्याची तंबी दिली नाहीतर मामाच्या कानावर घालेन म्हणाली..तिने मला परोपरीने समजावलं..सख्खी बहीणही समजावणार नाही इतकं. मला तिचं आतून बोलणं,माझ्याविषयीची कळकळ जाणवली.
मी वेळीचं सावरलं स्वतःला. त्याला म्हंटलं, तुमचं लग्न झालंय. मी तुमच्यावर प्रेम करणं,आपल्या दोघांतले प्रेमसंबंथ हे व्यभिचार ठरतील. मी एक अनाथ मुलगी..हे मामाचं छप्पर मिळालय तेही गेलं तर कुठे जाणार मी..
मी त्याच्या खोलीत जाणं टाळू लागले. आठवड्याभराने एका दुपारी त्याने मला केळीखाली कपडे धुताना गाठलच.रडायलाच लागला. म्हणाला,”लग्न झालंय माझं पण बायको काही दिवसांचीच सोबती आहे. तीच म्हणते, माझे डोळे उघडे असेस्तोवर दुसरं लग्न करा. जानकी,तुझ्याइतका समजुतदार जोडीदार मला शोधुनही सापडणार नाही. तुझ्या शिक्षणाच्या आड मी येणार नाही. वचन देतो तुला.”
मला दया आली त्याची. एका रात्री सगळी निजानीज झाली असताना, मी त्याच्यासोबत पळून गेले. मामाने बहुधा मला शोधण्याचा प्रयत्न केला नसावा. मी त्याच्या भाडोत्र्यासोबत पळून गेले हे उघड होतं.
त्याच्या घरी त्याच्या पत्नीनं माझं स्वागत केलं.
फार छान बोलायची ती माझ्याशी,अगदी सख्खी बहीण जशी. कसला पोटाचा रोग झालाय सांगायची.
क्रमश:
काय लिहिलंय जानकीच्या नशिबात पाहू पुढच्या भागात. वाचत रहा.. प्रतिक्रिया द्या.
©️®️गीता गजानन गरुड.
Post navigation

गीता गरुड
नमस्कार, मी सौ. गीता गजानन गरुड. आजुबाजूला घडणाऱ्या घटना गोष्टीस्वरुपात मांडायचा माझा छंद आहे.