
©️®️ गीता गजानन गरुड
वत्सलाबाई, तो म्लान चेहरा पहात उभ्या राहिल्या. गव्हाळ रंगाची त्वचा ऐन तारुण्यात टक्केटोणपे खाऊन रापली होती. डोळ्यांखाली गडद काळी वर्तुळं..येईल का ही शुद्धीवर..कधी येईल? काय भोगलं असेल या कोवळ्या जीवाने?” पुन्हा पुन्हा तिच्या म्लान चेहऱ्याकडे,मिटल्या डोळ्यांकडे पाहून वत्सलाबाईंना प्रश्न पडत होते.
पेशंटचा निरोप घेऊन वत्सलाबाई निघाल्या. वाटेतल्या ट्रेफिकमुळे ऑफिसात पोहोचायला थोडा वेळ लागला
—————————–
राघवने मिटींग छान हँडल केली, हे ऐकून वत्सलाबाईंना प्रसन्न वाटलं. तुसडेपणाने बोलत असला तरी दिलेली कामं चोख निभावतो, राघव. त्या स्वतःशीच बोलत मंद हसल्या. मधे अग्निहोत्री केबिनमध्ये येऊन गेले. पुर्वीची शारीरिक जवळिकीची आस आता राहिली नसली तरी त्यांच्याशी बोललं की मानसिक आधार मिळायचा वत्सलाबाईंना. दोघांनी कर्मचाऱ्यांच्या काही महत्त्वाच्या मागण्यांवर चर्चा करत कॉफी घेतली.
अग्निहोत्री केबिनमधून निघाले तसं टेबलावरील फायली स्वत:जवळ ओढून घेत वत्सलाबाई कामाला लागल्या.
राघवला थोडं अंग दुखून आल्यासारखं वाटू लागलं म्हणून तो लवकर घरी गेला. चिनूने दार उघडलं.
“बाबा,आज तू लवकर कसा..बरं नै का वाटतय तुला?”
“हो रे थोडा थकवा आलाय.”
मावशीच पुढे आली. म्हणाली,” राघव,चल जरा जेवून घे नि गोळी घे. जरा पडल्यावर बरं वाटेल तुला.”
“मीपण बाबांच्या कुशीत झोपणार आज. नो ट्युशन.” चिनू गाडी पळवत म्हणाला.
“मुळीच नाही हं. ट्यूशनला गेलंच पाहिजे..परीक्षा जवळ आलीय. तुला कितीदा समजवायचं. घरी राहिलास तर आजी धम्मकलाडू देईल तुला न् मलाही.”मावशी म्हणाली.
चिनू ट्युशनला गेला. राघव जेवला न् कपाळाला बाम लावून झोपायला गेला. शांत झोप लागल्याने शरीराची कणकण उतरली होती. त्याने खिडकीचा तलम पडदा बाजूला केला नि पावसाची रिमझिम पाहू लागला. पानन्पान सचैल न्हालं होतं.
राघवचं मन भूतकाळात गेलं. किती अवखळ होता तो कॉलेजात असताना. वत्सलाबाईंनी मुलगी दाखवली ती जणू शिंपल्यातला मोतीच. रंगाने सावळी असली तरी रुपाने उजवी होती निलू..कुरळे केस शोभायचे तिला. राघवसारख्या झंझावाताला आवर घालायचं सामर्थ्य होतं तिच्यात. राघवचं उद्धट बोलणं तिला पटत नसायचं पण ती उघड चारचौघांमधे तसं बोलून दाखवत नव्हती तर शय्याखोलीत दोघंच असताना प्रेमाने त्याला समजवायची.
“बघ,गरज होती का तांबेंवर डाफरायची.”
“अगं मग वेळेवर आले नाहीत नं ते. कंपनीत उशिरा गेलो की वत्सलाबाई ओरडतात.”
“आई का नाही म्हणत त्यांना तू?”
“तसं मनापासून प्रेम केलंय का त्यांनी माझ्यावर? त्या त्यांच वात्सल्य एम्प्लॉइजमधे वाटतात नि मलाही एम्लॉइचं समजतात वत्सलाबाई.”
“तू सुधारणार नाहीस. बरं,ते तांबेच्या मुलीला साप चावला ठाऊकै का तुला?”
“कुठे? कधी? काही बोलले नाहीत ते.”
“तू विचारलंस? समोरच्याला बोलू देतोस? असं का वागतोस सांग बरं?”
“सॉरी..खरंच सॉरी निलू..आता नाही वागणार तस्सं.”
“नेहमीचंच आहे तुझं. परत पहिले पाढे पंचावन्न.”
“ये आपण दुसरा पाढा म्हणू.”
“कोणता रे?”
“तो गं तो..गुलाबी पाढा..वन वनझा लव्ह..वन टूझा लव्ह..वन थ्रीझा..”
“पुरे हं तुझा पाढा..माझ्याशी इतकं प्रेमाने वागतोस तसं इतरांशीही वाग ना.”
“निलू,तू म्हणजे तू आहेस गं. तू आहेसच इतकी गोड की माझ्यासारखा खडकही मऊ होतो तुझ्यासमोर.”
हे असे भूतकाळातले राघवनिलांबरीमधले संवाद राघवच्या कानात घुमू लागले.
राघवला आठवलं..चिनूनंतर चार वर्षांनी निलूला दिवस गेले होते. यावेळी मात्र मला मुलगी पाहिजे..अगदी तुझं रुपडं घेतलेली..असं राघव निलूला लाडीकपणे बजावायचा.
कंपनीच्या कामाकरता राघव बँगलोरला जायला निघाला खरा पण यावेळी निघताना त्याचा पाय रेटता रेटत नव्हता. का कोण जाणे, अनामिक अशुभाची चाहूल त्याला अस्वस्थ करत होती. तिथे पोहोचल्यावरही कामातनं वेळ काढून निलूची खुशाली घेतच होता.
तीनदा फोन आल्यावर मात्र निलूने दमात घेतलं,”राघव, काय चाललय तुझं? घरात मोठी माणसं आहेत मला बघायला,माझी काळजी घ्यायला. तू तुझ्या कामावर लक्ष केंद्रित कर बघू.”
वत्सलाबाई कंपनीत गेल्या होत्या. मायामावशी कामवाल्या बाईकडून घराची साफसुफ करुन घेत होती. निलांबरी पोर्चमधे चिनूसोबत खेळत होती. तिथे शेवाळाने थोडं निसरडं झालं होतं. निलांबरीच्या ते लक्षात आलं नाही. पाय घसरून ती पडली.
जब्बर मार लागला. निलूची शुद्ध हरपली. मावशीने तिला उठवायचा अयशस्वी प्रयत्न केला. काही कळायच्या आतच तिची प्राणज्योत मालवली. चिनू वेड्यासारखा तिला हाका मारत होता..आई..आई..उठ ना गं..लागलं का तुला!” मावशीने वत्सलाबाईंना व कारखानीसांना कळवलं. तीही शॉकमधे होती.
कारखानीस मुलीचं अकाली जाणं पाहून धो धो रडत होते. निलूच्या आजीची अवस्था काही वेगळी नव्हती. सून गेल्यानंतर ती आईच तर झालेली निलूची. तिचं सारं काही सुखात चाललं असताना अचानक तिलाच असं उचलून न्यावं.. कावऱ्याबावऱ्या झालेल्या चिनूला जवळ घेऊन बसली होती,बापड्यासारखी. वत्सलाबाईंवर दु:खाचा डोंगर कोसळला होता.
राघवला काहीतरी कारण सांगून ताबडतोब यायला सांगितलं..तो आला तेंव्हा बंगल्याजवळ गर्दी..कोणीच काही बोलत नव्हतं..सगळ्यांच्या माना खाली..पुढचं द्रुश्य पाहून त्याला घेरी आली होती.
निलू गेल्यानंतर तब्बल दोन दिवसांनी तो शुद्धीवर आला होता.
तेंव्हाही असाच पाऊस पडत होता..पावसातच त्याची निलांबरी त्याला व चिनूला सोडून दूरच्या प्रवासाला निघून गेली होती..तेंव्हापासून हे असंच..पाऊस पडू लागला की त्याचं डोकं ठणकायचं.
झिम्माड पावसात थिरकणारी निलांबरी त्याला साद घालायची. हिरव्यागार गवतरानात पावसाचे थेंब झेलत निलांबरीसोबत केलेली भटकंती राघवला आठवायची..पावसाचा धोधो आवाज येऊ लागला नि त्याने कानात बोटं घातली.
“मावशी..मावशी”
मावशी लगोलग आली.
“काय झालं..स्वप्न पाहिलंस..”
“मावशी..पाऊस..बंद कर तो आवाज पावसाचा..बंद कर आधी..माझं डोकं फुटतय मावशी माझं डोकं फुटतय..यानंच न्हेलं माझ्या निलूला, मावशी..कशाला येतो हा!”
मावशीने राघवचं डोकं मांडीवर घेतलं नि हलक्या हाताने दाबू लागली..बऱ्याच वेळाने त्याची कपाळावरील तटतटणारी शीर शांत झाली. त्याने डोळे मिटले.
मावशीने त्याचं डोकं उशीवर ठेवलं नि स्वैंपाकघराकडे वळली. खरंतर राघवची तब्येत बरी नसताना तिला स्वैंपाक सुचायचाच नाही पण चिनू भुकेला येणार..त्याच्यासाठी काहीतरी बनवणं गरजेचं होतं.
वत्सलाबाई आल्या. मावशीने त्यांना पाणी आणून दिलं.
“झाली का ती कालची मुलगी बरी..म्हणजे आली का शुद्धीवर? तुम्हीपण उगाच ते गळ्यात अडकवून घेतलंत..मला अडकवून घेतलंत तसंच..मी कोण कुठली तुमच्या नात्याची न् गोत्याची. मला गर्भाशय नाही म्हंटल्यावर लोकंच काय माझे मायबापूसुद्धा अडगळीप्रमाणे बघू लागले होते माझ्याकडे. त्यांच्या गळ्यातलं ओझं होते मी..कधीकधी वाटायचं देवाने जन्मालाच का घातलं मला? का नाही मला गर्भाशय दिलं ? का रिती ठेवली माझी कुस!
मुली बाहेर बसायच्या तेव्हा माझ्याकडे बघून कुजबुजायच्या..आपण माणूस नाही..जनावरपण नाही..असं वाटायचं मला पण अहिल्येला रामरायाने जसं शापातून मुक्त केलं तसं बाईसाहेब तुम्ही आलात आणि मला त्या नरकातून मुक्त केलंत.
तुमच्या पदराखाली घेतलंत. मोठ्या बहिणीसारखी माया केलीत माझ्यावर.
डॉक्टर उपचार केलेत..आता माझं भाग्यच अपुरं म्हणा..आई होण्याचं भाग्य नव्हतं नशिबात पण राघवाच्या निमित्ताने माया करायला हक्काचं मुल दिलंत.
मी सतत राघवाच्या नजीक असल्याने राघव माझ्यावर जास्त माया करत आला..याचंही तुम्ही कधी वाईट वाटून घेतलं नाहीत. आजकाल राघव जास्तच तुसड्यासारखं वागतो पण ते त्याच्या भुतकाळामुळे. अजुनही निलांबरीच्या आठवणीने बेचैन होतो तो.
हा पाऊस पण बघा ना कसा निष्ठूर..का बरं पडतो हा..हा पडला नाही तर माझ्या राघवाचं चित्त असं भरकटणार नाही. डोकं दुखणार नाही.बिचारं पोर माझं.” असं म्हणत मावशीने पदर डोळ्यांना लावला.
वत्सलाबाईंनी मायाच्या खांद्यावर हात ठेवला.क्रमश:तुमच्या प्रतिक्रिया वाचून लिहायला हुरुप येतोय. लिहिता लिहिता कथा जगतेय. वाचत रहा.
–©️®️ गीता गजानन गरुड.
Post navigation

गीता गरुड
नमस्कार, मी सौ. गीता गजानन गरुड. आजुबाजूला घडणाऱ्या घटना गोष्टीस्वरुपात मांडायचा माझा छंद आहे.