Skip to content Skip to sidebar Skip to footer

चाकोरीबाहेर (भाग तिसरा)

©गीता गजानन गरुड

वत्सलाबाई खूप खूष होत्या. एकुलत्या एका मुलाचं लग्न..महिनाभर सोहळा सुरु होता. लग्नादिवशी शहरभर लायटींग केली होती. सनईच्या सुरात लग्न लागलं. कारखानिसांची निलांबरी अष्टपुत्र्यांची सुनबाई झाली. नवदाम्पत्याच्या हस्ते शहरातल्या दीनदुबळ्यांना वस्त्रे, रुचकर मिठाई वाटली गेली. कंपनीतल्या लेबर्सना भेटवस्तू शिवाय एका महिन्याचा अधिक पगार देऊ केला.

राघवच्या लग्नानंतरची काही वर्ष अगदी सुखात गेली. निलू होतीच प्रेमळ. श्रीमंताघरची असली तरी वळण होतं पोरीला. घरातल्या गडीमाणसांनाही जीव लावला होता तिने. निलू आल्यापासनं राघवचा आततायीपणाही कमी झाला होता. अगदी समंजस झाला होता तो. संगतीचा परिणाम.

राघव निलांबरीमधे पत्नी,आई,बहीण ही सारी रुपं पहात होता,अनुभवत होता.

दोघांमधे फक्त प्रेमच नव्हते तर रुसवेफुगवेही होऊ लागले होते. निलू रुसली की राघवला करमत नसे. तिचा अबोला त्याला असह्य होत असे आणि..आणि मग पलंगावर दोघांची दिलजमाई होत असे. त्यांची ही कट्टीबट्टी पाहून
माया मावशीला  हसू येई. ती मनात म्हणे,”असाच या दोघांचा संसार फुलारु दे.”

निलूने राघववर तिच्या प्रेमाची जादू केली होती.  मिलनाच्या उत्कट क्षणांनंतर एकमेकांच्या बाहूत ते दोन प्रेमी जीव सुखी संसाराच स्वप्न पहायचे. दोघेही एकुलते एक म्हणून किमानपक्षी दोन तरी बाळं व्हावीत यावर दोघांचंही एकमत होतं. निलूला मुलांचा फार लळा होता. तिला तिचं बाळ लवकरात लवकर हवं होतं.

दोघांचे मधुर प्रयत्न फलास आले आणि  एके दिवशी निलूने गोड बातमी दिली. वत्सलाबाईंना तर आकाश ठेंगणं झालं.

आईविना पोर ती, आजीच्या छायेखाली लहानाची मोठी झालेली. वत्सलाबाई खऱ्या अर्थाने तिची आई झाल्या. निलूच्या आजीलाही आग्रहाने बोलवून घेतलं. मायामावशी तर निलूला फुलासारखं जपत होत्या.तिला काय हवं नको ते जातीनं पाहत होत्या.  निलूचं सासरी होणारं कोडकौतुक पाहून तिच्या म्हाताऱ्या आजीचे डोळे आनंदाश्रुंनी भरुन यायचे.

चोरओटी,चांदण्यातलं डोहाळजेवण,बोटीतलं डोहाळजेवण..किती कौतुकं..निलू कौतुकात न्हाऊन जात होती.  राघव तर सावलीसारखा तिच्या आसपास असायचा. कारखानीस चारेक दिवसांनी लेकीला बघायला येऊन जायचे. निलूचे दिवस भरत येत होते तसंतसं तिच्या सर्वांगावर एक वेगळंच तेज येऊ लागलं होतं.

निलूची प्रसुती अगदी विनासायास झाली. गुलामाने बाहेर येताना आईला बिलकुल त्रास दिला नाही. आजी निलूच्या कुशीला बसुनच असायची. तिच्या पोटलीतली मात्रा नातीला उगाळून द्यायची.

गोडगोजिरं,गुलाबी बाळ नर्सने जेंव्हा वत्सलाबाईंच्या हाती दिलं,तेंव्हा त्याच्या इवल्याशा जिवणीकडे, इकडेतिकडे बघणाऱ्या पिटुकल्या डोळ्यांकडे वत्सलाबाई अनिमिष नेत्रांनी पहातच राहिल्या. मग मायाला म्हणाल्या,”धर बाई, माझीच द्रुष्ट लागायची गुलामाला.”

राघवने एकांतात निलुच्या कपाळावर ओठ टेकवले व तिचे आभार मानले.

“खूष ना..” निलूने विचारलं तसं राघव म्हणाला,”छे..आता तर एकाच बाळाचा बाबा झालोय. अजून एक बाहुली हवीय मला तुझ्यासारखी दिसणारी.”

निलू गोड हसली.

राघवने तिचे दोन्ही हात हातात घेऊन त्यांचं चुंबन घेतलं.

“आता माहेरी जाणार..”

“गेलंच पाहिजे. पप्पा येतील नं न्यायला.”

“मीपण येऊ..”

“अरे असं कसं..अधनंमधनं येत जा की.” निलू त्याचा हात कुरवाळत म्हणाली.

कारखानीस लेकीला, नातवाला घरी घेऊन गेले. आजी दिमतीला होती. नातवाचं तोंड पाहिल्यापासनं आजीत वेगळीच उर्जा संचारली होती. बाळाला न्हाऊमाखू घालणं,मालीश करणं..सगळं ती हौसेने करत होती. निलांबरीच्या मालीशसाठी मात्र एका ओळखीच्या काकूंना बोलवलं जात होतं. बाळ दिवसेंदिवस बाळसं धरत होता.

कारखानीसांनी नातवाच्या बारशाला मोठा थाट केला होता. वत्सलाबाईही पाहुण्यांसाठी भेटवस्तू, बाळासाठी बाळलेणी,सुनेसाठी साडीचोळी,लक्ष्मीहार घेऊन गैल्या होत्या. डाळिंबी रंगाच्या साडीत निलांबरी खूप गोड दिसत होती. त्यात तिने सुरेख केशरचना करुन त्यावर माळलेले मोगऱ्याचे गजरे..राघवची नजर बायकोवरून हटता हटत नव्हती.

बाळराजाला छान आंगड घातलं होतं, आजीने शिवलेली कुंची घातली होती. बाळाला पाळण्यात ठेवलं. बाळाच्या कानात कुर्र केलं नि बाळाचं नाव चिन्मय  ठेवलं.

बायांनी पाळणागीतं गायला सुरुवात केली..

हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा
पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा

सजली गं मऊमऊ मखमालीची शय्या
निजली गं बाळाची गोरीगोरी काया

बाळारुपडे देवाचे भुलविते लोचना
हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा

अंगणात हलवाई भल्या मोठ्या कढईत दूध आटवत होते. खवा होत आला तसं त्यात साखर,वेलचीपूड घालून हटवून घेतलं व चार माणसं पेढे करायला बसली होती. पंचपक्वांनांच जेवण होतं. पंगतींवर पंगती उठत होत्या. सारीजणं बाळाला आशीष देऊन जात होती.

निलू चारेक महिने माहेरी राहिली तेही काखानीसांच्या आग्रहाखातर.

वत्सलाबाईंना ती कधी एकदा घरी येतेय असं झालं होतं. राघव तर सुटटीला निलूकडेच जायचा. त्याचं बाबापण वत्सलाबाई डोळे भरुन पहात होत्या.

फार लहान वयात त्याच्या डोक्यावरचं बापाचं छत्र नाहीसं झालं होतं. वत्सलाबाईंनी सगळं सगळं दिलं त्याला तरी पित्याचा प्रेमळ धाक,आश्वासक आधार..याबाबतीत पोरकाच राहिला तो.

निलू बाळाला घेऊन घरी आली आणि घर जणू पुन्हा लहान झालं. बाळराजाचा थाटच आगळा होता. आईबाबा,आजी,मावशीआजी सारे त्याच्या दिमतीला हजर असायचे.

बाईसाहेब.. बाईसाहेब..ड्रायव्हर तांबेंच्या आवाजाने वत्सलाबाई त्या सुरेख भूतकाळातून बाहेर आल्या.. भानावर आल्या. समोर इस्पितळ होतं. त्यांनी गाडीचा दरवाजा उघडला न् त्या इस्पितळात गेल्या. डॉक्टर यायला अवकाश होता. त्या वेटींगमधे टेकल्या.

“कोणाची पोर असेल ती? तुला तरी काय गरज होती तिला वाचवायचा आगाऊपणा करायची? शुद्ध आली असेल का तिला? जीव द्यायला निघालेली..आयुष्य अर्ध्यावर संपवायला निघालेली का कोणा आजारी नातेवाईकाला बघायला निघालेली? कसं कळायचं? सगळेच प्रश्न..

काही सिस्टर नुकत्याच आलेल्या श..तिथे बोलत उभ्या होत्या. एकदा वाटलं..त्यांच्याकडे चौकशी करावी पण मग पायच नाही उचलले..बसून राहिल्या तशाच..बाहेरचा एकसुरी पाऊस पहात.

डॉक्टर आले तसे डॉक्टरांनी आत बोलावलं.

वत्सलाबाई केबिनमध्ये गेल्या.

“डॉ. इज देअर एनि इंम्प्रुव्हमेंट इन पेशंट्स हेल्थ? एनि ट्रेस ऑफ हर रिलेटिव्ह्ज?”

“नो म्याम, पुलिस इज ट्राइंग हार्ड. शी ह्याज नॉट कम टू सेन्सेस यट. यू क्यान सी हर.”

“डॉक्टर, तिचं सगळं बील मी भरायला तयार आहे.”

“द्याट्स सो काइंड ऑफ यू,म्याम. पेशंट शुद्धीवर आला की कळवतो तुम्हाला.”

वत्सलाबाईंंनी डॉक्टरांचा निरोप घेतला व त्या पेशंटकडे गेल्या. पेशंटच्या हातात सुया घुसवल्या होत्या. इंजेक्शन्स देण्यासाठी सलाइन चालू होते.

तो म्लान चेहरा त्या पहात उभ्या राहिल्या. गव्हाळ रंगाची त्वचा ऐन तारुण्यात टक्केटोणपे खाऊन रापली होती. डोळ्यांखाली गडद काळी वर्तुळं..येईल का ही शुद्धीवर..कधी येईल? काय भोगलं असेल या कोवळ्या जीवाने?” पुन्हा पुन्हा तिच्या म्लान चेहऱ्याकडे,मिटल्या डोळ्यांकडे पाहून वत्सलाबाईंना प्रश्न पडत होते.

पेशंटचा निरोप घेऊन वत्सलाबाई निघाल्या. वाटेतल्या ट्रेफिकमुळे ऑफिसात पोहोचायला थोडा वेळ लागला.

क्रमशः

वाचत रहा. तुमच्या प्रतिक्रिया जरुर कळवा.

–गीता गजानन गरुड.

 

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.