Skip to content Skip to sidebar Skip to footer

चाकोरीबाहेर (भाग दुसरा)

©गीता गजानन गरुड

अग्निहोत्रींच्या मार्गदर्शनाखाली काम करता करता वत्सलाबाईंचे त्यांच्याशी प्रेमाचे धागेदोरे नकळत विणले गेले आणि काही निवांत क्षणी दोघं एकमेकांजवळ आली. अग्निहोत्री विवाहीत असतानाही दोघं एकमेकांत गुंतत गेली.

अशाच एका त्रुप्तीच्या समयी त्यांनी अग्निहोत्रींना विचारलं होतं.
“अग्निहोत्री,माझं ठीकैय. मी माझी अत्रुप्त कामेच्छा तुमच्याकडून भागवतेय पण तुमचं काय घरात बायको असताना..मला ना कधीकधी फार अपराध्यासारखं वाटतं. दोन मुलं आहेत तुम्हाला,सुविद्य पत्नी ..तरीही तुम्ही माझ्याकडे..माझ्या या विश्रामग्रुहात कधी सांगेन तेंव्हा हजर असता..”

अग्निहोत्री तिच्या निवस्त्र देहाला कुरवाळत म्हणाले,”सुविद्य पत्नी..हो शालिनी आहेच सोज्वळ,सुशील..अगदी घरंदाज पण मला जे नेमकं प्रणयात हवं असतं ते मिस करतो मी तिच्यात. प्रणयाराधनेत अतिशय थंड आहे ती. शालिनी म्हणजे साचलेलं तळं..तर तू म्हणजे जलप्रपात..ओसंडून वहाणारा..तुझ्यासोबत रतीक्रिडा करायला उतावीळ असतो मी.
शालिनीचं म्हणशील तर तिला यात रसच नाही. ती आणि तिची भक्ती बास. मुलं झाली म्हणजे सगळं संपलं या विचारांची ती. ती काय मला संतुष्ट करणार!
वसु, माझं चुकत असेल पण मी राम नव्हे आणि तू सीता नव्हे. असं म्हणत अग्निहोत्रींनी वत्सलेच्या उरोजांना कुरवाळलं तशी ती अधिकच शिथिल झाली..दोघं एकमेकांत विरघळत गेली.

अशा कैक रात्री त्या दोघांच्या मिलनाच्या साक्षी होत्या. टुरच्या नावाखाली अग्निहोत्रींचं घरापासून एकदोन दिवस लांब रहाणं सहज पचत होतं..प्रश्न होता तो राघवचा..त्याला त्याची आई त्याच्या वाढत्या वयात हवी तेंव्हा मिळत नव्हती.

ऑफिसमधे मात्र वत्सलाबाई आणि अग्निहोत्री चार हाताचं अंतर राखूनच रहात त्यामुळे कोणाला संशय यायची गरजच नव्हती. सदा मोती रंगाची साडी..गळ्यात टपोऱ्या मोत्यांची माळ,केसांचा फ्रेंचबन,ओठांवर हलकीशी गुलाबी लिपस्टीक,कानात मोत्यांच्या कुड्या..वागण्याबोलण्यात घरंदाजपणा यामुळे स्टाफमधे त्यांची अतिशय सन्माननीय छबी होती.

पहाट कधी झाली कळलच नाही त्यांना. बंगल्याच्या भोवताली आंबा,चिकू,पेरु अशी झाडं होती. त्यांवरील पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग आली तरी उठावसं मुळीच वाटत नव्हतं.

बाहेर चिनूचा आवाज येत होता.

“मला दूध नकोय”

“असं काय करतोस बाळा. घे ना रे दूध.” मायामावशी त्याला आर्जव करत होती.

“मला बोर्नव्हिटा घालून दूध हवं असतं. तुझी चुकीय. तू हे प्रोटीनेक्स क काय कशाला आणलंस.” चिनूने हाताने तिचा ग्लास झिडकारताच..दूध हिंदकळलं नि इथेतिथे दुधाचे शिंतोडे उडवले.

“नको पिऊदे त्याला दूध. शाळेत भोवळ आली की समजेल,”वत्सलाताई बाहेर येत म्हणाल्या.

चिनू ड्रायव्हरसोबत शाळेत गेला. मायामावशीने साबणाचं पाणी करुन ते ओशट डाग पुसून काढले.

“माया,बाई आली असती न् पुसलं असतं ते. तू कशाला..एकतर तुझे गुढघे दुखताहेत.” वत्सलाबाई म्हणाल्या.

“तोवर तसंच राहू द्यायचं का ते. माझंच चुकलं. काल सामानात बोर्नव्हिटा लिहायचा आळस केला न् राघवबाबाची प्रोटीन पावडर चिनूच्या दुधात मिसळली..पोरगं लै हुशार. पटकरुन ओळखलन. .पण उपाशी गेला.” मायाने मनातली खंत बोलून दाखवली.

“माया,नको तितके लाड करतेस तू त्याचे. राघवचंही तेच झालं..आपण अति माया केली त्याच्यावर नइ परिणाम बघतैस ना.”

“बाईसाहेब,राघवबाबा असे नव्हते ओ. सुनबाईंचं ते तसं झाल्यापासनं..”मायाने डोळ्यांना पदर लावला.

तितक्यात राघव दिवाणखान्यात आला. डायनिंग टेबलजवळच्या खुर्चीवर बसून त्याने पेपर उघडला.

“राघव”

“राघव, आम्ही तुमच्याशी बोलतोय.”

“काय आहे..” राघव चिडचिडत म्हणाला.

“काल आम्ही सेमिनारहून परतताना एक आक्रित घडलं.”
“काय?”राघवने आता पेपर बाजुला ठेवला.

“आपल्या गाडीसमोर एक बाई विव्हळत पडली होती. कुणीतरी ठोकर देऊन गेलेलं तिला.आम्ही तिला इस्पितळात दाखल केलं. तिला बघायला जातो आहोत आम्ही.”

“कशाला नसती समाजसेवेची सोंगं करता?”

“ते आमचं आम्ही बघू. तुम्ही मि.भाटीया येणार आहेत. त्यांच्याशी चर्चा करा. अग्निहोत्रींना सोबत घ्या.”

“कुक्कुलं बाळ आहे का मी? प्रत्येक वेळी तो अग्निहोत्री असलाच पाहिजे का माझ्यासोबत!” राघव मुठी आवळत म्हणाला. त्याच्या कपाळावरली शीर तटतटली.

तितक्याच निश्चयी स्वरात वत्सलाबाई उत्तरल्या,
“अनुभवी आहेत ते राघव. शब्द जपून वापरा. वडीलधाऱ्यांचा आदर करण्याची संस्कृती आहे आपली.”

राघवने तोंड वाकडं केलं नि पेपरात बघू लागला.

मायामावशीने दूध,बटरब्रेड सगळा सरंजाम आणून टेबलवर ठेवला. ब्रेडला बटर लावून  डिशमधे ठेवले.

“सांगितलय ते लक्षात ठेवा राघव,”असं म्हणून वत्सलाबाई निघाल्या. मोतीकलरच्या साडीवर सोनेरी पोलका डॉट्स होते. ब्लाऊजच्या बाह्या कोपराहून दोन इंच खाली. नाकावर सोनेरी फ्रेमचा चष्मा..कपाळाला मरुन टिकली. केसांत एक चंदेरी बट दिमाखात मिरवत होती.

—————

वत्सलाबाईंच्या सांगण्यानुसार ड्रायव्हरने इस्पितळाच्या दिशेने टर्न घेतला. गाडीच्या वेगात वत्सलाबाईंचे विचारही धावू लागले..गतकाळात..नुकत्याच घडून गेलेल्या आघातांच्या खुणा त्यांच्या मनात ताज्या होत्या.

राघव पुण्यातील सिम्बॉयसिसमधून एमबीए उत्तीर्ण झाला तेंव्हा वत्सलाबाईंच्या आग्रहाखातर राघव त्यांच्या कंपनीत दाखल झाला. वत्सलाबाईंनी त्याला प्रारंभीच जबाबदारीची पोस्ट द्यावी ही त्याची अपेक्षा होती पण वत्सलाबाईंनी त्याला एक एम्प्लॉयी म्हणूनच उद्योगात सामिल करुन घेतले.

त्याच्या स्वभावाप्रमाणे तो सहकाऱ्यांशी उलट बोलला असता वत्सलाबाईंनी त्याला सगळ्या नोकरांसमक्ष तंबी दिली होती. सौहार्दपूर्ण वातावरणात रहावं लागेल अन्यथा तुला तुझा मार्ग मोकळा आहे.” राघवने कसाबसा वत्सलाबाईंचा ओरडा सहन केला होता. मुठ दाबत तो त्याच्या टेबलापाशी जाऊन बसला होता.

राघवकरिता कारखानीसांच्या निलांबरीचं स्थळ आलं. कारखानीसांशी संबंध जोडणे म्हणजे दुग्धशर्करा योगच. कारखानीस वत्सलाबाईंसारखेच अग्रगण्य उद्योजक होते. नुकतेच ते दिल्लीहून मुंबईत स्थयिक झाले होते. विशेष म्हणजे कै. उल्हासराव व वत्सलाबाई यांना ते फार पूर्वीपासून ओळखत होते.

कंपनीच्या विस्तारासाठीही श्री. कारखानीसांशी घरोबा होणं फायद्याचं होतं,पण राघवचं मत त्याहीपेक्षा महत्त्वाचं होतं. बिझनेसच्या फायद्यासाठी स्वत:च्या मुलाचा बळीचा बकरा बनवणाऱ्यांतल्या वत्सलाबाई मुळीच नव्हत्या.

कारखानीसांची निलू एमए होती. ग्रुहक्रुत्यदक्ष अशी. थोडी दिसायला सावळी होती पण नाकीडोळी नीटस. राघव आधी तयारच नव्हता लग्नाला पण मायामावशीने जोर लावला.

मावशीच्या आग्रहाखातर तो निलांबरीला जाऊन भेटला. तिचे बोलके,पाणेरी डोळे,चांदणहास्य,लाघवी बोलणं..राघवचा ना गळून पडला.

राघवची नि निलांबरीची फोनवर गुफ्तगु होऊ लागली. कधी दोघं हॉटेलिंगला, लाँग ड्राइव्हला जाऊ लागली.

वत्सलाबाई खूप खूष होत्या. एकुलत्या एका मुलाचं लग्न..महिनाभर सोहळा सुरु होता. लग्नादिवशी शहरभर लायटींग केली होती. सनईच्या सुरात लग्न लागलं.

कारखानीसांची निलांबरी अष्टपुत्र्यांची सुनबाई झाली. नवदाम्पत्याच्या हस्ते शहरातल्या दीनदुबळ्यांना वस्त्रे, रुचकर मिठाई वाटली गेली. कंपनीतल्या लेबर्सना भेटवस्तू शिवाय एका महिन्याचा अधिक पगार देऊ केला.

क्रमश:

गीता गजानन गरुड.

 

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.