Ritbhatmarathi

Search
Close this search box.

चाकोरीबाहेर (भाग चौदावा.. अंतिम भाग)

सौ.गीता गजानन गरुड

तितक्यात चिनू आला,”ए, आज्जी गोष्ट सांग नं.”

वत्सलाबाई त्याला मांडीवर घेऊन विक्रमवेताळची गोष्ट सांगू लागल्या. गोष्ट ऐकता ऐकता चिनू गाढ झोपी गेला. परी मात्र जानकीकडून लाड करुन घेत होती. कॉफी पिऊन झाल्यावर मायामावशी जानकीला म्हणाली,”जानकी, आण बघू परीला माझ्याकडे आणि तू जा बघू राघवबाबा वाट बघताहेत कधीची.”

“मावशी पण..”

“अगं, आम्ही दोघी आहोत नं इथे. रडली तर फोन लावेन तुला. धावतपळत येऊ नको. पडशीलबिडशील..सावकाश ये. गुडनैट.”

“हो मावशी. अच्छा पिल्लू. गुड नाइट,” म्हणत परीच्या गालावर पप्पी देऊन जानकी राघवच्या बेडरुमकडे वळली.
——————

जानकीने राघवच्या रुमचं दार उघडलं. रूममधे मोगऱ्याचा सुगंध दरवळत होता. गुलाबी फुलांची बेडशीट बेडवर अंथरली होती. फुलदाणीत निशिगंधाची फुले शोभून दिसत होती. खिडकीतनं चांदवा डोकावत होता.

जानकी पलंगाच्या एका कोनावर बसली. पांढराशुभ्र सदरालेंगा परिधान केलेला राघव तिच्या येण्याचीच वाट पहात बसला होता. सदऱ्याच्या बाह्या त्याने  दुमडून घेतल्या न जानकीकडे पाहून मिश्कील हासत पंख्याचं बटण दाबलं . पंखा सुरु होताच,गुलाबाच्या लालबुंद पाकळ्या तिच्या अंगाखांद्यावर पडल्या.

नकळत झालेल्या या वर्षावाने ती अधिकच शहारली.

राघवने जानकीचे हिरवाकंच चुडा भरलेले हात हातात घेतले..त्यावरली मेहंदी निरखून बघू लागला. तिच्या नक्षीदार तळव्यांवर त्याने आपले ओठ टेकवले तशी एक गोड शिरशिरी, सतारीची तार झंकारावी तशी तिच्या सर्वांगातून झंकारत गेली.

त्याने अलगद तिच्या केसांतला गजरा काढून उशाशी ठेवला व वेणीचा एकेक पेड सोडू लागला. मऊ मुलायम केसांचा पिसारा तिच्या पाठीवर पसरला.

राघवच्या स्पर्शाने, त्याच्या उबदार श्वासांनी जानकीचे अंग मोहरले. तिचे डोळे आपसूक मिटले.

राघवने तिची मान उशीवर टेकवली .. तिच्या चेहऱ्यावर वाकला.. तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले.

जानकीच्या ओठी शब्द फुटत होते तरी काही बोलवत नव्हते. एक आगळीच बेभानावस्था ती अनुभवत होती..

मालवून टाक दीप चेतवून अंग-अंग !
राजसा किती दिसांत लाभला निवांत संग !

त्या तिथे फुलाफुलांत, पेंगते अजून रात
हाय तू करू नकोस एवढ्यात स्वप्नभंग !

गारगार या हवेत, घेउनी मला कवेत
मोकळे करून टाक एकवार अंतरंग !

दूरदूर तारकात बैसली पहाट न्हात
सावकाश घे टिपून एक एक रूपरंग !

हे तुला कसे कळेल ? कोण एकटे जळेल ?
सांग, का कधी खरेच एकटा जळे पतंग ?

काय हा तुझाच श्वास ? दर्वळे इथे सुवास !
बोलरे हळू उठेल चांदण्यावरी तरंग !

साडीचा रेशमी पदर अलवार बाजूला सारुन राघव, तिच्या अंगप्रत्यांगांवर त्याची मोरपिसी बोटं फिरवू लागला..अधरांचे ठसे उमटवू लागला..त्यासरशी ती अधिकच सैलसर होत गेली.

रात्र बहरात आली होती.

खिडकीतली रातराणी झुळझूळत होती..रात्रीचे पदर बाजूला सरत होते तसे त्या दोघांमधले वल्कलांचे पदर अलगद दूर होत होते..

ती रात्र मंतरलेली होती..

ती रात्र गंधाळलेली होती..

एका नव्या सहजीवनाची पहाट होत होती.

परी,चिनू दोघं मायामावशीजवळ गाढ निजली होती. घर पुन्हा नव्याने लाजत होतं. वत्सलाबाई निजल्या होत्या. लेक पुन्हा मार्गाला लागल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर पसरलं होतं.

पहाटेच परीच्या आवाजाने जानकी जागी झाली. साडी ठीकठाक करुन ती परीला आणायला गेली.

———————-

जानकी परीला रुममधे घेऊन आली खरी पण दचकली..राघवना आवडेल का ..परत माघारी फिरणार इतक्यात राघवनेच उठून परीला घेतलं.

जानकीला उशीला टेकून बसू दिलं नि परीला तिच्या मांडीवर ठेवलं. परी दुधू पिऊ लागली..राघव ते मायलेकीचं रुपडं बघत बाजूलाच बसला.

परीने त्याची बोटं गच्च धरली होती. मधुनच त्याच्याकडे बघून खुदकन हसायची..पुन्हा आईच्या पदराखाली लपायची..बापलेकीचा लपाछपीचा खेळ सुरु होता.

चिनूला छोटी बहीण मिळाली,राघवला जोडीदारीण..सुख म्हणजे दुसरं काय असतं? दोघा तुटलेल्या संसारांना पुर्णत्व लाभलं.

मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं?

काय पुण्य असतं की जे घरबसल्या मिळतं!

—————   

आजकाल अग्निहोत्रींची तब्येत वरचेवर बरी नसायची. त्यांनी प्रक्रुतीकडे तसं दुर्लक्षच केलं होतं आणि अस्वस्थ वाटू लागल्यामुळे एडमिट केलं असता बॉडी चेकअप केल्यावर हर्टचं मेजर ऑपरेशन करावं लागेल म्हणून डॉक्टरांनी सांगितलं.

राघव स्वतः अग्निहोत्रींच्या ऑपरेशनवेळी त्यांच्या मुलांसोबत थांबला. अग्निहोत्रींना भेटायला वत्सलाबाई गेल्या होत्या.

दोन महिने सक्तीचा आराम करा असं त्यांना आग्रहाने सांगून आल्या.
आठेक दिवसांनी अग्निहोत्रींना डिस्चार्ज मिळाला.

ते आता घरी आराम करत असायचे.

राघवचं रुटीन सुरु झालं. राघव कंपनीत पुन्हा हजर झाला.

अग्निहोत्रींच्या अनुपस्थितीमुळे राघववर कामाचा लोड वाढला होता.  वत्सलाबाईही आताशा हळूहळू कंपनीच्या कारभारातून अंग काढू पहात होत्या.

नातवंडांची आठवण आली की लवकर घरी जायच्या.

—————

अग्निहोत्रींच्या केबिनमधली एक महत्त्वाची फाईल त्वरीत हवी होती. नेमकी शिपायालाही सापडेना. राघवचा पारा चढला..त्या शिपायावर राग काढत तो अग्निहोत्रींच्या केबिनमधे गेला. सगळे ड्रॉव्हर धुंडाळत होता.

एक डायरी राघवच्या हाती लागली. घरगुती डायऱ्या ऑफिसात कसल्या ठेवतात म्हणत तो ती  फेकणार इतक्यात डायरीतून वत्सलाबाईंचा फोटो बाहेर पडला..सोबत अग्निहोत्री..राघवला प्रचंड राग आला.

कसं शक्य आहे? ज्या आईने फक्त आपल्यासाठी म्हणून पुन्हा लग्न केलं नाही ..ती अग्निहोत्रीसोबत.. राघवने डायरी उघडली.. पहिल्याच पानावर ‘माझी वत्सला’ लिहिलं होतं.

राघव पानं उलटत होता. प्रत्येक पानावर तारीख,महिनेवार त्यांची भेट..भेटीचं रसभरीत वर्णन केलं होतं. 
वसु, मी तुझ्या अधिकाधिक जवळ येत चाललोय. मला तिन्ही प्रहरी फक्त तुझा चेहरा डोळ्यासमोर दिसतो. प्रेमकविता..असं बरंच काही..

राघवचं डोकं भंडावून गेलं. बराच वेळ तो डोकं गच्च धरून बसला. डायरी घेऊन तो  घरी आला. जानकी मुलांना घेऊन कारखानीसांकडे दोन दिवस रहायला गेली होती.

वत्सलाबाई दुपारीच घरी आल्या होत्या.

मावशी देवघरात होती.

“मावशी,”वत्सलाबाई कुठेयत?” राघव कडाडला.

“नुकत्याच आल्यात त्या. अग्निहोत्रींची तब्येत परत बिघडली म्हणून बघायला चालल्यात त्या.”

इतक्यात वत्सलाबाई बाहेर आल्या.

“राघव, काय झालं काय एवढं ओरडायला..”

“मावशी या बाईंना विचार..अग्निहोत्री यांचे कोण लागतात?” वत्सलाबाई गप्प झाल्या.

मावशीने मात्र पहिल्यांदाच राघवच्या गालांवर पाच बोटं खाडकन वाजवली.

“मावशी,याच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही. आपल्याला लगेच निघायला हवं.”

“तुझं नि त्यांचं नातं सांगून जा.” राघव पुन्हा एकेका शब्दावर जोर देत म्हणाला.

“राघव,” मावशी कडाडली. इतक्यात जानकीही मुलांना घेऊन आली.

“राघव का त्रागा करताहात? जानकीने विचारलं.

” ही डायरी नजरेखालून घाल. माझ्या त्राग्याचं कारण समजेल तुला. तुझी सासू कशी आहे कळेल तुला.”

वत्सलाबाई मावशीला घेऊन निघाल्या. आज त्या स्वतः गाडी चालवत होत्या.

काही अंतर कापल्यावर वत्सलाबाई म्हणाल्या,”माया, तुही रागावलीस,माझ्यावर.. तुझं लग्न झालंच नाही. तू श्रीकृष्ण भक्तीकडे स्वतःचं मन वळवलंस. श्रीकृष्णाला आपला सोबती मानत आलीस.

माया, उल्हासरावांच्या जाण्यानंतर अग्निहोत्रींनी मला धंद्यातल्या खाचाखोचा शिकवल्या. माझ्या कामाचं कौतुक केलं. मी तरुण होते. मला त्यांची सोबत आवडू लागली.

अग्निहोत्रींच्या मिसेसना प्रणयाराधनेविषयी आवड नव्हती. यंत्रवत मुलं जन्माला घातल्यानंतर त्यांचा अग्निहोत्रींमधील इंटरेस्ट संपत आला होता.

हळूहळू त्या भक्तीमार्गाकडे वळल्या.

मी नकळत अग्निहोत्रींकडे खेचले गेले. माझ्या सादेला अग्निहोत्रींनी प्रतिसाद दिला.. माया हे चूक की बरोबर..मला या फंदात नाही पडायचं.

मी माणूस आहे. नवरा गेला म्हणजे बायकोच्या कामेच्छा त्याच्यासोबत संपून जातात असं होत नाही ना!

आम्ही संग केला..खबरदारी घेऊन..मुलं होऊ दिली नाही. तू विचारशीलही परत लग्न का नाही केलं?

माया, या समाजात विधुराला जितक्या लवकर नवीन जोडीदार मिळतो तितक्या सहज तो विधवेला तेही एक मुल असलेल्या परित्यक्ता वा विधवेला मिळणं अवघडच.

कोणीही इस्टेटीसाठी तयार झाला असता पण मग त्याने माझ्या राघवचा तिरस्कार केला असता तर..तर ते चाललं नसतं मला शिवाय मनाचं काय..माझं मन तर अग्निहोत्रींत गुंतलं होतं.

विशेष म्हणजे,अग्निहोत्रींच्या पत्नीलाही हे ठाऊक झालं होतं पण तिचं आमच्या नात्याबद्दल काहीच म्हणणं नव्हतं.

तीचा भक्तसमुदाय वाढत चालला होता. भजन,किर्तन,प्रवचनात ती दंग असायची.

माया, अग्निहोत्री डायरी लिहित..मला ठाऊक होतं. एकदोनदा मी वाचली आहे त्यांची डायरी.

मी त्यांना ती लपवून ठेवण्यासही सांगितलं होतं पण त्यांना ती सदैव जवळ लागायची.

“वत्सलाबाई, राघवबाबाचा राग उतरेल थोड्या दिवसांत. तुम्ही नका काळजी करु” माया वत्सलाबाईंना समजावत म्हणाली.

त्या  दोघी अग्निहोत्रींच्या घराजवळ पोहोचल्या. बाहेर मिसेस अग्निहोत्रींच्या भक्तमंडळींची गर्दी होती. वत्सलाबाई आत गेल्या. अग्निहोत्रींच्या जीवाची नुसतीच घरघर चालू होती.

अग्निहोत्रींच्या मिसेसने वत्सलाबाईंचा हात अग्निहोत्रींच्या तळहातावर ठेवला.

वत्सलाबाईंनी मिसेस अग्निहोत्रींकडे पाहिलं. त्यांना मिसेस अग्निहोत्रींच्या डोळ्यांत  विश्वास, आदर दिसला.

अग्निहोत्री जणू वत्सलाबाईंचीच वाट पहात होते. काही क्षणच..त्यांच्या जीवात धगधग होती.

नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही
सा-याच चांदण्याची जगतास जाण नाही

ना ताल राग यांच्या बंधात बांधलेला
स्वरमेघ मंजूळांचा बरसे दिशात दाही

गावातल्या दिव्यांना पथ तो कसा पुसावा
मंझिल की जयाची तारांगणात नाही

नात्यास नाव अ पु ल्या..

फक्त काही क्षणांची भेट..

अग्निहोत्रींचा हात वत्सलाबाईंना गार लागला. एक नातं तिथेच संपलं होतं. दोन जीवांनी चाकोरीबाहेर जाऊन आपापली सोय भागवून घेतली होती.

वत्सलाबाईं व मायामावशींनी मिसेस अग्निहोत्रींचा निरोप घेतला.

मिसेस अग्निहोत्री त्यांच्या पाठमोऱ्या छबीकडे ती धुसर होईस्तोवर पहात राहिल्या.

या गोष्टीला चार दिवस झाले. राघवने वत्सलाबाईंशी बोलणंच टाकलं होतं. त्या दिवाणखान्यात असल्या तर बेडरुममधे जाऊन बसायचा. घरातलं वातावरण बिघडलं होतं. वत्सलाबाईंना लेकाचा अबोला सहन होईना. त्यांनी मायाला बोलावलं व म्हणाल्या,
“माया,मी एक निर्णय घेतलाय..सगळ्यांच्या भल्यासाठी. राघव आता बिझनेस यशस्वीरीत्या सांभाळू शकतो.

त्याच्याप्रति असलेली माझी कर्तव्ये बऱ्यापैकी संपली आहेत. एकाच घरात मुलासमोर मान खाली घालून रहाण्यापेक्षा मी महिलाश्रमात रहाणं पसंत करीन.”

“बाईसाहेब,..महिलाश्रम..लोकं काय म्हणतील?”माया सचिंत स्वरात म्हणाली.

“लोकांच काय..थोडे दिवस बोलतील मग नवा विषय मिळाला की त्यावर खलबतं.

मला शल्य एकाच गोष्टीचं वाटतं की राघवने मला समजून घेतलं नाही. असो,पण माझ्यामुळे राघवकडे कुणी बोट दाखवलं तर ते मला सहन होणार नाही.

जानकीला मात्र तुच समजाव.

थोड्याच दिवसांत कंपनीचा मालकीहक्क मी राघवच्या नावे करुन देईन.

माझ्या व आश्रमाच्या गरजेपुरते पैसे माझ्या खात्यात आहेत. माया, या महिलाश्रमाची स्थापना झाली तेव्हापासून दरवर्षी मी देणगीस्वरुपात ठराविक रक्कम तिथे देत आली आहे.”

“वत्सलाबाई,मलाही घेऊन चला तुमच्यासोबत.”मायाने विनंती केली.

“नाही हं माया. तू इथंच रहायचं आणि माझ्या लेकरांना बळ द्यायचंस,आधार द्यायचास.”

मायाचा निरोप घेऊन वत्सलाबाईंनी पहाटेच घर सोडलं. त्या महिलाश्रमाकडे रवाना झाल्या.

” सासुबाई कुठायत?” वत्सलाबाई कुठे दिसेनात म्हणून जानकी मायामावशीला विचारु लागली.

“जानकी, वत्सलाबाई आता इथे रहाणार नाहीत. फार मानी आहेत त्या. तुम्हा मुलांना त्यांच्यामुळे मान खाली घालावी लागू नये म्हणून त्या महिलाश्रमात रहायला गेल्या.”

“काय..” जानकी किंचाळलीच. “बघितलत राघव, हे सारं तुमच्यामुळे झालं.

कारखानीसही तिथे आले. जानकीने, कारखानीसांना वत्सलाबाई घर सोडून जाण्याचं कारण सांगितलं.

कारखानीसांनी थोडा विचार केला मग म्हणाले,”राघव, तुला राग येणं साहजिकच आहे. पण, जरा वत्सलाबाईंची बाजूही समजून घे, एक माणूस म्हणून त्यांच्याकडे पहा जरा, आई म्हणून नको.

राघव बेटा, तुझ्या आईवडिलांना मी महाविद्यालयीन जीवनापासनं ओळखतो. उल्हासराव असेतागायत वत्सलाबाई उल्हासरावांशी प्रामाणिक राहिल्या होत्या. खूप प्रेम होतं दोघांच परस्परांवर.

शेवटी त्यांनाही मन होतंच ना. राघव, तू वयाने मोठा आहेस. मला वाटतं राघव, तू तुझा या गोष्टीकडे बघण्याचा द्रुष्टीकोन थोडा व्यापक करायला हवा. “

“बाबा, रागाच्या भरात मी बोललो आईला पण मला कुठे ठाऊक होतं..ती अशी घर सोडून जाईल..”

“म्हणजे राघव तुझा राग निवळला तर. गुड..चल मग आपण सगळीच जाऊन त्यांना घेऊन येऊ. जानकी, पिल्लांना घे सोबत.” कारखानीसांनी जावयाचा हात हातात धरला.

आश्रमातली सुती साडी नेसून वत्सलाबाई ओसरीतल्या आरामखुर्चीवर निवांत बसल्या होत्या. अधनंमधनं धुरकट होणारा चष्मा..पदराने पुसत होत्या.

इतक्यात “आज्जी” म्हणत चिनूने वत्सलाबाईंच्या गळ्याभोवती वेढा घातला.

“आजी, मला न सांगता कुठे भुर्र निघून गेली होतीस. ” चिनू विचारु लागला.

“आई, मी चुकलो गं. तुला वाट्टेल तसं बोललो. परत तुला तसं नाही बोलणार. तुझ्याशिवाय आपल्या घराला अर्थ नाही, आई.” राघव वत्सलाबाईंच्या गुडघ्यावर डोकं ठेवून स्फुंदू लागला.

वत्सलाबाईंना राघवचं हे हळवं..आर्जवी रुप प्रथमच दिसत होतं.

वत्सलाबाई म्हणाल्या,”राघव, तू माझ्यावर बोट ठेवलंस ते एक निमित्त झालं समज..मला या सांसारिक जबाबदाऱ्यांतून मुक्त होण्यासाठी नियतीने टाकलेला नवा भावनिक डाव समजू . पण, आता माघार नाही रे बाळांनो.

आयुष्यभर कुटुंबासाठी, कंपनीसाठी राबले..आता तिची धुरा अंगिकारायला तुम्ही दोघं पतीपत्नी सक्षम आहात. कारखानीसांचा विश्वासक हात पाठीशी आहे तुमच्या..शिवाय मीही आहेच रे. सणावाराला येत जाईन. माझ्या मुला,नातवंडांना बघायला.

या आश्रमातील अनाथ,गरीब, विधवा,परित्यक्ता महिलांसाठी उरलेलं आयुष्य खर्ची करायचा निश्चय करतेय. तुम्ही सगळे पाठिंबा द्याल नं मला!”

राघव व जानकीने शहाण्या बाळासारखी मान हलवली.

जड पावलांनी राघव,जानकी मुलांना घेऊन माघारी फिरली.

वत्सलाबाईंच्या मनात ढग भरुन आले.

प्रार्थनेची वेळ झाली तशी..
आश्रमातल्या लेकीबाळी सुरात गाऊ लागल्या..

तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे

जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे

हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती

सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी

साधना करिती तुझी जे नित्य तव सहवास दे

जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना

तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना

धमन्यातल्या रुधिरास या खल भेदण्याची आस दे

सामर्थ्य या शब्दांस आणि अर्थ या जगण्यास दे

सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती

नीती ना ही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती

पंखास या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे

वत्सलाबाईंनी मनातल्या चिंता,उद्वेग झटकून टाकले नि आपसूक त्या आश्रमसख्यांच्या सुरात सूर मिसळला.

समाप्त

वाचकहो. आवडली नं कथा.
‘चाकोरीबाहेर’.. ही कथा लिहिताना खरंच मजा आली.  एकेक पात्र जीवंत साकारताना अनुभवत होते..शिकत होते. तुम्ही वेळोवेळी दिलेले प्रोत्साहन..शब्द अपुरे..तुमचे आभार मानावयास. असाच स्नेह राहू द्या. माझ्यावर व रीतभातपेजवर..रीतभात मराठी पेजचे आभार..ज्यांनी ही कथा तुमच्यापर्यंत पोहोचवली. अशाच  मनस्वी कथा वाचण्यासाठी ‘ritbhat मराठी’ पेजला फॉलो करायला विसरू नका. पुन्हा एकदा मन:पुर्वक धन्यवाद 

–सौ.गीता गजानन गरुड.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *