Ritbhatmarathi

Search
Close this search box.

सौ.गीता गजानन गरुड

नदीच्या काठावरलं,हिरवाईने नटलेलं, माडापोफळीच्या दाटीतलं गाव पाहून प्रवासाचा शीण कुठच्याकुठे पळाला. 
—————-

गाडीतनं उतरल्यावर, नदीवरचा साकव पार करताना चिनूला भारी मजा वाटली. तिथून पुढे गर्द आमराईची वाट होती…

जानकी प्रत्येक झाडाभोवती गुंफलेल्या तिच्या व मैत्रिणींच्या आठवणी सांगत होती. मधेच हसत होती..स्वत:त मश्गुल होती.

चिंचेचं झाड जवळ येताच तिला चिंचा खायचा मोह अनावर झाला. नेम धरुन दगड मारुन तिने पसाभर गाभुळलेल्या चिंचा गोळा केल्या.

परीला खोकला होईल म्हणून मावशीने तिला एकच खाऊ दिली न् बाकीच्या आपल्या पिशवीत ठेवल्या.

रायआवळ्याचं झाड तर बहराने खाली वाकलं होतं. लोणच्यासाठी म्हणून मावशीने स्वत:च जानकीला रायावळे काढायला सांगितलं नि मावशीचा शब्द प्रमाण मानत ती  साडी वर खोचून सरसर झाडावर चढली देखील. फांद्या हलवून आवळ्यांचा सडाच खाली पाडला. चिनू,तांबे न् राघवची आवळे गोळा करताना त्रेधातिरपट उडाली.

काही आवळे तर टपकन राघवच्या पाठीवर पडले. त्याने रागाने वरती पहाताच जानकीने दातांनी जीभ चावली व कान पकडले. राघव मनात म्हणाला,”थांब..भेट मला..मग बघतोच तुला. सगळं उट्ट वसूल करतो.”

वत्सलाबाईंनी तिला उतरायला लावलं,”घरी नेणारैस आम्हाला का झाडावरच बसून रहाणार..” म्हणताच जानकी साडीचा बोंगा आवरतसावरत खाली उतरली.

मग पाणंदीतून  ती मंडळींना आपल्या घरी घेऊन आली. समोर तिला तिचं घर दिसलं.

जानकी रहायची ते छोटसं घर मोडकळीस आलं होतं. तिथे जाताच जानकी पुन्हा हळवी झाली.

ओसरीवर,माजघरात फिरुन आली.. स्वैंपाकघराच्या खिडकीच्या गजांना तिनं घट्ट पकडलं. आईला मजुरीहून यायला उशीर झाला की ती तिथेच आईची वाट बघत बसायची.

जानकीला आईची सोबत आठवू लागली. आईने भरवलेला वरणभाताचा घास तिला आठवला…3

केस विंचरत नाही म्हणून पाठीत धपाटे घालून तुळशी व्रुंदावनाच्या पेळेवर खेचून न्हेणं..चपचपीत तेल लावून बांधलेल्या केसांच्या घट्ट वेण्या..त्यावर माळलेले पिवळ्याधम्म शेवंतीचे गजरे..

स्वतः उपाशी राहून जानकीला भरवलेली भाजीभाकर..सारं काही जणू आता इथे घडल्यासारं तिला नजरेसमोर दिसू लागलं..

आईचा पायरव ऐकू येण्यासाठी तिने कानात प्राण गोळा केले..अंगणातल्या देवचाफ्याला स्पर्शुन आलेली एक गंधित झुळुक तिला बिलगली.

तिला आईचा प्रेमळ स्पर्श जाणवला. आई..आई मी आलेय गं। तुला भेटायला..ऐकतेस नं आई..अशीच येत राहीन तुझ्याकडे..जानकी भान हरपून बोलत होती. तिच्या डोळ्यांतून अश्रुधारा अविरत वहात होत्या. 

तिची ती विव्हल अवस्था पाहून राघव पुढे सरसावणार इतक्यात वत्सलाबाईंनी त्याला मागै ओढलं..मोकळं होऊदेत तिला..पोटभर रडू देत म्हणाल्या . रडण्याचा आवेग ओसरताच मायामावशीने जानकीला जवळ घेतलं. पदराने तिचे डोळे पुसले.

घरात जे काही थोडंबहुत सामान होतं ते गरजुंनी केव्हाच न्हेलं होतं. खिडकीजवळ आईचा कंगवा मात्र होता. जानकीने तो आईची आठवण म्हणून घेतला.

जानकीला ती कविता आठवली..

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता

मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता

ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मी ही रडलो

त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता

अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे

खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता

घरात बराच पालापाचोळा पडला होता.  राघवने ठरवलं..या घराची डागडुजी करायची नि साफसफाईसाठी एखाद्या गावकऱ्याला कामाला ठेवायचं. त्याच्या जानकीचं मन जे त्यात गुंतलं होतं.
घराला नमस्कार करुन ती चुलत्यांच्या घराकडे गेली.

जानकी आल्याचा सुगावा एव्हाना चुलत्यांना लागला होता. छोट्याशा गावात बातमी पसरायला वेळ तो कितीसा लागणार! आपल्याकडे कशाला येईल ती प्रत्येक चुलता विचार करत होता नि आपापल्या कामाला जायला तयार झाला.

इतक्यात गाडीचा आवाज पाणंदीतून ऐकू आला. पोरंसोरं गाडीपाठून धावत होती.

दारात एवढी मोठी चकाचक गाडी पाहून जानकीचे चुलते थक्क झाले. मधला चुलता हयात नव्हता. थोरल्या व धाकट्या चुलत्याने पाहुणेमंडळींच स्वागत केलं..जानकीने ओळख करुन दिली.

चुलत्यांना आठवलं..भावजयीला भर पावसात  कसं घराबाहेर काढलं होतं..पदरात लेकरु असताना..भावजय गयावया करत होती..तिन्ही दिरांनी दारं बंद करुन घेतली होती.

जीती आहे का मेली हेही बघण्याची इच्छा कधी झाली नव्हती त्यांना..त्याच भावजयची लेक एवढ्या मोठ्या घराण्याची सूनबाई बनून आपल्या पाया पडायला येते काय..चुलत्यांना शरमल्यासारखं झालं होतं.

दोन्ही काक्यांनी जानकीची खणानारळाने ओटी भरली. बाळाच्या हाती पाकीट दिलं.

जानकी बघत होती..एवढं वाईट वागून चुलत्यांच तरी कुठे भलं झालं होतं. एकेकाळी सुबत्तेने भरलेल्या घराची रयाच गेली होती.

घरात वेगळेचार झाला होता. जावाजावा एकमेकींची तोंड बघत नव्हत्या. थोरल्या चुलतीचा लेक अट्टल बेवडा झाला होता. मधल्याच्या लेकीने सासरी छळ होतो म्हणून विहीर जवळ केली होती.

चिनू मात्र त्या झाडापेडांत छान रमला होता. गाईवासरं अशी इतक्या जवळ त्याला प्रथमच दिसत होती.

सगळ्यांचा निरोप घेऊन मंडळी देवीच्या दर्शनाला गेली. आंब्याच्या राईत वसलेलं ते देवीचं कौलारू देऊळ..अशी निरव शांतता शहरात कुठे लाभायला. बाजूच्या झऱ्याजवळ सर्वांनी हातपाय धुतले. सारवलेल्या गाभाऱ्याचा स्पर्श ओलेत्या पावलांना झाला.  गाभाऱ्यात देवी प्रसन्न मुद्रेने हसत होती. देवीची साडीचोळी,श्रीफळ,फुलांनी ओटी भरली नि जोडीने साष्टांग नमस्कार घातला.

पुजारीकाकांनी चहापाण्याची व्यवस्था केली.
पुजारीकाकांनी जानकीच्या आईचं हलाखीचं जीवन,
तिची चिकाटी,जानकीच्या लहानपणीच्या गमतीजमती सांगितल्या.

पुजारी काकांच्या पत्नीने, जानकीला माहेरची भेट म्हणून गावठी तांदूळ,पोहे बांधून दिले.  त्यांचा आशीर्वाद घेऊन गाडी मामाकडे निघाली.

मामा आता बराच मवाळ झाला होता. मामाच्या देवाचं दर्शन घेतलं.

मामाने पाहुणेमंडळींची सरबराई अगदी चोख केली होती. मामीने जावयासाठी खास पुरणपोळीचा स्वैंपाक केला होता.

कुरडया,पापड,लोणचं,कोशिंबीर..सारं पानांवर सजलं होतं. पानांभोवती सुरेख रांगोळीची वेलबुट्टी सुवर्णाने रेखाटली.

पंगत जेवायला बसली. मामी हवं, नको ते विचारुन वाढत होती. मामा आग्रह करत होता.

संध्याकाळी निघायचं होतं खरं पण चिनू ऐकेना. त्याला खेळायचा ताल आला होता. जानकीच्या मामाने त्याला विटीदांडू बनवून दिला,कशा प्रकारे खेळायचं ते शिकवलं. नारळाच्या झावळीचा चाबूक बनवून दिला..तो हातात घेताच चिनूत शिवाजी महाराज अवतरले. राजेशाही थाटात इकडून तिकडे फिरू लागला.

सुवर्णाने जानकीला फुगडीचा आग्रह केला. दोघींनी मिळून फुगडीची गाणी गात फुगड्या घातल्या.

आजूबाजूचे बालगोपाळही त्यांच्या खेळात सामील झाले. एकाने ब्याटबॉल आणला. कुरणात म्याच सुरु झाली. ब्याट राघवच्या हातात दिली. राघवच्याही मनात खेळायचं होतं. त्याने पोटभर रन्स काढले.

खेळताना झेल पकडण्यासाठी धावणाऱ्या जानकीची चपळाई पाहून काही तासांपुर्वी मुळुमुळू रडलेली जानकी ती हीच का असा संभ्रम राघवच्या मनात झाला.

कधी एकदा तिला बाहुपाशात घेतोय असं त्याला वाटत होतं. .पण जानकी तर अगदी मुलात मूल होऊन गेली होती.

बऱ्याच दिवसांनी खेळल्याने राघव चांगलाच दमला. त्यात जराशा दुर्लक्षाने एका दगडाला त्याचा अंगठा आपटला. जानकीचा जीव खालीवर झाला. अंगठ्यातून रक्त वहात होतं. तिने क्रुतककोपाने त्याच्याकडे पाहिलं न् त्याचा हात आपल्या खांद्यावर घेतला नि त्याला ओसरीवर आणलं.

त्या घामैजल्या तनुच्या स्पर्शाने राघव क्षणभरासाठी अंगठ्यातून येणारी कळ विसरला.

“राघव, काय झालं. कुठे धडपडलात?” वत्सलाबाई विचारत होत्या.

“कुठे काय..कुठे नाही..काहीच नाही.”

“अहो मग हे रक्त कसं..” वत्सलाबाईंचं बोलणं पुर्ण होईस्तोवर जानकी आतून हळदतुरटीची पूड करुन घेऊन आली.

स्वतःच्या हाताने तिने अंगठ्याची जखम स्वच्छ धुतली,पुसली. त्यावर तेलात कालवून हळदतुरटी बांधली व वरतून रुमाल गुंडाळून सैलसर गाठ बांधली.

हे सारं करताना ती त्याच्या अगदी नजीक होती..क्षणात तो तिला कवेत घेऊ शकत होता..हाय..पण आजुबाजूला सगळा सासरमाहेरचा मेळा भरला होता.

हातपाय धुण्यासाठी जानकीने राघवला पाणी काढून दिलं. टॉवेल दिला.

रात्री चांदण्यात जेवणं उरकली. मामाने सुवर्णाचा विषय काढला.

“बाईसाहेब, हा एक घोर आहे बघा जीवाला. पोरीची जात. हिचं एकदा लग्न लागलं की आम्ही मोकळे. तुम्हीच आता एखादा चांगल्या घरातला मुलगा बघा हिच्यासाठी.”

“व्हय तर वत्सलाबाईं एवढं आमचं काम मनावर घ्याच.” नवऱ्याच्या बोलण्याला जानकीच्या मामीने दुजोरा दिला.

“सुवर्णा, तुझं काय मत आहे यावर?” वत्सलाबाईंनी विचारलं.

“आता कुठं बीए झालेय मी. मला पुढे शिकायचंय. एमए करायचय. प्राध्यापक बनायचंय.” सुवर्णा खाली मान घालून बोलली…

जानकीच्या मामाला लेकीच्या ह्या पुढे बोलण्याचा भरपूर राग आला पण पाहुणेमंडळींसमोर त्याचा नाइलाज होता तरी सुवर्णाची आई बोललीच,”पोरीच्या जातीनं जास्ती शिकू नये बाय. पुढे नवरामुलगा मिळताना लय कठीण होऊन बसतय.”

सुवर्णा हिरमुसली झाली.

वत्सलाबाई तिला धीर देत म्हणाल्या,”सुवर्णा, तुझी शिकायची इच्छा आहे ना. तू जरुर शीक. तुझ्या शिक्षणाचा खर्च ,कपड्यांचा खर्च राघव उचलतील.”

“अहो पण तिच्या लग्नाचं..” दोघं नवराबायको मधे पडली.

“त्याची तुम्ही काळजी करु नका. तिला शिकू द्या. नोकरी करु द्या. स्थळं चालत येतील. न आल्यास आम्ही शोधून आणू.”

वत्सलाबाईंनी एवढी खात्री दिली म्हणताच दोघंही खूष झाली.

राघव व जानकी मामामामीच्या पाया पडले..

नि परतीच्या प्रवासाला निघाले.

प्रवासात परीने,चिनूने मुळीच त्रास दिला नाही. सगळं योजल्याप्रमाणे पार पडलं.

———————

वत्सलाबाईंनी घरी येताच मायामावशीला बोलावून घेतलं.

” खोलीत बोलावलत..काय हवंय का?”

“बस अशी.”

“सांगा तरी काय ते.”

“आजपासून चिनू नि परी तुझ्यासोबत झोपतील. मी आहेच गं पण चिनूला तुझाच लळा ना..नि मला ते रात्रीचं अधनंमधनं जागणं व्हायचं नाही.”

“एवढंच ना. अजिबात काळजी करु नका तुम्ही. चिनू एकदा निजला की सकाळीच उठतो तेही चारपाचदा हाका मारल्यावर. हल्ली तर सरळ बाथरुममधे न्हेऊन बसवते त्याला.”

“हो ते झालंच पण परीचं..”

—————-
“परी तरी कुठे उठते.. दुपारी खेळवत जाईन तिला..म्हणजे रात्री सुस निजते. ओलं झालं तर जरा चुळबूळ करते तेवढीच..आणि रडलीच तर फोन करु तिच्या आईला बाहेर बोलवू.”

“नाजूक विषय गं म्हणून काळजी.”

“मी आहे ना.”

“बरं आज रात्रीची काय व्यवस्था..”

“हो मी गुलाबाची फुलं आणून घेतलैत..नवीकोरी बेडशीट तुम्ही बँगलोरवरुन आणलेलात ती..ते काय ते मोगऱ्याचा रुम फ्रेशनरपण आणून घेतलाय तांबेंकडून.”

“धन्य गं बाई तुझी.”

“मग लेकरु इतके दिसाचं भुकेलं माझं,” म्हणत मायामावशी तोंडाला पदर लावून हसली.

“माया, विकासदादाला रीतसर आमंत्रण देऊनही आला नाही लग्नाला. माईअण्णा असते तर कदाचित आले असते गं.”

“ज्याची त्याची मर्जी, वत्सलाबाई.”

“अगं पण हक्कसोड पत्रावर सहीदेखील केली मी..तरी राग.”

“तो कसला?”

“त्यादिवशी पत्रिका द्यायला आम्ही त्यांच्या घरी गेलो तर वहिनी सांगत होती, त्यांच्या मुलाला कंपनीत मोठ्या पदावर कामाला घ्या. हिचा मुलगा धड पदवीधर नाही. मी म्हंटलं त्याला शिक्षण पुरं करायला सांगा आधी. एखाद्या विषयात स्पैशलायझेशन करु द्या..मग बघू. माझ्या राघवलाही मी कष्ट करायला लावले तर..फुकट मिळालेल्या यशाला किंमत नसते माया..पण ते मनाला लागलं वाटतं त्यांच्या.”

“वत्सलाबाई, सगळ्यांची मनं सांभाळत बसायची गरज नाही. तुम्ही योग्य तेच सांगितलत. कधीनकधी कळेल त्यांच त्यांना. बरं तुम्ही जेवला नाहीत. थोड दूध आणते तुमच्यासाठी.”

“नको गं कॉफी आण..आणि दोन मग आण तू तरी कुठे जेवलीस आज. दोघीजणी घेऊ.”

तितक्यात चिनू आला,”ए, आज्जी गोष्ट स़ाग नं.”

वत्सलाबाई त्याला मांडीवर घेऊन विक्रमवेताळची गोष्ट सांगू लागल्या. गोष्ट ऐकता ऐकता चिनू गाढ झोपी गेला. परी मात्र जानकीकडून लाड करुन घेत होती. कॉफी पिऊन झाल्यावर मायामावशी जानकीला म्हणाली,”जानकी, आण बघू परीला माझ्याकडे आणि तू जा बघू राघवबाबा वाट बघताहेत कधीची.”

“मावशी पण..”

“अगं, आम्ही दोघी आहोत नं इथे. रडली तर फोन लावेन तुला. धावतपळत येऊ नको. पडशीलबिडशील..सावकाश ये. गुडनैट.”

“हो मावशी. अच्छा पिल्लू. गुड नाइट,” म्हणत परीच्या गालावर पप्पी देऊन जानकी राघवच्या बेडरुमकडे वळली.

इकडे राघव जानकीची वाट बघून अस्वस्थ झाला होता. ती नक्की येईल का? मावशीने हे सगळं केलंय खरं पण परीला सोडून जानकी येणं शक्य आहे का..त्याचा स्वत:शीच संवाद चालला होता.

जानकीने राघवच्या रुमचं दार उघडलं. रूममधे मोगऱ्याचा सुगंध दरवळत होता. गुलाबी फुलांची बेडशीट बेडवर अंथरली होती. फुलदाणीत निशिगंधाची फुले शोभून दिसत होती. खिडकीतनं चांदवा डोकावत होता

——————

क्रमश:

कसं वाटलं जानकीचं माहेर! माहेराची माणसंच नाही तर माहेराची प्रत्येक गल्ली, तिथली झाडंपेडं,माती, देवळं..या साऱ्यांना कधी एकदा जाऊन भेटते असं प्रत्येक माहेरवाशिणीला वाटतं.
आपली जानकीही आपल्यातलीच एक..भेटुया पुढच्या भागात..राघवलाही बरीच वाट बघायला लावलेय नं आपण..

–सौ.गीता गजानन गरुड.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *