चाकोरीबाहेर (भाग बारावा)

सौ.गीता गजानन गरुड
राघव नुकताच कंपनीतून आला होता. नकळत त्याची पावलं गेस्ट हाऊसकडे वळली. जानकीचं गाणं ऐकत तो दाराशीच उभा राहिला..त्या खोलीत..धुपाचा दरवळ, जानकीचे स्वर यांचा उत्तम मिलाफ झाला होता.
जानकीचं लक्ष दाराकडे जाताच ती उठून उभी राहिली.
राघवसाहेब तुम्ही..या..या ना आत, म्हणत तिने त्यांना बसायला जागा करुन दिली. खाटीवरचे छोटीचे कपडे बाजूला करुन ठेवले.
“जानकी, रागावणार नसाल तर एक विचारायचं होतं..”
——————-
“विचारा ना. मी मुळीच रागावणार नाही.”
“जानकी,माझ्याशी लग्न करायला आवडेल तुला?”
अचानक विचारलेल्या त्या प्रश्नाने जानकी गांगरुन गेली. राघव हवेसे तर वाटत होते पण आजपर्यंत तिची कोणतीही इच्छा अशी सहजासहजी पुर्ण झाली नव्हती.
काय उत्तर द्यावं..जानकीला कळेना. ती उगीचच ओढणीच्या टोकाला बोटावर गुंडाळत राहिली.
“जानकी, मी काय विचारतोय..उत्तर देना प्लीज.”
आता काही धडगत नाही. उत्तर ऐकल्याशिवाय राघव काही पिच्छा सोडायचे नाहीत म्हंटल्यावर जानकीने शब्दांची जुळवाजुळव केली.
“पण मी ही अशी..वत्सलाबाई काय म्हणतील..तुम्हाला माझ्याहून सरस कितीतरी मुली भेटतील..कशाला माझं लोढणं गळ्यात बांधून घेताय? जानकी खाली मान घालून म्हणाली.
“अगं मीही तसा म्हणजे विधुर. मला तू आवडू लागलैस जानकी.. पण मी तुझ्यावर लग्नाची जबरदस्ती करणार नाही. तुला मी आवडत असेन..नवरा म्हणून पसंत असेन..तरच होकार दे नाहीतर राग नको धरुस. तू हो म्हणालीस तर वत्सलाबाईंना विचारु.”
जानकी म्हणाली,”दोन दिवसांनी सांगते.”
राघव थोडा वेळ तिथेच रेंगाळला अन निघून आला.
जानकीला लग्नाचं विचारल्यापासनं दोन रात्री राघवच्या डोळ्याला डोळा नव्हता.
जानकीचं उत्तर ऐकण्यासाठी त्याचे कान आतुर झाले होते.
जानकी खाटीवर पहुडली होती..मनात विचार होता राघवचा..’वत्सलाबाई,कोणाचं पाप वहात असेल ती मुलगी!’.. हे राघवचे वाग्बाण..राघवच्याच हल्लीच्या समंजस वागणुकीने बोथट झाले होते.
राघवचं जवळ असणं तिला हवंहवंस वाटू लागलं होतं.
त्याची दाट मिशी,मिशीतलं ते मधाळ हसू, भेदक नजर, लांबरुंद कपाळ,त्यावर स्पष्ट दिसणारी नि क्षुब्ध झाला की तटतटणारी , वीजेसारखी भासणारी हिरवी शीर, धारदार नाक..
नकळत झालेले त्याचे अस्पष्टसे..तिला अधीर करणारे स्पर्श..सगळं आठवून जानकी खुदकन हसली.
तितक्यात परीने ओलं केलं न् ट्या ट्या करु लागली.
जानकीने तिला उचलून घेतलं..तिचे ओलं आंगड काढलं.
निलूची आजी बाळाला शंभो घालायला आली. जानकी ,मायामावशी तिला हवं ते हातात देत होत्या.
परीच्या कोवळ्या अंगात आजीने स्वतः घरी सिद्ध केलेलं आयुर्वेदिक तेल जिरवलं..
परीच्या हातापायांची थोडी कवायत केली न् ऊन ऊन पाणी तिच्यावर घालत तिच्याशी गप्पा करु लागली.
तशी परीही मुठी चोखत आजीला हुंकार देऊ लागली.
“भुकी लागली आमच्या परीला..हो हो..चिनूदादा ये ये..खाऊ घेऊन ये हं..चिऊताई ये गं..परीसोबत खेळायला ये..काऊदादा ये..भू भू ये..”
परीची बडबड ऐकण्यासाठी आलेल्या वत्सलाबाईही हा आनंदसोहळा पहात होत्या.
कोणतं नातं होतं त्या आजीनातींत..रक्ताचं..छे! मग? ..मायेच नातं होतं..आजीने परीला नि परीने आजीला आपलंस केलं होतं..
तिथे कोणताही आपपरभाव नव्हता..होतं ते फक्त दैवी वास्तव्य.
कदाचित..कदाचित निलांबरीही हे आनंदाचे क्षण पहात असावी..तिच्या चिनूला हक्काची आई,बहीण भेटणार,आजीला नात भेटणार म्हणून तीही समाधान पावली असावी.
बाळाला दुपट्यात गुंडाळून मायामावशीने जानकीच्या हातात दिलं.
जानकीने परीला दुधाला घेतलं.
जानकी बाळा..काय होतंय का तुला..अशी गप्प गप्प का..वत्सलाबाईंनी आस्थेने विचारलं.
जानकीने राघवचं बोलणं त्यांच्या कानावर घातलं.वत्सलाबाईंनी मायेने तिच्या गालांवर हात फिरवले.
“परीचं काय..माझ्या परीचा सांभाळ करतील राघव..”
तितक्यात राघव आत डोकावले..”जानकी, परी आता फक्त तुझी नाही. ती आपली दोघांची आहे.”
वत्सलाबाई स्नेहाद्र नजरेने लेकाकडे बघत राहिल्या.
निलूच्या आजीने जानकीचा हात राघवच्या हातात दिला नि दोघांची नजर काढून आपल्या गालावर कडाकडा बोटं मोडली.
जानकीने लाजून खाली मान घातली. वत्सलाबाई खऱ्या अर्थाने सुखावल्या.
कारखानीसांच मत घेण्यासाठी वत्सलाबाई व राघव दोघे त्यांच्या घरी गेले.
राघवचं अडकलेलं आयुष्य मार्गी लागतय म्हंटल्यावर तेही खूष झाले.
आजीला काही इतक्यात पाठवणार नाही असं वत्सलाबाईंनी सांगताच कारखानीस म्हणाले,”इथे घर खायला उठतं आईला. माझा तरी वेळ कामकाजात जातो. हाताशी नोकरचाकर आहेत पण आईला फक्त ही ऐहिक सुख नको आहेत ..ती मायेची भुकेली आहे..तिला हवे तेवढे दिवस नि तुम्हाला कंटाळा येईस्तोवर तुमच्याकडे ठेवा तिला.”
“आपल्या माणसांचा कंटाळा येतो का? त्यात आजी म्हणजे सगळ्यांची लाडकी. तुमचीही मदत हवीच.”
“जरुर. हक्काने बोलवा.” कारखानीस म्हणाले.
” बाबा,लग्न मोजकी माणसं बोलावून उरकून घेऊ.” राघव म्हणाला.
“त्या मुलीचं पहिलंवहिलं लग्न..झोकात करुया.”
“लोकं..”
“गाढव नि त्याच्या मालकाची गोष्ट ठाऊक आहे न् राघव. ऐकावे जनाचे करावे मनाचे. आपल्या मनाचा कौल महत्वाचा. लागा तयारीला. शुभस्य शीघ्रम.”
—————
हॉल बुक केला.
क्याटरर्सना,डेकोरेटर्सना ऑर्डर देण्यात आली.
बस्ता बांधण्यासाठी दुकानदार स्वतः उंची साड्या,सुटाची कापडं घेऊन आला होता. चिंतामणी, केशरी,मोरपिसी, जांभळा,मस्टर्ड,गुलबक्षी,चंदनी,गुलाबी,मस्टर्ड,आकाशी,.. अशा विविध रंगांंच्या चंदेरी,बनारसी सिल्क, कांचिपुरम,नारायण पेठ, इरकल,ओरगंडी, येवला पैठणी..एकापेक्षा एक रंग नि तलम वस्त्रं..
बंगला निशिगंधा,अष्टर,मोगरा,झेंडूच्या मोहक सुवासिक माळांनी सजला. पंख्यांनाही चमेलीचे हार गुंडाळण्यात आले. घरातलं वातावरण अगदी सुगंधी झालं.
बंगल्याच्या आजुबाजूची झाडं विद्युत रोषणाईने सजली. दारी झुलींचा मांडव सजला, केळीचे खांब रोवले.
पाहुणेरावळे चारपाच दिवस आधीपासनं जमा होऊ लागले. तांदूळ निवडणं, हळद कुटणं..सगळी शास्त्रं हौसेने बायका करत होत्या. नटूनथटून मुरडत होत्या. स्वैंपाकासाठी आचाऱ्यांना बोलावलं होतं त्यामुळे स्त्रियांना थट्टामस्करीला पुरेसा वेळ मिळाला होता.
कासाराला बोलावलं. जानकीने हातात पिचोड्या घातल्या होत्या. त्यांच्यापुढे साध्या हिरव्या काचेच्या बांगड्या कासाराने निलूच्या हातात चढवल्या. वत्सलाबाईंनी वेलींच्या सोन्याच्या बांगड्या जानकीच्या हातात मधोमध चढवायला दिल्या..पुढे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या शगुनाच्या पाटल्या.
बाकीच्या महिलावर्गाने हव्या त्या डिझाइनचे चुडे भरले.
खास मेहंदी काढणारी सखी बोलावली होती. तिने मधोमध राघव,जानकी ही नावं हर्टशेपमधे गुंफली. जानकीच्या गोऱ्यापान तळहातांवर मेहंदी सजत होती
सुवर्णाने गाण्याची सीडी लावली होती..
फुलले रे क्षण माझे फुलले रे
मेंदीने, शकुनाच्या, शकुनाच्या मेंदीने, सजले रे क्षण माझे सजले रे
झुळूक वाऱ्याची आली रे लेऊन कोवळी सोनफुले
साजण स्पर्शाची जाणीव होऊन भाळले मन खुळे
या वेडाचे, या वेडाचे, नाचरे भाव बिलोरे
मेंदीने, शकुनाच्या मेंदीने, खुलले रे क्षण माझे खुलले रे
ओढ ही बेबंद, श्वासात, ध्यासात, स्वप्नात येणे तुझे
भांबावल्या माझ्या उरात, स्पर्शात रेशिम काटे तुझे
मनमोराचे, मनमोराचे, जादूभरे हे पिसारे
मेंदीने, शकुनाच्या मेंदीने, हसले रे क्षण माझे हसले रे
प्रीत ही, प्रीत ही उमजेना
जडला का जीव हा समजेना
कशी सांगू मी, कशी सांगू मी
माझ्या मनीची कथा रे
मेंदीने, शकुनाच्या मेंदीने, भुलले रे क्षण माझे भुलले रे
———————-
राघव व कारखानीस अतिथींचं स्वागत करत होते.
आश्चर्य म्हणजे वत्सलाबाईंनी जानकीच्या मामामामीलाही बोलावून घेतलं.
मामा खोटे का होईना डोळ्यात आसवं आणून आम्हांला क्षमा कर म्हणाला.
जानकीला भरुन आलं.
मामाच्या रुपात माहेर दिसलं तिला.
मामीही अगदी बताशावानी गोड बोलत होती. मामीची लेक, सुवर्णा करवली म्हणून तयार झाली. वत्सलाबाईंनी मामा,मामी,सुवर्णा..तिघांनाही पोशाख केला.
साखरपुडा संपन्न झाला.
लग्नाच्या आदल्या रात्री राघवच्या मनात अनेक आंदोलनं उमटत होती. राहून राहून तो निलूची क्षमा मागत होता.
वत्सलाबाईंनी राघवची अस्वस्थता कारखानीसांना सांगितली.
कारखानीस त्याला भेटायला आले.
राघवने कारखानीसांना त्याच्या मनातलं द्वंद्व सांगितलं.
कारखानीस म्हणाले,”राघव, पतीपत्नी यातला कुणीतरी एक आधी एक्झिट घेतो. मग दुसऱ्याने आयुष्यभर त्याच्या आठवणीत रहाण्यापेक्षा..त्याला मुक्त करावं..
आठवणी जरुर काढाव्यात पण इतक्याही नव्हे की त्या जीवाच्या पुढच्या मार्गात अडथळा येईल.
एखाद्या नाटकात अचानक एखादी नटी येऊ शकली नाही तर तिची जागा दुसरी नटी घेतेच ना.
आपलं आयुष्य हेही एक रंगमंच आहे. तुझी सोबती लवकर गेली..ती माझी लेक होती रे..माझ्या काळजाचा तुकडा..तरीही तुला सांगतो..
जानकीशी लग्न करतोयस .. म्हणून अपराध्यासारखं अजिबात वाटून घेऊ नकोस. नाहीतर तू जानकीला सुखी ठेवू शकणार नाहीस आणि ती जानकीची प्रतारणा ठरेल.”
कारखानीसांच्या बोलण्याने राघवच्या मनातले संभ्रम नाहीसे झाले.
मनाचं आभाळ निरभ्र झालं. चिनूला कुशीत घेऊन तो निद्रादेवीच्या अधिन झाला.
रात्रीने कुस पालटली. एक ताजी,नवी कोरी पहाट क्षितीजावर उमटू लागली.
राघवची उष्टी हळद जानकीला लावताना मावशीने व मामींनी सुरात गाणी म्हंटली..
पिवळी-पिवळी हळद लागली, भरला हिरवा चुडा
वधु लाजरी झालीस तू गं सांगे तो चौघडा
पिवळी-पिवळी हळद लागली, भरला हिरवा चुडा
वधु लाजरी झालीस तू गं सांगे तो चौघडा
बाजुबंद त्या गोठपाटल्या बिलवर नक्षीदार
तुझ्या हृदी गं कुणी छेडिली रतिवीणेची तार?
बाजुबंद त्या गोठपाटल्या बिलवर नक्षीदार
तुझ्या हृदी गं कुणी छेडिली रतिवीणेची तार?
सांग कुणी गं अंगठीत या तांबुस दिधला खडा?
वधु लाजरी झालीस तू गं सांगे तो चौघडा
मुंडावळि या भाळी दिसती, काजळ नयनागळी
करकमळापरी कुणी गुंफिले सुवासिनीचे मणी?
मुंडावळि या भाळी दिसती, काजळ नयनागळी
करकमळापरी कुणी गुंफिले सुवासिनीचे मणी?
आठवणींचा घेउन जा तू माहेरचा घडा
वधु लाजरी झालीस तू गं सांगे तो चौघडा..
ग्रहमख, घाणे भरणे,सीमांत पूजन..सारे विधी शांततेत,मंगलमय वातावरणात पार पडत होते.
गणपती पूजन, कुलदेवता पूजन झालं.
सजवलेल्या मंडपामध्ये तांदुळाची रास करून त्यावर अन्नपूर्णेची स्थापना केली होती. जानकी हिरव्या काठाची पिवळी साडी नेसली होती. तिने समईतली वात प्रज्वलित केली आणि मग गौरीहर पुजला. गौरी गौरी सौभाग्य दे, दारी पाहुणा येईल त्यास आयुष्य दे” असे जपत ओंजळीने थोडे थोडे तांदूळ देवीला वाहू लागली.
मुहुर्ताची वेळ होत आली..नवऱ्यामुलीला आणा..असे भटजींनी सांगताच जानकीचा मामा जानकीला घेऊन स्टेजपाशी आला.
मंडपात मध्यभागी पूर्व आणि पश्चिम अशा तांदूळच्या राशी मांडून राशीच्या मध्यभागी कुंकवाने दोन्ही बाजूंनी काढलेला अंतरपाट भटजींनी धरला होता. वधूला पश्चिमेकडच्या राशीवर पूर्व दिशेला तोंड करून आणि वराला पूर्वेकडेच्या राशीवर पश्चिम दिशेला तोंड करून उभे केले.
सनईचे मंजूळ सूर मंगल कार्यालयात घुमत होते. कार्यालय माणसांनी भरुन गेलं होतं. अंतरपाटाआडून राघव जानकीचं साजिरं रुप पहात होता. भाळी चंद्रकोर, नाकात मोत्याची नथ, डोळ्यांत काजळ, थरथरत्या ओठांवर लाली..फार गोड दिसत होती जानकी..राघवची जानकी.
जणू मनात गीत आळवत होती..
पैठणी बिलगून म्हणते मला
जानकी वनवास हा संपला
भटजी मंगलाष्टके म्हणू लागले.
मंगलाष्टक म्हणजे आठ श्लोकांचे मंगल वचनांचे अष्टक. मुहूर्ताची घटिका जवळ येईपर्यंत मंगलाष्टके म्हणण्याची पद्धत असते. शुभमंगल सावधान झालं. लग्न लागलं..
संगीताचे सूर वातावरण मंत्रमुग्ध करत होते..
ही अनोखी गाठ कोणी बांधली
एक झाले ऊन अन सावली
जाणिवांचा पूल कोणी सांधला
ऐलतिरी पैल हाती लागला
रंगली मेंदी नव्याने रंगली
एक झाले ऊन अन सावली
कन्यादान मामामामीच्या हातून पार पडलं.
सासरच्यांनी ओटीत घातलेली सोनेरी बुट्ट्यांची कुंकवाच्या रंगाची शिवशाही पैठणी जानकीला चापुनचोपून नेसवली. खांद्यावर सोनेरी जरीकाम केलेला शेला..पदरावरती सोनेरी मोर ऐटीत पिसारा मिरवत होते.
गळ्याबरोबर जोंधळी मण्यांची वज्रटिक, त्याखाली बेळगावी नक्षीची दोन पदरी मोहनमाळ शोभून दिसत होती.. नाजूक दंडात डाळिंबी खड्याचा बाजुबुंद रुतला होता.
कानात खास दाक्षिणात्य पद्धतीचे झुमके डोलत होते.
केसांची साजेसी केशरचना करुन त्यावर मोगऱ्याचे गजरे माळले होते.
राघवही मोतीकलरच्या शेरवानीत राजबिंडा दिसत होता. लाल रंगाची झिरमिरीत ओढणी त्याने उजव्या खांद्यावरनं हातावर घेतली होती. मामाने स्वतः त्याला कुंकू कलरचा फेटा बांधला..मग तर त्याचा रुबाब औरच दिसू लागला.
जानकी डोळ्याच्या कोनातून हळूच राघवकडे पहात असताना सुवर्णाने तिला हळूच ढुशी दिली. आपली चोरी सुवर्णाने पकडली हे जाणून जानकी गालातल्या गालात हसली.
कंकणबंधन, मंगळसुत्रबंध, होमलाजाहोम, सप्तपदी..सारं काही यथसांग पार पडत होतं. चिनू इकडून तिकडे खेळत होता. मधेच जानकीला डोकावून बघत होता. मायामावशी परीला घेऊन बसल्या होत्या.
कार्यक्रमाची सांगता होताच वरात घराच्या दिशेने रवाना झाली.
आज अष्टपुत्र्यांच्या घराचा थाट काही न्याराच होता.
घर जणू गात होतं..
दारा बांधता तोरण घर नव्याने सजले
आज येणार अंगणी सोनचाफ्याची पाऊले
भिंती रंगल्या स्वप्नांनी झाल्या गजांच्या कर्दळी
दार नटून उभेच, नाही मिरवायची बोली
सूर्यकिरण म्हणाले घालू दारात रांगोळी
शिंपू पायावरी दव म्हणे वरुन पागोळी
उंबऱ्यावरचं मापटं जानकीने ओलांडलं न सासरच्या घरात प्रवेश केला.
राघव,जानकी दोघांनी जोडीने उल्हासरावांच्या फोटोला व निलांबरीच्या फोटोला नमस्कार केला,फुलं वाहिली.
वत्सलाबाई जरा कातर झाल्या.
कारखानीसांना,आजीला,मायामावशीला,वत्सलाबाईंना,अग्निहोत्री व इतर आप्तजनांना नमस्कार करता करता दोघांचीही पाठ भरुन आली.
दुसऱ्यादिवशी सत्यनारायणाच्या पुजेला जोडीने बसली. नारिंगी रंगाच्या, जांभळ्या काठाच्या साडीतलं,कंच हिरव्या शेल्यातलं तिचं रुप राघवला पुन्हा पुन्हा तिच्याकडे पहाण्यास भाग पाडत होतं.
राघवही टोपी घातल्याने भलताच क्युट दिसत होता. मम म्हणण्यासाठी त्याच्या उजव्या हाताला बोटं लावताना जानकी मोहरली होती. सुवर्णा कानाजवळ येऊन हळूच तिची थट्टा करुन जात होती.
मामामामी व सुवर्णा संध्याकाळी जायला निघाले. जावईबापूंना गावी येण्याचं आमंत्रण देऊन गेले नि जानकी पुन्हा सैरभैर झाली.
गेले दोन दिवस फक्त दूध पाजण्यापुरतं ती परीला घेत होती..बाकी तिचं सारं आजी नि मावशीआजी करत होत्या. आता परीही चारेक महिन्यांची झाल्याने बऱ्यापैकी माणसं ओळखे..घेईल त्याच्याकडे जाई फक्त दाढीवाली माणसं तिला आवडत नसत.
रात्री हळदीकुंकवासाठी बोलावणी पाठवली होती. ओळखीपाळखीच्या,शेजारच्या साऱ्या येत होत्या.
निलूविषयी हळहळ व जानकीच्या रुपाचं,सहज वावराचं कौतुक करत होत्या. इतरही चर्चा बारीक आवाजात काही बेरक्या स्त्रिया करत होत्या..ज्याने जानकी नाही म्हंटलं तरी अस्वस्थ झाली.
मायामावशीने जानकीला आत बोलावलं व तिची समजूत घातली,”जानकी बाय, लोकं दहा तोंडाने बोलणार. आपण लक्ष नये देऊ. हत्तीसारखं चालावं. एवढ्यातेवढ्यावरुन खट्टू नाही व्हायचं काही.”
परी रडू लागली तसं जानकीने तिला पाजायला घेतलं.
जेवताना मायामावशीच्या आग्रहाने दोघांनी एकमेकांना घास भरवला..नावं घेतली.
राघव बाहेर मित्रांसोबत बसला होता. जानकीला या सगळ्या थाटामाटात आईची खूप आठवण येत होती. तिच्या मनात येत होतं. आज आई असती तर..माहेराच्या घरातून वाजतगाजत वरात निघाली असती आपली.
वत्सलाबाईंनी जानकीच्या पाठीवरून.हात फिरवला तसा इतका वेळ दाबून धरलेला हुंदका फुटला.
माहेरच्या घरची खूप आठवण येतेय असं वत्सलाबाईंना, जानकीने सांगताच..त्या म्हणाल्या..” त्यासाठी रडायचं कशाला वेडाबाई..आपण सगळी मिळून जाऊ तूझ्या माहेरी.”
“खरंच..”
“अगदी खरं. आता रडायचं बिलकुल नाही. जाण्याची तयारी करा. मी तांबेंना गाडी तयार ठेवायला सांगते.”
गाडीत राघवच्या बाजूला जानकी बसली होती खरी पण मनाने ती कधीच माहेराला पोहोचली होती. तिच्या वाऱ्यावर उडणाऱ्या भुरभुरत्या केसांसारखं तिचं मनही वाऱ्यासवे माहेरच्या अंगणात पोहोचलं होतं..गुणगुणत होतं..
आठवणींच्या आधी जाते
तिथे मनाचे निळे पाखरू
खेड्यामधले घर कौलारू
हिरवी श्यामल भवती शेती
पाऊलवाटा अंगणी मिळती
लव फुलवंती जुई शेवंती
शेंदरी अंबा सजे मोहरू
चौकट तीवर बाल गणपती
चौसोपी खण स्वागत करती
झोपाळ्यावर अभंग कातर
सवे लागती कड्या करकरू
माजघरातील उजेड मिणमिण
वृद्ध काकणे करिती किणकिण
किणकिणती हळू ये कुरवाळू
दूर देशिचे प्रौढ लेकरू..
नदीच्या काठावरलं,हिरवाईने नटलेलं, माडापोफळीच्या दाटीतलं गाव पाहून मंडळींचा प्रवासाचा शीण कुठच्याकुठे पळाला.
क्रमश:
येणार नं जानकीच्या माहेरी..आणि मिलनाची हुरहूर..सुखदुःखाचे क्षण..बरंच काहीभेटुया पुढच्या भागात. प्रतिक्रिया नक्की द्या..तुमच्या प्रतिक्रिया म्हणजे लेखणीचं इंधन. .