चाकोरीबाहेर (भाग दहावा)

सौ.गीता गजानन गरुड.
डॉक्टर परत आले. ताप उतरत नाहीसं पाहून तेही काळजीत पडले.” कसली धास्ती घेतलीय का याने..परीक्षा वगैरे.”
“नाही ओ डॉक्टर,उलट आता तर पुर्वीपेक्षा कितीतरी सोप्पे जातात त्याला विषय.”वत्सलाबाई काकुळतीने म्हणाल्या.
“चिनूबाळा डोळे उघड..डोळे उघड राजा.” राघवच्या हाकेने चिनूने डोळे उघडले.
————-
“डॉक्टर एनिथिंग सिरियस?..काय झालं ओ माझ्या चिनूला..डॉक्टर,प्लीज लवकर बरा करा याला. मी नाही बघू शकत याला असा.” राघव भरुन आलेले डोळे पुसत म्हणाला.
“राघव माय सन, तुमचा फ्यामिली डॉक्टर मी. तुझ्याइतकीच मलाही काळजी आहे चिनूची. काही होत नाहीए त्याला. या बाहेरच्या गोळ्या लिहून देतो..त्या दिवसातनं दोनदा द्यायच्या. ताप चढला तर ओल्या फडक्याने अंग पुसून काढा.
आणखी दोन दिवसात ताप उतरला नाही तर मात्र आपण टेस्ट करुन घेऊ..पण साधा फ्लूच असणार..वातावरणात किती बदल होताहेत..लहान मुलांना त्रास होतो त्याचा…” डॉक्टरांनी राघवला धीर दिला.
एवढ्यात चिनू कुशीने वळला. “आंटी..आंटी,”जाबडू लागला.
“चिनूबाळा डोळे उघड..डोळे उघड राजा.” राघवच्या हाकेने चिनूने डोळे उघडले. तो मावशीआजीला शोधू लागला. मावशीआजी जवळ येताच म्हणाला,”मावशीआजी..आंटी..आंटी आली का?”
“येईल हं बाळा. लवकर येईल आंटी.” मावशीआजी त्याच्या कपाळावर हात ठेवत म्हणाली.
“आज्जी,तिला सांग..तुझा चिनू खूप आजारी आहे..मग बघ कशी पळत येईल ती.” चिनू क्षीण आवाजात पुटपुटला.
डॉक्टर म्हणाले,”राघव, या आंटी कोण?”
“ते आमच्याकडे एक पेइंग गेस्ट रहायला आल्यात.”
“इंटरेस्टींग. अष्टपुत्र्यांना कधीपासून पेइंग गेस्ट ठेवायची गरज पडली..खरं बोलतोयस ना..असो त्या आंटींना आधी फोन करून बोलवून घ्या. भलत्याच प्रेमळ दिसताहेत..पेइंग गेस्ट..आमच्या चिनूबाळाचा जीव जडला तो..आणखी कुणाचं काळीज नाही नं चोरलं बाईसाहेबांनी..आय मिन पेइंग गेस्टने..”डॉक्टर गळ्यातला स्टेथेस्कोप ब्यागेत ठेवत म्हणाले.
राघवने हात मानेकडे न्हेला.
“इथे कुणाला काळीज असलं तर पुढच्या गोष्टी डॉक्टर,” वत्सलाबाई राघवकडे रोखून पहात म्हणाल्या.
“निदान माणुसकी तरी..”
“चिल वत्सलाबाई..आग धीरे धीरे लगनी चाहिए..दोनों तरफसे..जल्दबाजी अच्छी नहीं।”
“ते झालंच ओ. तरी चिडचिड होतेच नं.”
“हुं..म्हणूनच बी पी अनस्टेबल रहातं तुमचं.. ही दुखणीखुपणी होतंच असतात. सगळ्यात मोठा आजार म्हणजे चिंता. ती सोडा.”
“ती एखादी वस्तू आहे का सोडून द्यायला..”
“तुम्ही सगळ्या..एका माळेचे मणी..आमचं खटलंही असंच. सतत विचार करत बसणार.”
इतक्यात माया मावशीने डॉक्टरांच्या आवडीची कॉफी आणून दिली.
तिचा पहिला सीप घेतला नि “झक्कास” अशी दाद दिली त्यांनी.
डॉक्टरांच्या गप्पांनी सगळ्यांच्या मनावरचा ताण कमी झाला.
——
सूर्य मावळतीला गेला. तिन्हीसांज झाली तसा मावशीआजीचा जीव घाबरा झाला. ताप तो काय यायचा न् जायचा पण हा कोणाच्यातरी आठवणीने घेतलेला ताप जाणार कसा..मावशीला मोठं कोडं पडलं..
त्यात जानकीचीही काळजी लागून राहिलेली. दोन दिवस होत आले,पोरीचा पत्ता नाही.
पोटुशी पोर..कुठवर गेली असेल..कुणा गिधाडाच्या तावडीत तर..मावशीबाईंना हुंदका अनावर झाला.
ती देवघरात जाऊन तिच्या श्रीकृष्णापाशी हात जोडून बसली..या संकटातून तार रे माझ्या पोरांना, विनवू लागली. सांजवातीने तीच्या मनात उठलेलं काहूर शांत केलं. जणू कान्हा तिला सांगत होता..मी आहे ना!
दुसऱ्या दिवशी चिनूला घरीच सलाइन लावण्यात आलं. गोळ्या बदलूनही ताप येणं कमी होत नव्हतं. टेस्ट्स केल्या. रिपोर्ट तर नॉर्मल येत होते.
ड्रायव्हरकाकांनी एका बुवाकडून मंतरलेला दोरा आणून चिनूच्या हाती बांधला.
डॉक्टर,वैद्य,बुवा,प्रार्थना. सगळे उपाय जो तो ज्याच्या त्याच्या परीने करत होता.
हॉस्पिटलमध्ये ठेवायचं तर डायरियाची कसली साथ आली होती. त्या पेशंट्सनी चाइल्ड हॉस्पिटल्स भरली होती. त्यांत याला भरती करणं म्हणजे नव्या आजाराला आपणहून निमंत्रण दिल्यासारखं होतं.
श्री. व सौ. अग्निहोत्री चिनूच्या तब्येतीची विचारपूस करायला आले होते.
अग्निहोत्री राघवशी बोलत असताना वत्सलाबाईं, सौ. अग्निहोत्रींना आपल्या खोलीत घेऊन गेल्या.
“मिसेस अग्निहोत्री, मी तुमच्या नवऱ्याशी..त्या काळी..म्हणूनच हे सगळं वाईट होतय का माझ्याशी..मी खरंच तुमची माफी मागते, मिसेस अग्निहोत्री..”असं म्हणत वत्सलाबाई त्यांचे पाय धरण्यासाठी वाकल्या..
त्यांना आपल्या दोन्ही हातांनी उठवत मिसेस अग्निहोत्री म्हणाल्या,”अहो..हे काय करताय वत्सलाबाई..तुम्ही दोषी असलात तर मीही तितकीच दोषी आहे.
सहज गंमत म्हणून सत्संगाला जाऊन बसायचे..मग त्यातच इंटरेस्ट वाटू लागला..घरच्यांनी लग्न लावून दिलं..पाठच्या तीन बहिणींची लग्न व्हायची होती..नाही कोणत्या तोंडाने म्हणणार होते मी..
गुपचूप बोहल्यावर उभी राहिले.
एखाद्या चामडी बाहुलीशी संग करतात तसा अग्निहोत्री माझ्याशी संग करायचे. मी खुलतच नव्हते..
मी पाहिलय नवऱ्याच्या अंतरीचं दु:ख..मुलं झाली पण ही अशी.. काहीतरी रीत म्हणून पार पाडतात तशी. त्यानंतर मात्र ते स्वतः म्हणाले..तू तुझ्या भक्तीमार्गावर पाऊल ठेव..
त्यांनी मला अडवणं दूरच..माझ्या मार्गातही आले नाहीत..तुमच्याशी होत असलेली जवळीक बोलून लहान मुलासारखे रडले होते माझ्यापाशी..
मीच त्यांच्या मनातला अडसर दूर केला होता न् पुढे सरा म्हणून सांगितलं होतं.
वत्सलाबाई, अहो समाजमान्य चौकटी आहेत हे निश्चित पण काही अपवादात्मक स्थितीत त्या तोडून आपल्या मनासाठी, आपल्या मनाप्रमाणे वागलं तर काय हरकत..आणि शेवटी समाज समाज म्हणजे काय हो आपल्यासारखीच चार डोकी..मानवी मन हे असं चार डोक्यांच्या तालावर नाचू शकत नाही.
आपला चिनू लवकर बरा होणारै. तुमच्या घरी आलेली ती मुलगी..जानकी तिचाही पत्ता लवकरच मिळेल तुम्हाला. मनातले सगळे किंतु परंतु काढून टाका.”
सौ. अग्निहोत्रींच्या बोलण्याने वत्सलाबाईंच्या मनावरचं मणामणाचं ओझं हलकं झालं.
कंपनीतलं सगळं कामकाज अग्निहोत्री स्वतः जातीनिशी पहात होते व दिवसातल्या घडामोडींची इत्थंभूत माहिती वत्सलाबाईंना दिवसाअखेर पुरवत होते.
राघव सध्या कामकाजात लक्ष घालायच्या मन:स्थितीतच नव्हता.
चिनू जेवत नाही म्हणून राघवही चार दिवस जेवला नव्हता. अखेर बीपी लो होऊन त्याचा तोल गेला.
पुन्हा धावपळ झाली. डॉक्टरांना बोलावण्यात आलं.
राघवचं अंग गार पडलं होतं. डॉक्टरांनी त्याला तपासून इंजेक्शन दिलं.
वत्सलाबाईंचं डोकंच चालेनासं झालं होतं. एकावर एक आपत्ती..पोटुशी पोरगी तिन्हीसांजेला घराबाहेर गेली म्हणून तर नसेल..त्यांचं मन पुन्हा कचरलं.
मायामावशी शांत चित्ताने तिच्या कान्ह्याजवळ बसली होती. तिच्या कान्ह्याची पूजा ती नित्यनेमाने करत होती.
वत्सलाबाईंना तिच्या या स्थितप्रज्ञतेचं अप्रुप वाटलं.
वत्सलाबाई मावशीपाशी जाऊन म्हणाल्या,”माया,खरंच तुझा कान्हा आहे? असला तर काहीतरी धागादोरा दे म्हणावं त्या पोरीचा. पोटुशी पोर तिन्ही सांजेची घरातनं निराश होऊन गेली म्हणूनच हे भोग लागलेत पाठीशी,दुसरं काय!
ऐन तारुण्यात नवरा गेला..माहेराचं पाठबळ तसं गौणच. माझी मीच उठले..फिनिक्स पक्ष्यासारखी भरारी घेतली . कुठे स्थिरस्थावर होत होतं तर तरणीताठी सून गेली. घर सुनं झालं.
कसेबसे एकमेकांच्या आधाराने जगत होतो..त्या आईविना पोरावर मायेची पाखर घालत होतो तर जानकी नावाचं म्रुगजळ आलं आमच्या आयुष्यात.
ग्रीष्मात तप्त जमिनीवर,पानापानांवर वळीवाचा पाऊस पडून इतके दिवस साचलेली सारी धूळ निघून जावी तशी जानकी साचलेल्या दु:खांवर स्नेहाचं शिंपण घालत होती..आणि अचानक ती निघून गेली माझ्या चिनूला एकटं टाकून.
राघव ठीक बोलला पण तो कोणत्या मन:स्थितीत बोलला हे जरा जाणून घेतलं असतं तर..माया,बघ ना मी किती वेडी..परक्या माणसाकडून नको त्या अपेक्षा करते.”
वत्सलाबाईंचा हात धरत माया म्हणाली,”जानकी परकी थोडीच! वत्सलाबाई,तुम्ही कुणालाच परकेपणाची जाणीव कधीच करून दिली नाहीत.
हा तुमचा दिलदारपणा आहे. तुम्हाला सांगू,माझ्या बासरीवाल्याला..माझ्या कान्ह्याला भल्याबुऱ्याची ओळख आहे. तो योग्य तेच माप तुमच्या पदरात घालेल.
माझं मन सांगतय, आपला चिनू नक्की बरा होणार. जानकीही घरी परत येणार. सगळं आलबेल होणार.
जरा माझ्या मुकुंदाच्या डोळ्यांतले भाव तरी पहा. काहीतरी सांगतोय तो. हसतोय बघा कसा गुलाम!”
वत्सलाबाई म्हणाल्या,”खरंच गं माया, सुखी तू. मला कधी एवढं या जगतनियंत्याशी एकरूप होणं जमलच नाही बघ.”
वत्सलाबाईंना सोबत घेऊन मायामावशी तिच्या मुरलीधराची आराधना करु लागली..
केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा
तुझ्यासारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा
वेळोवेळी संकटातुनी तारिशी मानवा
वेडा होऊन भक्तीसाठी,गोपगड्यांसह
यमुनाकाठी
नंदाघरच्या गाइ हाकिशी, गोकुळी यादवा
वीर धनुर्धर पार्थासाठी, चक्र सुदर्शन घेऊन हाती
रथ हाकुनिया पांडवांचा, पळविशी कौरवा
मायामावशीने वत्सलाबाई़च्या हातावर प्रसाद ठेवला आणि प्रसन्न हसली.
————
अम्माच्या सोबत जानकीला कुणाचेच भय नव्हते. या लोकांनाही मन, असूया,माया असते,आपल्यासारखीच सुखदुःख असतात.
तीही आपल्यासारखीच हसतात,रडतात,कुढतात..समाजाला त्यांच्याकडून दुवा तर हव्या असतात पण, समाज त्यांचा स्वीकार मात्र करत नाही. वेशीवरली वस्ती एवढीच काय ती गणना असते त्यांची.
शबनमने जानकीला नवीन चुडीदार व इतर कपडे आणून दिले. ती त्यांची जणू सखीच झाली.
बाजूच्या वस्तीतली चंद्रा येऊन दम देऊन गेली,”देख अम्मा,ये लडकी इधर रहना धोखेसे खाली नहीं है। पुलीस आयी तो हमारे घर उखाड देगी और हमें भगा देगी यहाँसे। जीना मुश्कील कर देंगे हमारा।
अम्माने तिला समजावलं,”बच्चा है री इसकी गोद में। कहाँ जायेगी बेचारी। मेरे लिए तो इन्सानियत यही एक धरम है।”चंद्रा चरफडत आल्या पाऊली परत गेली.
दोन रात्री जानकीला झोप लागत नव्हती..”आंटी तू कुठेयस? येना गं घरी परत..” चिनू आर्जव करत होता. त्याच्या डोक्यावर पट्टी,हाताला सलाईन.” जानकी रडवेली झाली. झोपेतच ती “चिनू चिनू,बाळा मी येते रे..आले रे मी.” करत ओरडायची.
अम्माने सकाळी तिला विचारलंच तेंव्हा तिने चिनू सारखा नजरेसमोर दिसतोय, असं सांगितलं.
अम्माने शबनम,छम्मोला वत्सलाबाईंच्या घरी पाठवलं. एकतर चौकीदार त्यांना आत येऊ देत नव्हता.
त्यांनी टाळ्या वाजवत जुग जुग जिओ रे लल्ला म्हणत गायला सुरुवात केली.
राघव बाहेर आला..तो त्यांना पिटाळू पहात होता.
साहब हमारा सुन तो लो जरा..शबनम म्हणाली.
“क्या सुनने का। हमेशा आते हो पैसा माँगने. फोकट का खाने कि आदत पड गयी है तुम्हे। जाओ दफा हो जाओ।”
छम्मो टाळ्या पिटत म्हणाली,”ए साहब..क्या झुठ बोलता है रे तू। हमेशा आते है बोलता है। हमारा वार ठरेला रहेता है। कुछ भी बोलता है **।
और कमाने का बोलता है। तू देगा नौकरी तेरी फ्याक्टरी में आजसे जॉइन होते है। बोल देगा क्या?” त्या दोघी जोरात टाळ्या वाजवू लागल्या तसं त्यांच्याकडे दुर्लक्ष करत राघव घराकडे वळला.
“ओ साहब,हम यहाँ जानकीदिदी कि तरफ से आये थे तुम्हारी लल्ला कि तबियत पुछने। जाते है हम।”
हे शब्द कानी येताच राघव सर्रकन मागे वळला. दाराजवळ आलेल्या वत्सलाबाईही त्याच्या पाठोपाठ गेल्या.
“काय झालं राघव?”
“ते किन्नर..त्यांना जानकीने पाठवलेलं..मी परत चुकलो..परत.” राघव उद्विगतेने म्हणाला.
“ड्रायव्हर गाडी काढा. चला राघव, मला त्यांच्या अम्माचा ठावठिकाणा माहिती आहे. चला गाडीत बसा.”
ड्रायव्हरने गाडी रतनगल्लीच्या दिशेने वळवली. राघव नि वत्सलाबाई गाडीतनं उतरल्या.
झोपडपट्ट्या होत्या त्या.एकमेकांना लागून. राघव तर प्रथमच अशा ठिकाणी पाऊल ठेवत होता. अरुंद बोळ..साईडला कचरा..उकीडवी बसलेली मुलं..विष्ठा..गाढवं..मल खाणारी डुकरं.. वाटेतच संग करणारी कुत्री ..राघवला उमासे येऊ लागले.
एका कोपऱ्यातल्या घराचं दार त्यांनी ठोकवलं.
“वत्सलादिदी तुम” वत्सलाबाईंना पाहून अम्माचा चेहरा खुलला.
“पहेचाना?”
“इस गरीब कि कैसे याद आयी?”
“अंदर तो बुला पहेले।”
“दिदी.आप हमारे घर..आओ ना..अंदर आओ।”
अम्माने त्यांना बसायला खुर्च्या उघडून दिल्या.
“दिदी आपका लल्ला तो बडा हो गया। बहोत अच्छा दिखता है।”
“राघव, तुला ठाऊक नाही. आमच्या लग्नाला
सहा वर्ष झाली तरी आम्हाला मुलबाळ नव्हतं. ही अम्मा आपल्याकडे यायची। हिने एकदा स्वतः येऊन सांगितलेलं मला..देख वत्सलाबाई.. तू इस बरस जरुर माँ बनेगी ..मेरा दिल कहेता है..आणि पंधरवड्यात तुझी चाहूल लागली।”
“छोडो भी दिदी,ये लोग को सब अंधश्रद्धा लगेगी। श्रद्धा और अंधश्रद्धा के बीच का अंतर भला इनको कौन समझाए। मुझे याद है, साहबने सोने का कॉइन दिया था मुझे और भारीवाली साडी..” अम्माला ते दिवस आठवले. तिच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं.
“अम्मा,मेरी जानकी है आपके पास?”
“जानकी बिटिया..अरे है ना..खाना पका रही है। वह आयी है तबसे कुछ न् कुछ काम करती रहेती है।”
“हम उसे लेने आये है अम्मा।” वत्सलाबाई म्हणाल्या.
क्रमशः
जानकी जाईल का वत्सलाबाईंसोबत? पुढे सगळं क्षेमकुशल होईल का अजून काही..पाहुया पुढच्या भागात. प्रतिक्रिया द्या.
सौ.गीता गजानन गरुड.